Marathi Poet Vasant esakal
सप्तरंग

शब्द : शब्दांची मर्यादा शब्दांतून सांगणारी कविता!

- डॉ. नीरज देव

वासुदेव बळवंत पटवर्धन उपाख्य कवी वसंत यांचे काव्य मोजके असून विचारप्रवण करणारे आहे. शब्दांचे अवास्तव स्तोम न माजवता ‘शब्दामागील भावनांना समजून घ्या’चा संदेश देणारी त्यांची ‘शब्द’ ही कविता मानवजातीला नित्य उपयोगी पडणारी आहे.

विशेषतः शब्दा-शब्दावरुन वादविवाद घालण्याऱ्या, संसार तोडायला तयार होणाऱ्या आजच्या काळात तर ती अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. या कवितेबाबत आज आपण जाणून घेऊ या... (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet vasant poem that tells limit of words through words nashik news)

वासुदेव बळवंत पटवर्धन उपाख्य कवी वसंत ( १८७० ते १९२१) या कवी व काव्यसमीक्षकाने माध्यमिक शिक्षण नागपूरातून तर बी ए ची पदवी कोलकाता विद्यापीठातून घेतली. सुरवातीस न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकाची व नंतर फर्ग्युसन काùलेजात प्राध्यापकाची नोकरी केली. पटवर्धनांनी स्वीकारलेला अध्यापनाचा पेशा आगरकरांच्या आवाहनातून ध्येय म्हणून आलेला होता.

आचार्य अत्रे, पु य देशपांडे इ दिग्गज त्यांचे शिष्य होत. आचार्य अत्र्यांनी त्यांच्या ध्येयनिष्ठेविषयी एक घटना क-हेचे पाणी या आत्मकथेत नमूद केलेली आहे. अत्रे लिहीतात पटवर्धनांचा एकुलता एक मुलगा मोरेश्वर वारला होता. त्यामुळे त्या दिवशी ते शिकवायला येणार नाहीत अशा अंदाजाने वर्गातील सर्व मुले गप्पा मारत बाहेर उभे होते.

तितकयात लगबगीने पटवर्धन सर आले व त्यांनी शिकविण्यास प्रारंभ केला. योग पहा त्या दिवशीच्या पाठातील पहिलेच वाकय होते, ‘when mohmmad lost his son’ ते वाचल्या वाचल्या त्यांचा कंठ दाटून आला. पण स्वतःला सावरत त्यांनी पुढचा भाग क्षीण आवाजात पूर्ण केला. मुलाच्या मृत्यूपेक्षा विद्यार्थ्याचे हीत नि स्वतःचे कर्तव्य सांभाळणारा असा शिक्षक दुर्लभच होय.

आगरकरांवरील याच निष्ठेतून त्यांनी काही काळ ‘सुधारका’चे संपादकत्व सांभाळले होते. पटवर्धनाचे लिखाण ज्वलजहाल होते. त्यांच्या सुधारणावादी विचारांमुळे हुतात्मा चाफेकर त्यांच्यावर खूप चिडले होते नि त्यातून त्यांनी पटवर्धनांना चोप दिला होता. त्यात पटवर्धनांना तीन दात गमवावे लागले होते.

प्लेगच्या काळात इंग्रजांच्या जुलमी कारभारावरील लिखाणामुळे इंग्रज सरकार ही त्यांच्यावर चिडले. परीणामी त्यांना नोकरीपासून हात धुवावे लागले.

कवीचा काव्य आणि काव्योदय हा काव्याच्या संदर्भात चर्चा करणारा ग्रंथ १९०९ साली प्रकाशित झाला. मराठीतील आधुनिक साहित्यातील तत्वचिंतनाला या ग्रंथापासूनच प्रारंभ झाला असे अनेकांचे मत आहे त्यांनी लिहीलेले ‘शिक्षण, शिक्षक व अभयासक्रम’ हे पुस्तक तसेच ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हा ग्रंथही अत्यंत गाजला या ग्रंथामागील पार्श्वभूमी अशी १९०१ साली भांडारकरांना अशी कल्पना सूचली कि तुकारामांच्या अभंगाची चर्चा करणारे जाणकार लोकांचे एक मंडळ काढावे त्यांनी नियमितपणे एकत्रित बसून तुकोबांच्या अभंगावर चर्चा करावी हा अभिनव उपक्रम सुमारे १६ वर्षे म्हणजे १९१६ पावेतो चालला यात तुकोबांच्या सुमारे १८०० अभंगावर सर्वांगाने चर्चा झाली मंडळात कवी व गणेश हरि केळकर या दोघांकडे टिपण काढायचे काम होते दोघांनी त्यातील ७५० अभंगांवरील चर्चेचे सार सुसंगतरीत्या एकत्रित करुन प्रसिध्द केले त्यातूनच हा ग्रंथ सिध्द झाला आजही तो उपयुक्त आहे.

पटवर्धनांनी वसंत या नावाने काव्यलिखाण केले त्यांचे काव्य मोजके असून विचारप्रवण करणारे

आहे त्यांची शब्द ही कविता आज आपण पाहुयात
शब्द बापडे केवळ वारा । अर्थ वागतो मनांत सारा ।
नीट-नेटका शब्द-पसारा । अर्थाविण पंगू ।।

'शब्द' शब्दाचा अर्थ आवाज आहे. आवाज किंवा ध्वनि हाच कोणत्याही भाषेचा आत्मा असतो. मग ती भाषा माणसाची असो वा पशु-पक्ष्यांची. येथे कवी शब्दाला वारा संबोधतो. वार्याचे मुख्य काम वाहून नेणे असते. ध्वनिला ही वाराच वाहून नेत असतो. शब्द अर्थाला वाहून नेतो म्हणजे तो वार्याचे काम करतो.

जर त्यात अर्थरुपी सुगंध नसेल तर तो नीटनेटका असला तरीही व्यर्थ पसारा ठरतो. पाहिल्याच कडव्यात कवी शब्दांची किंमत साध्य नव्हे तर साधन आहे असे सुचवून जातो.
पुढच्या कडव्यात तो म्हणतो, जर मनं जुळलेली असतील तर हृदयाची भाषा ह्रदयाला आपोआप कळते. मनातील भाव, विचार वा संदेश पोहोचविणे हाच भाषेचा उद्देश असतो. तो मनं जुळाल्याने सहज साधत असल्याने शब्दांची गरज रहात नाही.

शुद्धाशुद्धाकडे बघावे| वैय्याकरणी शब्द छळावे
शुष्कबंधनी का गुंतावे | प्रेमळ हृदयांनी ?
व्याकरणाचे नियम कशाला | कोण मानतो साहित्याला
उठला जो ह्रदयास | उमाळा ह्रदयी विरमावा

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कवी म्हणतो, जेंव्हा ह्रदय जुळलेले असते तेंव्हा शब्दांकडे पाहू नये. मनो-भावनेकडे पहावे. भावनांना भावनांनी साद द्यावी. जणू कवीला सुचवायचे आहे, शब्दांना अधिक महत्व देऊ नये. एखाद्याचा एखादा शब्द पकडून घराघरात होणारे वाद टाळायला हवे.

सुंदर वाक्ये शब्द मनोहर | सरस्वतीचे मंजुळ नूपुर
ऐकायातें हटून अंतर । बसो पंडितांचे ।।

जे शब्दकलांना अधिक किंमत देत बसतात, त्याच्या सौदर्याला भाळतात ते पंडित नि विव्दान त्यासाठी हटून बसणार असतील तर बसू द्या पण जेथे ममता नि प्रीति उत्कंठीत नि उत्साहीत होऊन बसलेल्या असतात तेथे यांचे काय काम? कारण कवीला बहुधा ठाऊक असावे तोंड खोटे बोलण्यासाठीच बनलेले असते जीवाची भाषा अंगअंगांनी बडबडत असते त्यामुळेच तो ठासून सांगतो,

अशुध्द वाकये शब्द मोडके । अवाच्य अक्षर वर्ण तोटके ।
गोड असे अमृताचे भुरके । होती प्रीतीनें ।।

बघा नं । जेंव्हा आपण कोणाशी ममतेने जोडलेले असतो तेंव्हा त्याचे किंवा तिचे मोडके तोडके शब्द, अशुध्द बोल आपल्याला अमृतासारखे गोडच लागतात तीच बाब लिखाणाची ते गिचमीड असले तरी वाचावेसे वाटते घरातील लहान मुले जेंव्हा बोबड््या उच्चारात बोलतात तेंव्हा त्यांचे बोलणे सुधेहूनही मधूरच लागणार प्रस्तुत कविता कोरड््या शब्दांपेक्षा ख-या भावनेला महत्व देणारी आहे भावना असते.

तेंव्हा समोरच्याला काय म्हणायचे ते समजून घेतले जाते याउलट जेंव्हा शब्दांना अत्यधिक किंमत दिली जाते तेंव्हा हमखास अर्थाचा अनर्थ केला जातो नसलेले अर्थ शोधले जातात, असलेले गुण विसरले जातात परीणामी माणसापासून माणूस दुरावत जातो हे कविने अचूक ओळखले आहे

काव्य म्हणजे छंदोमयी, शब्दकळेने नटलेली, वृत्त-अलंकारांनी शृंगारलेली मग अर्थदृष्ट््या निरर्थक असली तर खपून जाणारी अशी कल्पनांचा सुकाळ त्याकाळी झालेला होता त्यासमयी आधुनिक काव्यगुणांचे वर्णन करताना कवि विनायकाच्या संग्रहाला लिहीलेल्या प्रस्तावनेत लिहीतो, ‘’भाषेच्या चमत्कारांपेक्षा अर्थांच्या चमत्कारांचे, त्यातहि बुध्दीला गुदगुल्या करणा-यां रचनेपेक्षां अंतःकरण हालविणा-या रचनेचे महत्व कवींना अधिक वाटू लागलें;

कसरती करण्याचे वेड होते ते गेले कृत्रिम डामडौलाला कवि नाक मुरडूं लागले पण सहज सौभाग्याला आळवूं लागले सभोवारचे जग, भोवतीं होणा-या घडामोडी, ऐहिक व्यवहाराच्या अवगुंठात लपलेल्या अंतःस्फूर्तिं वगैरे गोष्टींनी कवि-हृदयें हलूं लागली काव्याचे विषय बदलले, वृत्त बदलले, ध्येय बदलले, भाव बदलले, थाट बदलले;’’

विनायकाबाबत कविने जे म्हटले ते कवीच्या या काव्यालाही लागू होणारे आहे शब्दांचे अवास्तव स्तोम न माजवता ‘शब्दामागील भावनांना समजून घ्या’चा संदेश देणारी ही कविता मानवजातीला नित्य उपयोगी पडणारी आहे विशेषतः शब्दा-शब्दावरुन वादीवाद घालण्या-या , संसार तोडायला तयार होणा-या आजच्या काळात तर ती अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 9.00 वा. पर्यंत 7.38 टक्के मतदान

Traffic Update: मतदारांची गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड; मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

Chatrapati Sambhajinagar Assembly Election : मतदार संख्येत भर; शाई वाढली, मतदान केंद्रांना तब्बल ७ हजार २०० बाटल्यांचा पुरवठा

Nashik Vidhan Sabha Election : बालेकिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

प्राजक्ता माळी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT