K S Azad esakal
सप्तरंग

एज्युकॉर्नर : मुलांशी हवा विश्वासू अन् खुला संवाद!

सकाळ डिजिटल टीम

लेखक : के. एस. आजाद

जडणघडणीत शाळेचा वाटा जितका महत्त्वाचा आहे, त्यापेक्षाही अधिक त्यांना मिळणारे पालकत्व कसे आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. सुजाण अथवा विवेकी पालकत्व स्वीकारण्याची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीत लहान मुलांना घडविणे हे फार मोठे आव्हान आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार पालकत्वाचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पालक जेव्हा आपल्या मुलांशी संवाद साधतात, तेव्हा अपेक्षित संवाद कमी आणि हुकूमशाही, कठोर पद्धतीने बोलण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. हुकूमशाही पालकत्व शैलीला ‘कठोर पालकत्व शैली’ असेही म्हणतात. यामध्ये पालकांचा असा विश्वास असतो, की मुलांनी त्यांचे म्हणणे बिनशर्त ऐकायला हवे.

पालक मुलांना समस्या सोडवणाऱ्या आव्हानांमध्ये सहभागी होऊ देत नाहीत. त्याऐवजी पालक नियम बनवतात आणि त्यानुसार मुलांना काम करण्यास सांगतात. मुलांच्या मतांना किंवा सूचनांना या सर्व प्रक्रियेत फारसे महत्त्व दिले जात नाही. या पालकत्वामध्ये शिस्तीपेक्षा शिक्षेचा अधिक वापर केला जातो, त्यामुळे मुलांना शिकवण्याऐवजी शिक्षा किंवा चुकांच्या धड्यांवर जास्त भर दिला जातो.

अशा परिस्थितीत पालक आणि मुले यांच्यात खुला संवाद प्रस्थापित होत नाही. खरंतर सुसंवाद ही खूप लांबची गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते अशा पालकत्वामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्याचवेळी अशा मुलांना असुरक्षित तसेच भीती वाटत असते. यामुळे बऱ्याच वेळा ही मुले मागे पडतात. यासाठी पालकांनी मुलांवर काटेकोर लक्ष ठेवण्याऐवजी त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलणे गरजेचे आहे.

एकत्र चर्चा करून समस्येचे निराकरण करावे. मुलांवर संशय घेण्याऐवजी त्यांना स्वातंत्र्य द्यावे. परंतु त्यांना इतकेही मुक्त होऊ देऊ नका, की ते निष्काळजी बनतील. पालकांनी संशयी स्वभाव सोडून मुलांवर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे. मुलांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी द्यायला हवी.

मुक्त आचरण ः शिस्तीचा अभाव

मुक्त आचरणास परवानगी देणारे पालक आपल्या मुलांसाठी फारच कमी नियम आणि मर्यादा निश्चित करतात, असे पालक दयाळू असतात. त्यांना आपल्या मुलांना नाही म्हणायला आवडत नाही, ते मुलांना निराश करत नाही, असे पालक सहसा पालकांच्या भूमिकेपेक्षा मित्रासारखे वागण्यावर भर देतात.

त्यांच्या मुलांना त्यांच्या समस्यांबद्दल बोलण्यासाठी अधिक प्रोत्साहित करतात. परंतु काही वेळा ते मुलांच्या चुकीच्या निवडी किंवा वाईट वागणुकी थांबवण्यास फारसा प्रयत्न करत नाही. त्यामुळे मुलांमध्ये शिस्त व नियंत्रणाचा अभाव असू शकतो, अशा प्रकारच्या मुलांमध्ये मोठे झाल्यावर अहंकार प्रवृत्ती निर्माण होते.

तज्ज्ञांच्या मते पालकांनी मुलांशी मैत्री करणे खूप महत्त्वाचे आहे. पण त्याचबरोबर मुलांसाठी काही मर्यादा आणि नियम निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांना त्यांची जबाबदारी समजू शकेल. प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे त्याच्या चांगल्या गुणांची चाचणी घेणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे.

जिथे मुलांना तुमची आवश्यकता असेल, तेथे नक्कीच त्यांना पाठिंबा द्या. पालकांचे वर्तन मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासावर परिणाम घडवून आणते. एखाद्या मुलाने चूक केली, तर त्यास त्याची चूक लक्षात आणून द्यावी. मुलाचा प्रत्येक हट्ट किंवा इच्छा पूर्ण करू नये, त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विश्वासार्ह पालकत्वाचे फायदे

मानसशास्त्रानुसार सामान्य मुलांसाठी विश्वासार्ह पालकत्व शैली सर्वांत प्रभावी आणि फायदेशीर मानली गेली आहे. हुकूमशाही पालकांप्रमाणेच विश्वासार्ह पालकदेखील स्पष्ट नियम बनवतात. परंतु नियमांना थोडीशी शिथिलता दिली जाते, असे पालक सहसा तार्किक आधारित संवाद साधतात. ज्यातून जीवनाचे धडे मिळतात.

मुलांचे घरी वर्तन टाळण्यासाठी त्यांना चांगले वर्तन दृढ करण्यासाठी ते सकारात्मक शिस्तीचा वापर करतात. म्हणूनच असे पालक त्यांच्या चुकीच्या वागण्याबद्दल मुलांना समज देतात आणि चांगल्या वागण्याचे कौतुक करतात. या प्रकारच्या पालकत्वाच्या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे पालक आणि मुलांमधील होणारा मुक्त सुसंवाद.

निर्णय घेण्याची क्षमता वाढते

असे पालक आपल्या मुलांची निंदा न करता त्यांचे निर्णय ऐकतात. त्यामुळे बोलण्याची क्षमता वाढते. या प्रकारामध्ये खासकरून किशोरावस्थेतील मुलांसाठी निरोगी वातावरण तयार केले जाते. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये सकारात्मक संबंध वाढवण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात. अशाप्रकारे पालकत्वांर्गत मुले आनंदी व भविष्यात यशस्वी होतात.

त्यांच्याकडे निर्णय घेण्याची आणि जोखीम मूल्यांकन करण्याची चांगली क्षमता विकसित होते, अशी मुले बहुधा जबाबदार नागरिक होण्याची शक्यता असते. ही मुले कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालेली आपल्याला बघावयास मिळते.

त्यांच्या डोळ्यांनी पाहू द्या जग

यात पालकांनी मुलांचे बोट पकडण्याऐवजी त्यांना त्यांच्या डोळ्यांनी जग पाहण्याची आणि समजण्याची संधी द्यावी. मुलांविषयी पालकांची अधिक काळजी घेणारी वृत्ती त्यांना आत्मनिर्भर होण्यापासून वंचित करते. मुलांना त्यांची स्वतःची छोटछोटी कामे करू द्या, असे केल्यास ते बालपणापासून जबाबदार आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होते.

आपला संयम गमावण्यापूर्वी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुले एखाद्या गोष्टीवर सहमत होत नसतील, तर त्यांची इतरांशी तुलना करण्याऐवजी त्यांना सकारात्मक राहू द्या. पालकच मुलांसाठी आदर्श असतात, त्यामुळे वागायचे कसे, हे मुले आपल्या पालकांकडून शिकतात.

मुलांबरोबर दर्जेदार वेळ घालवा, त्यांच्या दैनंदिन कामात सहभागी होणे हेदेखील मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग आहे. मुलांबरोबर चित्र काढणे, एखादी गोष्ट सांगणे, पार्कमध्ये घेऊन जाणे यांसारख्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावे, मुलांना समजवताना हृदय, मन दुखेल, असे शब्द वापरू नये. परंतु त्यांच्याशी प्रेम व सौम्यतेने वागले पाहिजे.

निष्काळजी पालकत्व धोक्याचे

काही पालकांचे पालकत्व हे अत्यंत निष्काळजी असते, हे सर्वांत हानिकारक पालकत्व मानले जाते. निष्काळजी पालक आपल्या मुलांसाठी कोणत्याही मर्यादा किंवा नियम निश्चित करत नाही. स्वतःच्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्याची कोणतीही जबाबदारी स्वतःवर घेत नाही. असे पालक मुलांच्या मूलभूत गरजा भागविण्यातही हातभार लावत नाहीत.

या प्रकारचे पालक अनेकदा नैराश्य, शोषित, मानसिक, आरोग्य, व्यसनाधीनतेसारख्या अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असतात. त्यामुळे मुलांना मार्गदर्शन, पोषण आणि पालकांचा भावनिक आधार मिळत नाही. अशा मुलांमध्ये आत्मसन्मान, आत्मविश्वास कमी असतो.

मुलांसमोर खोटे बोलू नका

अशा प्रकारचे पालकत्व टाळण्यासाठी मुलांसमोर खोटे बोलू नये. कारण मुले त्यांच्या पालकांचे अनुकरण करतात. मुलांवर दबाव आणण्याऐवजी त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी. नकारात्मक बोलून त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू नये.

मुलांसमोर नकारात्मक शब्द वापरू नये. कारण आपण मुलांशी ज्या पद्धतीने बोलत असतो, मुले ही तर आपल्याशी तशाच प्रकारे बोलतात. कोणत्याही स्पर्धेत हरल्यानंतर मुलाला ओरडण्याऐवजी पुन्हा लढण्यासाठी प्रोत्साहित करा.

अतिशयोक्तीपूर्ण प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे. त्यांच्यासमोर नकारात्मक बोलून, त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका. मुलांकडून अधिक अपेक्षा बाळगू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT