mohan joshi 
सप्तरंग

आठवणी ‘माझी शाळा’च्या (मोहन जोशी)

मोहन जोशी

आता नातवंडांना शाळेच्या बसमधून उतरवून घ्यायला सोसायटीच्या दारात आजोबाच्या भूमिकेत उभं राहावं लागतं तेव्हा माझ्या बालपणीची शाळा मला आठवते. कधी नातवंडांचा हेवा वाटतो, तर कधी आपलं बालपण काहीसं गैरसोईंचं, असुविधांचं असलं तरी किती सुखरूप आणि आनंददायी होतं या विचारानं मन सुखावूनही जातं.

शाहूपुरीतलं घर बदलून आम्ही गावात राहायला आलो. कोल्हापुरात शुक्रवार पेठेत शंकराचार्य मठाजवळ टोपकर वाड्यात हे घर होतं. शाहूपुरीत असताना त्या वेळच्या बीटी कॉलेजसमोर असलेल्या ‘सदानंद विद्यालया’त मी दुसरीत होतो. इथं गावात आल्यानंतर वडिलांनी त्यांच्या शाळेत माझं तिसरीच्या वर्गात नाव घातलं. या आमच्या शाळेचं नाव मोठं गमतीचं होतं. तिचं नाव होतं ‘माझी शाळा’. ‘माझी शाळा’ अशाच नावाची ही माझी शाळा होती ‘गंगावेस’मध्ये.

शाळेची इमारत तीनमजली होती. तळमजल्यावर टिपुगडे आडनावाच्या व्यक्तीचं केशकर्तनालय होतं, तसंच पान-तंबाखूचं एक मोठं दुकान होतं आणि औषधाचं एक दुकान होतं. दुसरा संपूर्ण मजला पैलवान शंकरराव वासकर यांच्या ‘हनुमान खानावळी’नं व्यापलेला होता. ही मांसाहारी खानावळ त्या वेळी खूपच प्रसिद्ध होती. आमची शाळा होती तिसऱ्या मजल्यावर. भाडोत्री इमारतीतच ही शाळा भरायची. जिने चढून गेल्यावर उजव्या हाताला पहिलीच्या व दुसरीच्या वर्गात जायला वाट होती. समोर गॅलरीतून डाव्या हाताला वळलं की लांबलचक गॅलरीतून उजव्या हाताला ‘गंगावेस’च्या रस्त्याची वर्दळ, म्हशींचा दूधकट्टा, ‘गंगावेस’चा संपूर्ण चौक असं दृश्य दिसायचं. तिसरीच्या आणि चौथीच्या वर्गात जाणाऱ्या मुलांना या गॅलरीतून जावं लागे. डाव्या हाताला पहिलीचा, तिसरीचा व कोपऱ्यातला वर्ग चौथीचा होता.
माझे वडील ‘अण्णा’ इथं चौथीच्या वर्गाला शिकवायचे. याशिवाय शाळेच्या जमाखर्चाचं सगळं दफ्तर पाहायचं, त्याचे हिशेब शिक्षणाधिकाऱ्यांकडे वेळेत समक्ष घेऊन जायचे व शाळेचं अनुदान मंजूर करून घ्यायचं अशी सगळी जबाबदारीची कामगिरी हेडमास्तरांनी अण्णांवर सोपवलेली होती. शाळाचालक आणि हेडमास्तर होते विश्र्वनाथ पोतदार. ते अविवाहित होते. शाळा सांभाळून कोकणात रत्नागिरी, साखरपा, देवरुख, चिपळूण या ठिकाणी भाजीपाला पाठवायचा व्यवसाय ते करायचे. पहाटे पहाटे कपीलतीर्थ भाजीमंडईत मिरज, बेळगाव आणि नजीकच्या खेडेगावांतून ताज्या भाज्या येत. सकाळी आठ वाजेपर्यंत भाज्यांची ‘होलसेल’ उलाढाल होई. त्या वेळी पोतदारमास्तर मागणीनुसार भाज्यांची ‘होलसेल’ खरेदी करत व त्यांच्या ठरलेल्या दोन हमालांकडून शाळेसमोरच्या दूधकट्ट्यांमागं घेतलेल्या दुकानाच्या गाळ्यात भाज्यांचा ढीग टाकत. मग मागणीनुसार भाज्यांची पार्सलं तयार करून घेत. ‘गंगावेस’च्या एका कोपऱ्यात ‘कोकण ट्रान्स्पोर्ट सेवा’ होती. त्यांच्या ठराविक वेळेत ही भाजीची पार्सलं कोकणात रवाना होत. शाळा भरण्याच्या वेळेपर्यंत पोतदारमास्तरांचं हे सगळं काम पूर्ण होई. कधी कधी मी अण्णांच्या बरोबर जात असल्यानं ताज्या भाज्यांचे ढीग आणि भाजी भरतात कशी हे मला बघायला मिळायचं.

गंगावेस म्हणजे त्या वेळीही गजबजलेला भाग होता. तिथं दूधकट्ट्यावर धारोष्ण दूध प्यायला पैलवानांची गर्दी असायची. रोजची रतिबाची गिऱ्हाईक आणि परगावहून आलेले लोकही धारोष्ण दूध पिण्यासाठी हमखास तिथं थांबायचे. हातात कडीचा डबा, रिकामं भांडं घेतलेलं कुणी दिसलं की ‘हाई या लगेच’च्या आरोळ्या घुमायच्या. अगदी पहाटेपासून दुपारी दोनपर्यंत आणि संध्याकाळी पाचपासून रात्री बारापर्यंत दूधकट्टा म्हशींच्या राबत्यानं गजबजलेला असायचा.
चार पावलं पुढं गेल्यावर खासगी सर्व्हिसच्या दोन-चार गाड्या उभ्या असायच्या. त्यांचे एजंट ‘सरवडे, राधानगरे...चला लगेच’च्या आरोळ्या देत. त्या गावांना आणि त्याच वाटेवरच्या इतर गावांना जाणारे प्रवासी मिळवण्यासाठी अशा आरोळ्या द्याव्या लागत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एसटी) सेवा अजून त्या वेळी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे आसपासच्या खेड्यातल्या प्रवाशांची मदार अशा ‘खासगी सर्व्हिस’वरच असायची.

‘माझी शाळा’ ही खासगी शाळा होती. या शाळेत दोन-अडीचशे तरी मुलं-मुली शिकायला होत्या. त्या काळाच्या, म्हणजे जवळपास सत्तर वर्षांपूर्वीच्या काळाच्या, मानानं ही संख्या चांगलीच होती. नगरपालिकेच्या शाळा आणि खासगी शाळा असा फरक कुणी त्या वेळी करत नसे. तिसरी-चौथीचं शिक्षण घेताना काहीच उणीव या शाळेत भासली नाही. या शाळेत सर्व जाती-धर्मांचे, समाजाचे विद्यार्थी अगदी गुण्या-गोविंदानं, आनंदानं शिकत. परिणामी, सर्वसमावेशकतेचे संस्कार वेगळेपणानं कधी घ्यावे लागले नाहीत.

माझ्या वडिलांनी, म्हणजे अर्थातच अण्णांनी, मला एकदाचंच बजावून ठेवले होतं :‘शाळेची वेळ झाली की तुझं तू आवरून जायचंस. माझी वाट बघत बसायची नाही.’ त्यानुसार आम्ही भावंडं शाळेच्या वेळेपूर्वी घराबाहेर पडत असू. आमचं घर ते शाळा हे जवळजवळ पाऊण किलोमीटरचं अंतर होतं. वाटेत सायकल किंवा टांगा, क्वचित एखादं चारचाकी वाहन याशिवाय वाहनांची गर्दी नसे. मात्र, दूधकट्ट्याकडं निघालेले आणि तिकडून येत असलेले म्हशींचे कळप खूप असायचे. म्हशींना चुकवून वाट काढत काढत पुढं जाताना नाकीनऊ येत. या कळपांबरोबर गवळी, म्हशींचं खाद्य असलेल्या कोंड्याच्या पाट्या घेतलेले एक-दोनजण असायचे. त्यामुळे तशी भीती नसायची; पण तरीही एखादी चुकार म्हैस माणसाच्या चाहुलीनं शिंगं आडवीतिडवी हलवायची. म्हशींना रोजच चुकवावं लागत असे, त्यामुळे त्यांना चुकवत चुकवत शाळेपर्यंत कसं पोचायचं ही ‘कला’ आम्हा मुलांना चांगलीच अवगत झालेली होती. आता नातवंडांना शाळेच्या बसमधून उतरवून घ्यायला सोसायटीच्या दारात आजोबाच्या भूमिकेत उभं राहावं लागतं तेव्हा माझ्या बालपणीची शाळा मला आठवते. कधी नातवंडांचा हेवा वाटतो, तर कधी आपलं बालपण काहीसं गैरसोईंचं, असुविधांचं असलं तरी किती सुखरूप आणि आनंददायी होतं या विचारानं मन सुखावूनही जातं.

माझं तिसरी-चौथीचं शिक्षण अण्णांच्या सान्निध्यात असं ‘माझी शाळा’त झालं. जेमतेम दोन वर्षांच्या काळाची ही झलक. कधीतरी ती नजरेपुढं तरळत राहते.
हेडमास्तरांच्या निधनानंतर ही शाळा बरीच वर्षं बंदच होती.
चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या शिक्षकमित्रानं मला माहिती दिली. तो म्हणाला : ‘‘कदमवाडीजवळ भोसलेवाडीत ‘माझी शाळा’ सुरू झाली आहे.’’
मी एकदा शाळेला भेट देऊन आलो. नंतरही एकदा कोल्हापूर गेलो होतो. त्या वेळी जाण्यापूर्वी शाळेला पत्रानं कळवलं होतं.

‘माझी शाळा’ला देण्यासाठी घरातली काही पुस्तकं मी त्या खेपेला बरोबर घेतली होती. तिथल्या शिक्षकांच्या हवाली ती पुस्तकं करताना ‘माझी शाळा’चं ऋण, किंचित का होईना, फेडता आल्याचं समाधान वाटलं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT