sudhir gadgil 
सप्तरंग

रसीला, सुरीला अवलिया (सुधीर गाडगीळ)

सुधीर गाडगीळ

ज्येष्ठ संगीतकार-गझलगायक-तबलावादक रवी दाते हे परवा (ता. तीन डिसेंबर) ८० वर्षं पूर्ण करत आहेत. ‘रसिकाग्रणी’ म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला गेला ते वडील रामूभैया दाते आणि थोरले बंधू प्रसिद्ध भावगीतगायक अरुण दाते अशा या दोघांचा रसिकतेचा, कलेचा वारसा रवीजींना घरातूनच मिळाला.‘शब्दांच्या पलीकडले’, ‘शाम-ए-गझल’, ‘महफिल’, ‘स्वरांजली’ असे त्यांचे अनेक कार्यक्रम रसिकांनी अनुभवले आहेत. गाण्या-बजावण्याच्या मैफलींमध्ये आणि गप्पांमध्ये रमणं ही त्यांची खासियत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

प्रश्न : अरुभैय्या (अरुण दाते) तबल्याच्या क्‍लासला जायचे आणि तुम्ही गाण्याच्या क्‍लासला जायचात. मग पुढच्या काळात तुम्हा दोघांचीही क्षेत्रं नेमक्या उलट्या पद्धतीनं कशी बदलली गेली?

रवी दाते : लहानपणी आमच्या घरी इंदूरला
खूप कलाकारांचा जवळपास रोजच राबता असायचा. सतत कानावर संगीत पडत असे. मला आठवतंय, मी तीन-चार वर्षांचा असताना मास्टर कृष्णराव आमच्या घरी आले होते. मला त्यांचं गाणं आठवत नसलं तरी ती मैफल, तिचा तो ‘माहौल’ आठवतोय. (त्यांनी तेव्हा ‘रागेश्री’ हा राग गायला होता असं पुढं मला मोठेपणी कळलं). ही मैफल ज्या हॉलमध्ये सुरू होती त्या हॉलमध्ये छताला झुंबरं होती. लखलखती-झगमगती उजळलेली झुंबरं. नंतर पुढच्या काळात कधीही लखलखता, झगमगता प्रकाश कुठं दिसला की मला ‘रागेश्री’ हा राग आठवायचा, ती उजळलेली झुंबरं आठवायची. ती मैफल माझ्या मनावर अशा प्रकारे ठसली होती!
लहानपणापासून मी गाणं खूप ऐकत आलो. माझ्या सहाव्या वाढदिवशी (तीन डिसेंबर) अल्लादिया खाँ यांचं गाणं ठेवण्यात आलं होतं आणि भुर्जी खाँ आणि मंजी खाँ हे दोघं तबल्यावर होते. मला ते सगळं आठवतंय. मी अडीच-तीन वर्षांचा असताना रांगत रांगत जाऊन एका माणसाच्या पोटावर बसायचो आणि त्याला सांगायचो, ‘गाणं म्हण’. तो माणूस म्हणजे कुमारकाका. कुमार गंधर्व! स्वतःचाच हेवा वाटावं असं ते सगळं होतं!
अरुदादा तबला शिकायचा. लहानपणी आमच्याकडे लखनौहून एकजण तबला शिकवायला यायचे. कुमारकाका आले की मी एक भजन शिकायचो नेहमी. ‘के सब कहीं न जाए...’ असं ते गायचे. मी त्यांच्याकडून दोन-तीन भजनं मी शिकलो होतो. पुढं क्रिकेट खेळायला जाऊ लागलो. क्रिकेट खेळताना ओरडून ओरडून आवाज इतका बसायचा की मग कसलं गाणं म्हणतोय? गाणं म्हणण्याची ताकदच नसायची. उस्ताद अहमद जाँ थिरकवा यांच्या तबलावादनाचा आमच्यावर प्रभाव होता. सोलो तबला ते काय वाजवायचे! अप्रतिम! मग मला वाटायचं की आपणही तबला शिकायला पाहिजे.
एकदा उस्ताद जहाँगीर खाँ साहेब आमच्याकडं आले होते. तबला शिकण्याविषयी त्यांच्याशी चर्चा झाली आणि एक जानेवारी १९५९ रोजी मी त्यांचा ‘गंडाबंद शागीर्द’ झालो. अशा प्रकारे माझं तबला शिकणं सुरू झालं. जहाँगीर खाँसाहेब हे दिल्ली, आग्रा, पुरज अशा विविध घराण्यांचा तबला शिकवत.
माझं गंडाबंधन झालं तेव्हा ते ८५ वर्षांचे होते. ते १०८ वर्ष जगले. मला त्यांनी खूप छान शिकवलं.
दुसरीकडे, त्याच वेळी अरुदादा मुंबईत गेला. गायनाच्या क्षेत्रात. त्यानं सुरवातीला सिनेमासाठी पार्श्वगायन केलं. नंतर गझलगायन शिकून तो गझला गाऊ लागला. अशा प्रकारे मी गायनाकडं जाण्याऐवजी तबला वाजवू लागलो आणि अरुदादा तबलावादक होण्याऐवजी गायक झाला!

* तुम्ही लता मंगेशकर यांनाही तिरुपतीमधल्या एका कार्यक्रमात तबलासाथ केली होती...ती कुठल्या वर्षी? लतादीदींशिवाय आणखी कुणाकुणाला वादनसाथ केलीत तुम्ही?

- लतादीदींना साथ केली ती तारीख होती १७ ऑक्‍टोबर १९७२. लतादीदींना मी अनेक कार्यक्रमांत साथ केली असून त्यांच्याशिवाय इतर अनेक दिग्गजांना तबलासाथ करण्याचं भाग्य मला लाभलं. बेगम
अख़्तर, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे आदींना मी तबलासाथ केली आहे.

* श्री. ना. पेंडसे, विंदा करंदीकर अशा मोठ्या साहित्यिकांनीही तुमच्या तबल्याचं कौतुक केलेलं आहे ना? त्याबद्दल जरा सांगा...

- श्री.ना., विंदा, मंगेश पाडगावकर असे बरेच साहित्यिक आमच्याकडं दादरला यायचे. असं कुणी आलं की ‘तबला ऐकव ना त्यांना’ असं मला बाबा (वडील रामूभैया दाते) सांगायचे. विंदांना माझं तबलावादन खूपच आवडायचं. एकदा ते आणि पाडगावकर
आमच्याकडे एकत्रच आले होते. त्या वेळची एक गंमत सांगतो.
माझ्याकडे बोट दाखवून पाडगावकरांना विंदा म्हणाले : ‘‘या मुलाची स्पेशालिटी म्हणजे बांया!’’ पाडगावकरही मिश्किल! ते म्हणाले : ‘‘या वयात बांया?’’
डग्ग्याला ‘बांया’ असंही म्हणतात असा खुलासा नंतर केला गेल्यावर मोठाच हशा पिकला. ‘बांया’ हा डग्ग्याचा पर्यायवाचक शब्द फारसा प्रचलित नाही.

* हृदयनाथ मंगेशकर आणि नंतर अरुण दाते यांच्यामुळे ‘भावसरगम’ हा कार्यक्रम गाजला; पण मला वाटतं, ‘भावसरगम’च्या अगदी आरंभापासून तुम्हीही होतात ना? कोण कोण होतं आणखी?

- हृदयनाथ, उषाताई मंगेशकर, अरुभैया आणि मीही होतो. एक-दोन कार्यक्रमांत लतादीदीही गायल्या होत्या. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी निवेदन केलं होतं. मी खूप कार्यक्रम केले, खूप तबला वाजवला; पण एक सांगू का, माझं मन तबल्यात रमतच नव्हतं. कुमारकाकांच्या सुरांनी मला अगदी झपाटून टाकलं होतं. त्यामुळे असा काही परिणाम झाला की तबला राहिला बाजूला आणि पेटी आली हातात!

* तुम्हाला गझलगायकीचंही खूप आकर्षण आहे. तुम्ही अनेक गझला संगीतबद्धही केल्या आहेत...तिकडे कसे वळलात आणि ते संस्कार तुमच्यावर कसकसे झाले?

- विख्यात गायिका बेगम अख़्तर यांचं गझलगायन मी खूप ऐकलं. त्या आमच्या घरी यायच्या. मी कधी त्यांच्याकडे लखनौला गेलो नाही. मात्र, इंदूरला किंवा अन्य कुठं त्यांचा कार्यक्रम असला की मी त्यांचं गाणं ऐकायला जायचो. त्यांच गाणं पारंपरिक थाटाचं असलं तरीही निराळ्या पद्धतीचं होतं. मात्र, माझ्यावर खरा प्रभाव कुणाचा पडला म्हणाल तर तो ज्येष्ठ गझलगायक मेहदी हसन यांचा. मुंबईत ‘बिर्ला मातोश्री’मध्ये एकदा त्यांची मैफल होती. मला तारीखही आठवतेय. २८ फेब्रुवारी १९७९. त्या मैफलीत सुरवातीला लतादीदी बोलल्या. नंतर संगीतकार नौशाद यांच्या हस्ते मेहदी हसन यांचा सत्कार झाला आणि मग त्यांच्या गझलगायनाची मैफल झाली.

* मेहदी हसन यांनाही तुम्ही भेटला होतात ना? अनपेक्षितपणे? कशी घडून आली होती ती भेट?

- तो मोठाच किस्सा आहे. २८ फेब्रुवारी १९७९ च्या त्या मैफलीनं मी अतिशय भारावून गेलो होतो. मी त्या मैफलीची २५ तिकिटं खरेदी केली होती व नात्यातल्या, ओळखीतल्या ज्यांना संगीताची आवड आहे अशा सगळ्यांना त्या मैफलीला घेऊन गेलो होतो. ‘हे गाणं दैवी आहे, तुम्ही ऐकायलाच हवं’ असं सांगत मी त्या सगळ्यांना मैफलीला नेलं होतं. त्या मैफलीच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट.
मी तेव्हा मफतलाल ग्रुपमध्ये नोकरी करत होतो. ओबेरॉय शेरेटन हॉटेलात त्या दिवशी ऑफिसची पार्टी होती. मी त्या पार्टीला गेलो असता कळलं की मेहदी हसन त्याच हॉटेलात उतरले आहेत. पीरबक्ष नावाचे त्यांचे तबलजी आहेत हे मला माहीत होतं.
आधी पीरबक्ष यांना भेटायचं व मग योग जुळून आला तर मेहदी हसन यांना भेटायचं असं मी ठरवलं.
मी त्यांच्या खोलीजवळ गेलो असता ते मला समोरच दिसले. मी त्यांच्याकडेच आलो आहे असं कळताच ते म्हणाले : ‘‘आईए...तश्रीफ लाईये’’
मी म्हणालो : ‘‘माफ कीजिए, मै आप को ज़हमत देने नही आया हूँ, मैं पीरबक्षसाब से मिलने आया हूँ।’’
‘‘जरूर, जरूर।आप आईये।’’
‘‘मियाँ पीरबक्ष को बुलाओ’’ त्यांनी कुणाला तरी सूचना केली.
आणि मग मला विचारलं : ‘‘आप की तारीफ?’’
मी संकोचतच म्हणालो : ‘‘हुजूर, मैं तारीफ के लायक तो नही हूँ, पर पहचान बताता हूँ मेरी...मैं वो हूँ जिस के लिये आप गाते हो...!
मतलब, आप के जो सुननेवाले है, आप के जो चाहनेवाले है उन तमाम लोगों का मैं रिप्रेझेंटेटिव्ह हूँ। मैं सज्दे में दुआ माँगता हूँ आप के लिए। आप के गाने ने मुझे इतना सुकून दिया है कि मैं वो लब्जों में बयाँ नही कर सकता हूँ। यहाँ बंबई मे बांद्रा कर के जो एरिया है वहाँ मै रहता हूँ।
मेरी बेडरूम में एक तरफ आप की तसवीर लगी हुई है और दूसरी तरफ है समंदर। मैं सुबह उठता हूँ तो कश्‍मकश में पड जाता हूँ की मै पहले इधर देखूँ या उधर देखूँ?’’
हे ऐकल्यावर ते दिलखुलास हसले आणि तिथं काही पत्रकार आधीच आलेले होते त्यांना उद्देशून ते म्हणाले : ‘‘अरे भाई देखो, ऐसे भी लोग है दुनिया में. इन का इंटरव्ह्यू ले लो, यार. मेरा क्‍या ले रहो हो!’’
अशा प्रकारे मेहदी हसन यांच्याशी माझी अकल्पित आणि अतिशय सुंदर भेट झाली. त्यांच्या सुरांनी मला खूप समृद्ध केलं आहे.
तत्पूर्वीची गोष्ट. मी सन १९७२ मध्ये तबलावादनासाठी आफ्रिकेत गेलो होतो. मेहदी हसन यांचे तिथं खूप कार्यक्रम व्हायचे. तिथल्या त्यांच्या अनेक कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग तिकडच्या लोकांनी करून मला दिलं. मी ते मुंबईला आणलं. त्यापैकी एक रेकॉर्ड मी लतादीदींना दिली. ती ऐकण्यात त्या रमून गेल्या होत्या.

*मराठी गझल ऐकता ऐकता कविवर्य, गझलकार सुरेश भट यांच्याशीदेखील या विषयावर तुमच्या खूप गप्पा झालेल्या आहेत ना?

- खूप! सुरेश भटांचं आणि माझं नातं होतं. माझ्या आत्याचे ते पुतणे. त्या वेळी ते अमरावतीला असत. भट यांची गझल थेट हृदयाला भिडणारी आहे. लाजवाब! माझा उर्दू गझलांचा बऱ्यापैकी अभ्यास होता; पण मराठी साहित्याचा म्हणावा तेवढा नव्हता. मात्र, भट यांच्या गझलांनी मला श्रीमंत केलं. त्यांच्या गझला वाचल्या/ऐकल्या आणि वाटलं की या संगीतबद्ध व्हायलाच हव्यात. मग काही गझला मी संगीतबद्ध केल्या. भट यांच्या गझलेची मला जाणवलेली ताकद सांगतो.
जोपर्यंत कोणतीही गझल - मग ती मराठी असो की उर्दू असो - माणसाशी (Human being) संबंधित नसेल तर तिला काही अर्थ नाही. चंद्र, सूर्य, तारे यांच्यावरही गझला असतात, नाही असं नाही; पण माणसाशी, त्याच्या जगण्याशी संबंधित असलेल्या गझला अधिक आशयघन, अधिक अर्थपूर्ण असतात असं माझं मत आहे. यासंदर्भात भट यांच्या एकाच गझलेचं उदाहरण देतो.
आसवांचे जरी हसे झाले
हे तुला पाहिजे तसे झाले

पाहिले दुःख मी तुझे जेव्हा
दुःख माझे लहानसे झाले!

तो १९८७-८८ चा काळ होता. आम्ही काही मित्रांनी तेव्हा केलेली आर्थिक गुंतवणूक बुडाली. मोठीच गडबड झाली. आम्ही सगळेच तेव्हा दुःखात होतो. त्याच काळात भट यांचा हा शेर -
पाहिले दुःख मी तुझे जेव्हा
दुःख माझे लहानसे झाले

माझ्या वाचनात आला आणि वाटून गेलं की आत्ता जरी आपलं काही आर्थिक नुकसान झालेलं असलं तरी इतरांच्या तुलनेत आपल्या आयुष्यात तसं काहीच दुःख नाहीये, फार मोठी काही अडचण आपल्यापुढे नाहीये. आपण उगाचच रडतोय...तर
गझलेतला शेर माणसाला, माणसाच्या जगण्याला असा ‘ॲप्लिकेबल’ व्हायला हवा!

* कुमार गंधर्वांनी जेव्हा तुमचं गाणं ऐकलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

- सन १९८४-८५ मध्ये ‘शाम-ए-गझल’ नावाचा माझा कार्यक्रम दूरदर्शनवर झाला होता. आमचे बाबा घरात गझला गुणगुणायचे. त्या माझ्या कानावर पडत. बेगम अख़्तर यांच्याकडून ते त्या गझला ऐकून आलेले असायचे. त्या गझला आम्ही लिहून ठेवल्या होत्या. त्यातल्या पाच गझलांचा मी ‘शाम-ए-गझल’ नावाचा कार्यक्रम केला. तो प्रसारित झाल्यावर कुमारकाकांनी मला विचारलं, ‘तू चाली दिल्या आहेत असं कळलं.’
मी म्हणालो, ‘हो. प्रयत्न केला आहे!’
त्यावर ते म्हणाले, ‘मला ऐकव.’ त्यानुसार मी ऐकवल्या आणि त्यांचे डोळे भरून आले. आमच्या बाबांच्या आठवणीनं त्यांना गहिवरून आलं होतं. त्यांनी त्या कार्यक्रमाची कॅसेट त्यांच्या संग्रही ठेवण्यासाठी
मला मागितली. कुमारकाकांनी माझी ती कॅसेट पाहावी, ऐकावी यापेक्षा मोठी दाद ती कोणती! त्यांना ती कॅसेट फार आवडली होती.

* गायिका रेश्‍मा यांनाही तुम्ही भेटला होता ना?

- हो, त्यांनाही भेटलो आहे मी. त्यांचं भरपूर गाणं ऐकलं आहे. पूर्वी बाबांमुळेही अनेक दिग्गजांच्या भेटी घडून आल्या. संगीतकार कल्याणजी-आनंदजी या द्वयीतले कल्याणजी यांच्यामुळेही खूपजणांची भेट झाली.

* ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांची आणि तुमची मैत्री आहे. त्यांच्या सांगीतिक संबंधांबद्दल सांगा.

- पोहनकर हे मोठे ‘म्युझिशिअन’ तर आहेतच; पण मी मात्र त्यांना ‘पेंटर’ मानतो! ते फोटोग्राफिक पेंटर नाहीत, तर लॅंडस्केपिंगसारखं त्यांचं गायन आहे. श्रोता त्यांचं गाणं आपापल्या अंदाजानुसार, आपापल्या कल्पनांनुसार ऐकत असतो. पोहनकर यांच्या गायनाची ही खासियत आहे. एकदा आम्ही दोघांनी एक प्रयोग केला होता. मी गझलची एक ओळ म्हणायची आणि पोहनकर यांनी केवळ आलाप घ्यायचे असा तो प्रयोग होता.

प्रश्न : तुमचे वडील रामूभैया दाते यांच्या प्रोत्साहनामुळेच तुम्ही गाणं-गायन यात रमू शकलात ना? हे तुम्ही नोकरी सांभाळून केलंत...!

रवी दाते : नक्कीच. बाबांचं प्रोत्साहन सततच असायचं.
‘रवी तबला-डग्ग्याचा समतोल उत्तम सांभाळतो. तबल्याला त्याचा हात मुलायम आहे’ असं एकदा ते म्हणाले होते.
ते उच्चपदस्थ नोकरीमुळे अनेकदा फिरतीवर असत. जिथं कुठं असतील तिथून मला पत्र पाठवत. बाबांची पत्र सुभाषितवजा असत. एकदा माझी परीक्षा असतानाही त्यांनी मला हबीबुद्दीन खाँसाहेबांच्या तबलावादनाला कुमारकाकांबरोबर पाठवलं होतं; पण एका पत्रातून नेमक्या शब्दांत रास्त सल्लाही दिला होता. त्यांनी पत्रात म्हटलं होतं : ‘तुला संगीताचा ‘शौक’ आहे हे माहीत आहे मला; पण सुरांचा एवढाच ‘षौक’ कर की पुढच्या आयुष्यात तुझ्यावर ‘शोक’ करण्याची वेळ येऊ नये!’
अशा वडिलांमुळेच नोकरीत भरीव करिअर, गाण्याचा छंद, तबल्याचा रियाज, गझलच्या शिकवण्या यांचा ‘बॅलन्स’
रवी दाते आयुष्यात साधू शकले.
ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT