madhurani prabhulkar 
सप्तरंग

पालक म्हणजे दिशादर्शक (मधुराणी प्रभुलकर)

मधुराणी प्रभुलकर

आई काम करते आणि त्यासाठी तिला बाहेर जावं लागतं हे स्वरालीला माहीत आहे. "आई कुठे काय करते' मालिकेचं शूटिंग मुंबईत सुरू झालं तशी प्रमोदनं स्वरालीची जबाबदारी घेतली. मी तेव्हा ठाण्यात तर प्रमोद आणि स्वराली पुण्यात राहत होते. त्या काळात तिनं कधी रडारड वगैरे केली नाही. अगदी छान राहिली. मीच कधी कधी सेटवर रडायचे; पण स्वराली कधी रडली नाही.

माझे वडील व्यावसायिक होते, तर आई शास्त्रीय संगीत गायिका आहे. आईशी मी जास्त कनेक्‍टेड आहे. तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या कलेबद्दल असणारी ओढ आणि तिचा सातत्यानं पाठपुरावा. तिनं आत्ता पासष्टाव्या वर्षी शास्त्रीय संगीतावरची पीएचडी पूर्ण केली. ती स्वतः दहावीत असताना विशारद झाली होती. तिला अनेक अडचणी आल्या. आमच्या संगोपनापासून आमच्या बाळंतपणापर्यंत तिनं सगळी कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडली. त्यासोबत संगीतसाधना सुरूच होती. तिची ही तळमळ मी लहानपणापासून बघत आले आहे. तो संस्कार माझ्यावर नक्कीच झाला आहे. आई लहानपणी मला वेगवेगळी गाणी अर्थ समजावत शिकवायची. त्यातूनच माझी कवितेची आवड निर्माण झाली.
तिनं पीएचडी पूर्ण केली, तो काळ तर तिच्यासाठी खूपच परीक्षा बघणारा होता. त्यादरम्यान माझ्या मोठ्या बहिणीचं आणि त्यानंतर माझं बाळंतपण झालं. त्यानंतर वडिलांना कॅन्सर असल्याचं समजलं. त्या काळात आई रात्ररात्र जागून काढायची; पण तरीही विशिष्ट वेळेला उठून तिच्या थीसिसवर काम करायची. तिच्या या अफाट जिद्दीपुढे आम्ही खरं तर खुज्याच वाटतो. कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची सौंदर्यदृष्टी तिनं आम्हा दोघींना दिली. कोणतीही गोष्ट केवळ करायची म्हणून करू नये हा तिचा आग्रह असतो. परवाचीच गोष्ट सांगते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच आहेत. त्यामुळे मी घरातच कशाला तरी साधी टिप घालत होते. ते बघून ती लगेच मला म्हणाली ः ""अगं, व्यवस्थित एकसारखी आली पाहिजे टिप.''

वडिलांमुळे आम्हाला वाचनाची गोडी लागली. त्यांना स्वतःला वाचनाची खूप आवड होती. ते बघूनच आमच्यावर वाचनाचा संस्कार झाला. वडिलांना कॅन्सर डिटेक्‍ट झाला, तेव्हा माझ्या बहिणीच्या हातात सहा महिन्याची, तर माझ्या हातात एक महिन्याची मुलगी होती. आजार समजल्यावर आम्हाला त्रास होऊ नये, आमच्या बाळांकडे आमचे दुर्लक्ष होऊ नये, आम्ही मुक्त मनानं आमच्या मुलांना वेळ द्यावा म्हणून आजारपणाची गोष्ट दोघांनी लपवून ठेवली. वर्षभर तेच त्यांचे लढत होते. बाबांची तब्येत पुन्हा बिघडली, तेव्हा कुठं त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली. त्यांची वृत्ती किती धीराची आणि दुसऱ्याचा विचार करणारी आहे हेच यातून दिसून येतं.

माझ्या आणि आईच्या "आईपणात' महत्त्वाचा फरक जाणवतो तो म्हणजे माझी आई ही कायमच "आई' होती. तिचा संगीताचा रियाज सुरू होता; पण ती आवड तिनं कायम दुसऱ्या क्रमांकावर ठेवली. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर मी कधीकधी आई असते; पण जेव्हा असते तेव्हा शंभर टक्के असते. माझ्या पालकत्वाचा स्वरालीवर म्हणजे माझ्या मुलीवर किती आणि कसा परिणाम झाला हे समजायला अजून बराच वेळ आहे- कारण ती आता सातच वर्षांची आहे. आईच्या तुलनेत मी माझ्या व्यक्तिमत्त्वाला मी जास्त प्राथमिकता देते आणि स्वरालीनंही तसच असावं असं मला वाटतं. आपलं व्यक्तिमत्त्व आणि आईपण बॅलन्स करता आलंच पाहिजे आणि हे स्वरालीनंही शिकावं असं माझं मत आहे. स्वराली वयाच्या मानानं खूपच इनडिपेंडंट आहे. ती स्मार्ट आहे- त्यामुळे ती स्वतःला खूपच छान सांभाळू शकते.
एक गोष्ट स्वरालीच्या बाबतीत खूपच जमेची आहे आणि ती म्हणजे तिचा बाबा प्रमोद. तो खूपच प्रोटेक्‍टिव्ह आहे. माझे वडील फार लक्षपूर्वक पालकत्व निभावणारे नव्हते. तेव्हा काळही तसाच होता. पण प्रमोद खूपच सजग आणि जबाबदार पालक आहे. आम्ही आधी मुंबईत राहत होतो. तिथं मुलाच्या वाढीसाठी उत्तम वातावरण कमीच होतं. आम्ही पुण्यात सेकंड होम म्हणून घर घेतलं होतं. त्यावेळी स्वरालीची चाहूल लागलीच होती. त्यामुळे तेव्हाच आम्ही निर्णय घेतला, की येणाऱ्या बाळाला सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरण मिळणं, सगळ्या गोष्टी जवळ असणं, मराठीचे संस्कार होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही पुण्यात येण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यात प्रमोदचा जास्त पुढाकार होता. तो खूप योग्य निर्णय होता.

स्वरालीला वाढवताना आम्ही नेहमीच तिला तिच्या आवडीप्रमाणे छोटेछोटे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केलं. तिला भरपूर झोप मिळावी म्हणून दुपारची शाळा घेतली. मला स्वतःला लहान मुलांना झोपेतून उठवायला आवडत नाही. पहिली काही वर्षं तर नियमित शाळेत गेलंच पाहिजे असाही आमचा आग्रह नव्हता; पण तिलाच शाळा आवडू लागली आणि ती नियमितपणे स्वतःहून जाऊ लागली. ती लहान होती तेव्हापासूनच मी नाटकाच्या काही तालमींसाठी वगैरे जायचे. त्यामुळे तेव्हापासून आई काम करते आणि त्यासाठी तिला बाहेर जावं लागतं हे तिला माहीत आहे. त्यामुळे तिची कधी तक्रार नसते. "आई कुठे काय करते' मालिकेचं शूटिंग मुंबईत सुरू झालं तशी प्रमोदनं स्वरालीची जबाबदारी घेतली. मी तेव्हा ठाण्यात तर प्रमोद आणि स्वराली पुण्यात राहत होते. त्या काळात तिनं कधी रडारड वगैरे केली नाही. अगदी छान राहिली. शिवाय तिचं आणि प्रमोदचं बॉंडिंग उत्तम असल्यामुळे तिला मला सोडून राहणं सोपं गेलं. मीच कधी कधी सेटवर रडायचे; पण स्वराली कधी रडली नाही. ती तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी ग्रीटिंग्ज बनवायची. त्यामध्ये ती एक आई काढायची, एक मुलगी काढायची आणि मग एक हार्ट काढायची ते रडताना दाखवायची. असं ती व्यक्त व्हायची; पण रडून गोंधळ कधी नाही घातला तिनं. याचं कारण म्हणजे आई कामाला जाते हे तिनं स्वीकारलं होतं. मी करत असलेल्या वेगवेगळ्या कामांमुळे तिला कविता, गाणी यांची आवड निर्माण झाली. हे सर्व कदाचित ती आमच्याकडे पाहून शिकली असावी. सध्या लॉकडाऊनच्या काळात ती आणि तिच्या समोर राहणाऱ्या मित्रानं काही नाटकं बसवली, ते आम्हाला बिल्डिंगमधल्या लोकांना दाखवलं. दहा दिवस चित्रकलेचे शो केले. ते दोघं पेंटिंग करायचे आणि आमच्यासाठी रंगवायला काही चित्रं ठेवायचे.

आई होणं, पालक होणं हे एक दान आहे देवानं आपल्याला दिलेलं. माझी आई नेहमी म्हणते, की "आईपण हे व्रत आहे आणि ते आजन्म सुरू असतं. त्याच्यातून रिटायरमेंट कधीच होत नसते. ते निभावत राहावं लागतं.' आपल्या मुलीला सौंदर्यदृष्टी असलीच पाहिजे याबाबत मी आग्रही होते. कारण माणसाकडे सौंदर्यदृष्टी नसेल, रसिकता नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही असं मला नेहमीच वाटतं. ते मी स्वरालीमध्ये रुजवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. स्वरालीला असंख्य मराठी आणि हिंदी जुनी गाणी माहीत आहेत. हे गाणं का आवडतं हे ती व्यवस्थित सांगते. निसर्गातील विविध गोष्टींबद्दल तिच्या मनात प्रचंड कुतूहल आहे. मला याचा नक्कीच आनंद वाटतो.

तिच्याबरोबर मीही बरंच काही शिकत असते. माझं आणि प्रमोदचं भांडण झालं, मी रुसून बसले, तर ती म्हणते ः "मी तुझी आई आहे बरं का!! अगं, एवढंच कारण आहे ना! मग दे ना सोडून!' अशावेळी हसून राग सोडून देणं खूप आनंददायी वाटतं. स्वराली कुठंही गेली तर तिथल्या परिस्थितीशी खूप छान जुळवून घेते. मला ही गोष्ट तिच्याकडून खूप शिकावीशी वाटते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर या पिढीकडूनच आपल्याला खूप गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. पालक म्हणून आपण मुलांना काही शिकवायची गरज नाही. कारण त्यांना इतक्‍या गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत, की आपण फक्त त्याचे दरवाजे, खिडक्‍या उघड्या करून दिल्या पाहिजे आणि त्यासाठी आवश्‍यक असणारा दृष्टिकोन दिला पाहिजे. आपलं आचरण त्यांच्यासमोर काळजीपूर्वकपणे ठेवलं पाहिजे. त्यातून ती शिकत असतात. अगदी शिकवायचंच असेल, तर त्यांची मूळं पक्की करणं गरजेचं आहे. मग ते मूळ तत्त्वांचं असेल किंवा मूल्यांचं असेल. मुलांना खोटं बोलू नकोस असं सांगायचं आणि आपणच त्यांच्यासमोर एखाद्याला छान थाप मारायची हे चुकीचं ठरेल.
आम्ही स्वरालीची शाळा फार हायफाय निवडली नाही. सगळ्या प्रकारचे लोक समाजात राहतात ही जाणीव तिला व्हावी हा हेतू त्यामागे होता. तिच्या बेस्ट फ्रेंडचं घर अत्यंत छोटं आहे. त्यातून तिला बरेच प्रश्न पडतात. आम्ही त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. ती समर्पक आहेत की नाही माहीत नाही- कारण पालक म्हणून आम्हीदेखील अधिक चांगले बनण्यासाठी धडपडच करत आहोत. त्यांची समज, त्यांची डेस्टिनी, त्यांचं प्रोग्रॅमिंग ते घेऊन आले आहेत. आपण फक्त एक आराखडा किंवा दिशा दाखवू शकतो.

स्वरालीला वाढवण्यात प्रमोदचा खूप मोठा वाटा आहे. तो अतिशय उत्तम पालक आहे. तो स्वरालीवर कधीच चिडत नाही. हे त्याचं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. तो म्हणतो की, "मी तिला समजावूनच सांगणार. कळेपर्यंत प्रेमानंच समजावून सांगणार!' त्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. मला सासू-सासरे नाहीत. त्यामुळे मी मुंबईत असते, तेव्हा प्रमोदवर आणि घरातल्या मेडवरच सगळी जबाबदारी असते; पण मला कधीही असं वाटलं नाही, की स्वरालीचं कसं होईल, प्रमोदला जमेल का? वगैरे. प्रमोदनं घेतलेला आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आमच्या ऍक्‍टिंग ऍकॅडमीचं काम घरूनच बघायचं! आमचं मुंबईत आणि पुण्यात प्रत्येकी एक ऑफिस आहे. तिथं तो फक्त रविवारी शिकवायला जातो. बाकी फोन, वेब कॅमेरा याद्वारे बोलून काम करतो. काही वेळा घरी मीटिंग बोलावतो. कामाचे तासही त्यानं स्वरालीच्या वेळेनुसार ऍडजस्ट केले आहेत. तो म्हणतो तिच्यापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही. "तुझी मालिका चालेपर्यंत मी कदाचित नवी फिल्म घेणार नाही,' हे त्यानं मला सांगितलं आहे. असा तो पूर्णपणे वेगळा बाबा आहे. मी त्याला "वेडा बाप' म्हणते. त्याला घरातली कामं करायला अजिबात संकोच वाटत नाही. त्यामुळे ही आईची कामं, ही बाबांची कामं असा स्वरालीला अजिबात फरक जाणवत नाही.

पालकत्व ही आजन्म जबाबदारी आहे; पण ती पार पाडताना आपण खूप भारी आहोत आणि मुलांना काही कळत नाही असा आविर्भाव न ठेवता आपण त्यांना दृष्टी देणं, चांगल्या वाईटाची जाणीव करून देणं एवढंच आपल्या हातात आहे. कदाचित आणखी दहा वर्षांनी मला वेगळं वाटू शकेल कारण त्यावेळी मी देखील पालक म्हणून आणखी मोठी झाली असेन. माझं ऐकलंच पाहिजे असा हट्ट न धरता आपण मुलांच्या हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे. प्रेमाचा झरा सातत्यानं त्यांच्यापर्यंत पोचवत राहिलं पाहिजे. तिला आमच्याबरोबर कायम सुरक्षित वाटलं पाहिजे, काहीही सांगण्यात मोकळेपणा वाटला पाहिजे. हे पालकत्व आहे. तिला ती सुरक्षितता न वाटणं ही पालक म्हणून आमची हार असेल.
(शब्दांकन ः मोना भावसार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT