आयपीएल हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खेळ आणि गेमिंगचा दृष्टिकोन ठेवणाऱ्यांसाठी पैसे कमावण्याचा उद्योग असला तरी प्रामुख्याने देशातील नवोदितांसाठी भारतीय संघाचे दार उघडणारा आहे. पण त्याच वेळी अपेक्षेएवढे योगदान न देणाऱ्या सिनियर्ससाठी रजा घेण्याचा विचार करायला लावणारा आहे. या आयपीएलच्या दोन बाजू प्रत्येक मोसमानंतर पुढे येतात. पण यंदाची आयपीएल जरा खास ठरतेय.
यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा या नवोदितांची नावे चर्चेत येत असताना महान फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या प्रामुख्याने ट्वेन्टी-२० मधील अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे करत आहे. पिढी बदलत असते नवी टीम तयार करत असताना सिनियर्सना जागा रिकामी करावी लागते हे कालचक्रच आहे. यातून कोणाची सुटका नाही. तंदुरुस्ती असली तरी वाढते वय आणि काळानुरूप होत असलेला बदल हा कोणाला सुटलेला नाही. कितीही महान खेळाडू असलात तरी प्रत्येकाला या वाटेवरून जावे लागते आता प्रश्न आहे रोहित-विराट-केएल राहुल यांच्या टी-२० प्रकारातील भवितव्याचा !
रोखठोक वक्तव्यासाठी सुपरिचित असलेल्या रवी शास्त्री यांनी तर स्पष्टच सांगितले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा कसोटी आणि एकदिवसीय प्रकारासाठी विचार करा आणि ट्वेन्टी-२० प्रकारासाठी भविष्याचा विचार करून नव्याने संघ रचना तयार करा ! शास्त्री यांच्या या विधानाचा सरळ सऱळ अर्थ असा की आता रोहित-विराट-राहुल यांचा टी-२० मधून स्वेच्छा निवृत्ती द्या.
शास्त्री यांच्या या मताशी सर्वच क्रिकेट जाणकार सहमत असतील. इतिहासापेक्षा विद्यमान आकडेवारी खरे चित्र स्पष्ट करत असते. केएल राहुल दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून अगोदरच रजा घ्यावी लागली मात्र रोहित आणि विराट हे स्वतःहूनच स्वतःबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
रोहित शर्मा ज्योत पेटवतो पण त्याचा दिवा लवकर विझतोय. विराट कोहलीचा दिवा प्रखर तेज (स्ट्राईक रेट) देण्याऐवजी मिणमिणत जास्त राहतोय शेवटी याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होतोय. एक काळ असा होता या दोघांनी ही टी-२० प्रकार कमालीचा गाजवलाय. २०१७ मध्ये भारतात झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत विराट कोहलीने मोहालीत केलेली अविस्मरणीय फलंदाजीची आठवण येताच अजूनही रोमांच उभा रहातो.
एवढेच कशाला काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत याच विराटने पाकिस्तानविरुद्ध केलेली अशी अफलातून खेळी कोणीही विसरणे शक्यच नाही, परंतु परत मुद्दा येतो तो इतिहास आणि वर्तमानाचा कारण मुळात या टी-२० प्रकारात कालच्या दिवसाचे महत्त्व सूर्यास्ताबरोबर संपते.
प्रत्येक स्पर्धा किंवा मालिका जिंकली जरी असली तरी भविष्याच्यादृष्टीने बदलांबाबत विचार होत असतो. रोहित आणि विराट दोघेही पस्तिशीच्या पुढे आहेत. या वयात तर अनेक खेळाडू निवृत्त होतात, पण विराट कोहलीचा विचार करता त्याच्याएवढा तंदुरुस्त खेळाडू क्रिकेट विश्वात सापडणार नाही. तरुण खेळाडूही पाठी पडेल एवढा फिटनेस त्याच्याकडे आहे.
रोहितला मात्र या पातळीवर झगडावे लागतेय. प्रत्येक सामन्यात प्रत्येक प्रकारात खेळायला हवे हा मोह असणे स्वाभाविक, पण वाढत्या वयानुसार तंदुरुस्तीचाही विचार करणे तेवढेच महत्त्वाचे म्हणूनच टी-२० प्रकारात विराट-रोहित-राहुल यांच्याऐवजी नवोदितांना संधी द्यावी हा शास्त्री यांचा विचार सर्वांना पटतो.
भारतीय संघ सातत्याने खेळतो...जेवढे अधिक सामने तेवढा अधिक मोबदला...मग तो खेळाडूंसाठी असो, ब्रॉडकास्टर्ससाठी असो वा बीसीसीआयसाठी असो. मीटर सुरूच असते त्यामुळे अति क्रिकेटचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. म्हणूनच यावर साधा सोपा उतारा म्हणजे व्हाईटबॉल आणि रेड बॉल (कसोटी) यासाठी दोन वेगवेगळे संघ तयार करणे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांनी ही कास धरली आहे.
आपल्याकडे केवळ विचार होतो, पण रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि आत्ता दुखापतीमुळे बाहेर असलेला जसप्रीत बुमरा ही नावे तिन्ही प्रकारात दिसतात.
पण आता खरोखरीच किमान टी-२०साठी वेगळा संघ तयार करण्याची वेळ आलीय ती रोहित-विराट आयपीएलध्ये धावा करत नाही म्हणून नाही तर यशस्वी, रिंकू, तिलक यांसारखे खेळाडू संधीची वाट पहात आहेत म्हणून. शेवटी जम बसलेल्या आणि कर्तृत्व दाखवणाऱ्या अशा नवोदितांना योग्य वेळी संधी मिळणे ही त्यांच्यासाठीच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाची असते.
२००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर आणि लगेचच दुसऱ्या वर्षापासून आयपीएलसारखी मोठी स्पर्धा सुरू झाली त्यामुळे देशातील अनेक गुणवान खेळाडूंचे कर्तृत्व पुढे आले तरी टी-२० च्या विश्वकरंडकाने भारताला वेळोवेळी हुलकावणीच दिली. पुढचा टी-२० विश्वकरंडक पुढील वर्षी होत आहे याची तयारी आत्तापासूनच या नव्या खेळाडूंसह केली तर त्याचे परिणाम वर्षभरानंतर दिसून येईल.
पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रत्येक आयपीएलच्या मोसमात प्रभाव पाडणाऱ्या काही खेळाडूंचा भारतीय संघासाठी विचार केला जातो पण सर्वच खेळाडू भारतीय संघात तिचं गुणवत्ता दाखवतात असे नाही. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, टी. नटराजन अशी किती तरी उदाहरणे देता येतील त्यामुळे रोहित-विराट सारख्या खेळाडूंशिवाय पर्याय रहात नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.
तरीही ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर रोहित आणि विराट आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत खेळलेले नाहीत. निवड समितीने दिलेली विश्रांती असेल किंवा त्यांनी स्वतःहून घेतलेली विश्रांती असेल, पण नजीकच्या काळात तरी हे दोघेही पुन्हा कधी टी-२० सामने खेळतील हे सांगणे कठीण असेल सध्या तरी बघता बघता अर्धविरामाचे रूपांतर पूर्णविरामात होऊ शकते.
वेगवान गोलंदाजांचे काय?
यंदाच्या आयपीएल मोसमातून यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा हे नावारुपास आलेले खेळाडू फलंदाज आहेत. ज्याचा विचार करावा असा एकही वेगवान गोलंदाज नाही आणि भारताला अशाच गोलंदाजाची गरज आहे. जसप्रीत बुमरा हे प्रमुख अस्त्र जायबंदी असल्यामुळे किती अडचणींचा सामना करावा लागतोय हे दिसून येते.
ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात दोनदा, इंग्लंडला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकांमध्ये पराभूत केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांची बेंच स्ट्रेंथ मजबूत होती. आता बुमरा संघाबाहेर असताना मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे दोन वेगवान गोलंदाज सोडले तर पुढे कोणीच नाही. दुर्दैवाने शमी-सिराज यांच्यावर आयपीएल खेळण्याचा परिणाम झाला तर?
एकदिवसीय वर्ल्डकपची तयारी
आयपीएलचा हा हंगाम पुढच्या रविवारी संपल्यानंतर काही महिन्यातच भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे नगारे वाजू लागतील. या दरम्यान भारतीय संघ काही एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याच काळात वर्ल्डकपसाठीचा अंतिम संघ जाहीर होईल बहुतेक खेळाडू निश्चित आहेत. असल्यास तर एक दोन जागा शिल्लक असतील त्या ठिकाणी आयपीएलमध्ये चमकलेल्या या नवोदितांना संधी द्यायला हरकत नाही. किमान सिनियर्सच्या साथीत राहून अनुभव मिळेल आणि बॅटन पुढे देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.