दुखापती हा खेळाचा भाग असल्याचं सर्रास म्हटलं जातं; पण नको त्या वेळी होणारी दुखापत खेळाडू आणि संघासाठीही पीडा ठरते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा.
दुखापती हा खेळाचा भाग असल्याचं सर्रास म्हटलं जातं; पण नको त्या वेळी होणारी दुखापत खेळाडू आणि संघासाठीही पीडा ठरते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा. दुखापतींमुळे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून या दोघांचं संघाच्या बाहेर जाणं हे त्यांच्यापेक्षा संघाचं अधिक नुकसान करणारं आहे. द्विराष्ट्रीय मालिका आणि विश्वकरंडक यामधील प्रतिष्ठा जमीन-अस्मानाएवढी असते. द्विराष्ट्रीय मालिका म्हणजे लढाया आणि विश्वकरंडक स्पर्धा म्हणजे युद्ध ! शेवटी युद्ध जिंकणाराच जग जिंकतो आणि तोच लक्षात रहातो, म्हणून यासाठी सेनापतीपासून सैन्यातील प्रत्येक योद्धा तंदुरुस्त असणं गरजेचं असतं.
ऑस्ट्रेलियात आता येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ दाखलही झाला; पण त्यातले दोन मॅचविनर लढवय्ये दुखापतींमुळे मायदेशातच आहेत. जखमी झाले जडेजा, बुमरा; वेदना मात्र संघाला अशी अवस्था आहे.
खेळताना मैदानावर पडल्यामुळे, आपटल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे दुखापती झाल्या, तर त्यात कोणाचाही दोष नसतो, ते निव्वळ दुर्दैव असतं; पण विश्वकरंडकासारखी मोठी स्पर्धा जवळ आल्यानंतर प्रत्येकाने तंदुरुस्तीची काळजी घेणं अत्यंत मोलाचं असतं, किंवा अगोदर झालेल्या दुखापतीनंतर तंदुरुस्त होण्याची प्रक्रिया सुरू असेल, तर ही काळजी काटेकोरपणे घ्यावी लागते. बुमराचं उदाहरण घेऊ या. वेगवान गोलंदाजांना नित्याची असणारी पाठ दुखापत त्याला झाली. आशिया करंडक स्पर्धेतही तो खेळला नव्हता; पण विश्वकरंडक स्पर्धेसाठी सराव असावा म्हणून पूर्ण तंदुरुस्त नसताना त्याला खेळवण्याचा हट्ट नडला आणि घात झाला. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी फारच विकसित तंत्रज्ञान आहे; श्वासापासून स्नायूंतील ताकदीचं मोजमाप होत असतं. असं असताना बुमराला मध्येच खेळवण्याचा हट्ट का करण्यात आला?
एखादा खेळाडू प्रामुख्याने वेगवान गोलंदाज जखमी झाला की, ओव्हरलोड म्हणजेच अधिक आणि सातत्याने सामने खेळल्याची ओरड केली जाते. ते खरंही आहे; पण आयपीएलमधील सामन्यांचा ताण याविषयी जास्त चर्चा बीसीसीआयच्या पातळीवर केली जात नाही. जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत बुमरा केवळ पाच कसोटी, पाच एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामने खेळला; पण आयपीएलमध्ये तो खेळलेल्या सामन्यांची संख्या १४ होती. आंतरराष्ट्रीय सामन्यांचा ताण कमी करण्यासाठी अधूनमधून विश्रांती दिली जाते. मग आयपीएलमध्ये काही सामन्यांतून विश्रांती द्यायला काय हरकत आहे? पण तसं होणार नाही. शेवटी संघमालकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून त्या त्या खेळाडूंना खरेदी केलेलं असतं. असे महत्त्वाचे खेळाडू ऐन महत्त्वाच्या क्षणी दुखापतग्रस्त होतात आणि पर्यायाने प्रतिष्ठेचा विश्वकरंडक पणास लागतो, याची पीडा सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना होत असते.
यंत्रामध्ये ‘वेअर आणि टेअर’ होत असतं, तसा फरक मानवी शरीरातही होत असतो. तिशी पार केल्यानंतर कुरबुरी सुरू होतात. खेळाडूंना तर अधिक काटेकोर रहावं लागतं. जोरजोरात धावत येऊन वेगवान गोलंदाजी करताना पोटरीपासून खांद्यापर्यंतच्या सर्व अवयवांना ताण येत असतो, त्यात शैली सदोष असली तर गुडघा, पाठ आणि खांदा यांच्या दुखापती तर हमखास त्रास देणाऱ्या असतात. वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग आणि पाकिस्तानचे शोएब अख्तर यांनी बुमराच्या शैलीचं योग्य विश्लेषण केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, बुमराला पाठीची दुखापत कधीना कधी होणार होती; पण विश्वकरंडक स्पर्धेच्या तोंडावर व्हावी हे दुर्दैव.
रवींद्र जडेजाचं वय ३३ वर्षं आहे. भारतीय संघातील तो सर्वांत चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. तो फिरकी गोलंदाज असला तरी चेंडू टाकताना त्याच्या गुडघ्यावरचा ताण कधी तरी डोकं वर काढणार होताच. भारतीय संघाचं आणखी एक दुर्दैव की, त्याची दुखापत आणि त्यावरची शस्त्रक्रिया विश्वकरंडकाच्या तोंडावर व्हावी. बुमरा आणि जडेजा हे विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार नाहीत म्हणून काय झालं, इतर खेळाडू आहेत ना? असा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविक आहे, पण प्रामुख्याने ट्वेन्टी-२० प्रकारात जिथे प्रत्येक चेंडू निर्णायक ठरत असतो, अशा प्रकारात मैदानात खेळणाऱ्या ११ खेळाडूंपैकी किती जण मॅच विनर (एकहाती सामना जिंकून देणारे) आहेत, यावर संघाचं भवितव्य अवलंबून असतं. बुमरा आणि जडेजा नसल्यामुळे थेट दोन मॅचविनर कमी झाले. जडेजाऐवजी संधी देणारा अक्षर पटेल ऑस्ट्रेलियात मॅचविनर ठरू शकेल? तसंच, बुमराऐवजी ज्याला संधी दिली जाईल, तो एकहाती संघाला जिंकून देऊ शकेल? म्हणूनच बुमरा, जडेजा यांची अनुपस्थिती भारतीय संघासाठी चिंता करणारी आहे.
कपिलदेव यांचा आदर्श बाळगा
भारताला पहिलं विश्वविजेतेपद मिळवून देणारे कपिलदेव हे अष्टपैलू खेळाडू होते. म्हणजेच त्यांच्या शरीरावर येणारा ताण अधिक होता. त्यांच्या काळात आत्तासारखी फिजिओ, मसाजर अशी वैद्यकीय टीम नव्हती. तरी, कपिलदेव त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत दुखापतींमुळे एखाद्या सामन्यास मुकले आहेत, असं घडलं नाही. नैसर्गिक तंदुरुस्ती कशी असावी याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. कपिलदेवनंतर महेंद्रसिंह धोनीने २००७ आणि २०११ मध्ये टी-२० आणि मर्यादित षटकांचे विश्वकरंडक भारताला मिळवून दिले. त्यानंतर सतत अपयश आलेलं आहे. गेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीतच गारद होण्याची वेळ आली होती. पुढील वर्षी बरोबर याच महिन्यात भारतात मर्यादित षटकांची विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आत्तापासून वेगवान गोलदाजांची काळजी घेतली, तरच आत्ता लागलेली ठेच शहाणपण शिकवणारी ठरू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.