ravi amale 
सप्तरंग

कोण पाहतो ‘तो’ टीव्ही? (रवि आमले)

रवि आमले ravi.amale@esakal.com

सर्व सुसंस्कृत माणसं आज वृत्तवाहिन्यांना वैतागली आहेत. अनेकांना समजत नाही की या वाहिन्या असं का वागतात? त्यामागे एक धोरण आहे. सूत्र आहे. प्रेक्षकांना ‘प्रॉडक्ट’ बनवून विकण्याचा व्यवहार आहे. तो कसा, याचा हा वेध…

माणसं टीव्हीला वैतागलीत. टीव्हीला म्हणजे दूरचित्रवाणीवरील सासू-सुनेच्या मालिकांना नव्हे. त्यावरील केविलवाण्या विनोदी कार्यक्रमांना नव्हे. बनावट रिअॅलिटी शोजना नव्हे. तर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांना. नकोत त्या बातम्या असं त्यांना झालंय. माणसं हल्ली एकमेकांना दूरध्वनी करून सल्ले देऊ लागली आहेत, की काळजी घ्या. ‘क’ जीवनसत्त्व घ्या. रोग प्रतिकारशक्ती वाढवा आणि टीव्हीवरच्या बातम्या पाहू नका. याचं कारण एकच - अतिरेक. सनसनाटीपणाचा, भयप्रसाराचा आणि मूर्खपणाचाही अतिरेक. ही खरं तर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची व्यवच्छेदक लक्षणं. परंतु त्यांची मात्रा कोरोना महासाथीच्या काळात जरा जास्तच झाली.

'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बार्क) नावाची संस्था दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या वगैरे मोजण्याचं काम करते. तिच्या अहवालानुसार कोरोना टाळेबंदीच्या पहिल्या बारा आठवड्यांत टीव्ही पाहण्याचं प्रमाण कोरोनापूर्व काळाहून २२ टक्क्यांनी वाढलं. टाळेबंदीच्या पहिल्या आठवड्यात (२२ ते २८ मार्च) तर ते ४३ टक्क्यांनी वाढलं. पण कोरोना या एकाच विषयाच्या बातम्या तुम्ही दाखविणार तरी किती ? या बातम्यांनी लोकांच्या मनात वृथा भयगंड निर्माण केला आणि अखेर त्या पाहणंच नकोसं झालं. तरीही लोक पाहत राहिले. हे सारं जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चाललं. आता बातम्यांची प्रेक्षकसंख्या उताराला लागणार तेवढ्यात सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आली. १४ जूनला ती घटना घडली आणि तेव्हापासून, राममंदिर भूमिपूजनासारखा अपवाद वगळता सुशांतसिंह प्रकरण हाच बातम्यांचा विषय राहिला. २० जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यानची (आठवडा ३० ते ३३) आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार या काळात वाहिनीवृत्तांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी केवळ सुशांतसिंह प्रकरणच होतं. पण यालाही लोक उबले होते. अनेक जण समाजमाध्यमांतून वगैरे तो वैताग व्यक्त करीत होते. पण आता चाळिसावा आठवडा सुरू आहे आणि आमचे स्टुडिओयोद्धे तोच विषय चघळत आहेत. इथं प्रश्न असा पडतो, की त्यांना का हे समजत नसेल का, की हे जरा अतिच होतं आहे. तर त्यांच्यादृष्टीने हे अजिबात अति नाही. याचं कारण अजूनही लोक त्याच बातम्या चघळताहेत. हे असं का, हे नीट समजून घेतलं म्हणजे आपल्या देशाची प्रेक्षक-संस्कृती लक्षात येईल.

ही संस्कृती लोककलांच्या पायावर उभी आहे आणि आधुनिक काळात या समस्त लोककलांची गुणसूत्रं चित्रपटांनी आपलीशी केलेली आहेत. त्यांद्वारे होणारं रंजन हे आपलं लोकप्रिय व्यंजन आहे. नेमक्या त्याच प्रकारचा रंजनआशय सुशांतसिंह प्रकरणात ठासून भरलेला आहे. नायक, नायिका, खलनायक, खलनायिका हे सारं त्यात आहे. त्यात राजकारण, गुन्हेगारी, लैंगिकता आहे. चित्रपटसृष्टीतील लोकांची जीवनपद्धती, त्यांची श्रीमंती, लफडी-कुलंगडी यांबद्दल अनेकांच्या मनात छुपी असूया असते. त्यातील काही व्यक्ती यात अडकल्याचे पाहून होणारी खुशी त्यात आहे. शिवाय सध्या जगभरातील राजकीय पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असलेला आतले विरुद्ध बाहेरचे हा वादही त्यात आहे. सगळ्या व्यवस्था इथल्या अभिजनांनी गिळंकृत केल्या आहेत. ती आतली मंडळी बाहेरच्यांना त्यात प्रवेश करू देत नाहीत. तेव्हा त्या लोकांना आता सत्ताच्युत करायलाच हवे, ही त्या वादामागची भावना. त्यावर मोदी निवडून आले. ट्रम्प विजयी झाले. आणि आता कंगना नामक वाचाळ नटीस उजव्या घोड्यावर बसवून काही शक्ती तोच कित्ता चित्रपटसृष्टीत गिरवू पाहत आहेत.

या प्रकरणामागं बिहार निवडणुकीचं राजकारण आहे. त्यात राजकीय प्रचार आहे, हे तर अनेकांनी सांगून झालंय. ही सर्व राजकीय कार्यक्रमपत्रिका काही वृत्तवाहिन्या इमानेइतबारे राबवितही आहेत. परंतु असे पत्रकार आणि वातकुक्कुट यांत फारसा फरक नसतो. आज उजवी हवा असल्याने ते तिच्याबरोबर आहेत एवढंच. अखेर त्यांचा संबंध हा जाहिरातींतून येणाऱ्या धनराशीशी असतो. आपल्या देशातील माध्यमांचं हे दुर्दैवच की त्यांना जाहिरातदारांवरच अवलंबून राहावं लागतं. त्यातूनच वाहिन्यांच्या क्षेत्रात रेटिंगचा - क्रमवारीचा - खेळ सुरू झाला. सुशांतसिंह प्रकरण चघळलं जातं ते त्यातील तद्दन फिल्मी आशयामुळे हे तर झालंच. परंतु ते वृत्तवाहिन्यांच्या रेटिंग-वृद्धीसही पोषक आहे हे त्यामागील महत्त्वाचं कारण आहे. या रेटिंगच्या खेळाचे काही नियम आहेत.

तिथं केवळ प्रेक्षकसंख्या भरपूर आहे एवढ्यानं भागत नसतं. ते प्रेक्षक त्या एकाच वाहिनीवर जास्त काळ थांबणं गरजेचं असतं. ते थांबले, तरच त्यांना जाहिराती दिसणार. ते थांबणारच नसतील, तर तो कार्यक्रम वा बातम्या कितीही दर्जेदार असोत, त्याचा काय उपयोग? तेव्हा मग त्या बातम्यासुद्धा चटकदार असायला हव्यात. आता वृत्तवाहिन्यांना बातम्या मिळविण्यासाठी मोठा खर्च असतो, मेहनत असते. त्यानं नफा कमी होतो. म्हणून थेट वार्तांकन कमी झालं आणि आले चर्चेचे अखिल भारतीय कार्यक्रम. पण दोन माणसं - मग ती कितीही विद्वान असोत - त्यांची चर्चा अनेकांसाठी कंटाळवाणीच. म्हणून मग आपल्या वाहिन्यांनी अमेरिकेतील ‘फॉक्स’ वाहिनीचा आदर्श घेतला. आता चर्चा ही नुसती चर्चा राहिली नाही. ते वाक्‌युद्ध बनलं. बोंबाबोंब हे त्याचं लक्षण झालं. लोकांना खिळवून ठेवण्यासाठी त्यात सतत हलती चित्रं, मजकुराच्या हलत्या पाट्या आल्या. भडक रंग आले. अँकर्सचे म्हणजे वृत्तनिवेदक वा सूत्रसंचालक यांचे - तमाशे सुरू झाले. एका जागी उभं राहून वा बसून बातम्या देण्याऐवजी ते स्टुडिओत फिरू लागले. जोरजोरानं हातवारे करू लागले. युद्धाची बातमी सांगण्यासाठी बंदुका घेऊन बसू लागले आणि चांद्रयानाची बातमी चंद्रावर बसून देऊ लागले. हे झालं सादरीकरणाचं. त्यास अनुरूप असा आशयही हवा. त्यामुळं चर्चेचे विषयही असेच येऊ लागले, की ज्यात फिल्मी मसाला आहे.

फिल्मी मनोरंजनास चटावलेल्या आपल्या प्रेक्षकांना आपल्याकडं वळविण्यासाठी वाहिन्यांनी बातम्यांचं फिल्मीकरण, सनसनाटीकरण केलं. सायंकाळी दमून घरी आलेल्या मायबाप प्रेक्षकाला, त्याच्या जीवनमरणाशी निगडित प्रश्न दाखवून का गांजवून सोडायचं? त्याऐवजी त्याचं रक्त सळसळलं पाहिजे. मेंदूला कैफ चढला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पूर्वग्रहांवर, त्याच्या मतांवर शिक्कामोर्तब करणारा मसालाच त्याला भरवला पाहिजे. म्हणजे तो आपल्या वाहिनीवर अधिक काळ थांबेल. त्याकरिता मग कोणी तरी एक शत्रू समोर ठेवायचा आणि त्यास झोडपून काढायचं हे सूत्र ठरलं. त्यातच मग राष्ट्रवादापासून अर्थव्यवस्थेपर्यंतचे तमाम विषय बसविण्यात येऊ लागले. या खेळानं वाहिन्यांवरील जाहिरातदारांना मोठा ग्राहक मिळवून दिला. कोरोनाच्या कहराच्या काळात वृत्तवाहिन्यांकडं मनोरंजन वाहिन्यांचा (जीईसी) प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर वळला, वृत्तवाहिन्यांचा प्रेक्षाकाल (३० ते ३३ व्या आठवड्यात) ४९ टक्क्यांनी वाढला. याचं कारण मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमांचा दुष्काळ. ती गरज या वृत्तवाहिन्यांनी भरून काढली.

या सगळ्याचा अर्थ एकच, की आपण जाहिराती पाहाव्यात यासाठी हा सगळा उद्योग सुरू असून, प्रेक्षक हा वाहिन्यांचा उपभोक्ता नसून, त्यांचं उत्पादन बनलेला आहे. आपल्या प्रेक्षक-संस्कृतीच्या मुळाशी हे आहे. ही संस्कृती केवळ कोणा अल्पशिक्षितांची, बेरोजगारांची, ग्रामीणांची नाही. ती सर्वांचीच आहे. यात प्रश्न हाच आहे की, आपण एक व्यक्ती म्हणून या संस्कृतीचे भाग आहोत का? किंवा आपणांस नकळत तसे बनविले जात आहे का? आपण हाही प्रश्न विचारला पाहिजे, की या अशा बातम्यांतून आपल्याला काय मिळतं? आपला मेंदू केवळ फिल्मी वृत्त-रंजनासच चटावलेला आहे? तसं नसेल, तर मग आपण अन्य पर्यायांचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी आपल्याला माहितीचे, बातम्यांचे, ज्ञानाचे, एवढंच नव्हे तर मनोरंजनाचेही गंभीर स्रोत शोधावे लागतील. अन्यथा वाहिन्यांच्या रेटिंगच्या खेळात जाहिरातदारांसाठीचं एक प्रॉडक्ट हीच आपली ओळख उरेल.

तशी ओळख असलेले अनेक लोक आपल्यातच आहेत. आणि तरीही आपण विचारत राहतो, या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना सगळेच वैतागलेत, तरी त्यांचा टीआरपी वाढतो कसा ? कोण आहेत, तो टीव्ही पाहणारी माणसं ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT