Gadge Baba esakal
सप्तरंग

दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणारे : संत गाडगेबाबा

सचिन उषा विलास जोशी


संतांच्या शिक्षणासंदर्भातल्या विचारधनाचा मागोवा घेताना संत गाडगेबाबांचे विचार दिशादर्शक तर ठरतातच, पण ते कालातीत अशा मूल्यव्यवस्थेची अखंड पाठराखण करत सध्याच्या शिक्षणपद्धतीचा पाया ठरतात.
नाशिकमध्ये गाडगेबाबांना प्रत्यक्ष पाहिलेली, भेटलेली अनेक माणसं आजही सक्षम रीतीने आणि सक्षमपणे मूर्तिमंत गाडगेबाबा आपल्यासमोर उभे करतात. त्यांपैकी एका आजोबांनी एक किस्सा सांगितला...

हे आजोबा तेव्हा लहान होते. शाळेत जात असत. सहावी-सातवीत असतील. नाशिकमध्ये हॉस्टेलमध्ये राहत असत. अनेकदा दुपारी मित्रांबरोबर पुस्तकं घेऊन समोरच्या बागेत अभ्यासाला जात. एक दिवस अभ्यास करताना सगळ्यांना खूप झोप आली. म्हणून ‘दहा मिनिटं आराम करू या’ म्हणत हे सगळे मित्र डोळ्यांवर आपापलं पुस्तक ठेवून स्वतःपुरता अंधार करत आडवे झाले. पाहा बरं! जी पुस्तकं प्रकाश देतात, त्यांच्या आधारे या मुलांनी स्वतःपुरता चक्क काळोख निर्माण केला. काही क्षणांतच काय झालं, खराट्याचे सपासप फटके त्यांच्या अंगावर बसू लागले. खडबडून जागे होत उठून बसतात तो काय, साक्षात गाडगेबाबा त्यांना जागं करत होते; ‘झोपा कसल्या काढताय? उठा, जागे व्हा. बाकी काही करायचं नसेल तर हा झाडू घ्या-चला, स्वच्छता करा.’ चौथी नापास इतकं शिक्षण घेतलेल्या या डेबूजीने या झोपी गेलेल्या मुलांना जागं केलं... त्यांना मेहनतीचा अर्थ समजावला कारण त्यांनी अखंड कामात असण्याचा वसा घेतलेला होता. या बाबाचा दशसूत्री संदेशच मुळी हा होता...
भुकेलेल्यांना : अन्न, तहानलेल्यांना : पाणी, उघड्यानागड्यांना : वस्त्र, गरीब मुला-मुलींना : शिक्षण, बेघरांना : आसरा, अंध, पंगू, रोग्यांना : औषधोपचार, बेकारांना : रोजगार, पशू, पक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय, गरीब तरुण-तरुणींचं : लग्न, दुःखी आणि निराशांना : हिंमत.

गाडगेबाबांच्या या दशसूत्रीत खरा भारत घडविण्याची गुरुकिल्ली आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकीला स्थान आहे. आजकालचं विद्यार्थ्यांचं आयुष्य हे व्यक्तिकेंद्रित झालं आहे. ‘इट्स माय लाइफ’ या चुकीच्या मूल्यावर आपण सगळे चाललो आहोत. या ठिकाणी गाडगेबाबांची ही दशसूत्री जेव्हा शिक्षणव्यवस्थेत उतरवली जाईल, तेव्हा येणारा समाज स्वत:पुरता विचार न करता तो इतरांसाठी विचार करेल. आनंदी समाजाचा हा पाया आहे. हाच आजचा रोकडा धर्म आहे. बाबा म्हणायचे,
‘‘गोरगरीब आदिवासी मुलांना शिक्षण द्या.
पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा.
हातावर भाकरी खा,बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या..
पण मुलाले शाळेत घातल्याविना राहू नका.
एवढं सगळं झालं की समाज प्रगतीच्या मार्गावरून चालू लागलाच म्हणून समजा की! लागतंच काय दुसरं?’’ गाडगेबाबांनी साक्षर आणि निरक्षर समाजामधील फरक पाहिला. त्यांनी हेरले की जनसामान्यांच्या दारिद्र्याच्या मुळाशी निरक्षरता आहे, अज्ञान आहे. बाबा स्वतः शिकले नव्हते. वडील वारल्यानंतर त्यांना लहानपणी आपल्या आईसोबत मामाच्या घरी आश्रयाला राहावे लागले. मामाही निरक्षर होते. त्यांचा शेतीचा व्यवसाय होता, शेतीसाठी सावकारांकडून कर्ज काढावे लागत असेल तर या संबंधित सावकारांच्या दिवाणजी कशावर तरी अंगठा घेत, हा अंगठा कशावर घेतला हे समजत नसे. मामांचा सावकार व दिवाणजीवर पूर्ण विश्वास होता. मामांनी प्रामाणिकपणाने कर्जाचे हप्ते फेडले. तथापि, सावकारी विचाराने मामांची सर्व जमीन कर्जात गेली. निरक्षरपणामुळे बाबांवरील झालेला भयंकर दुष्परिणाम बाबांनी अनुभवला म्हणून बाबांनी मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्व दिले.
संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सतत सांगायचे, की जे लोक दरिद्री आहेत त्यांचे मूळ कारण त्यांना शिक्षण नाही. आता प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मान्य केला. पण आजही शाळाबाह्य मुलांची समस्या मोठी आहे. इयत्ता पाचवी, आठवीला शाळांमध्येच सोडून द्यायचं प्रमाण खूप मोठं आहे. आता तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच लिहिले आहे, की इयत्ता आठवीमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण तीन कोटींहून अधिक मुलांचे आहे. अशा वेळेस गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं किती महत्त्वाचं हे समजतं. शिक्षणाचं महत्त्व ते अतिशय सोप्या पद्धतीने जनतेला पटवून देण्यात ते माहीर होते.

एका गाडग्यात सारी हिंमत एकवटून कृतिशील समाजकार्याचा वसा कळत्या वयापासून पुढे आयुष्यभर निभावणाऱ्या या डेबूजी झिंगराजी जानोरकरांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या कोतेगाव (शेणगाव) इथे २३ फेब्रुवारी १८७६ ला झाला आणि २० डिसेंबर १९५६ ला अमरावतीत गाडगेबाबांचं निधन झालं.
दरम्यानचा जीवनकाल दीनदुबळ्यांच्या गरजा भागवण्यात, शिक्षणाचा जीव तोडून प्रसार करण्यात आणि वणवण करून जनसमूहापर्यंत पोचून चार खडे बोल सुनावत लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करण्यात गेला. ‘सेवा परमो धर्म:’ म्हणत खऱ्या धर्माची-माणुसकीची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांचे शिक्षणविषयक विचार अभ्यासताना आपण बौद्धिक पातळीवर पुनःपुन्हा शहाणे होतो. ते म्हणत, ‘मी कोणाचा गुरू नाही, माझा कोणी शिष्य नाही.’ स्वच्छता हा देव मानणारा, हा त्या परमेश्वराचा परमभक्त कधीही देवळात गेला नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्यच नव्हती. ‘स्वच्छतेला देव मानणं’ हा विचार खरंतर विद्यार्थ्यांवर शाळेपासूनच बिंबवला पाहिजे. त्यांनी माणसात देव शोधला. शिक्षणावर त्यांची अढळ श्रद्धा होती. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचं साधन आहे, असं ते म्हणत. शिक्षणामुळे आपण या जगात कशासाठी आलो आहोत ते कळतं. अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या वाणीने अखंड प्रहार केले. कृतीने त्या उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला.

एकदा गंगेवर ते ओंजळीत पाणी घेऊन घेऊन डोक्यावरून पाठी फेकत होते.
लोकांनी विचारलं, ‘‘बाबा, हे काय करताय?’’
‘‘माझ्या अमरावतीतल्या शेताले पाणी देतो.’’
‘‘असं कसं पोचंल बाबा इतक्या दूर?’’
‘‘का बरं?’’ म्हणे, ‘‘‘तुम्ही देता ते अन्न, पाणी पार स्वर्गात तुमच्या पितराले पोचतं, तर माझ्या शेताले का न्हाई पोचणार?’’
असा अंधश्रद्धेचा पार इस्कोट करून टाकी बाबा! ते नेहमी कीर्तनात म्हणत, ‘‘मंदिरात देव नाही, पुजाऱ्याचं पोट असतं.’’ त्यांनी देव नाकारला नाही. पण देवाचा खरा अर्थ शोधला. ज्यांच्यापाशी जराही भोंदूपणा नव्हता, अशा सगळ्या खऱ्या संतांनी हेच केलं. देव ही संकल्पना फार सोप्या पद्धतीने उलगडून दाखवली. हे विचार मुलांपर्यंत पोचले पाहिजेत. नाहीतर विद्यार्थी डॉक्टर, शास्त्रज्ञ होतील पण प्रॅक्टिस चालत नाही म्हणून वेगवेगळ्या पूजा करतील. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणाचा पाया आहे. राज्यघटनेतच तसं नमूद केलं जे गाडगे महाराज कृतीतून करून घ्यायचे.

‘सत्यनारायण कुठून आला?’ विचारत गाडगेबाबा. त्याला लोकांनी तयार केलेला देव म्हणत.
ते कीर्तनात म्हणत, ‘मघाशी तुम्ही ती पोथी ऐकलीच असंल. त्या कलावती का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईने सत्यनारायणाचा प्रसाद खाताच झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर. काय?’ उपरोधाने विचारत, ‘आहे का न्हाई हा देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धांत फ्रान्स-अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सोपी युगत अजून त्यांना कुणी सांगितली कशी न्हाई कोण जाणे! बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला की त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला की भराभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील की नाही? सांगा तुम्ही. विलायतची भानगड लांबची. मुंबई बंदरात बुडालेली रामदास बोट तरी पूजा घालून कोणा भगताने बाहेर आणून दाखवावी. बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा हा एक लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका,’ असं कळकळीने सांगत असत.

प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगे महाराजांचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात गाडगेबाबांचं विचारसंचित उलगडून दाखवताना त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. सत्यनारायणाचा दाखलाही यात वाचायला मिळतो.‘आपल्या नजरेसमोर शेकडो अमंगल, अनीतिमान आणि अन्यायी गोष्टी घडतात. चालायचंच हे असं, त्याला कोण काय करणार?’ अशा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तसल्या घटनेचं निरीक्षण, चिंतन-मनन करत तिथेच उभा राहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडायला, फोडायला किंवा तोडायला धावायचा.
‘एका नाक्षर बौद्धाचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्रच नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण? तर, कुळकर्णी महाराज!’
‘दादा पाया पडतो, वाचून दाखवा.’ त्याचे ते पत्र कुळकर्ण्यांनी घेतले.
‘ही माझी लाकडं फोड, मग दाखवतो वाचून.’
‘पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?’
‘आधी लाकडे फोड मग सांगेन पत्र वाचून.’
तास-दीड तास खपून त्याने दीड-दोन गाडाभर लाकडे फोडून रचली.
‘पोरगा खुशाल आहे ना दादा तेवढं तरी सांगा.’ पण प्रत्येक विनवणीला शिवी हासडली जात होती आणि काम पुरे करण्याची दटावणी. जीव कासावीस होऊन तो घामाघूम होऊन वैतागून खाली बसला. ‘पत्र परत द्या,’ म्हणाला. त्याने दिले नाही. तेवढ्यात डेबूजीची स्वारी तिथे आली. त्याने सगळे पाहिले होते.
‘आण रे बाबा, इकडे तुझी कुऱ्हाड.’ डेबूजीने पुढची सारी लाकडे फोडली आणि कुळकर्णी महाशयांकडे नजर रोखून म्हटले, ‘काय देता का न्हाई पत्र त्याचं त्याला परत?’ त्यांनी पत्र परत केलं. डेबूजी त्या माणसाला म्हणाला, ‘आपण दोघंही गाढव. आपण शिकलो असतो तर आपली ही अवस्था झाली असती का? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा.’ या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणाच्या माहात्म्यावर जोरदार प्रवचनं करण्याचा सपाटा चालू ठेवला.त्यांची व्याख्यानं द्यायची पद्धत तर आजच्या शिक्षकांनी खरंच शिकली पाहिजे. ते लोकांना प्रश्न विचारून विचारून प्रबोधन करत असत. लोकांना प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तरं काढून घ्यायची. शिक्षणाच्या संदर्भात समाजमन जागृत करताना गाडगेबाबांच्या अखेरच्या कीर्तनातला पुढील संवाद लक्षवेधी आहे-

‘हे लोक का गरिबीत राहिले?’
‘एक तर याहिले नाही विद्या.’
‘काय नाही?- वि ऽ द्या...’
‘ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी -
- चाले ऽ ल. ...!’

या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ तयार होतो. त्यातून ते ‘जिज्ञासा’ जागृत करत असत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याचा पाया आहे. हे चौथी शिकलेल्या बाबांनी कृतीतून समजावून दिले. शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. हा त्यांचा ध्यास आणि अट्टाहास होता. गाडगेबाबांच्या सगळ्याच कृती आणि सगळेच प्रयत्न कायम यशस्वी होत आले, कारण त्यामागे फार मोठा विचार आणि चिंतन असे. ‘प्रश्नोत्तरातून प्रबोधन’ ही पद्धत फ्रॉइडपासून मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी मांडली. रॅशनल इम्होटिव्ह थेरपीचे जनक डॉ. अल्बर्ट आलीस यांचा आरईबीटीचा पायाच मुळी प्रश्नोत्तराचा आहे. याच्यातूनच माणूस विचार करू लागतो. वास्तविक दोघांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही. पण तुलना यासाठी की गाडगेबाबांनी किती मोठी विचार करण्याची पद्धत आपल्याला दिली आहे. हे विचार जर आज शिक्षणपद्धतीत आणले तर आपली शिक्षणपद्धती खऱ्या अर्थाने प्रगत होईल. बऱ्याच समाजसुधारकांनी त्यांचं मार्गदर्शन घेतले होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनीही त्यांची भेट घेतली होती. गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे.खरंतर गाडगेबाबा हा सगळा प्रत्यक्षात उतरवायचा विषय आहे. भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक यांबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू असते. गाडगे महाराजांचा माणूस समजून घेण्याचा आभाळाएवढा प्रयत्न पाहिला की या सर्व संकल्पनांचा त्यांनी किती सहजपणे विचार केला होता हे प्रकर्षाने लक्षात येतं. त्या अनुषंगाने पायाभूत अशी सगळी मूल्यं त्या काळी लागू होती पण ती जास्त प्रमाणात आत्ताच्या काळात लागू होतात. आता उलट आंतरराष्ट्रीय अंधश्रद्धा मोडीत काढायचं आधुनिक आव्हान आपल्यासमोर आहे.
बाबा हे कर्ते सुधारक होते, त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रचार केला नाही तर शिक्षण संस्था व गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहे काढलीत व लोकांना प्रेरणा दिली. इतकेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी गोळा करून दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची शैक्षणिक कार्याबाबत बाबा नेहमी भेट घेत असत. १९३९ मध्ये सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या शाळेचा उद्‍घाटन समारंभ होता, त्या दिवशी रात्री तिथे बाबांच्या कीर्तनाला अपार जनसमुदाय लोटला होता. बाबांनी कीर्तनात सांगितले, मुलांना निरक्षर ठेवणं पाप आहे आणि दुसरं पाप म्हणजे नशा करणं. भाऊराव लोकांचं भलं करावयास निघाले, त्यांना मदत करा, शैक्षणिक कार्याला मदत करणं हीच देवाची खरी भक्ती आहे... हीच देवाची महापूजा होय. यादुसरे पुण्य नाही. बाबा कधीच देवळात गेले नाहीत. त्यांनी शिक्षणाला, स्वच्छतेला, गरिबांच्या मदतीला देवकार्य मानले.

अशा या फकिराने पैसा उभा करून शंभरहून अधिक धर्मशाळा बांधल्या हे सर्वज्ञात आहे. सर्व धर्मशाळांतून गाडगे महाराज मिशनतर्फे आजही रोज मोफत दुपारी चारला जेवण मिळतं; ही चारची वेळ का.. माहिती आहे? कारण दोन्ही वेळचं एकदम मिळावं म्हणून. आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत व्हावं, या हेतूने इस्पॅलियर स्कूलकडून दर वर्षी एक उपक्रम राबवला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सेंड-ऑफच्या दिवशी ठीक चार वाजता आम्ही मुलांना घेऊन गाडगेबाबा धर्मशाळेत जातो. गाडगेबाबांचे विचार त्यांना समजावून सांगितले जातात. मुलांच्या हातून तिथे अन्नदान करून गोरगरिबांचा आशीर्वाद घेतला जातो. हा आशीर्वादही कृतिशील व्हावा आणि संत गाडगेबाबांनी फार पूर्वीच सुचवलेल्या शैक्षणिक वैज्ञानिक मार्गावरून आधुनिक भारताची ही वाटचाल व्हावी ही सदिच्छा!

(लेखक ज्येष्ठ शिक्षण अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT