Saptarang Marathi features 
सप्तरंग

ग्राहकांच्या सहकार्यातून सहनिर्मिती

आश्विनी देशपांडे

DIY म्हणजे स्वतः करून पाहणं. त्यात आनंद आणि समाधान आहेच; पण प्रत्येक सेवा अथवा उत्पादन ग्राहकाला तयार करू देणं शक्‍य नसतं. कल्पना, नियोजन, डिझाईन, उत्पादन आणि विक्री या सगळ्याच क्रिया उत्पादकांनी संपूर्णपणे स्वतःकडं ठेवणं आणि ग्राहकांना DIY विचारसरणीप्रमाणे अंतिम स्वरूप स्वतः तयार करू देणं ही रचनेची दोन टोकं समजली. मात्र, यात सुवर्णमध्यही आहे. 

तो म्हणजे ग्राहकांबरोबर संवाद साधून, त्यांच्या सहकार्यानं केलेली सहनिर्मिती. 
पायातली चप्पल नेमकी कुठं टोचते हे ती घालणाऱ्याइतकं नेमकं दुसऱ्या कुणालाही सांगता येणार नाही; त्यामुळं प्रत्यक्ष त्या व्यक्तीनं जर त्या चपलेच्या डिझाईनमधला आणि निर्मितीमधला दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ते सगळ्यात जास्त कार्यक्षम ठरेल. आता ती व्यक्ती उत्पादनाच्या पद्धती, मटेरियल आणि तंत्रज्ञान यात कुशल नसणार. तेव्हा त्या गोष्टींसाठी प्रॉडक्‍ट डिझायनर, इंजिनिअर आणि कुशल कारागीर यांची मदत लागणारच. यात पुढं ब्रॅंड डिझायनर आणि जाहिराततज्ज्ञ आणि 
त्याहूनही पुढचा टप्पा म्हणजे चप्पल वापरून टाकून दिली गेल्यावर त्या मटेरियलची विल्हेवाट कशी लागणार यासाठी पर्यावरणाचा विचार करणारे तज्ज्ञही हवेत. चप्पल हे एक सोपं उदाहरण झालं. अशा असंख्य वस्तू आणि सेवा या ग्राहक-उत्पादक-डिझायनर्स यांनी एकत्र येऊन योजल्या तर त्या परिपूर्ण असण्याची मोठी शक्‍यता निर्माण होऊ शकते. 
* * * 

कात्रीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या 'फिस्कर' या फिनलंडस्थित आणि तब्बल 369 वर्षं सुरू असलेल्या कंपनीची ही गोष्ट आहे. त्यांच्या अतिशय लोकप्रिय अशा केशरी मूठ असलेल्या कात्रीच्या डिझाईनला यावर्षी 50 वर्षं होतील. या डिझाईनच्या शंभर कोटी कात्र्या जगभर विकल्या गेलेल्या आहेत. 

अतिशय थोडा फेरफार झालेलं हे डिझाईन क्‍लासिक म्हणता येईल. कारण, ते सतत 50 वर्षं वापरणाऱ्यांच्या कसोटीला उतरलेलं आहे आणि आजतागायत ते सर्वोत्तम मानलं जातं. मात्र, इतका संपन्न वारसा असलेल्या ब्रॅंडच्या अस्तित्वाला काही वर्षांपूर्वी कमी दर्जाच्या, नकली, स्वस्त चिनी उत्पादनांमुळं मोठा धोका निर्माण झाला होता. या कंपनीचा बालेकिल्ला म्हणजेच सगळ्यात जास्त विक्री जिथं होते ती अमेरिका. बाजारात शिरलेल्या नकली उत्पादनामुळं मूळ कंपनीचा तिथला विक्रीचा हिस्सा झपाट्यानं खाली जात होता. या समस्येवर 'मोठमोठ्या जाहिरातींचा मारा' हा उपाय चालणार नाही, हे समजून-उमजून फिस्करची मार्केटिंग टीम एका वेगळ्याच डिझाईन कंपनीकडं चर्चा करायला गेली. त्यांच्या अपेक्षेनुसार, 'ब्रेन्स ऑन फायर' या 
सामाजिक समस्यांसंदर्भात सामूहिक बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या डिझाईन कंपनीनं फिस्करच्या समस्येकडं अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांनी कात्री वापरणाऱ्यांचे दोन ढोबळ गट केले.

पहिला गट म्हणजे, जे आपल्या व्यवसायासाठी कात्री वापरतात त्यांचा गट. उदाहरणार्थ : फॅशन डिझायनर, टेलर, हेअर ड्रेसर इत्यादी. त्यांची व्यावसायिक कामगिरी चांगल्या उपकरणांवर अवलंबून असल्यामुळं हा गट दर्जेदार उपकरणं घेण्याबाबत सहसा तडजोड करत नाही. हा गट बऱ्याच प्रमाणात फिस्करच्याच कात्र्या वापरत होता. दुसरा मोठा गट म्हणजे, हस्तकला, हस्तव्यवसाय आणि छंद म्हणून कलाकुसर करणारे. यात छोटे हस्तकला प्रकल्प करणारी शाळकरी मुलंही आली. या गटाचा आपल्या कामाकडं पाहण्याचा दृष्टिकोन फारसा गंभीर नव्हता. 2005-2006 च्या सुमारास सोशल मीडिया आजच्याएवढा विस्तारलेला नसल्यामुळं आपण केलेली कलाकुसर अभिमानानं दाखवण्याची फारशी संधीही या गटाला नव्हती.

'ब्रेन्स ऑन फायर' कंपनीच्या 'डिझाईन थिंकर्स'नी या गटावर आपलं लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. कारण, फिस्करची तीन हजार कोटी डॉलर्सची उलाढाल केवळ या गटावर अवलंबून होती. सुमारे दीडशेहून अधिक हस्तकलाकार, छंदवर्ग चालवणारे कलाकार, शाळांमधले हस्तकला शिक्षक यांच्याशी त्यांच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारल्यावर असं लक्षात आलं, की आधी समजूत होती त्यापेक्षा यांचा वयोगट बराच तरुण आहे. त्यांना त्यांच्या कलेची फारशी कदर होत नसल्याची खंत आहे आणि आपण तयार केलेल्या सुंदर वस्तू इतर कलाकारांना दाखवण्याची, स्वतः शिकलेल्या काही खास गोष्टींची चर्चा करण्याची संधी नसल्यामुळं त्यांच्यामधली सृजनशीलता खुंटत चालली आहे. 

चाळिशीच्या आतल्या वयोगटातल्या या महिलांना संधी मिळाली तर समविचारी असलेल्या हजारो महिलांना त्या त्यांच्या कलेबाबत प्रोत्साहित करू शकतील, या विचारानं एक अगदी आगळा-वेगळा कार्यक्रम पुढं आला. जोखून-पारखून केवळ चार महिलांना 'फिस्केटियर' म्हणजेच 'फिस्कर कंपनीचे दूत' म्हणून तयार करण्यात आलं. समव्यावसायिक महिलांशी संवाद साधण्यासाठी ब्लॉग आणि कलेची प्रात्यक्षिकं या माध्यमातून त्यांनी छोट्या प्रमाणात योग्य पद्धती, कल्पना प्रत्यक्ष 
आणण्यासाठी लागणाऱ्या योजना, उपकरणं यांची माहिती द्यायला सुरवात केली. त्यांनी फिस्कर ब्रॅंडबद्दल मुद्दाम बोलावं, अशी अपेक्षा अजिबात नव्हती. कलेसाठी योग्य त्या सूचना आणि सल्ला देणं एवढंच त्यांनी करायचं होतं. हळूहळू या कल्पनेला मोठा आकार येत गेला. दोनच वर्षांत अमेरिकेतल्या सगळ्या राज्यांमध्ये एक हजार फिस्केटियर-दूतांचं जाळं तयार झालं. फिस्केटियर ब्लॉगला आणि वेबसाईटला 50 पेक्षा अधिक देशांतल्या लोकांनी भेट दिली. ही हस्तकला करणारी कम्युनिटी मग आपल्याला कशा प्रकारची उपकरणं हवीत त्याविषयी किंवा काही अगदी नवीन कल्पनाही फिस्कर कंपनीला पाठवायला लागली. अशा हजारो कल्पना प्रत्यक्ष उपकरण वापरणाऱ्यांकडून आल्यामुळं त्यांचं महत्त्व खूप मोठं होतं. या कल्पनांमधून आजतागायत फिस्करची कित्येक नवी उपकरणं विकसित झाली आहेत व ती अर्थातच अतिशय उत्साहानं स्वीकारली गेली आहेत. 

या संपूर्ण प्रकल्पात ब्रॅंडची जाहिरात कुठंही होणार नाही, अशी दक्षता घेतली गेल्यामुळं ब्रॅंडवरचा विश्वास नैसर्गिक पद्धतीनं वाढत गेला. असा विश्वास उभा राहिल्यामुळं अर्थातच विक्री वाढत गेली. 

प्रत्यक्ष उत्पादनं वापरणाऱ्या ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सल्ल्यानं आणि सहकार्यानं केलेला हा उपक्रम सहनिर्मिताचा पायंडा घालणारा ठरावा. हे उदाहरण देण्याचा उद्देश असा, की समस्या सोडवताना डिझायनर्स प्रत्येक वेळी त्या संपूर्णपणे 
स्वतःच सोडवतील असं नाही. मात्र, डिझाइनची विचारप्रणाली वापरून, ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचीच मदत घेऊन ते जास्त योग्य आणि अतिशय वेगळ्या प्रकारे समस्यांवरचं कायमस्वरूपी उत्तर नियोजनबद्धरीत्या शोधू शकतात. 
 
'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्याचा निकाल आधीच ठरला होता, नंतर निकालाचं चित्र बदललं; महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT