Luv Kush esakal
सप्तरंग

कुमार गायन : मनोहरांचे रामायण

- डॉ. नीरज देव

गोपाल गंगाधर पोतदार अर्थात कवी मनोहर (१८९६) यांचा जन्म साताऱ्याचा होता ते शिक्षक म्हणून कार्य करत. त्यांनी उत्तर आयुष्यात संन्यस्त जीवनाचा स्वीकार केला होता. कवीच्या मृत्युविषयी कोणतीही माहिती मिळत नाही.

मनोहरांनी शांतियुग, परित्यक्ता इ कादंबऱ्या तसेच अनेक कथा, नाटके, प्रबंध नि काव्ये लिहिली. छत्रपती हे खंडकाव्य त्यांनी १०१ वर्षांपूर्वी म्हणजे सन १९२२ साली प्रसिध्द केले. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on lav kush Kumar Gayan Manohar Ramayana nashik news)

भावभेट हा स्फूटकाव्यांचा संग्रह १९३२ साली प्रकाशित केला. त्यातील दुदैव या कवितेत कविने केलेले

पसरेही काळरात । दावीत वीज दात
अंधार आभाळ खात । रडते अभागी प्रीत
गेले थकून हात । करि कमनशीब मात

दुर्दैवाचे हे वर्णन लक्षणीय आहे. त्यात दात दाखविणारी वीज, आभाळ खाणारा अंधार ह्या कल्पना विलक्षण वाटतात. तर थकून गेलेले हात, कमनशीबाची मात या गद्य उक्तींचा पद्यमय उपयोग कवीची उत्तम काव्यशक्तीचे दर्शन घडवून जातो.

मनोहरांचे सर्वोत्तम कार्य म्हणजे त्यांनी रचलेले सुमारे एक लक्ष पंक्तींचे रामायण होय. त्यातील कुमार गायनाचा विचार आपण या लेखात करुया. श्रीरामाने महायज्ञाचे आयोजन केलेले होते तेथे वाल्मिकींसोबत लवकुश होते. ते रामासमोर रामायण सांगायला पोहोचले, हे वर्णन करताना कवि सांगतो,

दोन आले सुकुमार बाल गात । गोड रामायण वाल्मिकीप्रणीत ।।
दोन आले चंद्र सूर्य खाली । प्रणति करण्या रामास यज्ञमेळी ।।

कवीला वाटते की, ते दोघे म्हणजे जणू चंद्रसूर्यच आहेत. नवीन खगोलज्ञानाच्या दृष्टीत चंद्रसूर्याची ही उपमा हास्यास्पद भासत असली तरी कवीच्या काळी ती चालणारी होती आणि आजही मानवी मनाला ती संमोहक वाटते.

तिचा निघणारा अर्थ दिवस-रात्र पृथ्वीला प्रकाश पोहोचविणारे दोन दूत असाच होतो. रामायणरुपी प्रकाश पोचविणारे हे दूतच असल्याने ती उपमा अचूक ठरते. श्रीरामाला वंदन करताना ते त्याची स्तुति गात ‘प्रजारंजनी गाठली उच्च सीमा।’ असा उल्लेख करीत आपला हेतू आरंभीच सूचित करतात.

प्रजारंजनी गाठली उच्च सीमा म्हणजे प्रजेकरता राजाने केलेला उत्कट प्रणयाचा व प्रीतीचा त्याग होय. प्रणय नि प्रीतिसाठी तरुणतरुणी आई-बाप-कुल-धर्म-राष्ट्र साऱ्यांचा त्याग करताना इतिहासाच्या पानोपानी दिसतात.

पण प्रजेसाठी प्रणयाचा त्याग करणारा राम विरळच पण लवकुशांच्या मनांत एवढाच हेतू नाही. कारण त्या त्यागाची दुसरी उत्कट बाजू त्यांना ठाऊक आहे. इतकेच नाही तर ते पण त्याच बाजूचे दुःखभोगी आहेत.

पण त्याचे भांडवल न करता त्यांना केवळ दुसऱ्या बाजूची निष्कलंकता नि निर्मळता मांडायची आहे. म्हणून ते पुढे होऊन श्रीरामांना वंदन करतात. श्रीराम त्यांना त्यांची नावे विचारतात, त्यावेळी ते

कवी प्राचेतस पूज्य गुरु देव । करु रामायणगान करुण देव ।।

आम्ही गुरुदेव वाल्मिकींच्या रामायणाचे गायन करायला आलो सांगत परिचय देण्याचे टाळतात. विषयाला नेमका हात घालित ते गातात,

रामकांता जानकी विपिनवासी । परित्यक्ता हा ! जानकी उदासी ।।

रामचंद्राची रोहिणी सुरुप । रामचंद्रा चिरविरह देई ताप ।।

रामनामाचे वेड जानकीस । नाही सीता चित्तास दुजा ध्यास ।।

कविने जानकीची विपिनवासी म्हणत तिची भौगोलिक नि भौतिक अवस्था, ती उदासी म्हणत भावनिक अवस्था , रामचंद्राला चिरविरह देणारी म्हणत तिची उच्च आत्मिक अवस्था सोबतच श्रीरामांची विरही विकल अवस्था असे विशाल वर्णन केवळ तीन पंक्तीत केले आहे.

तिला रामनामाविना कसलाही छंद नाही सांगत तिची रामासोबतची अनन्यावस्थाच अधोरेखित करत ती बालके साऱ्या सभाजनांच्या हृदयाला आंदोलित करतात. श्रोते नि श्रीराम भावमग्न झाल्याचे पाहत ते अग्निदिव्याचा घोर प्रसंग हुबेहूब वर्णितात तो वर्णितांना

पुसत डोळे गातात बाल वीर । येत श्रोत्यांचा लोचनास पूर ।।
वीर रडतात पुसतात मंत्रि डोळे । रामचंद्रांचे वदन म्लान झाले ।।
अश्रु आले सौमित्रिलोचनात । भरत शत्रुघ्ना ऐकवे न गीत ।।
पुशी डोळे हनुमान महावीर । शांत होता रघुनाथ महा धीर ।।

गाणारे बालक, ऐकणारे श्रोते, मंत्रिवर, सीतेला वनात सोडून येणारा लक्ष्मण, भरत, शत्रूघ्न इतकेच नाही तर महावीर हनुमानाच्या डोळ्यात अश्रू आले तर रामाची माता, ‘माझी सीता कुठे ?’ म्हणून टाहो फोडत आक्रंदू लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पण रणधीर, करुणानिधान श्रीराम शांतपणे सारे ऐकत होते. रसिका ! करुणानिधान श्रीराम सीतेबाबत इतके निष्ठूर कसे? असा प्रश्न तर तुला पडला नाही ना? वेड्या ते करुणानिधान जगासाठी होते. स्वतःसाठी निःष्करुणच होते. ज्याचे दुःख ऐकून सारं जग दुःखी झाले ते श्रीराम अन् ती सीता स्वदुःखाबाबत मौनच होते.

साऱ्या सभेकडे निरखून पाहताना त्या बालकांची दृष्टी श्रीरामावर स्थिरावली, म्लान तरीही गंभीर भाव धारण करणाऱ्या श्रीरामाला त्यांनी विचारले,

‘कुठे वैदेही बैसली लपून ?’

दाटल्या कंठाने त्यांनी पुसले, ‘तुमचे हृदय तर मृदु कोमल आहे, वैदेहीसाठी ते इतके कठोर का केलेत?’  ते ऐकताच श्रीरामाच्या डोळ्यात पाणी आले, रुद्ध कंठाने ते उत्तरले,

प्रजारंजन हे ध्येय रघुवंशी । रजकशंका सर्वस्व सुखा ग्रासी ।।

भारतीय राजनीतिचे चिंतन राजाला जगाचा उपभोगशून्य स्वामी संबोधते. प्रजाहित प्रधान मानते म्हणूनच कौटिल्य सांगतो कि दुष्काळ पडला, आपत्ती कोसळली तर राजाने पहिला विचार प्रजेचा करावा.

स्वतःचा, स्वतःच्या परिवाराचा नाही. तिचेच प्रतिबिंब हरिश्चंद्रापासून शिवराया पावेतो साऱ्या हिंदूराजात पडलेले दिसते. ते सर्वांचा आदर्श असणाऱ्या श्रीरामात नसणार का?  पण ते लवकुशाला एकांगी वाटत होते.

ते विचारु लागले, ‘जसे राजाचे असते तसे प्रजेचे काहीच कर्तव्य नसते का? जानकीवर उगाच अन्याय होत नाही का?‘ बालकांच्या या भाषणाने सभेने लाजेने मान खाली घातली तर श्रीरामांनी इतकी वर्षे दाबून ठेवलेला शोक बाहेर पडला. कुमार गायनाचा पहिला हेतू साध्य झाला.

मनोहरांचे हे कुमारगायन वाचताना गदीमांच्या लवकुश रामायण गाती या गीत रामायणातील गीताचे स्मरण हटकून होईल. विचक्षण वाचकाला मोरोपंताचे रामायणही स्मरेल, यातील सरस कोणते ? असा विचार करायची पण गरज नाही. कारण मूळात रामायणच मधूर आहे आणि राम रसौ वै सः आहे.

कुमार गायन या कवितेच्या माध्यमातून कालौघात लुप्त झालेल्या गोपाल गंगाधर पोतदार अर्थात कवी मनोहरांचे स्मरण करण्याचे भाग्य आपणास लाभते आहे, हे ही थोडके नाही. यातूनच कोणी त्यांचे संपूर्ण रामायण पुढे घेऊन येईल तर मराठीची मोठी सेवा ठरेल.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ असून दशग्रंथी सावरकर या पीएच.डी समतुल्य पुरस्काराने सन्मानीत आहेत.)

Also read:संवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT