संजीवनी रामचंद्र मराठे (१९१६- २०००) यांचा जन्म पुण्याचा. कवयित्री पद्मा गोळे या तिच्या वर्गभगिनी होत. मोठ्या बहिणीच्या - मृत सवतीच्या भावाशी -रामभाऊशी संजीवनीचे प्रेमबंध जुळले. घरच्यांचा विरोध असतानाही तिने त्यांच्याशी लग्न केले.
कवयित्रीला तीन मुली व एक मुलगा होता. त्यातील अंजूच्या पत्रांचा संग्रह कवयित्रीने संपादित केला आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet sanjeevani marathe nashik)
कवयित्री चांगली गायिका होती. त्याच गायकीमुळे ती अगदी शालेय वयातच कवितेकडे वळली. १९३२ साली म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी कोल्हापूरला संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात ती कवयित्री म्हणून पुढे आली.
त्याचवर्षी तिचा पहिला काव्यसंग्रह ‘काव्यसंजीवनी’ प्रकाशित झाला. त्यानंतर तिचे ‘राका’, ‘संसार’, ‘चित्रा’, ‘छाया’, ‘भावपुष्प’, ‘परिमला’, ‘मी दिवाणी’ इ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. तिच्या काव्यावर तांब्यांचा नि काही प्रमाणात रविकिरण मंडळांतील कविंचा प्रभाव होता.
तांब्यांप्रमाणेच तिची कविता आनंदाने, सौंदर्याने नि तृप्ततेने भरलेली आहे. प्रणयप्रधानता तिचा प्रधान गुण असला तरी वात्सल्य तीत ओतप्रोत भरलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने कवयित्रीच्या ‘बरं का गं आई’ आणि ‘हसू बाई हसू’ या दोन बालगीतांच्या पुस्तकांना पुरस्कार देत तोच तिच्या काव्यातून ओसंडणारा वात्सल्यभाव सन्मानिला आहे.
‘बरं का गं आई’ ही कवयित्रीची केवळ वीस पंक्तींची कविता असून तीत एक लहान मुलगी तिच्या आईला ‘तूं आहेस बेबी, मी आहे आई’ हे विसरायचं नाही असे सांगते.
तिची आई तिला सकाळी उठण्यापासून कपडे घालणे, न भांडता खेळणे इ ज्या गोष्टी सांगते त्याच गोष्टी तिच्या आईला ती उलट सांगू लागते. तेव्हा तिच्या त्या बालसुलभ बोलाने रसिक मंत्रमुग्ध होतात. तितक्यात त्या छोट्या मुलीचे,
झोपताना मात्र तूं आई व्हायच
अंगाई म्हणत थोपटत राह्यच
दुपारच काही आठवायच नाही,
बरं का गं आई,
हे विसरायच नाही ! विसरायच नाही !
हे शब्द येतात तेव्हा आबालवृद्ध रसिक संजीवनीच्या संजीवक प्रतिभेवर लुब्ध होतो. या छोट्याशा कवितेत कवयित्रीने एकाचवेळी साधलेले नाट्य नि काव्य खरोखरीच अद्भूत नि मनमोहक आहे.
कवयित्रीच्या इतर प्रणयप्रधान कवितांकडे न वळता तिच्या काव्यविषयक कवितांतील काहींचे अवगाहन करण्याचा मानस आहे. संजीवनीला कविता तिचे श्वासोच्छवासच वाटतात -
श्वासच माझे काव्य जाहले ।
जे ध्यानी मनी स्वप्नी वसते ।
तिमरी वा तेजी मजसंगे ।
लडिवाळपणे हसते--रुसते ।।
श्वास म्हणजे जीवन, जिवंतता; तेच कवयित्रीचे काव्य आहे. तिमिरी म्हणजे दुःखात नि तेजी म्हणजे सुखात. कवयित्रीच्या ध्यानी, मनी, स्वप्नी काव्यच रुंजी घालत राहते. म्हणूनच की काय केशवसूतांच्या ‘आम्ही कोण’ च्या सूरावर सूर धरत ती गाते,
मर्त्य अमुच्या हाती आम्ही
धरिला आहे अमर दिवा ।
श्वसनी अमुच्या भरुनी राहे
स्वर्गामधली विमल हवा ।
अहाहा ! किती बहारदार वर्णन आहे हे ! एखाद्या केशवसूत, गोविंदाग्रज वा बालकवीने पण ज्यावर मान डोलवावी असे. त्यामुळेच कुतुहलाने रसिक तिला पुसायला जातो ‘तुला कविता सूचते कशी?’ त्याचे उत्तर देताना ती सांगते,
थेंबामधून शब्द येतात
शब्दामधून येतात सूर
गाण्यामध्ये न्हाते तेव्हा,
उरतच नाही जवळ दूर
असा काव्य निर्मितीचा सर्वस्पर्शी अनुभव ती रसिकांत वाटते. हा सर्वस्पर्शी नि सर्वग्राही अनुभव रसिक मनास झेपवत नाहीसे पाहून ती व्यथित होऊन वदते -
या जगण्याच्या वहीत झर्झर
पाटपोठ मी कविता लिहिली
कुणास कळला अर्थ तिचा तर
लिपी तेव्हढी कुणास कळली
व्वा ! काय आशयसंपन्न पंक्ती आहेत या ! कवितेचा अर्थ म्हणजे जिवंतता तर लिपी म्हणजे कवितेचे कलेवर होय. लिपीपलीकडचा भाव जाणणे म्हणजे काव्यानंद.
या काव्यानंदाने तिच्या काव्य प्रतिभेवर भाळलेला रसिक पाहून ती ‘तुला काव्य कसे स्फुरते?’ पुसणाऱ्या सुजाण रसिकाला लडिवाळपणे सांगू लागते,
कशी अचानक जनी प्रकटते मनांतली उर्वशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
येथे कशी नंतर प्रश्नार्थक चिन्ह नाही. कारण पहिल्याच पंक्तीत, ‘मनातील उर्वशी म्हणजे मनातील उत्कट, उत्फुल्ल नि उत्तुंग भावना होय.
ती जनांत नि जगांत शब्दरुप घेऊन प्रकटते तेव्हा तिला कविता म्हणतात.’ हे रहस्य तिने उलगडलेले आहे.
दुसरी पंक्ती केवळ लडिवाळपणातून जन्मते त्यामुळे कवितेत मधुर गोडवा निर्माण होतो.
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी
नजरेपुढतीं ठुमकत येती रुपवती कामिनी
हंसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी
स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी
त्याच्या नादे करु पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
किती अप्रतिम नि चपखल उपमा आहेत यातील ! नऊ रसांचे कुंभ घेऊन शब्दरुपी गवळणी ठुमकत ठुमकत येतात. त्या कधी हसतात, रुसतात, तरंगतात, विसावतात.
कवयित्रीच्या मानस अंबरांत विहरणाऱ्या त्या तिच्या सख्या तिला वेध लावतात. त्यांना पाहत ती जो पदन्यास करते तीच तर कविता होय. हे सांगत पुन्हा मला कविता कशी स्फुरते ते सांगणार नाहीची धून ती लावते.
तितक्यात तिला वाटते ‘उषा म्हणजे आकाशाच्या मुखावर विलसणारे स्मित होय.’ ते जेव्हा साऱ्या सृष्टीवर धुंद होऊन ओघळते. तेव्हा भावनांच्या बागेला बहर येतो.
चांदण्यांच्या शुभ्र शीतल रसांत नहात मनोभाव अंतर्बाह्य उजळून निघतात. सुरावर सूर लावत घुमायला लागतात. तीच कविता होय, सांगत ती पुन्हा कविता कशी स्फूरते ते सांगणार नसल्याची रसाळ रट लावते. शेवटी ती,
हे स्वरसुंदर जीवनमंदिर कुणी कसे उभविले
मी न कुणाला दावायची शिलालेख आंतले
समयीमधली ज्योत अहर्निश भावभरे तेवते
तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आलापिते
कशी नाचते कीर्तनरंगी हरपुन जाते कशी
तिला जीवनरुपी मंदिर स्वरमंदिर वाटते. शिलालेख म्हणजे मनावर कायमचे कोरले गेलेले गहन गंभीर तरीही हळवे करणारे भावाक्षरे होत. ते कुणाला दाखवणार नाही म्हणत ती रसिकांना प्रेमाने दाखवत जाते.
समयीतील ज्योत म्हणजे तो शिलालेख दाखविणारा प्रकाश अर्थात काव्य होय. हे उच्चरवाने सांगत आपण कविता कशी स्फूरते ते सांगणार नसल्याचा राग ती आलापते.
संपूर्ण काव्यभर ‘मी कविता कशी जन्मते ते सांगणार नसल्याची’ री ओढत सुरम्य कल्पनांतून ती कवितेची जी जन्मकथा सांगत जाते. ती रसिकमनाला मोहून टाकते.
कवयित्रीची ‘सांगणार नाही’ म्हणत सांगून जाण्याची ही अदा लाघवी नि लाजवाब आहे. त्यावर तिच्या चतूर स्त्रीसुलभतेचा अमिट ठसा उमटलेला आहे. त्यामुळेच सहा-सात दशकांनंतरही ही कविता ताजीतवानी वाटते.
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.