Sant Dnyaneshwar Maharaj esakal
सप्तरंग

पसायदान : मानव्याचे उत्कट, भव्य निधान!

ज्ञानेश्वर माउली हे मराठी मनाला पडलेले अपूर्व स्वप्न होते. अत्यंत उपेक्षित जीवन, तेही जन्मापासून लाभलेल्या या बालकाने स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन केले असते.

- डॉ. नीरज देव

रसिका, आजवर अनेक कवींवर लिहिले, पण आज मन कंपित होतंय. संत ज्ञानेश्वर नि त्यांचे पसायदान यांना स्पर्श करण्याचे धाडस करावे का? न तो माझा अधिकार, ना ती माझी योग्यता.

कंपित मनाने नि थरथरत्या हाताने ज्ञानेश्वरी चाळताना माझी दृष्टी ‘राजहंसाचें चालणें। भूतळीं जालिया शाहाणें। आणिकें काय कोणें। चालावेंचिना?’(१८/१७१४) या ओवीवर गेली.

‘राजहंसाचे चालणे पाहिल्यावर इतरांनी चालणे सोडून द्यावे काय? चालूच नाही काय?’, अशी पृच्छा करणारी ही ओवी मनाला धाडस देऊन गेली व माझे तुटके-फुटके विवेचन प्रसवती झाली. हे किती चूक, किती महाचूक याचा निवाडा तुलाच करायचाय.

(saptarang latest marathi article by dr neeraj deo on sant dnyaneshwar maharaj poetry Pasaydan nashik news)

ज्ञानेश्वर माउली हे मराठी मनाला पडलेले अपूर्व स्वप्न होते. अत्यंत उपेक्षित जीवन, तेही जन्मापासून लाभलेल्या या बालकाने स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन केले असते, बालवयात मायबापाच्या जाण्याने हरवलेले बालपण धर्माला नि रूढीला, पर्यायाने तत्कालीन समाजाला शिव्याशाप देण्यात व्यतीत केले असते, तर कुणास वावगे वाटले नसते.

उलट त्याच्याविषयी सहानुभावच वाटला असता. पण या महापुरुषाने त्यावर अवाक्षरही न लिहिता, विश्वकल्याणाचा वसा उचलला. तो ही आत्मौपम्य वृत्तीने! आत्मौपम्य वृत्ती इतकी विलक्षण, की कुणाला न सुचणारी.

संस्कृत सुभाषितकार सांगतात-

अयं निजः परोऽवेत्ति गणना लघुचेतसाम् ।

उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम् ।।

अर्थात ‘हे माझे नि हे तुझे, असा क्षुद्र विचार न बाळगता उदार हृदयाचे महापुरुष अवघ्या विश्वालाच आपले कुटुंब मानतात.’ याच श्लोकाचा आधार वेगवेगळ्या महापुरुषांचे श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी घेतला जातो. पण आमच्या ज्ञानराजाला ते मान्य नाही, तो सांगतो-

हें विश्वचि माझें घर । ऐसी मति जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपण जाहला ।। १२।२१३

‘हे विश्वच माझे घर आहे,’ अशी ज्याची मति स्थिर झाली, असे म्हणताच त्यांना वाटते, ‘नाही नाही घरात, कुटुंबात तर अनेक जण राहतात. त्यांचे हिताहित निराळे असू शकते. इच्छा-आकांक्षा भिन्नभिन्न असू शकतात.

ते नकोय मला! मला त्याहूनही भव्य हवे’ नि लगेच पुढील पंक्ती अवतरतात. ‘किंबहुना चराचर आपण जाहला।’ विश्व हे कुटुंब नव्हे, तर तो स्वतःच चराचर बनला. त्याला वाटले ‘हे विश्व किती छोटेसे; एका सूर्यमालिकेत मावणारे.

मला तर साऱ्या या सूर्यमालिका, सारे ग्रह-तारे, सप्त स्वर्ग, नरक, पाताळ यांना व्यापून उरणारे विश्व हवे. मग चराचराशिवाय काय असणार?’ मग श्रीज्ञानेश्वर स्वतःच चराचर होऊन उरतात.

त्यामुळे जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलते. पाहता पाहता हा सोळावर्षीय कुमार महाराष्ट्राची, मराठीची नव्हे नव्हे; साऱ्या विश्वाची माउली बनतो.

जगातील कोणत्याही भाषेत; अहो देववाणी संस्कृतात तरी कोणी अशी दिव्य माउली जन्माला आली आहे का? नाही ! अलम दुनियेत कुठेही नाही. ज्यांना मार्ग पुसत ज्ञानदेवांनी गीतार्थ समजून घेतला, ते शंकरही ‘आचार्य’ म्हणून पूजले गेले.

मातेची महती त्यांनाही लाभली नाही. एवढेच कशाला, ज्यांची गीता ज्ञानदेवांनी मायमराठीत आणली, ते योगेश्वर श्रीकृष्ण पूर्णावतार होते, जगद्‍गुरू होते. मातृत्वाचे पद त्यांनाही लाभले नाही.

ज्ञानेशाला माउली म्हणतात, याची अनेक कारणे आहेत. भगवद्‍गीता ही आश्वासनांचा पाऊस करणारी आहे. ‘ती स्त्री, वैश्य, शुद्रादिक सारे परमगतीला प्राप्त होऊ शकतात’, हे महान आश्वासन हजारो वर्षांपासून देत आहे.

त्यामुळे गीतेला माउली म्हणतात. या माउलीचे विवेचन करायला ज्ञानेश माउली बसली. मग आश्चर्यावर आश्चर्य घडले नसते तरच नवल! सोळाव्या अध्यायात दैवासूर संपत्तीचे विवरण करता करता भगवान आश्वासन देतात, ‘ज्याप्रमाणे श्रेष्ठ आचरण करतात, तसे आचरण केले तरी प्राणी परमगतीला प्राप्त होतो.’

पण श्रेष्ठांचे आचरण, अगदी बाह्याचरण करणे तरी सामान्यास कसे शक्य होणार? माउलीला वाटते, यावर एकच उपाय श्रेष्ठांनी कनवाळू होऊन सामान्यांना कवेत घ्यायला हवे. जाणत्यांचा अनुभव सांगतो-

की ईश्वरकृपा व्हायला कारण लागत नाही. केवळ त्याची दृष्टी पडावी लागते. ज्ञानेश्वर माउलींना हे ठाऊक आहे. म्हणून त्यांना वाटते ईश्वरानेच साऱ्यांना तो महान अनुभव का देऊ नये बरे. कारण ते चित्-तत्त्व माउलींना परब्रह्म; परमात्म्याच्या रूपांत नाही, तर अत्यंत प्रेमळ नि मायाळू रूपात दिसते.

तेथ प्रियाची परम सीमा । तो भेटे माउली आत्मा ।

तयें खेंवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ।। १६।४४३

‘माउली आत्मा’, अहो! वेद उपनिषदांना, मोठमोठ्या दृष्ट्या ऋषींना, इतकेच कशाला भगवान श्रीकृष्णांना कुठेही न आढळलेला आत्मा; ‘माउली आत्मा’ ज्ञानदेवाला गवसला. कसा तर ‘प्रेमाची परमसीमा असलेला’.

प्रेमाची परमसीमा फक्त माउलीतच होते, म्हणून ‘माउली आत्मा’! म्हणून ज्ञानदेव माउली बनले. या माउलीपणातूनच पसायदानाचा जन्म होतो.

आता विश्वात्मके देवे ! येणे वाग्यज्ञे तोषावे ।

तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ।।

हा विश्वात्मक देव कोण? १५ व्या अध्यायात माउली सांगतात,

आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तीराजा ।

तो अवधारू वाक्पूजा । ज्ञानदेवो म्हणे ।। १५।५९९

म्हणजे त्यांचे सद्‍गुरु नि ज्येष्ठ बंधू निवृत्तिनाथ होत. कोणी म्हणेल गुरू आणि विश्वात्मक देव हे एक कसे बरे असेल? त्यांना निवृत्तिनाथांची महती ज्ञात नाही. निवृत्तिनाथांना नाथ संप्रदायात उच्च स्थान आहे.

ज्ञानेश्वरांना आध्यात्मिक सिद्धी त्यांनी दिल्यात. ज्ञानेश्वर अमृतानुभावांत सांगतात गुरू नि ईश्वर वेगळे नाहीत. कबीराचेही मंतव्य तेच आहे ‘गुरू गोबिंद दोऊं खडे कां के लागूं पाँव?’ तो गुरूच्याच पायाशी धावतो.

स्वामी विवेकानंदांना भगवान रामकृष्ण ‘राम आणि कृष्णा’चे एकत्रित अवतार वाटत. आदी शंकरांची प्रज्ञा नि बुद्धाचे हृदय रामकृष्णात एकत्रित अवतरले वाटे. त्यामुळे जे ज्ञानेश्वरांना वाटते ते काही वेगळे नाही.

ते विनवितात, ‘आपल्याच कृपेने हे धर्मसंकीर्तन मी केले. आता माझ्याकडे फक्त पाईकपण उरले. या वाग्यज्ञाने प्रसन्न होऊन आपण मला कृपाप्रासादाचे ओंजळभर दान द्यावे.’ पसायचे दोन अर्थ एक म्हणजे पसाभर; ओंजळभर आणि दोन प्रसाद होय. पहिले दान ते मागतात-

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।।

ज्ञानेशाची ही मागणी पाहताच भगद्‍गीतेत भगवंताने दिलेले आश्वासन स्मरते. भगवान सांगतात-

परित्राणाय साधुनां विनाशायच दृष्कृतां ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।। ४।८

‘साधूंचे रक्षण करण्यासाठी मी दुष्टांचा विनाश करायला अवतरत असतो.’ भगवंताने मारलेल्या हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, जरासंध या दुष्टांची यादी फार मोठी आहे. पण माउलींची मागणी वेगळीच आहे, ते दुष्टांचे पारिपत्य करायला भगवंताला बोलावतच नाहीत.

तसे बोलावण्याची गरज पण नाही, कारण ‘मी येईन’ हे त्याचेच आश्वासन आहे. या आश्वासनातील पहिली अट जर साधू असतील तर तो येणार आहे आणि तरच दुष्टांचा नाश करून जाणार आहे. ज्ञानदेवांना ते नकोय.

त्यांची मागणी आहे, दुष्टांतील दुष्ट प्रवृत्ती गळून पडावी. ‘सांडो’ म्हणजे सोडावी नाही तर सांडावी; गळून पडावी. जसे पिकलेले पान गळून पडते तसेच नैसर्गिकरीतीने गळून पडावी. त्यांच्यात सत्कर्माची रती वाढावी.

रती वाढणे म्हणजे निमग्न होणे होय. सत्कर्मासाठी सद्प्रवृतींची गरज असते. त्यासाठी तिसरी पायरी सांगताना ते ‘भूतां परस्परे पडो मैत्र जिवाचे म्हणतात.

भूत म्हणजे तत्त्व होय; पंचमहाभूते आकाश, अग्नी, वायू, पाणी नि जमीन एकमेकांशी अभिन्नपणे जोडलेले असतात, एकमेकांहून अधुरे असतात. तशीच अतूट मैत्री सर्व जिवात राहो. जीव म्हणजे केवळ मनुष्य नाही, तर मनुष्यासह यच्चयावत प्राणी होत.

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।

जों जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ।।

दुरित म्हणजे असत्य किंवा पाप होय. जे अज्ञानातून निर्माण होते. ज्याला ज्ञानदेव तिमिर म्हणतात. उपनिषदांनासुद्धा अज्ञानरुपी अंधकार घालवायचाय. त्यासाठी तेसुद्धा प्रार्थना करतात. ‘तमसो मा ज्योतिऽर्गमय।’ पण ज्ञानेशाला ज्योती नको सूर्य हवा.

कारण कोण्या एकाची नव्हे तर साऱ्यांचाच साऱ्या प्रकारचाच अंधार घालवायचाय. सूर्य हवा तोही विश्व स्वधर्माचा होय. धर्म म्हणजे पंथ, संप्रदाय किंवा एखादी ग्रंथप्रणाली नाही, तर धर्म म्हणजे कर्तव्य! विश्व स्वधर्म म्हणजे वैश्विक नियमांना धरून येणारे कर्तव्य.

तो उगवला, की सत्य आपोआप येते नि असत्यरुपी तिमिर चटकन नाहीसा होतो. याच श्रेणीत ते पुढचा प्रसाद मागतात, ‘ज्या ज्या प्राण्याला जे जे हवे ते ते सर्व मिळो.’ किती अद्‍भुत मागणी आहे ही. प्राचीन वेदर्षी म्हणतात ‘सर्वेत्रः भवन्तु सुखिनः ।’ त्याच दर्जाची ही मागणी आहे.

पण यातही ज्ञानदेव पुढचे पाऊल टाकतात. सर्वजण सुखी व्हावेत, यात ‘सर्वाच्या सर्वच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात.’ हा भाग येत नाही. तो ज्ञानियाच्या या ओवीतील शेवटच्या भागात येतो.

सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायच्या असतील, तर त्या एकमेकांना कोणत्याही दृष्टीने छेदणाऱ्या नसाव्यात. हे दोन प्रकारे संभवते; मुळातून सर्व इच्छांचाच लोप झाला तर किंवा सर्वांच्या सर्व इच्छापूर्तीसाठी प्रत्येकासाठी स्वतंत्र विश्व उभारले तरच. ज्ञानेश्वर महाराज यावर उपाय सांगतात-

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांचि मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।

‘जे सदैव मंगलमयतेचा वर्षाव करीत असतात, अशा ईश्वरनिष्ठांचे समूहाच्या समूह प्रत्येक प्राणिमात्राला सतत भेटत राहोत.’ येथे ज्ञानदेव ईश्वरनिष्ठ म्हणतात, ईश्वरवादी किंवा ईश्वरभक्त म्हणत नाहीत.

वादी-वादासाठी ईश्वराचा उपयोग करतात, तर भक्त मिळणाऱ्या सुख-दुःखावर ईश्वराला तोलतात. ईश्वरनिष्ठ ईश्वराची महती पटवून देण्यासाठीसुद्धा वाद घालत नाहीत. भगवान रामकृष्ण नि केशवचंद्रांचा वाद याचेच उदाहरण आहे.

ईश्वरनिष्ठ ईश्वर लिप्त असतो, तो कधीही चळत नाही. कारण त्याने ईश्वराला जाणलेले असते. कुणीतरी श्रीअरविंदांना विचारले, “Do you believe in the God?’’ श्रीअरविंद तत्काळ उत्तरले, ‘’ No ! I know.” अशा ईशस्वरूप असलेल्यांचे समूहच्या समूह सतत प्रत्येकासोबत असतील.

प्रत्येकासोबत असणे तेव्हाच घडते जेव्हा ती व्यक्तीच स्वतःच ते होते. ईश्वरनिष्ठ कसे असतात, ते सांगताना माउली म्हणतात-

चलां कल्पतरुंचे अरव । चेतना चिंतामणींचे गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

कल्पतरू म्हणजे ज्याखाली बसून केवळ इच्छा केली, की ती तत्काळ पूर्ण होते असा वृक्ष. तो वृक्ष शोधावा लागतो, त्याखाली जाऊन बसावे लागते. पण येथे ज्ञानेश्वर त्या वृक्षांनाच चालायला लावतात नि कल्पवृक्षांचे जंगलच्या जंगल उभे करतात.

कारण ‘जो जें वांच्छिल तो तें लाहो’ ची आंस आहे. म्हणून तर कल्पवृक्षांसोबत चिंतामणीला ते आणतात. चिंतामणी म्हणजे मनोवांच्छा पूर्ण करणारा मणी. ज्ञानेश्वर त्याला ‘चेतना’ जोडतात. चेतना म्हणजे चैतन्य, जागृतता, सजीवता ! चिंतामणीला जो जिव्हाळा नि विवेक नसतो, तो सजीवता असल्याने यांच्यात आपसूक येतो.

अशा चैतन्यमय चिंतामणींचे गावचे गाव ज्ञानेश्वर बोलावितात. चलत्व नि चैतन्यत्व देतानाच ते मधूर वाचेने बोलणाऱ्या अमृताचे समुद्रच्या समुद्र आणतात. हे सारे वर्णन त्या ईश्वरनिष्ठांचे आहे; संतांचे आहे.

संत म्हणजे ‘वसंतः चरंतः लोकानां’ लोकांमध्ये जे वसंत फुलवतात ते. वसंतात चलत्व, चैतन्य नि अमृतत्व तिन्ही असते. सोबतच निरपेक्ष करुणा असते. त्यामुळेच ते साऱ्यांच्या साऱ्या वांच्छा पूर्ण करू शकतात. त्यांचे गुणवर्णन करताना माउली सांगतात-

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जें तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

ते अकलंकित चंद्रासारखे शीतल, तापहीन सूर्यासारखे तेजस्वी असतात. ज्यांनी अन्योक्ती वाचल्यात त्यांना चटकन लक्षात येईल, चंद्र असो वा सूर्य त्यांच्यात दोष असतोच. तोच दाखविताना सूर्यान्योक्तीत कवी म्हणतो-

देशी ताप परी जसजसा येशी नभी भास्करा ।

अत्त्युच्ची पदी थोर ही बिघडतो हा बोल आहे खरा ।

ज्ञानदेव सारे दोष काढूनच साऱ्यांना बोलावतात. तसेच हे अकलंकित चंद्र नि तापहीन रवी आहे. बरे ते दूर कोठे नाही, तर सगेसोयरे म्हणून निरंतर सोबत राहणारे आहे.

सोयरे म्हणजे ‘केवळ कर्तव्य भावनेतून स्वतः झीज सोसून दुसऱ्यांना सुखी करणारे आप्त होत.’ हे लक्षात घेतले तर ज्ञानेश्वरांची आपुलकी ध्यानात येईल. पुढे ते म्हणता- असा जो सर्वसुखी झालाय व पूर्णत्वाला पोहोचलाय.

तो आदिपुरुषाला अखंड भजत राहातो. सुखी माणूस स्वमग्न असतो. स्वमग्न नेहमी आधाअधुराच राहात असतो. पण हा तिन्ही लोकांत पूर्णत्वास पोहोचलाय.

पूर्णत्वास पोहोचलेला शुष्क होतो. पण याचे तसे नाही. तो आदिपुरुषाला भजत राहून जिव्हाळा जपतोय. खरेतर हा मधुराव्दैत भाव आहे. त्यामुळेच ते म्हणतात-

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ।।

विशेषतः या लोकांत तरी हा ग्रंथच जीवन व्हावे. ग्रंथ जीवन होण्यासाठीची कसोटी सांगताना समर्थ रामदास सांगतात, ‘ज्याने परमार्थ वाढतो तो ग्रंथ होय’, जर तसे झाले तर त्यांना दृष्ट म्हणजे या जीवनात नि अदृष्ट म्हणजे मरणोत्तर जीवनात ही विजय लाभावा. ज्ञानेशाची ही भावार्द्र विनवणी ऐकून

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।

सारे पसायदान ऐकल्यावर श्रीविश्वेश्वर उत्तरले, ‘हे पसायदान सफल होईल.’ तो वर ऐकताच ज्ञानदेव सुखी झाले. गुरूच्या शब्दावर किती नितांत श्रद्धा ही ! त्यांनी म्हटले ‘हा होईल दानपसावो’ की ज्ञानेश्वर सुखी झाले.

किती अलौकिक बाब आहे ही! त्यांनी विचारले पण नाही, की ‘केव्हा फळाला येईल ? किती दिवस, वर्ष लागतील?’ कोणताही प्रश्न नाही. केवळ होकारावर समाधान.

त्यांनाही ठाऊक यास काळ लागतो. पण तोवर थांबायला ज्ञानदेव तयार झाले. संजीवन समाधी घेऊन त्या समयाची प्रतीक्षा करीत स्थित झाले.

श्रीज्ञानेश्वरीचे सार म्हणजे पसायदान होय. हे मराठीत आणण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ‘अमृतातेहि पैंजा’ जिंकणारी अक्षरे मेळविली. तरीही पुरेसे वाटेना म्हणून त्यांनी कल्पना केली-

‘म्हणौनि माझे नित्यनवे । श्वासोच्छ्वासही प्रबंध होआवे ।’ १८।१७३८

काय अद्‍भुत कल्पना ! एक प्रबंध लिहायला तीन-चार वर्षे लागतात. उत्तम दर्जाचा लिहायला तप लागते. पण इथे तर ज्ञानदेवांचे श्वास नि उच्छ्वासच प्रबंध होतात. किती ही अद्‍भुत, भव्य, दिव्य नि प्रत्यक्षात उतरवलेली कल्पना ! ज्ञानेश्वरीच्या ओव्या न ओव्या प्रबंध होतात.

पसायदानात त्याचा उत्कर्ष अनुभवायला मिळतो. केवळ त्याचमुळे भावार्थ-दीपिकेसारखे अलौकिक दिव्यरत्न प्रसवता आले. या अलौकिक साहित्यरत्नावर लिहिताना एकनाथ महाराजांसारखा सिद्ध महात्मा गहिवरून उद्‍गरला-

ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओवी करील मऱ्हाटी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ।।

व्वा ! काय प्रत्यंतर ! काय अनुभूती !! ज्ञानेश्वरीनंतर मराठीत जर कोणी ओवी केली तर त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवली, असे होईल. खरेतर ही ओवी करताना स्वतः एकनाथांनीच अमृताच्या ताटात अमृताची वाटी ठेवली.

अशा ज्ञानेश्वरीरुपी अमृताचे सार असलेले हे पसायदान मानवतेसाठीच नाही तर अखिल प्राणिमात्रांसाठी उत्कट भव्य निधान आहे.

याच्या निर्मितीचे भाग्य जगातील कोणत्याही जात-अभिजात भाषेला मिळाले नाही, देवभाषा म्हणून मिरविणाऱ्या संस्कृतलाही लाभले नाही. हे कर्तृत्व केवळ नि केवळ मराठीचे ! म्हणूनच माझी मराठी ‘अमृतातेही पैजा जिंकित’ दिमाखात नि डौलाने उभी आहे.

(लेखांक क्रमांक १३०)

(लेखक प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT