Kumbh Mela & Aviral Godavari esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : सिंहस्थ नियोजनात अविरल गोदावरीला द्या प्राधान्य !

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

दक्षिणकाशी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात नेहमीप्रमाणे पायाभूत सुविधांचा विषय असणारच. पण यंदाच्या नियोजनात दक्षिणगंगा गोदावरी अविरल वाहती कशी राहील, यासाठी खास प्रयत्न व्हायला हवेत.

गोदावरीत मिसळणारे सांडपाणी कायमचे बंद करून तिचे पावित्र्य जपून धार्मिक पर्यटन कसे वाढेल, यावर आता भर देण्याची गरज आहे. उज्जैनमधील क्षिप्रा आणि काशीच्या धर्तीवर येथेही नाशिक- आणि त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर झाल्यास देशभरात नाशिकची असलेली धार्मिकनगरी ही ओळख दृढ होऊन खऱ्या अर्थाने भाविकांचा येथील ओघ वाढेल.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने कायमस्वरूपी साधूग्राम निर्मिती आणि गोदावरी अविरल वाहती ठेवणे यासाठी राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे. (saptarang latest marathi article by dr rahul ranalkar sahyadricaha matha Aviral Godavari in Simhastha planning nashik news)

दक्षिणकाशी असलेल्या नाशिकसह ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर नगरीत दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा म्हणजे मोठी धार्मिक पर्वणी. यानिमित्ताने साधूसंतांबरोबरच देशभरासह विदेशातूनही भाविक येत असतात.

या भाविकांबरोबरच साधूसंतांचा वर्षभर धार्मिक नगरीत मुक्काम असतो. येणाऱ्या भाविकांची संख्या दर कुंभागणिक वाढत चालली आहे. त्यामानाने नाशिकमध्ये पायाभूत सुविधांची अजूनही काही प्रमाणात कमतरता आहे.

महापालिका, राज्यसरकार आणि केंद्राच्या मदतीतून दरकुंभावेळी या सुविधांमध्ये भर पडत आहे. कुंभमेळ्यासह अन्य वेळी येणारे भाविक विशेषतः दक्षिणेतील भाविक गोदावरी उगमस्थान आणि रामकुंडाच्या दर्शनासाठी येतात.

या भाविकांची आस्था, भावना ही गोदावरीच्या निर्मळ, अविरल रूपाशी जोडलेली असते. मात्र येथे आल्यावर भाविकांचा भ्रमनिरास होतो. तो होऊ नये, यासाठी कुंभमेळ्याच्या नियोजनात दक्षता घेतली गेली पाहिजे, ती म्हणजे गोदावरी अविरल याची. अविरल गोदावरी ही केवळ कुंभ काळात नव्हे तर सदासर्वकाळ वाहती व्हायला हवी. 

उज्जैन येथे क्षीप्रा नदीकिनारी भरणारा कुंभमेळा हा देखील अशाच काहीशा समस्यांनी ग्रस्त होता. क्षीप्रा नदीला कुंभपर्व काळातही पाणी राहत नसे. काहीवेळा तर ती अक्षरशः कोरडी पडत असे. भाविकांसाठी धार्मिक नगरी असलेल्या नदीचे पावित्र्य म्हणजे ती सतत वाहती आणि स्वच्छ असावी हेच असते.

जर ती कोरडी आणि गटारगंगा असेल तर कोणताही भाविक तिकडे फारसा फिरकणार नाही. भाविकांची गर्दी नसेल तर धार्मिक पर्यटनही नसेल. ओघाने त्याचा परिणाम अर्थकारणावरही होतो. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने क्षीप्रा नदी कायमची वाहती राहण्यासाठी थेट नर्मदा नदीतून पाणी आणून ते तीर्थस्थानाच्या काही किलोमीटर आधी क्षीप्रा नदीत सोडले.

त्यामुळे आता क्षीप्रा कायमची वाहती झाली आहे. त्यामुळेच तेथील धार्मिक पर्यटन कुंभमेळा काळ नसला तरी वाढले आहे.

दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर काशीचे देता येईल. तेथेही धार्मिक कॉरिडॉर विकसित करून पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांना नेमके काय हवे आहे, त्यांना कमीत कमी किंवा त्रास होणार नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेत विकास साधण्यात आला आहे.

त्यामुळे आजमितीस काशी हे देशातील सर्वाधिक भेट देणाऱ्या पर्यटकांचे शहर बनले आहे. याआधी सर्वाधिक पर्यटक आग्रा येथे भेट देत होते. उत्तर प्रदेश सरकारने धार्मिक पर्यटनाचे महत्त्व ओळखून तेथे कायमस्वरूपी भाविकांचा राबता राहील, असे नियोजन आणि विकास सिंहस्थाची पर्वणी साधत केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्याकडे गोदावरीचे पावित्र्य राखणे शक्य आहे. कुंभमेळ्याच्या काळात गोदावरीत मिसळणारे पाणी बंद राहू शकते तर मग ते सर्वकाळ का राहू शकत नाही? याचा विचार करून आत्तापासून नियोजन झाले तर हे शक्य आहे. 

आनंदवलीपासून ते चांदोरीपर्यंत गोदावरीत पानवेली वाढण्याचे कारण तीत मिसळणारे सांडपाणी हेच आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, मग धोरणकर्त्यांची इच्छाशक्ती जाते कुठे? हा प्रश्न सोडवून अविरल गोदावरीसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ब्रम्हगिरीवरील पुरातन कुंडांचे पुरुज्जीवन झाल्यास अविरल गोदावरी शक्य असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी अभ्यासाअंती म्हटले आहे. या प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. क्षीप्रासारखा प्रयोग नाशिकमध्येही करता येऊ शकतो, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. 

नाशिकमध्ये धार्मिक पर्यटनासाठी येणारा सर्वाधिक वर्ग हा दक्षिण भारतातील असतो. गोदावरी ही त्यांचीही जीवनदायिनी आहे, त्यामुळे तिच्या उगमस्थानी तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यावे, तिचे अविरल रूप पाहावे, यासाठीच हा पर्यटक येत असतो.

मात्र येथे येऊन गोदावरीचे रूप पाहून तो नाराज होतो. येथील त्याची राहण्याची व्यवस्थाच हायजॅक झालेली आहे, सर्वच भाविक श्रीमंत नसतात, त्यामुळे ही व्यवस्था किफायतशीर दराने काशीसारखी उपलब्ध केल्यास दिलासा मिळेल.

तो पुन्हा येण्याचा प्रयत्न तरी करेल किंवा नाशिकची महती तो आपल्या गावी घेऊन जाईल. त्यातून नाशिकचे चांगले नाव निघेल. काशीच्या धर्तीवर भाविक नजरेसमोर ठेवून आता नाशिकचा धार्मिक पर्यटनवृद्धीसाठी विकास करावा लागणार आहे.

क्षीप्राच्या धर्तीवर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाइपलाइन टाकून ती आनंदवलीच्या आधी गोदावरीत टाकल्यास गोदावरीचे वाहते आणि निर्मळ रूप रामकुंडापर्यंत कायम राहील. हे करणे फार कठीण नाही, त्यासाठी योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती हवी.

त्र्यंबकेश्वराचा समावेश प्रसाद योजनेत करून केंद्र सरकारने येथील धार्मिक महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी पाऊल उचलले आहे. मात्र आज प्रत्येक कुंभमेळ्यावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये काँक्रिटीकरण करून शहराची उंची किमान पाऊण मीटरने वाढली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

दुसरीकडे अनेक जिवंत झरे नाहीसे होऊन त्र्यंबकेश्वरच्या इकोसिस्‍टीमला धोका पोचला आहे. त्र्यंबकेश्वराचे अर्थकारण हे केवळ धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. येथे येणारा पर्यटक हा धार्मिक पर्यटनासाठी येतो.

त्याला मिळणाऱ्या सुविधा किफायतशीर दराने मिळाल्यास तो एक दिवस मुक्काम करू शकेल. आजमितीस तसे हव्या त्या प्रमाणात होताना दिसत नाही. हा मुद्दा कुंभमेळ्याच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि विकास करताना ध्यानात घ्यायला हवा.

नाशिकमध्ये साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा घेण्यासाठी महापालिकेची संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याइतपत आर्थिक स्थिती नाही. त्यासाठी किमान पाच हजार कोटी रुपये शासनाने द्यावेत, असे पत्र महापालिकेने दिले आहे.

त्यावर शासनाने किमान तीनशे एकर जमीन संपादनाचा प्रस्ताव द्यावा, असे सुचविले आहे. त्यावरही वेगाने काम व्हायला हवे.

अर्धकाशी असलेल्या प्रकाशा (जि. नंदुरबार) येथेही सिंहस्थाचे ध्वजारोहण होते. मात्र प्रकाशाच्या विकासाकडे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेले नाही.

त्यामुळे राज्य सरकारने कुंभमेळ्याचे नियोजन करताना प्रकाशाही विचारात घ्यायला हवे. तेथे पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास कुंभकाळात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल. 

Also read:संवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT