Soil, brick and stone esakal
सप्तरंग

शब्दसंवाद : माती, वीट आणि दगड...

Marathi Article : माती हा साधा शब्द. खरे म्हणजे भुसभुशीत, लुसलुशीत, गुळगुळीत, काळीशार, तांबडी, पांढरी आणि कोणत्याही साच्यात स्वतःला बसवू पाहणारी माती ही एक उपयुक्त वस्तू.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : तृप्ती चावरे-तिजारे

माती हा साधा शब्द. खरे म्हणजे भुसभुशीत, लुसलुशीत, गुळगुळीत, काळीशार, तांबडी, पांढरी आणि कोणत्याही साच्यात स्वतःला बसवू पाहणारी माती ही एक उपयुक्त वस्तू. पण यापलीकडे जाऊन माती या शब्दाला किती व्यापक आयाम आहेत. तसेच कितीही संवाद साधला तरी वीट येणार नाही असा वीट हा शब्द. पण या शब्दाची तुलना जेव्हा ‘दगडापेक्षा वीट मऊ’, असे म्हणून थेट दगडाशी होते तेव्हा मग दगड या शब्दाशीही संवाद साधावासा वाटतो. (saptarang latest article verbal communication on soil brick and stone )

कुठली ती होती माती, कोण तो कुंभार

घडविता उभा राही पाहा विश्वंभर

तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी

धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी

पाहताच होती दंग आज सर्व संत

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

मराठी भाषेतील काही शब्द अर्थाच्या पलीकडे जाऊन एक वेगळाच भावसंवाद करू पाहत असतात. माती, वीट आणि दगड हे शब्द असेच... वरवर पाहता या तिन्ही वस्तू आहेत; परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात वेगवेगळ्या व्यापक भावनाही लपलेल्या आहेत. त्या शोधून काढणे म्हणजे शब्दसंवाद. वरील तिन्ही वस्तूंचा जसा आपापसांत काहीतरी भौतिक संबंध आहे तसाच या तिन्ही शब्दांचा भाषिक संबंधही आहे.

मातीपासून वीट तयार होते, ही व्याख्या ज्याप्रमाणे भौतिकशास्त्र शिकवीत असते, त्याचप्रमाणे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ ही म्हण काहीतरी भावना शिकवीत असते. जी शास्त्र अर्थ आणि व्याख्या यांच्या पलीकडची असते. हीच तर खरी मराठी भाषेची गंमत आहे. तिच्यात शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ मात्र अनेक असतात. तिच्यातून व्यक्त होणाऱ्या भावना या विविधतेने नटलेल्या असतात. तिच्या उपयुक्ततेतूनही सौंदर्य, तत्त्वज्ञान आणि भावना ही मूल्ये ओसंडून वाहत असतात आणि तिच्या अर्थातून कल्पनेला आणि प्रतिभेला चालनाही मिळत असते.

आता हेच बघा ना, माती हा साधा शब्द. खरे म्हणजे भुसभुशीत, लुसलुशीत, गुळगुळीत, काळीशार, तांबडी, पांढरी आणि कोणत्याही साच्यात स्वतःला बसवू पाहणारी माती ही एक उपयुक्त वस्तू. पण यापलीकडे जाऊन माती या शब्दाला किती व्यापक आयाम आहेत.

१. एखाद्याच्या जीवनाची ‘माती’ होणे या म्हणीतील माती; २. अति तिथे ‘माती’ या सुविचारातील माती; ३. माझ्या मराठी ‘माती’चा लावा कपाळास टिळा या कवितेतली माती; ४. हा माणूस कोणत्या ‘माती’चा घडला आहे, या वाक्यातील माती; आणि ५. या पोराने ‘माती’ खाल्ली या उपहासातील माती...

अर्थाच्या दृष्टीने या पाचही वाक्यरचनांमधील ‘माती’ हा शब्द किती वेगवेगळा आहे ! पण या पाचही वाक्यांमधून ‘माती’ हा शब्द आपण मातीच्याच संदर्भानुसार, पण पाच वेगवेगळ्या प्रकारे उच्चारत असतो, त्यासाठी वेगवेगळे आघात आणि आवाजात चढ-उतारही करत असतो. या शब्दामागच्या भावनाविस्ताराचा परीघही किती मोठा आहे. ‘माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश स्वरांनी...’, ही कवी मनाची माती, ‘देखिला कृष्ण माती खाता, दावियानें बांधी यशोदा माता’ किंवा

शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती ।

उपाय नाही हो चालत, नरहरी जोडितसे कर ॥

ही संतकवींची माती, काळया मातीत तिफन चालविणारी शेतकरी मनाची माती, शाडूच्या मातीपासून मूर्ती घडविणारी भक्ताच्या मनातील माती, इस्टेटीवर मूठमाती सोडणारी वैराग्याची माती, आखाड्यातील पहिलवानांची तांबडी माती, शौर्याची माती आणि प्राण निघून गेल्यावर देहाला पृथ्वीत गाडणारी तीही मातीच.

अशा विविध भावविश्वांशी माती‌ या शब्दाचे सुंदर असे नाते आहे. हे प्रत्येक नाते ‘माती या शब्दाशी‌ आपापल्या परिभाषेतील संज्ञा म्हणून संवाद साधत असते. त्या प्रत्येक संज्ञेला एक वजन असते, तिचे म्हणून एक सामर्थ्य असते आणि स्वतंत्र स्थानही असते.

दुसरे उदाहरण विटेचे देता येईल. वीट म्हणजे इमारतीच्या बांधकामासाठी मातीची भाजलेली चतुष्कोनी वस्तू, अशी भौतिक व्याख्या करता येते; पण ‘संसाराचा वीट आला म्हणून देवाचरणी आलो’ असे म्हणत असताना त्यातून वीट म्हणजे कंटाळा, तिरस्कार, शिसारी अशीही भावना व्यक्त होते.

‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ या भक्तिगीत एकाच वेळी वस्तू संज्ञा आणि भक्तीविभोर भावाचे दर्शन होते. ‘विटणे’ हा शब्दही यापासूनच तयार झाला असावा. विटेवर वीट रचून इमारत तयार होते, तर एखाद्या गोष्टीची सुरवात करणे म्हणजे पहिली वीट रचणे. आपल्या मराठी मनाची भक्ती ही तर अठ्ठावीस युगांपासून भक्त पुंडलिकाने एकाच विटेवर उभी केली आहे. त्यावर संत तुकाराम म्हणतात-

ऐसा कैसा तूं रे धीट । मागें भिरकाविली वीट ॥१॥

कां रे पुंडया मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥२॥

युगें जालीं अठ्ठावीस । अजुनि कां न म्हणे बैस ॥३॥

तुका म्हणे पुंडलीका । तुचि भक्त एक निका ॥४॥

या विटेवरच आपल्या संतांनी अनेक अभंग अजरामर करून ठेवले आहेत. अभंग आणि भक्तिगीते यातून मला सचिन चंद्रात्रे सर यांनी या लेखासाठी दिलेली एक कविता :

युगे अठ्ठावीस विठू, भक्तांसाठी आहे उभा,

माझे मन स्थिराया दे, तुझ्या विटेपाशी जागा ॥

आला प्रपंचाचा वीट, मन होईना रे धीट,

माझ्या डोईवर भार, तुझ्या पायी असे वीट ॥

माझे मन हे चंचल, कधी शांत कधी बंड,

सांगे विठू विटेवरी, रहा अलिप्त अखंड ॥

कोण धावते सारखे? वारा सोसाट्याचा येता

मना बांध रे विठ्ठला, तुझ्या साधन विटेला॥

आता उतर जरासा, तुझी सोडून रे वीट

अन् होऊ दे निवांत, तुझी माझी गळाभेट ॥

कितीही संवाद साधला तरी वीट येणार नाही असा वीट हा शब्द. पण या शब्दाची तुलना जेव्हा ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असे म्हणून थेट दगडाशी होते, तेव्हा मग दगड या शब्दाशीही संवाद साधावासा वाटतो. आदिम अवस्थेतील माणसाची अवजारे दगडांची होती. भक्कम किल्ले हे दगडाचे असायचे. दगडांमधूनच कोरीव काम करण्याची कला विकसित झाली.

मोठमोठी लेणी तयार करताना दगडच उपयोगी पडले. माती आणि दगड यांच्यात तुलना करायची झालीच तर दगड मला केव्हाही श्रेष्ठ वाटतो. कारण विसर्जन करायची मूर्ती ही मातीची बनलेली असते आणि मातीतच मिसळून जाते, पण टाकीचे घाव सोसून देवपण घेणारी मंदिरातली कायमस्वरूपी मूर्ती असते ती दगडाचीच.

एका दगडात दोन पक्षी मारणारा माणूस हुशार आणि व्यवहारात हुशार नसणारा माणूस मात्र दगड, याचे मात्र मला आश्चर्य वाटते. रावणाचे हृदय हे दगडासारखे होते, असे म्हणतात; पण लंकेचा समुद्र पार करण्यासाठी वानरसेनेने प्रभू रामचंद्रांना दगडांचाच सेतू बांधून दिला होता. करोडो रुपये खर्च करून मानव चंद्रावरून काय घेऊन आला, तर तो दगडच.

असा हा दगड अनेकार्थी पण मजेशीर शब्द. एखाद्या क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्ती जगभरात ‘माइलस्टोन’ अर्थात ‘मैलाचे दगड’ अशी गौरविली जाते तेव्हा मला त्या व्यक्तीप्रमाणेच दगडाचादेखील अभिमान वाटतो. असा हा माती, वीट आणि दगडांशी साधलेला शब्दसंवाद मला अभिमान वाटणाऱ्या या दगडचरणी समर्पित. 

(क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT