pravin tokekar 
सप्तरंग

अभावातही भाव उराशी... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर

‘माणूस दिवाळी साजरी का करतो?’ हा एक न फुटलेल्या फटाक्‍यासारखा जिवंत सवाल आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं पिकांची कापणीबिपणी होऊन हातात चार पैसे खुळखुळू लागल्यावर दिवाळी साजरी करण्याची सांस्कृतिक उबळ येऊन हा सण भारतीय माणसांनी योजिला, असं म्हणतात. ते साहजिकच आहे. पैशाचं वजन अनेकदा खिश्यांना पेलवत नाही. कधी एकदा त्याला बारा वाटांनी बाहेरचा मार्ग दाखवावा, असं वाटू लागतं. दिवाळी हे प्रयोजन त्यासाठी बेष्ट असतं. शेतकऱ्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेला हा दीपोत्सवाचा सोहळा अवघ्या संस्कृतीचा भाग झाला. त्यात चाकरमान्यांनीही आपापल्या परीनं भाग घेतला; पण तो का? हा सवाल मात्र अजुनी अनुत्तरितच राहिला आहे.

‘‘माणूस दिवाळी साजरी का करतो?,’’ चिम्या नेवरेकरानं समोरच्या मसाला डोश्‍याचा कोथळा काट्यानं काढत सवाल केला, तेव्हा माझ्या घशात गरम उपम्याचा घास अडकला होता. हे भलतंच होतं. चिम्याच्या कानामागचा, शर्टाच्या कॉलरीवरचा गुलाल अजून कायम होता, आणि पुढले आठ-दहा दिवस तो तसाच राहणार आहे, हेही कळत होतं. (रोज आंघोळ करणं हे आरोग्याला घातक असतं, हे चिम्याचं लाडकं मत चिंत्य आहे.) निवडणुकीच्या तापातून नुकताच उठलेला चिम्या खोल डोळ्यांनी माझ्याकडे बघत भलतीच कोडी घालत होता. स्थळ : आमचा नेहमीचा उडपी. वेळ : रविवार सकाळच्या न्याहारीची.

बाकी चिम्याच्या प्रश्‍नामुळे त्याचा निवडणुकीचा ताप कंप्लीट उतरला आहे, एवढं मला कळलं. कारण निकाल जाहीर होऊन पुरते अठरा तास होण्याच्या आत त्याच्या डोक्‍यात दिवाळीविषयक विचार घोळू लागले होते. एरवी असं घडत नाही.
चिम्या नेवरेकर हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याबद्दल थोडंसं सांगणं भाग आहे. चिम्या ही व्यक्‍ती दिसायला कितीही बेंगरुळ दिसली, तरी चांगलीच पावरफुल आहे. पोटासाठी कुठलाही ठोस धंदा न करता हा सत्तेचाळीस किलोचा देह या पृथ्वीतलावर गेली सत्तेचाळीस वर्षं तग धरून आहे, यात सारं काही आलं. चिम्या पोटासाठी काय करतो, हे एक गूढ आहे. वास्तविक एक प्लेट इडली विकत घेऊन खाण्याचीही चिम्याची ऐपत नसावी; पण चिम्याला त्याचं काही नाही. ‘ईडीची नोटीस आली, तरी बेहत्तर आज मुर्गी खाणारच’ या इराद्यानं चिम्या मोहिमेवर निघाला, की अपयशी कधीच ठरला नाही.

चिम्या नुकताच निवडणुकीच्या कामातून मोकळा झाला आहे. म्हणजे असा त्याचा दावा आहे. निवडणुकीत तो नेमकं काय काम करतो, हे कोणालाही धड माहीत नसावं; पण तरीही निवडणुकीत त्याचा अवतार तुम्ही पाहायला हवा होता. गावातल्या सर्व पक्षांच्या सर्व कार्यक्रमांच्या वेळा आणि अन्य तपशील जिभेवर असलेला हा एकमेव इसम. एखाद्याला श्रीखंडाचं जेवण चढतं, तशी त्याला निवडणूक चढते. कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या सभेला ऑडियन्ससाठी किती रेट लावला आहे, हे चिम्याला विचारावं. ‘साडेसातशे रुपये, दोन वडापाव आणि एक बिसलेरी’ असा रेट फोनवर कोणाला तरी सांगताना मी स्वत:च्या कानानं ऐकलं आहे. ‘झेंड्याचे अलग पडतील,’ असंही त्यानं तेव्हा बजावलं होतं. शिवाय कोणत्या नेत्यानं बिर्याणीचे बॉक्‍स वाटले, हेही त्याला ठाऊक असतं. निवडणुकीत चिम्या बऱ्यापैकी हात धुऊन घेत असावा, असा माझा समज होता; पण तो चुकीचा होता, हे आजच कळालं! अन्यथा, तो दिवाळीबद्दल का बोलता व्हावा?

बाकी काहीही असलं, तरी एरवी चिम्या हा सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत केव्हाही उजवा आहे. कांगोच्या खोऱ्यातील उईवान नावाच्या जंगली जमातीत लाल मुंग्यांचं वरण करतात, ही माहिती त्यानंच आम्हाला रेसिपीसकट दिली होती. तेव्हा पोटात ढवळत असतानाही, ‘चिम्या तू केबीसीत का नाही रे गेलास?’ असं सद्‌गदित कंठानं मी विचारले होते. इतिहास, भूगोल, संस्कृती, जनरल नालेज अशा कैक विषयात विलक्षण गती असलेला चिम्या हे एक आश्‍चर्य आहे. पण त्याला अमिताभ हा व्यावसायिक अभिनेता वाटतो, देव नव्हे! (हे त्याचेच उद्‌गार.) त्यामुळे असल्या सामान्य वकुबाचं ज्ञान असलेल्या गृहस्थानं आपल्याला प्रश्‍न विचारावेत, आणि आपण त्याला उत्तरं द्यावीत, हे त्याच्या स्वाभिमानाला पटलं नाही. चिम्या नेवरेकर नारायण पेठेत राहतो. म्हणजे पुणे!

‘‘का करतो म्हंजे, या दिवसात दिवाळी नाही साजरी करायची, तर काय शिमगा साजरा करायचा का चिम्या, काहीतरीच तुझं,?’’ पुढ्यातला गरमागरम उपमा चमच्यावर घेत त्यावर फुंकर घालत मी चिम्याचा पहिला हल्ला हुकवला.
‘‘दिवाळी साजरी करावी, असा नियम कुठं लिहिला आहे दाखव! डोश्‍याच्या बॅटरमध्ये डाळीचं पीठ घालून ठेवतात, साले!,’’ चिम्या भडकून म्हणाला. त्याचा भडका उडप्याच्या डाळीच्या पीठासाठी होता, हा झाला तपशीलाचा भाग.
‘‘निवडणुकीच्या वरातीत नाचावं, असं तरी कुठं लिहिलंय चिम्या राज्यघटनेत?’’ उपम्याच्या चटक्‍यानं कळवळत आम्ही उलटा चटका दिला. चिम्याच्या ‘निवडणुकीच्या कामाला’ वरातीत नाचणं म्हटल्यानं त्याचा स्वाभिमान नाही म्हटले तरी दुखावला असावा.

‘‘निवडणुकीची मिरवणूक असते, वरात नव्हे!’’ त्यानं आमची चूक सुधारली.
‘‘तेच ते! लेना ना देना आऊर मेरे को मेहमान मानना!’’ मी उगीच नाक वेंगाडलं. खरं सांगायचं, तर आपला कुठल्याच मिरवणुकीला किंवा वरातीला आक्षेप नाही. घरात सर्वानुमते ठरेल त्याला मत देऊन बोट वर करून फेसबुकवर सेल्फी टाकली, की आपल्यापुरती निवडणूक प्रक्रिया संपते.
‘‘इलेक्‍शन ही जबाबदारी आहे, फेस्टिवल नव्हे!’’ डोश्‍याच्या पोटातला काटा काढून समोर रोखत डोळे बारीक करत चिम्यानं मला बजावलं. या कृतीमुळे खरं तर मी सावध व्हायला हवं होतं; पण तेवढ्यात उपम्यात चक्‍क काजू आला.
‘‘ये लोकशाही का उत्सव हय, असं खुद्द मोदीजीच म्हणालेत! उत्सव म्हंजे फेस्टिवल! आता बोल!’’ काजूच्या तुकड्यात बरीच जीवनसत्त्वं की काय ते असणार. नाहीतर आमचा आवाज इतका चढणं अशक्‍य.

‘‘हुं:!,’’ चिम्यानं छद्मी का काय म्हणतात तशी मुद्रा करत डोश्‍याचा एक मोठा डासा काढला. परवा परवापर्यंत चिम्या मोदीजींचं नाव घेतल्यावर चक्‍क उठून उभा राहत असे. बालाकोटचा सर्जिकल स्ट्राइक झाला, तेव्हा चिम्या बंदूक खांद्यावर घेऊन हिंडल्यासारखा भोपटकर आळीत हिंडत होता. पाकव्याप्त काश्‍मीरसकट पाकिस्तान बळकावण्याची एकमेव युद्धयोजना चिम्या नेवरेकरच्या मेंदूत दडली आहे, हे पाकिस्तानींना कळलं असतं, तर नारायण पेठेवर पाकिस्तानची एफ-१६ विमानं घिरट्या घालू लागली असती; पण हे राष्ट्रीय गुपित फुटलं नाही हे पुणेकरांचं भाग्य होय.
हल्ली हल्ली मोदीजी म्हटलं, की चिम्या उठून उभा राहत नाही, हे आम्ही मागल्या दोन भेटीतच ओळखलं होतं. नोटाबंदीनंतर उसनवारी मिळणं अवघड होत गेल्यावर चिम्याचं हे मतपरिवर्तन झालं असावं. मी विषय वाढवला नाही. उपमा संपत आल्यानं कांदा उत्तप्याची ऑर्डर देणं भाग होतं.
‘‘ते जाऊ दे! नरश्रेष्ठा, तू दिवाळी साजरी का करतोस?,’’ चिम्यानं आपला हट्ट सोडला नाही.

‘‘कारण ती क्‍यालिंडरात येते म्हणून! एक कांदा उत्तप्पा...चटणी ज्यादा!,’’ चिम्याच्या दुसऱ्या प्रश्‍नाची वासलात लावत आपण उपमा संपवला. उपमा या दिवसाच्या बिनतोड सुरवातीला उपमा नाही. चिम्या तर या डिशला ‘कालिदास स्पेशल’ असंच म्हणतो. कारण ‘उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम, दंडिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयोगुणा: ’ हा श्‍लोक तो विसरलेला नाही.
‘‘हे उत्तर नाही. क्‍यालिंडरात सर्वपित्री अमावास्यासुद्धा येते. दर सर्वपित्रीला तू पिंड गिळतोस काय?,’’ चिम्यानं निरुत्तर केलं.
‘माणूस दिवाळी साजरी का करतो?’ हा एक न फुटलेल्या फटाक्‍यासारखा जिवंत सवाल आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं पिकांची कापणीबिपणी होऊन हातात चार पैसे खुळखुळू लागल्यावर दिवाळी साजरी करण्याची सांस्कृतिक उबळ येऊन हा सण भारतीय माणसांनी योजिला, असं म्हणतात. ते साहजिकच आहे. पैशाचं वजन अनेकदा खिश्यांना पेलवत नाही. कधी एकदा त्याला बारा वाटांनी बाहेरचा मार्ग दाखवावा, असं वाटू लागतं. दिवाळी हे प्रयोजन त्यासाठी बेष्ट असतं. शेतकऱ्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेला हा दीपोत्सवाचा सोहळा अवघ्या संस्कृतीचा भाग झाला. त्यात चाकरमान्यांनीही आपापल्या परीनं भाग घेतला; पण तो का? हा सवाल मात्र अजुनी अनुत्तरितच राहिला आहे.
‘‘दिवाळी हा दीपोत्सव असतो. सुगीचे दिवस सुरू झाल्यावर शेतकरी मन प्रफुल्लित होतं. प्रफुल्लित मनाच्या रंजनासाठी अशा सणांची योजना केलेली असते...’’ उत्तर देताना आपला आवाज पडत चालला आहे, हे मला कळत होतं. इंटुक लेव्हलच्या पुड्या सोडण्यासाठीही दणकट काळीज लागतं; पण इलाज नव्हता.
‘‘सुगी? सुगी? सु-गी?’’ भेदक आवाजात चिम्यानं अंगावर अग्निबाण सोडला.
‘‘ सुगीच...बहुतेक!’’ आम्ही.

‘‘सुगी म्हंजे काय रे? कुणी पाहिलीये ती? कशी दिसते? कशी येते? नॉन्सेन्स! सुगी हा एक फ्रॉड आहे...‘अच्छे दिन’टाइप!’’ चिम्या चवताळून म्हणाला. पुढ्यातला डोसा संपला आहे, याचं त्याला भान उरलं नव्हतं. बाकी सुगी म्हंजे काय, याचंही उत्तरही खरोखर अवघडच होतं म्हणा. कुणी पाहिली आहे? सुगी हा प्रकार शेतकऱ्यांच्या आयुष्यात असेल, आपल्याला नाही. आपण चाकरमानी! दरमहा तुटपुंज्या पगारात घरखर्च चालवत शहरी जीवनं कंठणाऱ्या दुर्बल, वंचित गटापैकी. आपला आणि सुगीचा काय संबंध? नाही म्हणायला एकदा सासुरवाडी गेलो असताना अचानक भेटलेल्या चुलत सासऱ्यानं वाकून नमस्कार केल्याबद्दल पाचशे रुपयांची नोट काढून दिली होती, तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. सुगी म्हणजे साधारणत: अशीच भावना असावी.

‘‘अरे, ती एक सांस्कृतिक कल्पना आहे...सुगी नावाची गोष्ट दिसत नाही काही! ती अनुभवावी लागते!’’ चिम्या म्हणाला. कांदा उत्तप्पा एव्हाना टेबलावर अवतरला होता. सांबाराच्या वासानं मन थोडं शेतकऱ्यासारखं प्रफुल्लित झालं होतं. सुगी, सुगी म्हणतात तिचा वास सांबारासारखा असावा, असा विचार मनाला चाटून गेला.
‘‘इथं माणूस महागाईनं पिचलाय. महामंदीत होरपळलाय...मोटारींची विक्री किती थंडावलीये, कल्पना आहे तुला? बेकारीचे दिवस आहेत हे...तुला नाही कळणार बेकारीचं दु:ख!’’ चिम्यानं एक सुस्कारा सोडला. त्याच्या सुस्काऱ्यात जन्माच्या कर्माची बेरोजगारीची वेदना होती, असं वाटलं. मी दया येऊन त्याच्यासाठी एक म्हैसूर मसाला डोसा मागवला.
‘‘लाल चटणीवाला आण रे!’’ दु:खातिरेकाच्या झटक्‍यात चिम्याला लाल चटणी आठवली, हे चांगलं लक्षण होतं.
‘‘मोटार महाग झाली काय, आणि स्वस्त झाली काय...आपल्याला काय करायचंय चिम्या! जोवर हा उडपी उधारी चालवून घेतोय, तितके दिवस इथं यायचं. मोटारविक्री बंद झाली तरी आपल्याला काय फरक पडतो?’’ मी नेमस्तपणानं म्हणालो. आमच्या नशिबी सायकलची प्याडलं तेवढी येणार!
‘‘पेठ्यांच्या दुकानी जाऊन बघ...गर्दी किती रोडावलेय ते. लोक सोनं खरेदी चक्‍क टाळतायत. दिवाळी असूनही!’’ चिम्यानं आणखी एक पुरावा दिला.
‘‘अरे, पेठ्यांच्या दुकानासमोरून मी जातसुद्धा नाही. चिम्या, आपल्या खिश्‍याची अवस्था कायम तोळामासा! सोनं कसला खरेदी करतोस?’’ कांदा उत्तप्पा झक्‍क होता, म्हणून एक छोटासा विनोद करण्याचा मी प्रयत्न केला; पण चिम्या हसला नाही.
‘‘मी ठरवलंय, या वर्षी दिवाळी साजरी करायची नाही. नो मीन्स नो!’’ समोर आलेल्या ताज्या म्हैसूर मसाल्यावर हात ठेवून चिम्यानं घनघोर प्रतिज्ञा केली. त्याच्या सत्तेचाळीस किलोच्या देहावर तेव्हा निराळंच तेज चढलं होतं.

‘‘म्हंजे?’’ मी बुचकळ्यात पडलो. सांबारात चक्‍क गिलके घालतात हे लोक!
‘‘नो फटाके, नो फराळ. नो कपडे. नो भेटवस्तू. नथिंग!’’ चिम्या इंग्रजीत शिरला, की लक्षात घ्यावं, परिस्थिती तंग आहे. मागल्या खेपेला त्यानं उधारी हे सशक्‍त अर्थव्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे, ही थिअरी कोपऱ्यावरल्या शा. मुळशी प्रेमजी अेण्ड सन्स (किराणा भुसार व्यापारी) यांना इंग्रजीत समजावून सांगून आपली उधारी महिनाभर वाढवून घेण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. शा. मुळशीनं त्याला ‘‘ते सगळा च्यांगला हाय चिम्यासेठ; पन उधारी दिऊन टाक, आनि लागंल तेवडा माल घिऊन ज्या’ असा मोलाचा सल्ला देऊन हाकललं होतं. इथं चिम्या अपरिग्रहाच्या बाता करत होता. दिवाळी साजरी करणार नाही, असं म्हणणाऱ्या चिम्याला विरक्‍ती आली की काय, या विचारानं मी चिंतेत पडलो.
‘‘कुणी भेट दिले तर?,’’ मी.
‘‘कॉय?’’ चिम्या.
‘‘फटाके?’’ मी.
‘‘नॉय! आवाजवाले तर मुळीच नाही. त्यानं प्रदूषण वाढतं!’’ चिम्या.
‘‘कपडे?’’ मी.
‘‘कपड्यानं प्रदूषण कसं वाढेल?’’ चिम्या.
‘‘फुकट दिले तर?’’ मी.
‘‘घालीन!’’
‘‘फराळ फुकट दिला तर?’’ मी.
‘‘खाईन!’’ चिम्या.
‘‘दिवाळी अंक दिले तर?’’ मी.
‘‘वाचीन!’’ चिम्या.
‘‘भेटवस्तू?’’ मी.
‘‘आपल्याला कोण देणार?’’ चिम्याचा निरागस प्रश्‍न.
‘‘जाऊ दे!’’ मी प्रश्‍न सोडून दिला. आपल्याला दिवाळीत भेटवस्तू कोण देणार, या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला तरी कुठं ठाऊक होतं?
‘‘थोडक्‍यात, चिम्या, फुकट मिळालं तर तू दिवाळी साजरी करणार आहेस! स्वखर्चानं नाही...बरोबर ना?’’ मी वकिली युक्‍तिवाद केला.
‘‘ते एक इंटरप्रीटेशन झालं! वास्तविक माझा तत्त्वत: दिवाळी साजरी करण्याला विरोधच आहे!’’ चिम्या म्हणाला.

‘‘थोडक्‍यात तुला क्‍याशलेस दिवाळी साजरी करायची आहे!’’ मी म्हणालो.
‘‘दिवाळी साजरी करणं हे कालबाह्य आहे. हल्ली शेती हासुद्धा डबघाईला आलेला व्यवसाय असल्यानं तिथं सुगी नाही. चाकरमान्यांची तर हालतच पतली आहे. कोणाच्याही खिश्यात पैसा अडका नसल्यानं दीपोत्सव वगैरे साजरे करणं भंकस आहे...’’ चिम्यानं त्याचे क्रांतिकारक विचार सांगून मला गोंधळात पाडलं.
‘‘दिवाळीत दिवाळी साजरी नाही करायची तर मग करायचं तरी काय?’’ मी अस्वस्थ होऊन विचारलं. तेवढ्यात वाटीतल्या सांबारात शेवग्याची चिटुकली शेंग आल्याचं हुडकून चिम्यानं ती उचलली होती.
‘‘ते तुमचं तुम्ही ठरवा...शेवटी आपली संस्कृती आपणच पुढं किंवा मागं नेत असतो!’’ चिम्यानं हात झटकले. आमच्या पुढल्या पदार्थांच्या ऑर्डरीची वाट न पाहता वेटरनं बिल आणून ठेवलं, तेव्हा चिम्या बाणेदारपणानं उठून हात धुवायला गेला. मी निमूटपणे बिल भागवले, तोवर परत येऊन त्यानं बडीशेपेची चिमुकली ताटली तळहातावर उपडी करून घेतली.
‘‘...चिम्या येरे परवा फराळाला घरी!’’ जाता जाता मी त्याच्या खांद्यावर हात टाकून आमंत्रण दिलं. त्यावर ‘नक्‍की’ अशा अर्थाचा अंगठा उडवून चिम्या नेवरेकर पसार झाला.

...दिवाळीच्या फराळाला चिम्या नक्‍की येईल. इतर दोस्तांच्या कोंडाळ्यात निवडणुकीचे किस्से रंगवून रंगवून सांगेल. त्यांच्यासोबत नावाजत चकल्या, चिवडा, चिरोटे आवडीनं खाईल. त्याच्या अंगावर तेव्हा नवाकोरा फैनाबाज मोदीकुर्ता असेल. नव्या अत्तराचा सुगंध त्याच्याभोवती दर्वळत असेल. शिवाय प्लॅस्टिकच्या पिशवीत चिवडालाडू वगैरे घरचा फराळसुद्धा वानोळा म्हणून आणेलच.
...आपल्यासारख्यांच्या सामान्य जीवितांमध्ये चिम्यासारखे मित्र असतात, म्हणून तर दिवाळी दिवाळी असते. ‘तू दिवाळी साजरी का करतोस?’ या प्रश्‍नाचं उत्तर चिम्या पाठमोरा चालत असताना मिळून गेलं. घरी भेटला, की त्याला सांगून टाकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT