Mahabharat esakal
सप्तरंग

राजवंश भारती : ऐल राजवंश (चंद्रवंश)

इक्ष्वाकू वंशाची माहिती घेताना आपण पाहिलं की वैवस्वत मनूला दहा मुलगे व मुलगी होती. या मुलीचं नाव ‘इला’. या इलापासून जो वंश सुरू झाला, त्याला ‘इला’चा या अर्थाने ‘ऐल’ वंश म्हटले गेले. या ‘इला’ची कहाणी भलतीच चमत्कारिक आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजवंश भारती

इक्ष्वाकू वंशाची माहिती घेताना आपण पाहिलं की वैवस्वत मनूला दहा मुलगे व मुलगी होती. या मुलीचं नाव ‘इला’. या इलापासून जो वंश सुरू झाला, त्याला ‘इला’चा या अर्थाने ‘ऐल’ वंश म्हटले गेले. या ‘इला’ची कहाणी भलतीच चमत्कारिक आहे.

ती पुराणांमध्ये, रामायणात, उत्तरकांडातही आहे आणि महाभारतातही आहे. इला ही ‘इल’ म्हणून- पुरुष म्हणून जन्मली होती; पण एका शापामुळे ती एक महिना स्त्री व एक महिना पुरुष होत असे. स्त्री रूपात तिचा विवाह बुधाशी झाला.

बुध हा चंद्राचा-सोमाचा मुलगा. त्यांना जो मुलगा झाला, त्याचं नाव पुरुरवा. हा या वंशाचा पहिला राजा. त्याच्या वंशाला आई व पितामह, दोघांचीही ओळख मिळाली. ऐल वंश अथवा चंद्रवंश वा सोमवंश. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या ‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकाचा नायक तोच हा पुरुरवा. (saptarang latest marathi article by adv sushil atre rajvansh bharat All Dynasty chandravansh nashik khandesh)

इलाच्या ‘शापा’ची कथा क्षणभर बाजूला ठेवू. पण, अतिप्राचीन काळातच ज्या व्यक्तीची लिंगबदल प्रक्रिया झाली अथवा केली, ती व्यक्ती म्हणजे इला! ती कशी, हे आज आपण सांगू शकत नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इतक्या प्राचीन काळी, वेदपूर्व काळातही एक राजवंश ‘आईच्या’ नावाने ओळखला गेला होता. ऋग्वेदात या इलाचा उल्लेख ‘इडा’ म्हणून येतो. ऐलवंश कालांतराने चंद्रवंश म्हणूनच परिचित झाला. रामायण हे सूर्यवंशाशी निगडित आहे; तर महाभारत चंद्रवंशाशी निगडित आहे.

पुरुरव्याचा नातू राजा नहुष. हा इतका पराक्रमी होता, की त्याला इंद्रपद मिळाले होते. नहुषाचा मुलगा ययाती- दैत्यगुरू शुक्राचार्यांची मुलगी देवयानी हिचा पती. भारतात लोकप्रिय असणाऱ्या कथानकांपैकी एक म्हणजे कच- देवयानी- ययाती यांची कथा.

मराठी साहित्यात वि. स. खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कादंबरी ‘ययाती’ याच कथावास्तूवर आधारित आहे. ययाती हा अनिवार भोगासक्तीचे प्रतीक मानला गेला आहे. आणि त्याचाच मुलगा पुरू हा त्यागाचे प्रतीक आहे.

त्याने आपले तारुण्य बापाला देऊन त्याचे वार्धक्य घेतले. पण, हाच पुरू पुढे कीर्तिवंत सम्राट झाला. त्याच्यामुळे चंद्रवंशाला ‘पुरूवंश’ हे पर्यायी नाव मिळाले. पौराणिक संदर्भानुसार पुरू हा सूर्यवंशी सम्राट मांधात्याचा समकालीन होता.

पुरूनंतर सुमारे २७ व्या पिढीत दुष्यंत राजा जन्माला आला. कण्व मुनींची मानसकन्या शकुंतला आणि दुष्यंत यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. या दाम्पत्याचा मुलगा हा चंद्रवंशातील दिगंतकीर्ती सम्राट होता. त्याचे नाव भरत.

(तोच- बालपणी सिंहाचे दात मोजणारा!). त्याच्यामुळेच आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव मिळाले. चक्रवर्ती भरताचा प्रदेश तो भारत.

भरतानंतर काही पिढ्या गेल्यावर येतो तो महाराज हस्ती. यानेच हस्तिनापूर नगराची स्थापना केली, आणि ती आपली राजधानी केली. याचा पुढील वंशज आहे ‘कुरू’. इथून चंद्रवंशाची एक शाखा ‘कुरूवंश’ म्हणून ओळखली जाते.

महाभारत युद्धातील एक पक्ष ‘कौरव’, हे कुरूचे वंशज, म्हणून कौरव. अर्थात् तसे पाहिले तर पांडवही कुरूचेच वंशज. पण, त्यांनी आपली स्वतंत्र ओळख, पंडूची मुले- पांडव अशी ठेवली. ज्याठिकाणी महाभारत युद्ध लढले गेले, ती जागाही कुरूच्या नावेच प्रसिद्ध होती- कुरुक्षेत्र.

महाभारताच्या मध्यवर्ती कहाणीला सुरवात होते, ती राजा शंतनूपासून. शंतनूचा समकालीन, चंद्रवंशाचाच; परंतु पुरूशाखेचा वंशज असलेला राजा ‘उपरिचर वसू’ हा चेदी प्रदेशाचा (शिशुपालाचे राज्य) राजा होता.

या वसूची कन्या म्हणजे सत्यवती. तिचा सांभाळ एका धीवराने-कोळ्याने केला होता. तिचा विवाह शंतनूशी झाला. सत्यवतीला विवाहापूर्वी पराशर ऋषींपासून झालेला मुलगा म्हणजे महर्षी व्यास.

कुरुक्षेत्रावर झालेल्या भारतीय महायुद्धात त्या काळी असलेल्या कित्येक राजवंशांचे राजे, वारस मृत्युमुखी पडले. भारताचा राजकीय पट आमूलाग्र बदलला. कुरूचा २५ वा वंशज, युधिष्ठीर संपूर्ण भारताचा सम्राट झाला. या वेळी चंद्रवंश आपल्या कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर होता.

युद्धानंतरच्या निशासंहारात पांडवांची सर्व मुले मारली गेली. त्यामुळे युधिष्ठीरानंतर अर्जुनाचा नातू परीक्षित गादीवर आला. त्याचा मुलगा जन्मेजय. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुराणांचा संदर्भ घेताना या नावांमुळे अनेकदा घोटाळे होतात.

कालक्रम आणि वंशावळ चुकते. चंद्रवंशात परीक्षित आणि जन्मेजय ही नावे अनेकदा येतात. त्यांच्यात अनेक पिढ्यांचे अंतर आहे. ज्या जन्मेजयाचा आपण उल्लेख करतो आहोत, तो चौथा जन्मेजय आहे. त्याचे वडील तिसरा परीक्षित आहेत.

यात फार जगावेगळे, किंवा चमत्कारिक असे काहीही नाही. युरोपच्या इतिहासात मध्ययुगातही असेच चौथा हेन्री, सोळावा लुई वगैरे होऊन गेलेच की! वंशातील एखाद्या पूर्वजांचे नाव मुलाला ठेवण्याची पद्धत फार जुनी आहे.

आणखी एक दिशाभूल होऊ शकते, ती शब्दार्थ आणि वाच्यार्थामुळे. हेच पाहू- रामाचा उल्लेख अनेकदा ‘रघुनंदन’ असा येतो. नंदन म्हणजे ‘मुलगा’ एवढाच अर्थ गृहित धरला तर समजुतीचा घोटाळा होतो. कारण राम हा रघूचा मुलगा नव्हे. इथे ‘नंदन’चा अर्थ ‘वंशज’ असा आहे.

त्यामुळे प्राचीन साहित्यातील घटना, कालक्रम, रूपके व वंशावळी समजून घेताना ‘भारतीय दृष्टिकोन’ ठेवला तर बरीच कोडी उलगडतात. पूर्वग्रहदूषित नजरेने हे साहित्य वाचले तर फारच विसंगत व चुकीचे निष्कर्ष निघतील. काही तथाकथित विद्वानांनी असे चुकीचे निष्कर्ष अगदी ठरवून, हेतुत: काढले आहेत.

स्वत:ला सोयीचे तेवढेच संदर्भाचे तुकडे वापरण्याची त्यांची चलाखी जुनीच आहे. याविषयी अनेक देशी-विदेशी अभ्यासकांची मते, त्यांचे प्रतिवाद, त्यातील तर्कदोष, पूर्वग्रह यांविषयी सविस्तर चर्चा या लेखमालेच्या अखेरीस मी करणारच आहे.

सध्या जन्मेजयाविषयी... तर, या जन्मेजयाने एक ‘सर्पसत्र’ विधी केला होता- यज्ञासारखा. त्या यज्ञाच्या दरम्यान त्याने वैशंपायन ऋषींना आपल्या पूर्वजांचा सगळा इतिहास कथन करण्याची विनंती केली. तेव्हा वैशंपायन मुनींनी राजाला अगदी भरतापासून परीक्षितापर्यंत सगळा इतिहास कथन केला, जो त्यांच्या गुरूंनी- महर्षी व्यासांनी छंदोबद्ध रचला होता.. तेच ‘महाभारत’.

जन्मेजयानंतर कुरूवंशाचे पुढील राजे फारसे प्रसिद्ध नाहीत. त्याच्यानंतर सुमारे २२-२३ पिढ्या गेल्यावर ‘क्षेमक’ नावाचा कुरूवंशाचा राजा हा अखेरचा ठरला. त्याचाही पराभव मगध सम्राट महापद्म नंदानेच केला.

तिथून पुढे इक्ष्वाकू आणि कुरू, दोन्ही वंश मगध साम्राज्यात विलीन झाले. मात्र, मूळ सूर्यवंश आणि चंद्रवंश (सोमवंश) हे नंतर, मध्ययुगातही इतर राजघराण्यांच्या रूपाने कायम अस्तित्वात राहिले आहेत. त्यांची माहिती आपण यथावकाश घेऊच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT