sandip kale 
सप्तरंग

गंध आपुलकीचा... (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com

मघाचे ते आजोबा दोन-तीन पायऱ्या मध्ये सोडून माझ्या पुढं बसले होते. आपल्या थैलीतून भाकरीचा तुकडा काढून खात होते. आजोबांच्या अंगावरचे कपडे बरेच मळलेले होते. डोळ्यांत काळजी दिसत होती. चेहरा आजारल्यासारखा दिसत होता. प्लॅस्टिकच्या पिशवीतली ती झेंडू, मोगरा, गुलाब, चमेली आणि वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं सुकून जाण्याच्या मार्गावर होती...

पुरातन काळात बांधल्या गेलेल्या अनेक वास्तू आपल्याला जगण्यासाठी प्रेरित करतात; मग ते गड-किल्ले असोत की वेगवेगळी मंदिरं. या सगळ्यांमध्ये कुणीतरी जीव ओतून आपली कलाकारी दाखवलेली असते. ही कलाकारी त्या त्या काळाचं वैभव असते. या वैभवातून माणसं शिकतात. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातलं हे अमृतेश्वरमंदिर. तसं नगर ते अमृतेश्वरमंदिर यांच्यातलं अंतर खूप आहे; पण त्या मंदिराचं सौंदर्य पाहून येणारे ते मोठं अंतर सहज कापत असतात.

मंदिराच्या कोरीव दगडावरून मी हात फिरवत होतो. माझ्या हातांना दहाव्या शतकातल्या कारागिराचा स्पर्श होत होता! मंदिराच्या आत प्रवेश करत असताना, रस्त्याच्या आजूबाजूला बेलाची पानं-फुलं आणि पूजेचं साहित्य विकणारी अनेक मंडळी होती; पण त्या सगळ्या मंडळींमध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला म्हातारा माणूस मोठ्या आवाजात ‘घ्या बाबा फुलं...देवाला आवडतील, घ्या दादा फुलं... देवाला आवडतील’ असं ओरडत होता. एकदम जर्जर झालेली ती व्यक्ती सगळ्या प्रकारची फुलं ओंजळीत घेऊन लोकांना विनंती करत होती. आसपास बरीच म्हातारी मंडळी तशी फुलं विकत होती; पण त्या सगळ्या चेहऱ्यांमध्ये हा म्हातारा चेहरा मला खूपच केविलवाणा वाटत होता. मी म्हातारबाबाकडं गेलो. त्यांच्या ओंजळीत असलेली फुलं माझ्या ओंजळीत घेतली. फुलं घेत असताना आजोबांच्या हाताचा स्पर्श एकदम मऊ मऊ लागला. खूप वय झाल्यामुळे तळहातालासुद्धा सुरकुत्या पडल्या होत्या. त्या आजोबांच्या तळहाताच्या रेषा काम करून करून पूर्णपणे पुसून गेल्या होत्या. मी त्यांच्याकडून फुलं घेतली आणि मंदिरात शिरलो. सगळे जण ज्या पिंडीवर फुलं वाहत होते तिथं मी ती फुलं ठेवली. मंदिराची कारागिरी आतमधल्या भागातून मी बारकाईनं पाहत होतो. प्रत्येक ठिकाणी महादेवाच्या मंदिराला किंवा कुठल्याही मंदिराला एकाच ठिकाणी दरवाजा असतो. इथं मात्र दोन्हीकडून दरवाजे होते. मंदिराच्या आसपास रतनवाडी, सांबरठ, घाटगड, कोरटेंबी अशी गावं आहेत. या गावांत या मंदिराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायचा. रोजगार कसला? जेमतेम संध्याकाळची चूल पेटण्याइतपतच ती व्यवस्था. मंदिराभोवती असलेल्या माहितीपत्रकावर त्रोटक अशी माहिती होती. शिलाहार राजवटीत झंझ राजानं भीमा ते त्र्यंबकेश्वर या बारा नद्या जिथं जिथं उगम पावतात, तिथं तिथं एक महादेवमंदिर बांधलं होतं.

अमृतेश्वराचं मंदिर हे त्यांपैकीच एक. अमृतमंथनच्या काळातली दंतकथा या मंदिराशी संबंधित आहे. देव-दानवांचं युद्ध झालं. त्यात अमृत आणि विष कुणी प्राशन करायचं यावरून वाद निर्माण झाला. त्या वादातून राहूचं शिर तोडलं गेलं, तरीही चोरून अमृत प्यायलेल्या राहूच्या शरीरातून अमृत निघत होतं. राहूचं शिर याच परिसरात पडलं आणि त्यातूनच अमृतेश्वर हे नाव मिळालं. नगरमधलं अमृतवाहिनी हे टोपणनाव किंवा अनेकांचं ‘अमृत’ असं ठेवलं गेलेलं नाव हे याच दंतकथेचा एक भाग आहे, अशी माहिती सांगण्यात आली.

दंतकथा काहीही असो; पण मंदिराचं वैभव एकदा अनुभवण्यासारखं नक्कीच आहे. हे मंदिर उत्तम कारागिरीचा नमुना आहे. मंदिराच्या समोर बघितलं तर पर्वतांच्या रांगांचं सौंदर्य, तर दुसऱ्या बाजूला हिरव्यागार गालिचात नटलेलं शेतीचं सौंदर्य आणि भोवताली असलेली छोटी छोटी गावं. आपला खरा भारत या गावांमध्ये आहे हे इथं निघणाऱ्या चुलीच्या धुराकडे बघून कळतच होतं. मंदिराच्या बाहेर बसलो. सोबत असणाऱ्या काही सहकाऱ्यांची वाट पाहत होतो.

मघाचे ते आजोबा दोन-तीन पायऱ्या मध्ये सोडून माझ्या पुढं बसले होते. आपल्या थैलीतून भाकरीचा तुकडा काढून खात होते. आजोबांच्या अंगावरचे कपडे बरेच मळलेले होते. दोन्ही डोळ्यांत काळजी दिसत होती. चेहरा आजारल्यासारखा दिसत होता. प्लॅस्टिकच्या पिशवीतली ती झेंडू, मोगरा, गुलाब, चमेली आणि वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं सुकून जाण्याच्या मर्गावर होती. ते भाकरीचा तुकडा मोडत असताना आसपासच्या माश्या त्यांच्या डोळ्यांभोवती भिरभिरत होत्या. त्या माश्यांना दूर करण्याचं भानही भुकेपोटी त्या आजोबांना नव्हतं. आसपास कुठली गावं आहेत, शेतीत नेमकं काय पिकतंय, मंदिराच्या दृष्टीनं काही नवा विषय समजून घ्यावा या उद्देशानं मी दोन पायऱ्या खाली आलो आणि आजोबांच्या शेजारी जाऊन बसलो. भाकरीचा तुकडा खालच्या कागदावर ठेवून आजोबांनी थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. मीही नमस्कार केला.
आजोबा अजूनही माझ्यासमोर हात जोडून होते.
स्मितहास्य करत आजोबांनी मला विचारलं : ‘‘झालं का दर्शन साहेब?’’
‘होय’ म्हणत मी आजोबांचे जोडलेले हात माझ्या हातात घेतले.
‘‘कुठलं गाव तुमचं?’’
आमच्या बोलण्याची सुरुवात झाली.
‘जी माणसं सतत पगारासाठी काहीतरी करत असतात,’ ‘ज्यांना स्वतःच्या कुवतीनुसार वेगळं काम करण्यात मजा येते’ आणि ‘ज्यांना काम करावं लागतंच, कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असतो’ अशा जर तीन वर्गवारी केल्या तर हे आजोबा तिसऱ्या वर्गवारीतले होते. वय वर्ष ९२.
मी आजोबांना म्हणालो : ‘‘तुम्ही भाकर खात होता ना, ती खाऊन घ्या. आपण नंतर बोलू.’’
ते म्हणाले :‘‘कालची शिळी भाकर होती. ती आता दाढांना चावतही नाही.’’
आजोबांच्या त्या बोलण्यातून मला त्यांच्या गरिबीचा अंदाज आला. काकांचं कुटुंब, काकांचं गाव, काकांच्या आयुष्यातला सगळा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेतला. मुलं मोठी झाली, कर्तबगार निघाली की गरिबीतून उभ्या राहिलेल्या बापाला विसरतात, हे चित्र तसं काही नवीन नाही. या आजोबांना नियतीनं सगळीकडून घेरलं होतं आणि त्यातून रोजच्या मरणयातना सहन करत त्यांचा जगण्याचा प्रवास सुरू होता.
या ९२ वर्षांच्या आजोबांचं नाव आहे अमृत महाजन. आयुष्यभर दुसऱ्याकडे रोजमजुरी करून त्यांनी मुलांना शिकवलं, त्यांना आयुष्यात उभं केलं. मुलं शिकली, उभी राहिली. मुलांनाही मुलं झाली. सगळ्यांचं व्यवस्थित सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी आजोबांच्या पत्नी गीताबाई या आजारात मरण पावल्या. आजोबांनाही वेगवेगळ्या आजारांनी त्रासलेलं आहेच. त्यात त्यांना औषधपाणी मिळत नाही, खायला दोन वेळचं अन्न मिळत नाही. आजोबांचा मोठा मुलगा नाशिकला प्राध्यापक आहे. प्राध्यापक असणाऱ्या मुलाची बायको नाशिकलाच शिक्षिका आहे. दुसरा मुलगा अकोले तालुक्‍यातच वेगवेगळ्या गावांत जाऊन धान्याचा व्यापार करतो. तो अकोल्यातच राहतो. मंदिरापासून दोन किलोमीटरवर आजोबांची वडिलोपार्जित बारा गुंठे जमीन आहे. त्या जमिनीवरच छोटीशी झोपडी बांधून आजोबा गुजराण करत असतात. जमिनीत फारसं काही पिकत नाही. रात्री अंधार पडायच्या आत झोपडीत जायचं आणि सकाळी तांबडं फुटलं की फुलं घेऊन मंदिराच्या पायऱ्यांवर विकत बसायचं, असा या आजोबांचा अनेक वर्षांपासूनचा दिनक्रम आहे. कधी पावसामुळे; तर कधी आजारी असल्यावर दिनक्रमात फेरबदल होतो; पण असा फेरबदल झाल्यावर दोन वेळच्या तुकड्यांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो...आजोबा सांगत होते.
आजोबा म्हणाले : ‘‘वर्षानुवर्षं मुलं भेटत नाहीत. मी जिवंत आहे की नाही हे पाहायलाही येत नाहीत. मला बिमारी आहे, त्याचा त्रास त्यांच्या मुलांनाही होईल म्हणून मला ते आपल्या घरीही राहू देत नाहीत.’’

आजोबांचं आपल्या मुलांवर किती प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यांची आपल्या मुलांबद्दल अजिबात तक्रार नाही. मुलं नेत नाहीत, मुलं पैसे देत नाहीत, याविषयीही त्यांची तक्रार नाही. त्यांची तक्रार फक्त आपल्या मरण पावलेल्या बायकोविषयी आहे. ‘आयुष्यभर जिनं सुख-दुःखात साथ दिली तीच अर्ध्यात
सोडून गेली,’ असं म्हणत आजोबा अगदी निराश होऊन मान खाली घालून बसले होते. मी त्यांची समजूत काढत होतो; पण ते आपल्या बायकोच्या आठवणीमधून बाहेर यायला तयार नव्हते. आपल्या बायकोसोबत घालवलेले दिवस...पहिला मुलगा झाल्यानंतरचा आनंद...पुरणपोळीचा स्वयंपाक करणारी बायको...अशा अनेक आठवणी आजोबा सांगत होते. आपली नात आणि नातू वर्षातून एकदा तरी डोळे भरून दिसावेत असा त्यांचा आग्रह असतो; पण त्यांची तीही इच्छा पूर्ण होत नाही.
पलीकडे दोन-चार म्हातारी माणसं फुलं आणि काही साहित्य विकत होती, त्यांच्याकडे हात करत मी आजोबांना विचारलं : ‘‘ही म्हातारी मंडळीसुद्धा तुमच्यासारखीच पीडित आहेत का?’’ त्यावर आजोबा म्हणाले : ‘‘असं काही नाही. प्रत्येकाला घरदार आहे आणि सगळे जण आपापल्या जोडीदारांबरोबर आनंदी आहेत. त्यामुळे ते दु:खी असायचं काही कारण नाही आणि सगळे जण मंदिराच्या आसपासच राहतात.’’
मला वाटत होतं, आजोबांच्या झोपडीत जावं, तिथं असणाऱ्या निसर्गाचा आनंद घ्यावा; पण मीही आजोबांच्या मुलांसारखाच, सतत कामात व्यग्र असणारा. नोकरीच्या धबडग्यात मनासारखं कुठं वागता येतं?

आजोबा म्हणाले : ‘‘आज खूप दिवसांनंतर कुणाकडे तरी मन मोकळं करता आलं. आमचं काय, आम्ही म्हातारी माणसं, टाकून दिलेल्या रद्दीसारखी; पण तुम्ही एकदम तरणीताठी आहात, तुमचा काळ आहे. तुमचे दिवस आहेत...पण बाबा, या दिवसांमध्ये ज्यांनी आपल्याला साथ दिली, ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, त्या आई-बाबांचा विसर पडायला नको रे. तो अमृतेश्वर पाहतोय सगळं वरून, कोण चांगलं वागतो आणि कोण वाईट...’’
सूर्य कलला होता. पक्षी घरट्याकडे निघाले होते. बाजूलाच एका गाड्यावर गरमागरम भजी तयार होत होती. भज्यांचा वास सगळीकडे दरवळत होता. मी दोन प्लेट भजी मागवली. भजी खाताना आजोबांना पुन्हा आपल्या बायकोची आठवण आली.
किती प्रेम होतं त्यांचं बायकोवर हे दिसत होतं. ज्या काळात जोडीदाराची सोबत हवी होती त्याच काळात ही सोबत सुटली होती.
आता पुढचा सगळा प्रवास आजोबांना एकट्यानंच करायचा होता. मुलं आता त्यांच्याकडे पाहतील की नाही हे आजवरच्या अनुभवावरून आजोबांनाच नेमकं माहीत नव्हतं.
मी तिथून निघालो. फुलं विकणारे आजोबांचे हात हातात घेतले. माझ्या डोक्याला लावले. त्या हातांना फुलांचा सुगंध रोजच लागत होता...तो सुगंध आता थेट माझ्या मनात दरवळला.

दंतकथेनुसार, अमृत कुणी प्यायचं, यावरून देव आणि दानव यांच्यात मोठा प्रश्न समुद्रमंथनाच्या वेळी निर्माण झाला होता. या आजोबांचा सगळा प्रवास ऐकल्यावर मला वाटून गेलं, की अमृत कुणी प्यायचं या प्रश्नापेक्षा ‘या आजोबांनी संध्याकाळी काय खायचं?’ हाच प्रश्न खूप गंभीर आहे.

आजोबांचं पुढचं आयुष्य किमान सुविधांचं, सुखाचं जावं यासाठी मंदिरातला अमृतेश्वर काही करील का हे माहीत नाही. मात्र, अमृतेश्वरच्या समोर बसलेल्या या आजोबांची उंची मला त्या क्षणी तरी मंदिरापेक्षा मोठी वाटत होती. कारण, आख्खं आयुष्य या आजोबांनी इतर कुणाच्या कल्याणासाठी पणाला लावलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT