Prakashacha Utsav Book sakal
सप्तरंग

समृद्ध वाचनानंद

‘प्रकाशाचा उत्सव’मधील लालित्यपूर्ण लेखन बालमनाचे भावविश्व उलगडणारे आहे. मुलांना वाचनानंदात चिंब भिजवणारे आहे.

अवतरण टीम

- सरोजिनी देवरे

‘प्रकाशाचा उत्सव’मधील लालित्यपूर्ण लेखन बालमनाचे भावविश्व उलगडणारे आहे. मुलांना वाचनानंदात चिंब भिजवणारे आहे.

एकनाथ आव्हाड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक. बालसाहित्यात सतत प्रयोग करणारे पाठ्यपुस्तकातील प्रयोगशील लेखक. त्यांची बालसाहित्य निर्मिती लहान-मोठ्यांना आवडते. त्यांच्या ‘छंद देई आनंद’ या बालकवितासंग्रहाला अलीकडेच साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला असून, आता ‘प्रकाशाचा उत्सव’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

आव्हाड हे शिक्षक असल्यामुळे मुलांसाठी काय उपयुक्त आहे याची त्यांना जाणीव असल्याचे हा कथासंग्रह पुन्हा एकदा अधोरेखित करणारा आहे. या कथा लिहिताना विद्यार्थ्यांना उपयुक्त असे वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक भाषेची गुंफण करून प्रत्येक कथा ते भाषासमृद्ध करतात. या कथा सहज संवादातून विनोद निर्मिती करतात. सत्यनिष्ठा, सर्जनशीलता, संवेदनशीलता इत्यादी मूल्यांचे संस्कार करणारा हा कथासंग्रह आहे.

‘अभ्यास एके अभ्यास’ या कथेतून सर्व विषयांचा अभ्यास कसा करावा, एकत्रित अभ्यासामुळे झालेला गोंधळ, बाबांनी अभ्यासाची नवी दिशा दिल्यामुळे मुलाला उमगलेली त्याची चूक हे सारे यथोचित उदाहरणे देऊन गुंफले आहे. या कथांना काव्याची जोड देऊन त्या कथा अधिक वाचनीय झाल्या आहेत. ‘कुसुमाकरांचा सलाम’ ही कथा श्रीशान नावाच्या मुलाची आहे. त्याला कविता लिहिण्याची खूप आवड असते.

‘कुसुमाकर’ हे नाव धारण करून तो छान छान कविता लिहितो. या कथेत हलक्याफुलक्या संवादातून सुंदर विनोदी हास्याचे प्रसंग आव्हाड यांनी छान रंगवले आहेत. ‘माझ्या नावाची गोष्ट’ ही कथा खेड्यातून शहरात आलेल्या खंडूची. त्याच्या नावामुळे झालेली गंमत या कथेतून, वर्गात घडलेल्या सर्व प्रसंगांना विनोदी झालर चढवून वाचकांसमोर लेखकाने सादर केली आहे. मास्तर आणि खंडू यांच्यातील संवादातून हास्याचे कारंजे सहज फुटतात.

‘प्रकाशाचा उत्सव’ या शीर्षक कथेत बाळूला वाचनाची प्रचंड आवड आहे, पण ताईला दिवाळीच्या सुट्टीत बाळूकडून खूप अपेक्षा आहेत. बाळूने गाण्याचा क्लास लावावा किंवा इतर गोष्टी शिकाव्यात अशी तिची इच्छा आहे. पण बाळू म्हणतो, ‘पुस्तक करतात माझ्यावरी, आईपरी माया, पुस्तकांसोबत जातो मी, जग फिराया.’ वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कथा आहे. ‘नवलाई’ ही शमी आणि बाळू या दोघा भावंडांची. आई-वडिलांच्या मदतीने ते एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे हा भाषिक खेळ खेळतात. आपणही त्या खेळात हरवून जातो.

‘सत्यमेव जयते’मध्ये खोटं बोलणाऱ्या मित्राला पाठीशी न घालता मित्राला ‘सत्यमेव जयते’ म्हणजेच सत्याचाच शेवटी विजय होतो, हे सांगताना आव्हाड यांनी बालमनावर नकळत कसे संस्कार होतील, याचा पुरेपूर विचार केला आहे. ‘अथक प्रयत्नांची यशोगाथा’ ही मुलांना प्रेरणादायी ठरावी अशी कथा. अचानक अधूपण आलेल्या प्रांजल या मुलीने जिद्द, चिकाटीने अंधत्वावर कशी मात केली. पहिल्या अंध कलेक्टर प्रांजलचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना विचार करायला लावण्यासारखाच आहे.

‘नवोन्मेष आनंदाचे’ या कथेत इयत्ता नववीच्या वर्गातील प्रसंग उभा केला आहे. गणपती सुट्टीच्या अगोदर भालचंद्र देशपांडे यांची वर्गात मुलांसोबत चर्चा होते. गणपती बनवायला दोन प्रकारची माती... शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस. कोणती योग्य? प्रदूषण कसे होते? लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश, पूर्वीचा गणेशोत्सव व आताचा गणेशोत्सव यातील फरक... मुलांच्या व देशपांडे सरांच्या संवादातून गणेशोत्सवामागची नवी दृष्टी मुलांना मिळते.

‘हाही आपला मित्रच’ ही कथा मधुकर आणि सतीशदादा यांच्यातील संवादावर बेतली आहे. वर्तमानपत्र नियमित वाचल्यावर कसे फायदे होतात. वर्तमानपत्रातून बहुविध प्रकारची माहिती दिलेली असते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, विज्ञान आणि दैनंदिन घडामोडी कळतात. म्हणजेच वर्तमानपत्र मित्राचे काम करतात. म्हणूनच प्रत्येकाने नियमित वर्तमानपत्र वाचावे, असा संदेश यातून मुलांना मिळतो.

‘खेळाचा तास’ या कथेत रविवारी कडक उन्हात कोणता खेळ खेळावा, असा प्रश्न मुलांना पडतो. तेव्हा ते ‘ओळखा पाहू’ म्हणजेच कोडी घालण्याचा खेळ खेळतात. खेळाची गोडी वाढवतात. ‘शिळोप्याच्या फळगप्पा’ ही कथा बहीण, भाऊ आणि वडील यांच्यातील संवादातून फळांचे महत्त्व पटवून देते. या कथेला काव्याची सुसंगत अशी जोड दिली आहे.

‘हाताचा धर्म उगारणे नव्हे उभारणे’ ही कथा चोरी करणे कसे वाईट असते, हे मुलांना सांगते. चोरी छोटी मग शिक्षा का मोठी, या प्रश्नावर चोरी ती चोरीच असते. ती लहान-मोठी नसते, असा संस्कार या गोष्टीतून सहजगत्या पुढे येतो. ‘मनात आहे पुष्कळ’ ही कथा शमी नावाच्या मुलीने स्वतःची फसगत कशी करून घेतली. ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात पाहुण्यांपुढे तिने स्वतःची चूक कबूल केली. पुन्हा सर्व तयारी करून चूक होणार नाही, याची खात्री करून दिली.

‘भेट पाखरांची’ या कथेत बाळूच्या बाबांना कामामुळे मुलांना कोठे फिरायला घेऊन जाता येत नाही; पण एका रविवारी त्यांनी मनाशी पक्के ठरवले आणि बाबांनी भायखळ्याच्या राणीच्या बागेत नाना तऱ्हेच्या पक्ष्यांच्या भेटीला नेले. वेगवेगळ्या पक्ष्यांचे केलेले काव्यात्मक वर्णन रंजक आहे. मुले बागेतील पक्ष्यांना खऱ्या अर्थाने भेटले.

‘प्रकाशाचा उत्सव’ हा नावीन्यपूर्ण असा बालकथासंग्रह आहे. त्यातील लालित्यपूर्ण केलेले लेखन हे उत्कंठावर्धक व बालमनाचे भावविश्व उलगडणारे आहे. मुलांना वाचनानंदात चिंब भिजवून, त्यांची आनंदाची बाग फुलविणारा हा बालकथासंग्रह बालसाहित्यात मोलाची भर घालेल, हे निश्चित!

‘हाही आपला मित्रच’ ही कथा वृत्तपत्रांचे महत्त्व सांगणारी आहे. वर्तमानपत्रात बहुविध प्रकारची माहिती असते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, विज्ञान आणि दैनंदिन घडामोडी कळतात. म्हणजेच वर्तमानपत्र मित्राचे काम करतात. म्हणूनच प्रत्येकाने नियमित वर्तमानपत्र वाचावे, असा संदेश यातून मुलांना मिळतो.

बालकथासंग्रह : प्रकाशाचा उत्सव

कथाकार : एकनाथ आव्हाड

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स

पृष्ठे : ८०

किंमत : १२० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : 'रात्रीचे खेळ सांगायला आम्हाला भाग पाडू नका'; आमदार जयकुमार गोरेंचा कोणाला इशारा?

Latest Maharashtra News Updates :मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

IND vs SA : आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात Axar Patel चा अफलातून कॅच; करून दिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची आठवण

BSNL IFTV : BSNLने सुरु केली पहिली इंट्रानेट टीव्ही सेवा; 500+ लाईव्ह चॅनेल्स अन् OTT प्लॅटफॉर्म्सचं कनेक्शन कसं घ्यायचं? वाचा

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT