गेल्या आठवड्यात जगभरासह देशातही शेअर बाजार गडगडत होता...निर्देशांक आपटी खात होता...अर्थव्यवस्थेला धक्का बसत होता; पण बंगळूरमध्ये मात्र कोट्यवधींची उड्डाणं घेतली जात होती.
गेल्या आठवड्यात जगभरासह देशातही शेअर बाजार गडगडत होता...निर्देशांक आपटी खात होता...अर्थव्यवस्थेला धक्का बसत होता; पण बंगळूरमध्ये मात्र कोट्यवधींची उड्डाणं घेतली जात होती. देशात-जगात काहीही होऊ द्या; पण आयपीएलचा निर्देशांक मात्र नेहमीच चढा असतो, मग ती लोकप्रियता असो वा आर्थिक उलाढाल! ‘महालिलाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उलाढातीत तब्बल ५०० हून अधिक कोटींचा व्यवहार खेळाडूंसंदर्भात झाला. कुणाला लॉटरी लागली, कुणी अपेक्षित भाव खाल्ला, तर कुणाची झोळी रिकामीच राहिली. एकीकडे पैशाच्या राशीच्या राशी रित्या केल्या जात असताना दुसरीकडे काहींना ‘किंमत’ दाखवण्यात आली. आयपीएल हे महाजाल आहे. झगमगती आणि चमचमती दुनिया कुणासाठी कुबेराचं दार उघडते, तर कुण्या रैनाचा ‘रंक’ होतो. जोपर्यंत तुमची चलती आहे, म्हणजेच जोपर्यंत तुम्ही उपयोगी ठरत आहात, तोपर्यंत तुमची किंमत आहे; पण निरुपयोगी झाल्यावर मात्र कुणीच विचारत नाही. अशी अनेक उदाहरणं २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये घडली आहेत. सध्या बीसीसीआयचा हा सर्व खेळ चालवणाऱ्या सौरव गांगुली यांनाही या फेऱ्यातून जावं लागलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कर्णधार आणि मुंबई इंडियन्सकडून खेळणारा रिकी पाँटिंग याला, आपण निरुपयोगी ठरत आहोत याची जाणीव होताच, तो स्वतःहून बाजूला गेला होता. अशाही घटना घडलेल्या आहेत. अगदी ताजंच उदाहरण म्हणजे डेव्हिड वॉर्नर. ज्या हैदराबाद संघाला त्यानं आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं तो गेल्या मोसमात नकोसा झाला होता. अंतिम संघात तर त्याला स्थान नव्हतंच; पण हॉटेलमधून स्टेडियममध्येही त्याला आणण्यात आलं नव्हतं. अर्थात् ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून त्यानं आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून आयपीएलमध्ये पुन्हा मानाचं स्थान मिळवलं हे अतिशय कौतुकास्पदच.
आयपीएलमध्ये कमालीचा ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंमध्ये मानाचं स्थान असलेला आणि त्यामुळेच ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना आयपीएलच्या या लिलावात सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला. सचिन तेंडुलकर म्हणजे मुंबई इंडियन्स, विराट कोहली म्हणजे रॉयल चॅलेंजर्स (बंगळूर) आणि महेंद्रसिंह धोनी म्हणजे चेन्नई सुपरकिंग अशी काही समीकरणं चिरस्थायी राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुरेश रैना आणि चेन्नई यांचं नातं होतं; पण ११ मोसमांच्या या नात्याला गेल्या आठवड्यात पूर्णविराम मिळाला.
आयपीएलला १४ वर्षं झाली. यातील दोन वर्षं ‘चेन्नई’वर बंदी होती, तर २०२० मध्ये अमिरातीत झालेल्या स्पर्धेत रैना खेळला नव्हता.
असा होता दोस्ताना
रैना आणि ‘चेन्नई’ यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला यापेक्षाही ‘दोस्त दोस्त ना रहा...’ याचं दुःख चेन्नई संघाच्या पाठिराख्यांना अधिक होत राहील. दोन वर्षं चेन्नईचा संघ नव्हता, त्या वेळी महेंद्रसिंह धोनी हा पुण्याच्या संघात होता; पण तिथंही रैनानं त्याची साथ सोडली नव्हती. व्यावसायिकतेकडे अधिक झुकलेल्या सध्याच्या युगात प्रमुख खेळाडूंमधील विस्तवाच्याच अधिक चर्चा होत असतात; परंतु जिवलग दोस्तीची उदाहरणं फारच कमी सापडतील. तरीही धोनी आणि रैना यांचा दोस्ताना आदर्श असाच होता. सन २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलियादौऱ्यात धोनीनं कर्णधारपदासह कसोटी-क्रिकेटमधून अचानक निवृत्ती स्वीकारली. ती सर्वांसाठी धक्कादायक होती. त्या संघात रैनाही खेळत होता. धोनीच्या सन्मानार्थ तो पुढच्या कसोटीत धोनीचा टीशर्ट घालून खेळला होता. ता. १५ ऑगस्ट २०२० हा मुहूर्त साधत धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, याची कल्पना कुणालाच नव्हती, त्या वेळी तो आयपीएलची तयारी करत होता. रैनालाही हा धक्का सहन झाला नाही, त्यानंही काही तासांतच स्वतःची निवृत्ती जाहीर केली. दोस्ती असावी तर अशी, असे दाखले त्या वेळी दिले जात होते.
कुठं बिनसलं?
ज्या आयपीएलची तयारी करत असताना धोनीच्या पावलावर पाऊल टाकत रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याच आयपीएलमध्ये रैना अमिरातीत गेला खरा; परंतु मायदेशात नातेवाइकांवर झालेल्या हल्ल्यामुळे तो परतला. हे कारण केवळ सांगण्यापुरतं होतं.
रैनाचा अहंकार दुखावला गेल्याचं कारण हॉटेलमधील रूममधून पुढं आलं होतं. तिथंच कुठं तरी धोनी-रैनाच्या दोस्तीत कुरबूर सुरू झाली. ‘रैना परत चेन्नई संघातून खेळणार नाही,’ अशी कडक भूमिका चेन्नई संघाचे सर्वेसर्वा एन. श्रीनिवासन यांनी जाहीर केली; पण धोनीच तो, तो मैत्रीला जागला. पुढच्याच वर्षी स्वतःच्या शब्दाखातर रैनासाठी ‘चेन्नई’चे दरवाजे उघडले गेले. चेन्नईचा संघ विजेतेपद मिळवत असताना रैनाचं अपयश ठळकपणे दिसून आलं.
काम तसे दाम
आयपीएलच्या पहिल्या लिलावानंतर आणि दोन नवे संघ असल्यामुळे महालिलाव झाला. भविष्याच्या दृष्टीनं संघ तयार करण्यात येत असताना ३५ वर्षीय रैना नव्या रचनेत कसा बसेल? धोनीनं कितीही वजन वापरलं तरीही आयपीएल ही व्यावसायिक स्पर्धा आहे. ‘काम तसे दाम’ हा या स्पर्धेचा मूलमंत्र आहे. याच चेन्नई व्यवस्थापनानं गतवर्षी ‘कसोटी स्पेशालिस्ट’ चेतेश्वर पुजारा याला आपल्या संघात घेतलं होतं. अर्थात्, त्याला एकाही सामन्यात खेळवलं गेलं नाही हे अलाहिदा.
रैनाचा मोह
आयपीएलच्या लिलावात एखादा खेळाडू स्वतःची पायाभूत रक्कम किती ठेवतो यावरही त्याची बोली ठरत असते. एक तर वाढलेलं वय, गतवर्षीचा खराब फॉर्म अशी परिस्थिती असताना रैनानं दोन कोटींची पायाभूत किंमत ठेवली व तिथंच त्याची चूक झाली. लिलावातून आपला संघ पूर्ण केला जाऊनही ‘चेन्नई’कडे दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम शिल्लक राहिली, तरीही त्यांनी रैनाला आपल्या संघात घेतलं नाही, हा सर्वांसाठीच इशारा आहे. जोपर्यंत तुमची चलती आहे तोपर्यंत दाम मिळणार; पण योगदान दिलं नाही तर कधीही पूर्णविराम मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.