''नथुराम गोडसे बोलतोय'' या नाटकाचे प्रयोग गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यगृहांमध्ये सुरु आहेत. ज्येष्ठ आणि कसलेले अभिनेते शरद पोंक्षे हे दमदारपणे या नाटकातील नथुराम गोडसेची भूमिका साकारतात.
गांधीहत्येनंतर न्यायालयात दिलेल्या नथुरामच्या निवेदनाच्या आधारे या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. ''५५ कोटींचे बळी'' या पुस्तकात हे निवेदन उपलब्ध आहे. हे मूळ पुस्तक इंग्रजीत असून ''मे इट प्लीज यूअर ऑनर'' असं या पुस्तकाचं नाव आहे.
''गांधी हत्या आणि मी'' या गोपाळ गोडसे यांच्या पुस्तकाचाही या नाटकासाठी आधार घेण्यात आला आहे. या नाटकाच्या निमित्तानं तटस्थ भूमिकेतून दिसणारं चित्र मांडण्यासाठीचा हा प्रयत्न... (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on mi nathuram godse boltoy drama nashik)
देशात नथुराम गोडसे, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुषंगानं आजवर अनेकदा वादविवाद घडले आहे, घडत आहेत. त्यात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न अनेकदा होताना दिसतो.
मुळात गांधीद्वेष हा एकूणच या सगळ्या मांडणीमागील प्रमुख धागा आहे. खासकरुन जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख कुठल्यातरी निमित्तानं अथवा भूमिकेतून होतो, तेव्हा देखील नथुरामची ''एंट्री'' आपसूकच तिथं होताना दिसते.
त्यातून नथुराम भक्त हे सावरकरांचे भक्त आहेत, असा एक आभास तयार होतो. किंवा सावरकरांची विचारसरणी मानणारी सगळी मंडळी ही नथुरामलाही मानतात, असा एक मतप्रवाह यातून तयार होताना दिसतो.
अलीकडे तर नथुराम, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार अशी तीन छायाचित्रे वापरुन नथुरामचा प्रचार-प्रसार होताना दिसतोय. ही सरळसरळ बदनामी ठरते. वस्तुतः महात्मा गांधी यांची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली तर डॉ. हेडगेवार यांचे निधन १९४० मध्येच झालेले होते.
विचार मान्य नसतील पण नथुरामनं निवडलेला मार्ग पूर्णपणे चुकीचाच होता. महात्मा गांधी बरोबर की चूक, स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, हे मान्य. पण नथुरामनं केलेली कृती ही लोकशाही विरोधीच आहे.
ही कृती कुठल्याही अंगानं लोकशाहीला पूरक नाही. नथुरामच्या कृत्याचे परिणाम कोणाला भोगावे लागले ? गांधींना जीव गमवावा लागला आणि ही घटना सावरकरांच्या अब्रूवर आली. एकप्रकारे दोघांनाही ते घातक ठरलं.
अभिनेते शरद पोंक्षे हे नथुरामची भूमिका आत्मियतेने नाटकात साकारतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ते भाषणंही देतात. तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा? त्यांना दोन्हींच्या भूमिका मान्य असल्याचा संदेश याद्वारे जातो.
हा विचार हिंदुत्ववादी आणि सावरकरवाद्यांनी करण्याची गरज आहे. चुकीचा मानदंड किंवा मापदंड निर्माण होऊन यातून चुकीच्या पद्धतीनं सुप्त संदेश समाजात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एखाद नाटक तयार केले जाते तेव्हा त्याचे दोन उद्देश असतात. एक म्हणजे त्यातून काहीतरी संदेश द्यायचा असतो आणि दुसरं म्हणजे मनोरंजन करायचं असतं. प्रस्तुत नाटकाचा हेतू हा मनोरंजनाचा नाही, तर तो संदेश देण्याचा आहे.
आणि तो संदेश हाच आहे की, नथुराम कसा बरोबर होता. त्यामुळे एकप्रकारे हे नाटक नथुरामचे उदात्तीकरण ठरते. जेव्हापासून नाटक सुरु आहे, तेव्हापासून नट कायम आहे. तोच नट सावरकरांवर भाषणं देतो. हे अभिनेते गांधींवर भाषण देत असते, तर भाग वेगळा ठरला असता.
मग नाटक नट म्हणून समजून घेता आलं असतं. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणचा श्रोतुवर्गदेखील सारखाच असल्याची शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही नाशिककर असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या अतीव आदरातून हे लिहिण्याची वेळ आमच्यावर आली, हे शेवटी नमूद करायला हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.