रस्ते अपघात ही आपल्या देशातील एक सर्वांत मोठी समस्या. देशात दिवसभरात कुठं ना कुठं छोटे-मोठे अपघात होत असतात आणि लोक जिवानिशी जातात, क्षणार्धात सर्व संपतं.
रस्ते अपघात ही आपल्या देशातील एक सर्वांत मोठी समस्या. देशात दिवसभरात कुठं ना कुठं छोटे-मोठे अपघात होत असतात आणि लोक जिवानिशी जातात, क्षणार्धात सर्व संपतं. अशा घटना ऐकताना आणि वाचताना अंगावर शहारे येतात, तरीही धडे काही घेतले जात नाहीत. सिगारेटच्या पाकिटावर असलेल्या चेतावनीकडे दुर्लक्ष करून पुन्हा झुरके मारले जातात. अशा प्रकारे रस्त्यारस्त्यांवर, नागमोडी वळणावर असलेल्या फलकांकडे डोळेझाक केली जाते.
‘अति घाई संकटात नेई...’ किंवा ‘दुर्घटना से देर भली’ अशा सूचना वेळ निघून गेल्यावर आठवण्यात काहीच अर्थ नसतो... २०२२ हे वर्ष संपत असताना अशीच एक मोठी दुर्घटना घडली. भारतीय क्रिकेटच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग होता. भिंगरीप्रमाणे गाडी फिरली तरीही त्यातील चालक केवळ आणि केवळ सुदैवाने बचावला, अन्यथा भारतीय क्रिकेटमध्ये मोठा अनर्थ घडला असता. हा चालक भारतीय क्रिकेटचा हरहुन्नरी आणि सिकंदर लढवय्या फलंदाज रिषभ पंत होता हे वेगळं सांगायची गरज नाही.
रिषभ पंत असो वा सामान्य नागरिक असो, शेवटी जीवनाचं मोल सर्वांसाठी सारखंच, चर्चा मात्र सेलिब्रिटींची होत असते. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतरही सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. काही त्रुटी यंत्रणेच्या असतात, तर काही वेळा स्वतःचाच हलगर्जीपणा कारणीभूत असतो. रिषभ पंत बचावला असल्यामुळे तेवढ्या अधिक प्रमाणात प्रश्न ऐरणीवर आले नसले, तरी तो सर्वसामान्यांसह देशाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या सर्वांसाठी धडा आहे आणि याची स्वभावगुणावरून सुरुवात होते.
रिषभ पंत हा मुळात बेधडक फलंदाज असल्याचं त्याच्या खेळातून स्पष्ट होतं. बेधडक फलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य. या वेळी तो स्वतःच्या विकेटची तमा बाळगत नाही. एरवी शतकाच्या जवळ गेल्यानंतर कोणताही फलंदाज धोका न पत्करता शतकाचा विचार करतो; पण पंत तसा नाही. बाद तर बाद; पण जर चेंडू फटकावण्याजोगा असेल, तर तो मी फटकावणारच, अशा वृत्तीमुळे हातातोंडाशी आलेल्या अनेक शतकांना तो मुकला आहे. वीरेंद्र सेहवागही अशाच शैलीचा फलंदाज. ‘हर फ्रिक को धुँवे में उडाता चला गया...’ हे गाणं पुटपुटतच तो फटकेबाजी करायचा. पण खेळ हा सर्व परिस्थितीला सामोरं जाण्यास शिकवणारा असतो.
आक्रमकतेबरोबर प्रसंगी संयमही हवाच असतो, तरच तुम्हाला यशाचा मार्ग मिळत असतो. पंत कधी कधी वेगापुढे संयम गमावतो. त्याच्या अपघातानंतर एक व्हिडिओ लगेचंच व्हायरल झाला. त्यात त्याचा सीनियर सहकारी आणि भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू आणि प्रसंगी तोही तेवढाच आक्रमक असलेला शिखर धवन. पंतने विचारलेल्या... तू मला कोणता सल्ला देशील, या प्रश्नावर उत्तर देताना धवन म्हणतो... सिर्फ गाडी धीरे चलाना! हे उत्तर दिल्यानंतर धवन आणि पंत दिलखुलास हसतात. पण, ही हसण्यावारी घेण्यासारखी गोष्ट नव्हती. रिषभ पंतला गाडी अतिवेगात चालवण्याचं वेड असणार, हे अधोरेखित होतं. अपघाताच्या वेळी त्याची गाडी किती वेगात होती हे उघड झालं नाही; पण तो वेग निश्चितच ताशी १२० कि.मी.पेक्षा किंबहुना १५० पर्यंत असण्याची शक्यता अनेक जण बोलून दाखवत आहेत.
या अपघातातून पंतला अनेक दुखापती झाल्या आहेत, त्यातून तो कधी बरा होईल, पूर्ण तंदुरुस्त होईल आणि पुन्हा मैदानात येईल हे आत्ताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही सांगू शकत नाहीत. मुळात पंत हा भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक आणि अशा खेळाडूंवर संघाची पुढील स्पर्धा-मालिकांसाठी रचना तयार होत असते; पण अशा प्रकारे अचानक एखादा खेळाडू संघाबाहेर गेला की, सर्व गणित बिघडू शकतं. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी जसप्रीत बुमरा नसण्याचा फटका बसला अगदी तसंच.
त्यामुळे आपण खेळत असो वा नसो किंवा विश्रांतीसाठी ब्रेक घेतलेला असो, आपल्या व्यवहारात, वर्तनात आणि प्रवासातही काळजी घेणं ही तेवढीच जबाबदारी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही गाड्यांचं प्रचंड वेड होतं. मारुती ८०० पासून फेरारीपर्यंत अनेक हायफाय गाड्या त्याच्या दिमतीला. महेंद्रसिंह धोनीचं बाइक वेड सर्वश्रुत, घरात गॅरेजच त्याला तयार करावं लागलं; पण ड्रायव्हिंगबाबत त्यांनी कधी मर्यादेचं उल्लंघन केल्याचं ऐकिवात नाही.
एवढंच कशाला, विश्वकरंडक विजेते कर्णधार आणि महान खेळाडू कपिलदेव यांनी पंतसह इतरांचीही चांगलीच कानउघाडणी केली हे चांगलंच झालं. मोठा प्रवास गाडीने आणि तोही रात्री-पहाटेच्या वेळी करायचा असेल, तर ड्रायव्हर ठेवावा... ड्रायव्हरला पगार देण्याइतपत तुम्ही निश्चितच कमावता, हा वडिलकीचा सल्ला, पुढच्यास ठेच मागचा शहाणा होण्याइतका मोलाचा आहे. ‘आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो, तेव्हा मोटारसायकलवर अपघात झाला होता. भावाने तंबी दिली, त्यानंतर आपण खेळत असेपर्यंत मोटारसायकल चालवली नाही,’ असं कपिलदेव यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. अशा मोठ्या आणि वरिष्ठ अनुभवी खेळाडूंकडून केवळ मैदानावरील खेळाबाबतच सल्ले घ्यायचे किंवा त्यांचं नुसतंच अनुकरण करायचं नसतं, तर त्यांच्या विचारांचाही आदर्श ठेवायचा असतो.
ठिकाण कळवण्याची अट हवी
पंतच्या या अपघातानंतर बीसीसीआयने अतिशय कडक धोरण तयार करायला हवं. करारबद्ध खेळाडूंशी केवळ आर्थिक करार न करता, त्याला महत्त्वाच्या गोष्टींची सक्तीही करायला हवी, अगदी ‘वाडा’सारखी! जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समिती अर्थात वाडाचा सर्व खेळाडूंसाठी नियम आहे, तुम्ही खेळत नसलात किंवा ब्रेक घेतलेला असला, तरी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठंही असाल किंवा जाणार असाल, त्याची माहिती आगाऊ वाडाला द्यायची असते. याच धर्तीवर बीसीसीआयनेही आता खेळाडूंना दूरवरच्या प्रवासाबाबत, टूरबाबत माहिती देणं बंधनकारक करावं, म्हणजे अशा खेळाडूंना आपल्यावर कोणाचं लक्ष आहे आणि आपण कोणाशी बांधील आहोत याचं भान कायम राहील.
दुर्दैवी विश्वा दीनदलायन
आता प्रश्न येतो रिषभ पंत मोठा खेळाडू आहे, बीसीसीआयशी करारबद्ध आहे, म्हणून त्याची जास्त चर्चा होत आहे; पण असे अनेक ज्युनिअर किंवा उदयोन्मुख खेळाडू आहेत, त्यांची कोण काळजी घेणार हा प्रश्न येतोच. २०२२ या वर्षातच मन हेलावणारी दुर्घटना घडली होती. एप्रिल महिन्यात शिलाँग इथं राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा होती. त्यासाठी तमिळनाडूचा उदयोन्मुख १८ वर्षीय खेळाडू विश्वा दीनदयालन आपल्या इतर तीन सहकाऱ्यांसह गुवाहाटी ते शिलाँग असा गाडीने प्रवास करत होता. परंतु, विरुद्ध दिशेने येणारा मोठा ट्रेलर दुभाजकाला लागून पलटला तो थेट त्यांच्या गाडीवरच. त्यात विश्वाचं निधन झालं आणि इतर तिघे जण जखमी झाले होते. यात दोष खेळाडूंचा नव्हता; परंतु अशा स्पर्धा आयोजित करताना खेळाडूंचा प्रवास सुरक्षित असेल याची जबाबदारी प्रत्येक संघटना आणि आयोजकांची असायला हवी.
रस्ते सुरक्षा लीग कोणासाठी?
रस्त्यांवरच्या सुरक्षिततेच्या जागृतीसाठी पोलिसांकडून रस्ते सुरक्षा आंतरराष्ट्रीय लीग खेळवली जाते. यात दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकर आणि त्याचे काही समकालिन खेळाडू खेळतात. या लीगच्या माध्यमाधून हे खेळाडू रस्त्यांवरची सुरक्षा किती महत्वाची आहे याचे प्रबोधनही करतात पण कारण काहीही असो रिषभ पंत हा आंतरराष्ट्रीय खेळाडू रस्ते अपघातात सापडतो तेव्हा निश्चितच लीग आणि वास्तव यांचा विरोधाभास जाणवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.