Samruddhi Mahamarg Driving esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : समृद्धीच्या निमित्ताने ड्रायव्हिंग व्हावे अपग्रेड!

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

आपल्याकडे ड्रायव्हिंग अजूनही गावठी पद्धतीनं केलं जातं. गावठी हा शब्दप्रयोग मुद्दामहून वापरला. वाहतुकीचे नियम पाळणं अजूनही बहुतेकांच्या अंगवळणी पडलेलं नाही. जर सगळ्या गोष्टी अपग्रेड होत असतील, तर ड्रायव्हिंग कला अपग्रेड करायला काय हरकत आहे..? सगळे सॉफ्टवेअर अपग्रेड करावे लागतात.

मोबाईल अपग्रेडेड घेण्यासाठी सगळेच आग्रही असतात. मग ड्रायव्हिंग पुरातन पद्धतीनं, बेजबाबदारपणे आपण का करतो? आम्ही बदलणार नाही, हवंतर समृद्धीसारखे हायवे नका बनवू...आम्ही जसे आहोत, तसेच राहू...ही मनोवृत्ती अयोग्य आहे.

सारखे अपघात होत असतील तर समृद्धीसारखे महामार्ग बनवायचेच नाहीत का? प्रत्येक वाहनधारक जबाबदारीनं वाहनं का चालवत नाही? गाड्यांचा योग्य मेंटेनन्स का ठेवला जात नाही, या अंगानं देखील विचार करण्याची वेळ आलेली आहे.... (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on samruddhi highway nashik)

ड्रायव्हिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची पद्धत आपल्याकडे अजून रुढ झालेली नाही. साधारण नववी दहावीत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात असताना घरी वाहन असल्यास मुलं आपोआप वाहन चालविणं शिकून जातात.

जणू वारसा हक्कानं ही मुलं ड्रायव्हर्स बनतात. व्हीडिओ गेमप्रमाणे प्रत्यक्ष कार चालवणे शक्य नसते, हे या मुलांना कोण सांगेल? ही पिढी या संदर्भात नेमकं कुणाचं ऐकेल, हा एक गंभीर प्रश्न आहे.  

लोकसंख्येच्या तुलनेत जे काही तुरळक लोक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन चार चाकी वाहन चालविणं शिकतात, त्यांचं देखील उद्दिष्ट स्पष्ट असतं, ते म्हणजे लायसन्स मिळविणं. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जे बेसिक्स शिकवतात, आणि ड्रायव्हर्ससाठीची आचारसंहिता सांगितली जाते, त्याची मुदत ही सर्वसाधारणपणे दोन-तीन आठवड्यांपुरती मर्यादीत असते.

शिवाय या शिकलेल्या गोष्टी वाहनं चालविताना फारशा गांभीर्यानं घ्यायच्या नसतात, ही परंपरा देखील रुढ झालेली आहे. लायसन्स देताना देखील फार गांभीर्यानं परीक्षा घेतल्या जात नाहीत.

अनेकदा तर प्रत्यक्ष वाहन न चालवता देखील लायसन्स दिले जातात. खरं म्हणजे लायसन्स दिल्यानंतर किमान दोन वर्षांनी सर्व चालकांची चाचणी घेऊन ते प्रमाणित करण्याची पद्धत विकसित व्हायला हवी. 

आपल्याकडे वाहन चालवणं हे गावठी पद्धतीचं आहे, याचा अर्थ वाहतुकीचे किमान नियम न पाळण्याची पद्धत रस्तोरस्ती दिसून येते. ओव्हरटेक डाव्या बाजूनं करणं, वळताना इंडिकेटर न देणं, सिग्नल न पाळणं, सिग्नलवरची रेषा न पाळणं, लेन कटिंग करणं, जड वाहनं रस्त्याच्या डाव्या बाजुनं न चालविणं, हेल्मेट-सीट बेल्टचा वापर न करणं, मोबाईलवर बोलणं, वैगरे सतत सुरु असतं.

शहरात वाहन चालविताना हे नियम पायदळी तुडवणं आता अनेकांच्या अंगवळणी पडलं आहे. शहरांमध्ये कदाचित ''चलता है'' अॅटिट्यूड काही वेळा चालूनही जातो.

पण या सवयी समृद्धीसारख्या महामार्गावर जीवघेण्या सिद्ध होत आहेत. शहरांमध्ये वाहन चालवताना लोक सर्रास व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करतात. मोबाईलवर बोलतात. हे प्रकार समृद्धीवर घातक ठरतात.      

गावठी पद्धतीचे ड्रायव्हिंग समृद्धीवर कोणत्याही परिस्थितीत चालत नाही. अन्य कुठल्याही महामार्गावर १२० च्या वेगात ३-४ मिनिटांपेक्षा जास्त वेळ कार चालवता येत नाही. स्पीड ब्रेकर किंवा अवजड वाहने, प्राणी असं काहीतरी अधेमधे येत राहतं.

समृद्धीवर किमान ५० किलोमीटर तुम्ही सलग १२०च्या वेगाने वाहन चालवू शकता. एवढी सवय आपल्यापैकी कुणालाही अजून झालेली नाही. त्यामुळे आता रोड हिप्नोसिस या आपल्यासाठी नव्या असलेल्या मानसिक अवस्थेवर चर्चा होऊ लागली आहे.

प्रचंड वेगात वाहनं असताना एसीचा स्पीड कमी जास्त करणं, गाण्यांचं फोल्डर बदलणं, कॉल रिसिव्ह करणं, मेसेज चेक करणे हे समृद्धीवर जीवघेणे आहे. मग ड्रायव्हर कितीही सराईत का असेनात. 

गाड्यांचे मेंटेनन्स हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. नियमित सर्व्हिसिंग नसणे, टायर्स घासलेले असणे या गोष्टी अंगलट येऊ शकतात. ८०० सीसीच्या आणि सीएनजी गाड्या समृद्धीवर नेताना चार वेळा विचार करायला हवा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्या गाड्यांना पिक अप आणि स्पीड पुरेसा नाही, त्या गाड्यांवर अन्य गाड्या येऊन आदळण्याचा धोका वाढतो. अॅटोमॅटिक गाड्या चालविताना रोड हिप्नोसिसचा शक्यता अधिक बळावते.

क्रूझ कंट्रोल ही फॅसिलिटी आता काही कार्समध्ये असते. पण हा ऑप्शन देखील जीवावर बेतू शकतो. क्रूझ कंट्रोलचा वापर कसा करावा, हे तंत्र नीट शिकून घ्यायला हवे. अॅटोमॅटिक गाड्यांमध्ये शरीराचा केवळ उजवा भाग कार्यरत राहतो.

डाव्या हाताला आणि डाव्या पायाला कमी काम असते. त्यातून शरीरात आलेले शैथिल्य अपघाताला आमंत्रण देऊ शकते. अनेक बारीकसारीक बाबींचा विचार करता समृद्धीच्या निमित्तानं ड्रायव्हिंग कलेचे आता अपग्रेडेशन करण्याची वेळ आहे.

शिस्तीत सगळं पुन्हा एकदा शिकून घ्यावं. शहरातही नियम पाळणं अंगवळणी पडल्यास आणि पुरेशी काळजी घेत समृद्धीवर गेल्यास ड्रायव्हिंगमधील खरा आनंद निश्चितपणानं घेता येऊ शकतो...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT