Mary Kom Sakal
सप्तरंग

अशी घडते पिढी

ऑलिंपिकसारख्या सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धांत प्रथितयश देशांचे खेळाडू पदकांची लयलूट करतात, विश्वविक्रमी कामगिरी करतात, हे अपेक्षितच असतं.

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

ऑलिंपिकसारख्या सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धांत प्रथितयश देशांचे खेळाडू पदकांची लयलूट करतात, विश्वविक्रमी कामगिरी करतात, हे अपेक्षितच असतं; परंतु जगाच्या नकाशावर ठिपक्यासारखे दिसणाऱ्या देशांचे खेळाडू जेव्हा पदकं अभिमानानं गळ्यात मिरवतात, तेव्हा आपण आपल्याला शोधत असतो. या टोकियो ऑलिंपिकमध्ये मीराबाई चानूनं पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकलं. दूरचित्रवाणीवरून याची देही याची डोळा पदक जिंकण्याचा हा सोहळा पाहणारे आपण धन्य झालो. खरं सांगा, यातील किती जणांना मीराबाई चानू हे नाव माहीत तरी होतं? सव्वाशे कोटींचा आपला देश; परंतु स्पर्धा सुरू होऊन पुढच्या पाच दिवसांत या एका रौप्य पदकाच्या पुढं आपण गेलो नाही. पहिल्याच दिवशी मीराबाई चानूनं हे यश मिळवलं म्हणून ठीक, नाहीतर खातंही उघडलं नसतं. हे आत्ताचं नाही, दरवर्षी ऑलिंपिकमध्ये असंच होत असतं...

असो, हा इतिहास पुन्हा उगाळण्याचा प्रश्न नाही, प्रश्न आपण बोध घेण्याचा आहे. कधीकाळी हॉकीत सुवर्णयुग होतं, त्यानंतर क्रिकेट हाच जणू काही आपला राष्ट्रीय खेळ म्हणून प्रसिद्धी पावत आहे. खेळ हा खेळ असतो, त्यांची तुलना करणंही योग्य नाही. कोणत्याही खेळात प्रगती करायची असेल, तर सर्वांत पहिल्यांदा पिढी घडायला हवी. ही पिढी वेताची छडी किंवा फूटपट्टीचा प्रसाद देऊन, तसंच उठाबशांची शिक्षा देऊन घडत नाही, ती आपसूक घडावी लागते, तरच क्रांतीची अपेक्षा बाळगता येते.

मीराबाई चानूनं रौप्यपदक जिंकताना क्लीन आणि जर्कमध्ये अखेरच्या प्रयत्नात उचलेलं वजन, त्यानंतरची तिची विजयी मुद्रा, पदक स्वीकारल्यानंतरचा आनंद हुबेहूब टीव्हीसमोर साकारत असलेल्या एका छोट्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाला...

अनेकांनी त्या व्हिडीओला लाइक्स दिल्या, पहाता पहाता स्मितहास्य करत हा व्हिडीओ फॉर्वर्डही केला; पण त्यामध्ये एक मोठा आशेचा किरण निर्माण झाला. आपणच मीराबाई आहोत असं त्या मुलीला वाटू लागलं. या मुलीला तूही चानूप्रमाणे कृती कर, असं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं नव्हतं, अंतर्मनातून वाटल्यामुळं त्या मुलीनं ही कृती केली.... खेळाची पिढी घडण्याचं असंच पहिलं पाऊल असतं....

व्हिडीओतील ही मुलगी पुढं वेटलिफ्टर होईल की नाही माहीत नाही.... पण दूरचित्रवाणीवर मीराबाईचा तो पराक्रम पाहणाऱ्या असंख्य मुलांना प्रेरणा निश्चितच मिळाली असणार. कोरोनामुळं आत्ता शाळा बंद आहेत हा अपवाद; परंतु ज्या शाळांमध्ये वेटलिफ्टिंग हा खेळ असेल, त्या शाळेतील मुलांसाठी मीराबाईनं निश्चितच आदर्श निर्माण केला आहे. या रुपेरी यशानंतर मीराबाईच्या खडतर प्रवासाबाबत अनेक सत्य घटना प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याही आहेत.

मीराबाईच्या कुटुंबात कोणी वेटलिफ्टर नव्हतं, किंवा खेळाचीही पार्श्वभूमी नव्हती. अंगणात पत्र्याचं शेड असलेल्या घरात ऑलिंपिक पदकविजेती घडणं यावरून भारतात कानाकोपऱ्यांत कदाचित दुर्गम भागातही हिरे आहेत, हे निश्चित होतं. घरात जेवणाच्या चुलीसाठी जंगलातून सर्वाधिक वजनाची लाकडांची भारी उचलून आणण्यापासून सुरू झालेला मीराबाईचा प्रवास आता ऑलिंपिकच्या रौप्यपदकापर्यंत आला आहे. अजूनही मोठी मजल मारायची आहे.

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली आपल्या देशाची पहिलीवहिली तलवारबाज भवानीदेवी. शाळेत कमी मार्क्स मिळतात म्हणून शाळेनं दिलेल्या खेळाच्या पर्यायांत जो शिल्लक राहिला, तो तलवारबाजीचा पर्याय तिनं निवडला. लाकडाच्या काठीनं तलवारबाजी करता करता ऑलिंपिकमध्ये पहिल्या फेरीत विजय मिळवण्याची कामगिरी ती करू शकते. भले ती दुसऱ्या फेरीत पराभूत झाली असेल; परंतु तिचं छायाचित्रही पाहून नव्या पिढीला प्रोत्साहन मिळू शकलं तरी भवानीदेवीचा हा प्रवास सार्थ झाल्यासारखं होईल. असे अनेक खेळाडू सापडतील, ज्यांची त्या त्या खेळाशी कोणतीच पार्श्वभूमी नव्हती, केवळ एखाद्या प्रसंगानं ठिगणी पडली आणि त्यानंतर तिचं ज्योतीत रूपांतर झालं आहे. साताऱ्याचा नेमबाज प्रवीण जावधचीही अशीच कथा आहे.

गेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सर्वांच्या मनाला भेदणारी अशी कमगिरी जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं केली. तिला पदक मिळालं नाही; परंतु तिच्या प्रयत्नांना कमालीची दाद मिळाली. मुळात जागतिक स्तरावर जिम्नॅस्टिक हा आपला खेळ नाही, तरीही दीपानं सर्वांना भारून टाकलं होतं. त्यानंतर पदकविजेत्या ऑलिंपिक खेळाडूंसह दीपाचाही सत्कार करण्यात येत होता. बक्षिसांचीही खैरात होत होती. त्या वेळी तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी म्हणाले होते, "आपल्याकडं अगोदर सिद्ध करावं लागतं, त्यानंतर बक्षीसरूपानं का होईना, आर्थिक मदत मिळते. हीच मदत जर खेळाडू तयार होताना मिळाली, तर चॅम्पियन खेळाडू घडू शकतात."

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक मदतीची किंवा मोठ्या पाठबळाची परिस्थिती निश्चितच बदलली आहे. ''टॉप्स'' अर्थात टार्गेट टू ऑलिंपिक पोडियम या योजनांतर्गत ज्यांच्याकडून ऑलिंपिक पदकाची आशा आहे, त्यांना आर्थिक साहाय्य दिलं जातं, परदेशात प्रशिक्षणाचीही सोय केली जाते, हे योग्य पाऊल आहेच. पण, शंभर खेळाडूंमधून एक चॅम्पियन घडतो आणि असे शंभर खेळाडू तयार करण्यासाठी पिढी तयार करावी लागते. मीराबाई आणि तिला पाहून हुबेहूब कृती करणाऱ्या अशा अनेक मुली किंवा मुलं जेव्हा स्वतःहून रस घेतील, तेव्हाच आपणही ऑलिंपिकमध्ये पदकांची लयलूट करू. असो, मीराबाई तू केवळ देशासाठी पदकच नाही जिंकलंस, तर नव्या पिढीला प्रोत्साहित केलंस. याचं मोल पदकापेक्षा मोठं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT