इंग्रजी आद्याक्षरं आणि त्यांचे अर्थ वेगवेगळे असतील; पण क्रीडा क्षेत्रात आद्याक्षरांची ओळख त्या त्या सुपरस्टार खेळाडूंचा ब्रँड असतो.
इंग्रजी आद्याक्षरं आणि त्यांचे अर्थ वेगवेगळे असतील; पण क्रीडा क्षेत्रात आद्याक्षरांची ओळख त्या त्या सुपरस्टार खेळाडूंचा ब्रँड असतो. उदाहरणार्थ : आरएफ अर्थात रॉजर फेडरर. राफा म्हणजेच राफेल नदाल. ‘एसआरटी’ म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. एमएस अर्थात महेंद्रसिंह धोनी आणि... सीआरसेव्हन म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो... ७ हा त्याचा क्रमांक. गेल्या काही दिवसांपासून ‘सीआर सेव्हन’ याची फारच मोठी चर्चा सुरू आहे. प्रतिष्ठा पणास लागली आहे असं म्हणू या जणू काही.
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा आणि क्लब बदल हे अजब समीकरण ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबत योगायोगाने का होईना पण घडत आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये रशियात झालेली वर्ल्डकप स्पर्धा आठवतेय? एकीकडे या स्पर्धेचा थरार रंगत असताना आणि कोणता खेळाडू स्पर्धा गाजवणार याची चर्चा टिपेला पोहचत असताना अचानक रोनाल्डोने प्रसिद्धीचं मार्केट खाल्लं. रेयाल माद्रिद हा क्लब सोडून त्याने भल्यामोठ्या रक्कमेचा करार इटलीतील युव्हेंटस या क्लबशी केला होता.
आता २०२२ कतारमध्ये यंदाची विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे आणि रोनाल्डो पुन्हा एकदा क्लबबदलामुळे चर्चेत आला. मँचेस्टर युनायटेडबरोबरचा करार संपुष्टात आणला, तसा तो येणारच होता. मँचेस्टर युनायटेड आणि रोनाल्डो यांचं नातं संपण्याची औपचारिकताच शिल्लक होती; पण ते विश्वकरंडक स्पर्धेच्या दरम्यान घडणं, हा योगायोग ठरला...
खेळ मोठा की खेळाडू आणि क्लब मोठा की खेळाडू, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. अनेक विक्रमादित्य आणि प्रसिद्धीची फार मोठी उंची गाठूनही खेळाडूंचे पाय जमिनीवरच असतात; पण काहीजण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागले, की त्यांचं कर्तृत्व आणि गुणवत्ता यापेक्षा किंवा मैदानापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींचीच चर्चा अधिक होत असते. मुळात फुटबॉल हा खेळ व्यावसायिकच अधिक आहे. विश्वकरंडक पात्रता आणि मुख्य स्पर्धा, तसंच युरो किंवा कोपा अमेरिका अशा स्पर्धा सोडल्या तर फुटबॉलपटू सर्वाधिक सामने क्लबमधूनच खेळत असतात. म्हणूनच त्यांचे क्लब हे त्यांचं दुसरं घरच असतं. आजही विश्वकरंडक स्पर्धेसाठीसुद्धा खेळाडूंची निवड करताना त्यांच्या मागे तो कोणत्या क्लबमधून खेळतो याची माहिती आवर्जून दिली जाते. अशा वेळी एखादा सुपरस्टार खेळाडू जेव्हा क्लब बदलतो तेव्हा चर्चा तर होणारच.
हा बदल एक तर मिळणारा जास्त मोबदला किंवा मानसन्मानासाठी असतो. रोनाल्डो रेयाल माद्रिद सोडून युव्हेंटसकडे गेला तो अधिकच्या मोबदल्यासाठी; पण आता मँचेस्टर युनायटेड क्लब सोडला तो आत्मसन्मासाठी, यात शंकाच नाही. गेल्या चार वर्षांत रोनाल्डोने रेयाल माद्रिद- युव्हेंटस- मँचेस्टर युनायटेड अशी पटापट आपली बांधिलकी बदलली याची कारणं तेवढीच दखल घेण्यासारखी आहेत.
वय वर्षं ३७ हे तर फुटबॉलपटूंसाठी सरासरी निवृत्तीचं वय. पण अफाट तंदुरुस्ती आणि प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याची खुमखुमी रोनाल्डोला स्वस्त बसू देत नाही. म्हणूनच आक्रमक वृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि मग असे वादविवाद निर्माण होत असतात. रेयाल माद्रिदने रोनाल्डोला मोठी उंची गाठून दिली हे खरं असलं तरी नावारूपास आणलं ते मँचेस्टर युनायटेडने. २००३ ते २००९ हा कालखंड तसा मोठा, यातूनच ‘सीआर सेव्हन’ हा ब्रँड तयार होत गेला आणि त्याचबरोबर विक्रमांच्या इमल्यासाठी भक्कम पाया तयार झाला. या वेळी मँचेस्टरचे आणि जगद्विख्यात प्रशिक्षक अॅलेक फर्ग्युसन यांचा रोनाल्डोला घडवण्यात मोठा वाटा होता. या क्लबमधून नावारूपास आल्यानंतर रोनाल्डो पुढे मोठी झेप घेणार हे अपेक्षित होतं आणि रेयाल माद्रिदकडे जाऊन ते अधोरेखितही झालं.
माशी कोठे शिंकली
रेयाल माद्रिदकडून युव्हेंटसकडे गेल्यावर रोनाल्डोचं या क्लबशी नातं जुळलंच नाही. तीन वर्षांचा करार संपताच तो पिंजरा तोडून पुन्हा भरारी घेणार हे स्पष्ट होतं; पण प्रश्न तो कोणत्या क्लबकडे जाणार याचा होता. मुळात एवढ्या महागड्या खेळाडूला आपल्या संघात घेणं परवडायलाही हवं. अधिक आर्थिक सुबत्ता असलेल्या मँचेस्टर सिटीकडे रोनाल्डो जाणार हे जवळपास ९९ टक्के निश्चित होत होतं. करारावर स्वाक्षरी होणं शिल्लक, इतपत सर्व निश्चित होतं; परंतु अचानक रोनाल्डो आपल्या जुन्या क्लबशी, म्हणजेच मँचेस्टरशी करारबद्ध झाल्याचं वृत्त धडकलं. त्याचं असं झालं. मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी एकमेकांचे पारंपरिक वैरी. माजी प्रशिक्षक फर्ग्युसन यांनी रोनाल्डोला सिटीकडे जाऊ नको, आपल्याच क्लबमधून खेळ अशी गळ घातली आणि त्यांचा शब्द रोनाल्डो मोडणं शक्य नव्हतं.
प्रशिक्षकांबरोबर वाद
एवढा मोठा खेळाडू आणि अधिक किमतीला आपल्या संघात येत असताना प्रशिक्षक हॅग यांना कदाचित कोणी महत्त्व दिलं नसेल आणि हॅग यांच्यापेक्षा आपण नावाजलेले खेळाडू आहोत, त्यांना कशाला महत्त्व द्यायचं असा अहंकार कदाचित रोनाल्डोमध्ये आला असावा आणि त्याचे पडसाद सामन्यांमध्ये पडत गेले. एक तर मँचेस्टर संघ अपेक्षेएवढी कामगिरी करत नसताना रोनाल्डोला ते अखेरच्या एक-दोन मिनिटांसाठी केवळ हजेरी म्हणून मैदानात आणत होते. ठिणगी पडली होती, त्याचा वणवा होण्याचा अवकाश होता, तरीही एका सामन्यात हॅग यांनी रोनाल्डोकडे नेतृत्व दिलं; पण तो सामना मँचेस्टरने मोठ्या फरकाने गमावला. तिथं या दोघांमध्ये अधिक विस्तव तयार झाला...
विश्वकरंडकाचं व्यासपीठ
रोनाल्डोला संधीच दिली जात नसल्यामुळे तो क्लबमध्ये राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ होती. मात्र, पहिली ‘किक’ कोण मारणार याची खडाखडी सुरू होती. रोनाल्डो तसा हुशारच, त्याने स्फोटक मुलाखत देण्यासाठी बरोबर विश्वकरंडक स्पर्धेचं व्यासपीठ निवडलं आणि जो काही आपला राग, अहंकार होता, त्याला मोकळी वाट करून दिली. ही मुलाखत प्रसिद्ध होताच मँचेस्टरबरोबरचे संबंध तुटण्याचा अवकाश होता आणि तसं घडलंच.
पुढे काय...
आता मोसमाच्या मध्यावर रोनाल्डो दुसऱ्या कोणत्या क्लबशी करारबद्ध होणार? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, त्याची भलीमोठी किंमत कोण मोजणार? पुन्हा एकदा मँचेस्टर सिटीचं नाव पुढे येऊ शकतं आणि तसं झाल्यास सिटी विरुद्ध युनायटेड यापेक्षा रोनाल्डो वि. युनायटेड हा सामना कमालीचा हीट होणार यात शंका नाही. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, रोनाल्डोला त्याचं अंतर्मन या पुढे थांबण्याचा सल्ला देत असलं तरी अहंकार त्याला थांबू देणार नाही....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.