Poet Anant Kanekar esakal
सप्तरंग

माझ्या हृदयाची ऐरण!

- डॉ. नीरज देव

अनंत आत्माराम काणेकर (१९०५ ते १९८०) यांचा जन्म गिरगाव, मुंबईचा होता. त्यांचे शिक्षण बी. ए., एलएलबीपर्यंत मुंबईतच झाले. आरंभी त्यांनी उच्च न्यायालयात वकिली केली, पण १९३३ मध्ये त्यांचा ‘चांद रात’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायाला रामराम ठोकला व साहित्यक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक वर्षे ‘चित्रा’ व ‘आशा’ या नियतकालिकांचे संपादन केले. सोबत नाट्यमन्वंतर या प्रयोगशील नाटकांचे प्रयोग करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. त्यांनी भाषांतरित केलेल्या तीन नाटकांचे प्रयोग याच संस्थेद्वारे केले होते.

(saptarang latest marathi article by dr neeraj dev on marathi poetry of anant kanekar nashik news)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

‘पिकली पाने’, ‘शिंपली आणि मोती’, ‘तुटलेले तारे’, ‘उघड्या खिडक्या’ इत्यादी सात लघुनिबंध, ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, ‘निळे डोंगर’, ‘तांबडी माती’, ‘सोनेरी उन्हात पाचूंची बेटे’ इत्यादी आठ प्रवासवर्णने, ‘जागत्या सावल्या’, ‘काळी मेहुणी’ इत्यादी सहा लघुकथा संग्रह, चार ललित लेखसंग्रह आणि दोन चित्रपटांचे संवाद एवढे साहित्य काणेकरांनी मराठी सारस्वतांना अर्पण केले. नंतरच्या काळात दोन महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून सेवाही दिली. त्यांनी औरंगाबाद येथे संपन्न मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. १९६५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र सरकार त्यांच्या नावाने ललित लेखनास पुरस्कार देत असते.
काणेकरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे लालित्यपूर्ण भाषा होय. त्यांच्या लघुनिबंधांचे संग्रह असो, प्रवासवर्णने असो किंवा लघुकथा संग्रह असो, साऱ्याच्या शीर्षकातूनही ती लालित्यपूर्णता ओसंडून वाहताना सापडते. त्यांनी एकच काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि तोही अगदी साहित्यसेवेच्या आरंभीच्या काळात. त्यातील ‘ऐरण’ ही अर्थपूर्ण नि गेय कविता आज आपण पाहणार आहोत.
कवितेच्या आरंभी आव्हानात्मक भाषेत कवी सांगतो,

घाव घालुनी पहा एकदां,
सोशिल सारे घण माझ्या हृदयाची ऐरण !

आजकाल दुर्मिळ झालेला ‘ऐरण’ हा शब्द पूर्वी ऐ ऐरणीचा म्हणून आपण शिकलेलो बहुतेकांस आठवत असेल. ऐरण म्हणजे जिच्यावर घाव घालून धातूला आकार दिला जातो ती होय. म्हणून तिला आकार देणारी आकारणीसुद्धा म्हणतात. ऐरणीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती कितीही लहान असली तरी त्याहून अधिक जड घणाचे घाव सोसते, तप्त धातूला सहन करते. इतकेच नाही, तर लोखंड असो वा सोने, कठोर कुऱ्हाड असो वा नाजूक कर्णफुले एकाच जिव्हाळ्याने तोलत त्यांना आकार देते, रूप प्रदान करते.

अशी आकार देणारी ऐरण कवीला मानवी हृदयाच्या रूपात गवसते. मानवी हृदय जितके कठोर, तितकेच कोमल असते. मानवी जीवनाचा सारा घडघडावं याच हृदयाच्या ऐरणीवर होत असतो. गंमत म्हणजे ही ऐरण जितके घाव पचवित जाते, तितकी ती अनुभवाने समृद्ध होत जाते नि सोबतच हळवी होत जाते, संवेदनशील होत जाते आणि ज्यावेळी गरज पडते, त्या वेळी ती वज्राहूनही कठोर होऊ शकते. याची जाण असल्यानेच कवी आव्हान देताना दिसतो. तो पुढे म्हणतो,

दुःख येऊन कधी हिच्यावर कपाळ घे फोडून!
कण्हतसे शोक गीत ऐरण !

दुःख देणारे प्रसंग जेव्हा येतात, तेव्हा ती खचून रडत नाही बसत, तर ते दुःखच तिच्यावर आदळून स्वतःचाच कपाळमोक्ष करून घेत असते. कारण मी मनातल्या मनात कण्हत हे सारे दुःख सहन करतो, पण त्याचे प्रदर्शन मांडून बसत नाही. येथे कवी मनाचे कर्तेपणाचे स्थानच अधोरेखित करतो. घरातील कर्त्या व्यक्तीला दाटलेले दुःख एकांतात आठवत धीरगंभीरपणाने वागावे लागते. हे जीवनात कोठेना कोठे प्रत्येकालाच करावे लागते. तेच कवी या कडव्यात चितारतो.

कधी कधी हर्ष मनात दाटून येतो. तो आला, की मन लहान बाळासारखे खिदळत नाचू लागते. त्या वेळी त्याचे ते मंजुळ गीत ‘माझी हृदयरूपी ऐरण’ गाऊ लागते. हे कथन करताना कवी मनाची निरागस भावनाच व्यक्तवित जातो. आणि जेव्हा प्रीतीदेवतेने माझी प्रीत अव्हेरून, लाथाडली होती, तेव्हा माझी ही एरवी कठोर असणारी ऐरण अत्यंत व्यथित होऊन हळवा स्वर आळवित होती आणि तेही तिने सहज पचविले होते. हे सारे ठाऊक असल्यानेच अत्यंत हिमतीने तो सांगतो,

कुणी कधी येउनी घाला येथे घण;
सौंदर्य ज्योतिचे उडतील तेज:कण!
या अशा कणांचे गीत-हीर बनवून,
घाव घालिता, हार हिऱ्यांचा तुम्हालाच अर्पिन !
असली माझी ही ऐरण !

खरोखर, जीवनात सुख देणाऱ्यांयांपेक्षा माणसाला दुःख, व्यथा देणारेच आपले वाटतात. आई- वडिलांपेक्षा बायका, मुले जवळची वाटतात. प्रीत करणारीपेक्षा प्रीत नाकारणारी प्यारी वाटते. हरवते तेच मोलाचे वाटते. त्यामुळेच असेल ज्यांच्यावर आपण प्रीत करतो, प्रेम करतो त्यांचे चुकीचे वर्तन ही आपल्याला कुठेतरी भावत असते. घावामागून घाव घालणारा घणच ऐरणीला अधिक भावतो. घाव घालण्याच्या मिषाने का होईना त्याचा होणारा स्पर्श तिला सुखावून जातो. कारण ती अन् तो वेगळे नसतात, एकाच मुशीत घडलेले असतात. तसेच आपल्या प्रियजनांचे असते, हेच कवीला या कडव्यात सुचवायचे आहे. कवीची हृदयरूपी असलेली ही ऐरण, त्याची एकट्याचीच नव्हे, तर प्रत्येक संवेदनशील माणसाची आहे, हे वाचकाला सहज ध्यानी येते.

प्रस्तुत कवितेत कवीने ह्रदयासाठी वापरलेली ऐरणीची उपमा अत्यंत समर्पक असून, रसिक मनाचा ठाव घेणारी आहे. कवीने अत्यंत मोठा विषय संक्षिप्त रचनेत, केवळ १३ ओळींत साक्षेपाने हाताळला आहे, असेच म्हणावे लागेल. कवितेची रचना सुबक असून, तिच्यातून पाझरणारा अर्थ तरल आहे. थोडक्यात सांगायचे, तर कवीची ही ऐरण, समीक्षकांच्या ऐरणीवर कसास उतरणारी असून, काव्यरसिकांच्या सुप्त ऐरणीवर घणाचे घाव घालीत आंदोलित करणारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi यांची उपस्थिती; काँग्रेस प्रचाराचं रणशिंग फुंकणार! 'या' जिल्ह्यात पहिली रॅली काढणार

Palakkad Train Accident: केरळमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू! पलक्कडमध्ये घडली भीषण घटना

Rohit Sharma च्या घरी नवा पाहुणा येणार! Ritika चा तो फोटो अन् समालोचक हर्षा भोगलेंचं ते विधान...

Sports Bulletin 2nd November : भारताची न्यूझीलंडविरूद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल ते भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागणार

Video : महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद! कुठंए हे मंदिर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT