sandip kale 
सप्तरंग

रडणारी शाळा... (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रगतीचे अहवाल, शाळेत आजवर करण्यात आलेले प्रयोग, प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, संगणकाचा वेगळा हॉल, कमालीची स्वच्छता राखलेलं संडास-बाथरूम, खेळांची भरपूर साधनं...अशी ती एक लोभसवाणी शाळी होती...मात्र, आसूदच्या (जि. रत्नागिरी, ता. दापोली) त्या शाळेची समस्या काही वेगळीच होती...

गेल्या आठवड्यात तीन दिवस कोकणदौऱ्यावर होतो. दापोली आणि परिसराचं लोभसवाणं सौंदर्य डोळ्यांत साठवून घेतलं. कोकणातलं वातावरण अजब आहे. साद घालणारा निसर्ग आहे; पण तो अनुभवायला माणसंच नाहीत. जिकडं जाल तिकडं निसर्गाचा खळाळता आवाज निसर्गाचा गाणं गाताना दिसतो. दापोली आणि परिसरात काही ठराविक हॉटेल्स आहेत. त्या हॉटेलांत आधी जेवणाची ऑर्डर द्यावी लागते तेव्हा कुठं ते मिळतं. जोशी नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी आहेत, त्यांनी आसूद गावात एक वेगळा प्रयोग करणारं हॉटेल उभारलंय. पलीकडे रस्ता, अलीकडे रस्ता आणि मध्ये जोशीकाकांचं हॉटेल. प्युअर व्हेज हॉटेल. उंच माळावरच्या या हॉटेलच्या बाजूनं असलेल्या रस्त्यावर माशांच्या पाण्याची दुर्गंधी जाणवत होती. ती दुर्गंधी जोशीकाकांच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी डोकेदुखी होऊन बसली होती. तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या या हॉटेलातून चहूबाजूंचं निरीक्षण बारकाईनं करता येत होतं. जेवण झाल्यावर खाली सहज नजर टाकली. खाली एक शाळा आहे. पायात चप्पल नसलेली चार-पाच शाळकरी मुलं मला तिथल्या आवारात पाणी पिताना दिसली. अंगावर मळके कपडे; पण चेहरे अतिशय उत्साही. या मुलांशी आपण बोलावं आणि या भागातलं नावीन्य जाणून घ्यावं या उद्देशानं मी त्या शाळेकडे निघालो. शाळेतल्या एका सरांना मी माझी ओळख सांगितली आणि त्यांना विचारलं :‘‘काही मुलांना भेटता येईल का? काही बोलता येईल का, सहज आपलं...’’

कशासाठी बोलायचं असावं अशी शंका त्या सरांच्या चेहऱ्यावर दिसली. या शाळेचे चार ते पाच वर्ग आहेत. शाळा देखणी आहे.
समोर बोर्डावर लिहिलं होतं : ‘वसंत नारायण जोशी यांनी या शाळेसाठी पंधरा गुंठे जमीन दिली आणि त्या जमिनीवर ही शाळा उभी आहे.’ शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी माझं स्वागत केलं. दैनंदिन प्रगतीचे अहवाल, शाळेत आजवर करण्यात आलेले प्रयोग, प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, फळ्यावर लिहिलेले सुविचार, संगणकाचा वेगळा हॉल, कमालीची स्वच्छता राखलेलं संडास-बाथरूम, खेळांची भरपूर साधनं...अशी ती लोभसवाणी शाळी होती. वर्गात गेल्यावर एका सुरात ‘नमस्कार सर’ म्हणणारे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वातावरणाची आठवण करून देत होते...
मी ज्या पाटनूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो त्या शाळेतल्या शिक्षणप्रणालीची मला यानिमित्तानं आठवण झाली. दत्तराव देशमुख गुरुजी, राम गुरुजी, धूतराज गुरुजी असे गुरुजन पाटनूरच्या शाळेत मला लाभले.
कोकणातल्या या शाळेतल्या मुलांनी माझ्याशी मोठ्या धिटाईनं संवाद साधला.
जन्म मिळावा अरण्यातला चंदनवृक्षापरी...
ईश्वरा, हीच मनीषा खरी
हे गीत वेदिका रांगले या विद्यार्थिनीनं गायलं, तर
भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं
शेतावर जाऊ या, संगती राहू या
हे गीत गायलं शैला चांदूरकर हिनं.
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुलांनी निर्भीडपणे दिलं.
जिल्हा परिषदेच्या शाळेचं ‘कल्चर’ माणसाच्या मनाचा पाया भक्कम करतं याचं हे उदाहरण माझ्यासमोर होतं. सोहम धामणे, यश धामणे या मुलांशी मी चर्चा केली. घरची परिस्थिती, किती दुरून शाळेत यावं लागतं याविषयी त्यांनी सांगितलं. दोन-तीन किलोमीटर पल्ला गाठून शाळेपर्यंत यायचं आणि पुन्हा अर्थातच तेवढंच अंतर कापून घरी जायचं हा त्यांचा दिनक्रम. एवढी पायपीट ही मुलं शिक्षणासाठी आनंदानं करत होती. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतचे व्यवस्थित वर्ग, दर्जेदार शिक्षण असं असतानाही इथले शिक्षक, विद्यार्थी व त्यापेक्षाही ती शाळाच दुःखी आहे असं मला वाटत राहिलं!

पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या होती केवळ अठ्ठावीस! रत्नागिरी जिल्ह्यातल्या आसूद (ता. दापोली) या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे आणि परिसरात सत्तावीस वाड्या आहेत. त्या सत्तावीस वाड्या आणि अठ्ठाविसाव्या आसूद गावात ही एक शाळा आहे. एकूण गावांची लोकसंख्या पाहता, किमान एका वर्गात तरी अठ्ठावीस संख्या असायला हवी, असं मला भाबडेपणानं वाटून जाणं साहजिकच होतं.
शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा सुर्वे (९४०५९२३४७२) मला म्हणाल्या : ‘‘मी सन २०१३ मध्ये या शाळेत आले तेव्हा या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ होती. मग ७४ वरून ६४, ५२, ४६, ३६ आणि आता २८ वर आली आहे. गाव आणि परिसरात इंग्लिश माध्यमाच्या दोन शाळा आहेत. तिथं काही मुलं जातात आणि बहुतेक मुलं ही आपल्या आई-वडिलांबरोबर स्थलांतरित होऊन मुंबईला जातात अशी इथली परिस्थिती आहे.’’
कोकणात स्थलांतरितांचं प्रमाण मोठं आहे. तिकडचं एकंदर वातावरणच वेगळं आहे. म्हणजे, दुपारी एक ते चार या वेळेत तुम्ही एखाद्या गावातून जात असाल आणि तुम्हाला रस्ता विचारायचा असेल तर एकही माणूस सापडणार नाही अशी परिस्थिती. कोकणात जितकं
निसर्गसौंदर्य आहे त्याहून अधिक गरिबी आहे. कोकणातल्या चार जिल्ह्यांत मी हिंडलो. ठाणे वगळता उर्वरित तीन जिल्ह्यांना रस्ते आणि एकूणच प्राथमिक जीवनावश्‍यक गरजा पुरवण्यासाठी इथले राज्यकर्ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत हे जाणवत राहिलं.

सुरुवातीला स्वागताला आलेले आणि त्या शाळेचे विद्यार्थिप्रिय शिक्षक सचिन जगताप (९४०५९२३४७२) म्हणाले : ‘‘मी बारा वर्षांपासून कोकणात शिक्षक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थिसंख्येबाबत लागलेली घरघर मी कायम अनुभवतो. याचं मुख्य कारण म्हणजे, सर्वाधिक माणसं नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईला जातात. इथल्या माणसांची छोटी-मोठी शेती, छोटा-मोठा उद्योग यात छोट्या मुलांनाही मदत करावी लागते. दुसरं कारण इंग्लिश माध्यमाच्या शाळांबाबतची पालकांची मानसिकता. आपला मुलगा इंग्लिश माध्यमाच्या शाळेतच गेला पाहिजे, मग फी कितीही असो, असा कल आता वाड्या-तांड्यांवरच्या पालकांचाही झालेला आढळून येतो. त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांचं प्रमाणही अधिक झालं आहे.’’
थोडक्यात, इतकी देखणी अशी ही शाळा त्या दिवशी मला रडत असलेली, रडवेली झालेली दिसली. मोठी इमारत आहे, शिक्षकवर्ग आहे, सोई-सुविधाही आहेत; पण मुलंच नसतील तर करायचं काय हा प्रश्न या शाळेपुढं आहे.
एकीकडे समाजात गरिबी असल्याचं सतत म्हटलं जातं, तर दुसरीकडे लोक कर्ज काढून मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत पाठवत आहेत. अशी अनेक उदाहरणं कोकणातल्या गावांत दिसली. जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मोफत आहार, मोफत पुस्तकं, सर्व मुलींना आणि दारिद्र्यरेषेखालील सर्व मुलांना गणवेश दिला जातो, सावित्रीबाई फुले यांच्या नावानं मुलींना शिष्यवृत्ती मिळते, गावातली कमिटी गरीब मुलांना मदत करते. थोडक्यात, जिल्हा परिषदेच्या शाळेचा जवळपास सगळा खर्च शासनच करतं. असं असताना या मोफत शिक्षणाचं महत्त्व अनेक पालकांना वाटत नाही असं आढळलं.
इंग्लिश माध्यमाच्या शाळांमधून पाल्यांना शिक्षण देण्याच्या मानसिकतेमुळे आणि मोठ्या प्रमाणातल्या स्थलांतरामुळे दापोली आणि परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेची ही अवस्था होती. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात हजारापेक्षा जास्त शाळा असतील आणि कोकणात अन्यत्र पाच हजारांच्या वर.

जिल्हा परिषदेच्या शाळेतून खरे हिरे घडतात, वेगळं कर्तृत्व गाजवतात याचे अनेक दाखले समाजासमोर आहेत. असं असताना जिल्हा परिषदेच्या शाळेची ही अवस्था मरणासन्न आहे असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही. काळानुसार बदललं पाहिजे, हे बरोबरच आहे; पण ज्या संस्कृतीतून मूल्यसंस्कार आपल्याला मिळतात ती संस्कृतीच आपण विसरत चाललो आहोत की काय असं कधी कधी वाटून जातं. गेल्या महिन्यात एक सर्व्हे वाचनात आला होता. त्यानुसार, इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या टॉपच्या दहा विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरही अद्याप काम मिळत नाही अशी परिस्थिती आहे. याउलट जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी केव्हाच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांची नावं, त्यांचे दाखले हे सगळं माझ्यासमोर होतं. असं असूनही आपण हे सगळं का करतोय आणि त्यामागं कुठली कारणं आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र, परिस्थिती गंभीर आहे हे ओळखायला पाहिजे.

नेहा सुर्वे आणि सचिन जगताप यांनी शाळेच्या यशाविषयी आणखीही माहिती दिली. पहिली आलेली मुलं...जास्त टक्के गुण मिळवलेली मुलं...वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रथमस्थानी असणारी मुलं...शिष्यवृत्ती, विज्ञानस्पर्धा यामध्येही पहिली येणारी मुलं...अशी चौफेर प्रगती या शाळेच्या मुलांनी केली असल्याचं दोघांनी सांगितलं. शाळेच्या ढोलपथकानं मला ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं अगदी ताला-सुरात ऐकवलं. मात्र, विद्यार्थिसंख्या जेमतेमच असल्याबद्दल दोन्ही शिक्षकांनी दुःख व्यक्त केलं. मुलांनी शाळेत छान बाग तयार केली आहे. टवटवीत फुललेल्या बागेत फुलांची संख्या खूप; पण फुलं तोडणारे हात मात्र कमी असं चित्र होतं. विद्यार्थ्यांच्या जेमतेम संख्येचं दुःख जसं शाळेला आहे तसंच माणसांच्या कमतरतेचं दुःख गावातल्या घरांनाही आहे. होळी, गणपती, दिवाळी याच काळात घरं आनंदी राहतात, असं गावातल्या अनेकांशी बोलल्यावर जाणवलं. कारण, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारी माणसं या सणांच्या निमित्तानंच कोकणात परततात आणि घरं माणसांनी पुन्हा फुलून जातात.
तपेश, धनीशा आणि अर्णव या माझ्यासोबत असलेल्या बच्चेकंपनीनं तीन तासांतच इथल्या शाळेतल्या मुलांसोबत गट्टी केली. शाळेचा निरोप घेऊन परतीच्या वाटेवर असताना माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न मी नांदेडमधले हाडाचे शिक्षक आणि पूर्वी शिक्षणाधिकारी असलेले गोविंद नांदेडे सरांपुढे मांडले.
ते म्हणाले : ‘‘जिल्हा परिषदेच्या शाळा हे आपल्या भारतातलं एक आगळंवेगळं उदाहरण आहे. त्या संस्कृतीतून मुलं घडतात, जोरकसपणे उभी राहतात. ही संस्कृती वाचवण्यासाठीच नव्हे तर जगवण्यासाठी तुम्हा-आम्हा सर्वांचे हात पुढं आले पाहिजेत.’’

मुख्य रस्त्यावर आल्यावर त्या शाळेकडे मी पाहिलं आणि वाटलं, गेल्या पाच वर्षांच्या एकूण आलेखानंतर पुढच्या दोन-तीन वर्षांत एवढ्या देखण्या शाळेला जर कायमचं कुलूप लागलं तर ही रडणारी शाळा कोणतं रूप धारण करील? आणि समाजातल्या त्या प्रत्येक घटकावर त्याचा काय परिणाम होईल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT