Ashleigh Barty Sakal
सप्तरंग

अष्टपैलू बार्ती

सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि त्याच्या अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलानो मार्टिनेझ याने ‘कोपा अमेरिके’त केलेली दिमाखदार कामगिरी...

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि त्याच्या अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलानो मार्टिनेझ याने ‘कोपा अमेरिके’त केलेली दिमाखदार कामगिरी... युरो फुटबॉल स्पर्धेत इटलीच्या अजिंक्यपदात हीरो ठरलेला त्यांचा गोलरक्षक डोनारोमा... विम्बल्डनमध्ये मक्तेदारी सिद्ध करून जोकोविचनं मिळवलेलं विसाव ग्रँडस्लॅम विजेतेपद...असे अनेक हीरो काही दिवसांपूर्वी जगभरातील क्रीडाक्षेत्रानं पाहिले अन् अनुभवलेही; पण त्याच वेळी या सर्व पुरुषांमध्ये एक महिला अभिमानानं आणि ठकळपणे उजळून आली ती म्हणजे विम्बल्डन महिला विजेती ऑस्ट्रेलियाची ॲश्ले बार्ती.

समोर अडचणींचा कितीही मोठा डोंगर असला तरी कमालीची इच्छाशक्ती आणि पराकोटीची जिद्द असली की हे आव्हान लीलया पार करता येऊ शकतं. यासंदर्भात बार्तीशिवाय सध्या तरी दुसरं उदाहरण देता येणार नाही. तीन जून रोजी तिला मांडीच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेतला दुसरा फेरीचा सामना मध्येच सोडून द्यावा लागला. बरोबर ३५ दिवसांनी तिनं विम्बल्डनचं विजेतेपद मिळवलं. दुखापतीतून सावरणं, पुन्हा अव्वल दर्जाची तंदुरुस्ती मिळवणं आणि अजिंक्य वीरांगनेसारखा खेळ करणं हे सगळं दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीतीलच आहे.

आक्रमक खेळ असलेली मार्टिना नवरातिलोवा, नजाकत असलेली ख्रिस एवर्ट लॉईड, खेळातही सौंदर्य असलेली स्टेफी ग्राफ त्याचप्रमाणे मार्टिना हिंगिस, ‘ताईगिरी’ करणारी सेरेना विल्यम्स, बंडखोर विचार असलेली आत्ताची नाओमी ओसाका अशा अनेक नायिकांनी महिला टेनिस गाजवलेलं आहे; पण या सर्वांत बार्ती वेगळी आहे. संयमी, शांत. विजयाचा कोणताही दर्प नसलेली बार्ती काहीशी स्टेफी ग्राफच्या जवळ जाणारी. पहिल्यावहिल्या विम्बल्डन आणि दुसऱ्या ग्रँड स्लॅम विजेतेपदानंतरही तिचं वर्तन प्राथमिक फेऱ्या जिंकल्यासारखंच होतं; पण असं असतानाही आदर आणि संस्कृतीचं पालनही ती करत होती. ४१ वर्षांनंतर विम्बल्डन जिंकणारी ही ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू ठरली. सन १९८० मध्ये विम्बल्डन जिंकताना इव्हॉन गूलागाँग यांनी जो पोशाख परिधान केलेला होता तसाच पोशाख परिधान करून बार्ती यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत खेळली आणि जिंकली. हे ऑस्ट्रेलियन लोक रूढी-परंपरा जपण्याला फारच प्राधान्य देतात आणि त्यांचा सन्मानही राखतात.

क्रिकेट आणि टेनिसपटू

म्हणूनच ॲश्ले बार्ती हे एक वेगळं रसायन आहे. लहानपणापासून अनेक खेळ खेळले जातात; पण ठरावीक वयानंतर एकाच खेळातील प्रगतीसाठी झोकून दिले जातं; पण बार्तीचं मात्र वेगळंच आहे. ती टेनिसबरोबरच क्रिकेटही खेळलेली आहे. अशी उदाहरणं महिलांमध्ये तरी अपवादानच आढळतील. भारताची हरहुन्नरी क्रिकेटपटू मुंबईची जेमिमा रॉड्रिग्ज राष्ट्रीय स्तरावर महिला हॉकीसुद्धा खेळलेली आहे. पुरुषांमध्ये उच्च स्तरावर असे विविध खेळ दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स खेळलेला आहे; पण टेनिसची कारकीर्द ऐन भरात येत असताना मध्येच दोन वर्षं महिला क्रिकेटसाठी देणं आणि पुन्हा टेनिसकडे केवळ परतणंच नव्हे तर, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकणं आणि महिलांच्या क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवणं हे कमालीचंच आहे. ‘दुहेरी शक्ती’ असंच या गुणवत्तेचं वर्णन करता येईल.

भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही क्रिकेटचं वेड आहे. तेव्हा बार्तीनंही लहानपणी टेनिसच्या रॅकेटसह क्रिकेटची बॅट हातात घेतली नसती तर नवलच होतं, त्यामुळे चांगलं क्रिकेट ती खेळू लागली. २०१२ मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळू लागल्यावर २१०४ मध्ये फ्रेंच आणि विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तिनं मजलही मारली होती; पण अचानकच तिचं मन टेनिसमध्ये रमेनासं झालं. ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश ट्वेन्टी-२० लीगसाठीची ऑफर आली आणि बार्तीनं थेट टेनिसची रॅकेट बाजूला टाकून क्रिकेटची बॅट हाती घेतली. टेनिस हा एकेरी आणि दुहेरीचा खेळ; पण क्रिकेट हा सांघिक खेळ. म्हटलं तर हा केवळ खेळातला फरक नाही, तर वैयक्तिक खेळ आणि सांघिक खेळ एवढा मोठा फरक आहे. वेगवेगळ्या विचारांच्या, प्रवृत्तींच्या आणि गुणवत्तेच्या इतर सहकाऱ्यांसह खेळताना तुमची मानसिकता वेगळ्या धाटणीत घडत असते. पुन्हा टेनिसकडे वळल्यावर ‘लॉकर रूम’ आणि ‘ड्रेसिंग रूम’ यांचा फायदा बार्तीला निश्चितच झाला. टेनिसमधील तिचे मार्गदर्शक क्रेग तेझर हेसुद्धा ही बाब मान्य करतात. बार्तीचे लाईफ पार्टनर गॅरी किसिक यांचाही बार्तीच्या या प्रगतीत महत्त्वाचा वाटा आहे. कारण, गॅरी हे ऑस्ट्रेलियातील गोल्फ चॅम्पियन आहेत, त्यामुळे गोल्फ या खेळात मानसिकता कशी असते याचेही धडे बार्तीला मिळालेले असतीलच.

महिला दुहेरीतही यश

बार्तीचा टेनिसमधील एकेरीतील प्रावीण्याचा उल्लेख केला जातोच; पण तिचं महिला दुहेरीतील यशही तेवढंच मोलाचं आहे. सन २०१८ मध्ये तिनं यूएस ओपन ग्रँड स्लॅम जिंकलेली आहे. त्यानंतरच्या वर्षात ती उपविजेती राहिलेली आहे. सन २०१३ मध्ये, म्हणजेच व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली त्याच्या पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि यूएस ओपन अशा तीन ग्रँड स्लॅमचं उपविजेतेपद तिनं मिळवलं होतं. केवळ याच वर्षी ती महिला दुहेरीत खेळली नाही. मांडीच्या दुखापतीमुळे तिनं हा निर्णय घेतला; पण कोर्टवर- दुहेरी असो वा एकेरी - सतत राहण्याची तिची इच्छाशक्ती ध्येयाकडे वेगानं वाटचाल करणारी आहे हे निश्चितच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT