खेळाडू कितीही महान असो किंवा त्याच्या नावावर कितीही मोठे विक्रम असोत, निवृत्तीच्या चक्रातून सर्वांनाच जावं लागतं; पण त्या क्षणाचं अचूक टायमिंग साधणं प्रत्येकाला जमतंच असं नाही.
खेळाडू कितीही महान असो किंवा त्याच्या नावावर कितीही मोठे विक्रम असोत, निवृत्तीच्या चक्रातून सर्वांनाच जावं लागतं; पण त्या क्षणाचं अचूक टायमिंग साधणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. स्वतःच्या वाढत्या वयामुळे कारकीर्द उतरणीस लागलेली असताना हा सन्मान जपणं म्हणजे तारेवरची कसरत. एखादा खेळाडू निवृत्त होतो तेव्हा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात.
पहिली असते...‘झाला अखेर निवृत्त’!
तर दुसरी असते...‘अरे! हा एवढ्यात का निवृत्त झाला?’
‘निवृत्तीची ही योग्य वेळ होती...’ असं ठरलेलं वाक्य बोलून अनेक खेळाडू वरील दोन प्रतिक्रियांचा सुवर्णमध्य साधतात; पण खेळाचे जाणकार प्रेक्षक आणि पाठिराखे मात्र जे काही समजायचं ते समजून जात असतात.
महिलाक्रिकेटमध्ये ‘राज’ करणाऱ्या मितालीनं २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम दिला आणि मितालीचे पाठिराखेच नव्हेत तर, तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी भावुक झाले. कारण, मितालीनं भारतीय महिलाक्रिकेटचं एक पर्व सुरू केलं होतं. ती महिलाक्रिकेटचा प्रमुख चेहरा होती.
तिच्या अगोदरही एक पिढी होती; पण त्या वेळी महिलाक्रिकेट हे मुळात बीसीसीआयच्या अखत्यारीत नव्हतं आणि दुर्लक्षितही होतं. मितालीकडे पाहून अनेक मुली क्रिकेटकडे वळल्या. मितालीचं हे अढळ स्थान सर्वांनाच मान्य आहे; पण मितालीला सॅल्यूट करणाऱ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असताना, काही तासांतच, बीसीसीआयनं श्रीलंकेच्या आगामी दौऱ्यासाठीचा संघ जाहीर केला आणि त्याच क्षणी जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मितालीनं ही ‘निवृत्ती’ ‘स्वेच्छे’नं घेतली होती की तिला ती घ्यायला सांगितली गेली, असा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं.
निवड समिती ही प्रत्येक दौरा, मालिका, स्पर्धा यांच्या वेळी संघ निवडताना भविष्याचाही विचार करत असते. जुन्या खेळाडूंना समाविष्ट करत असताना नव्यांसाठीही दरवाजे उघडावे लागत असतात. मग अशा वेळी काही जुन्या खेळाडूंना वास्तवाचा आरसा दाखवण्यात येत असतो. असं सर्वच खेळांमध्ये होत असतं. क्रिकेट हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून यातील मैदानाबाहेर घडणाऱ्या घटनाही तेवढ्याच फॉलो केल्या जातात, म्हणून त्यांची चर्चाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत असते.
सचिन तेंडुलकरबाबतही...
मिताली राजची निवृत्ती आणि लगेचच संघनिवड या घटनाक्रमानंतर अनेकांना सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीचा क्षण आठवला. सन २०१२ मधील ती घटना. आशिया कपमध्ये सचिननं शतक करून शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाचा बहुमान मिळवला. त्यानंतरच्या श्रीलंकादौऱ्यात तो खेळला नाही; मात्र, डिसेंबर महिन्यात पाकिस्तानचा संघ एकदिवसीय मालिका खेळण्यास भारतात आला होता.
‘सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेमधून निवृत्त’ असं बीसीसीआयनं दिलेलं वृत्त अचानक थडकलं आणि सर्वच जण अवाक् झाले. कारण, सचिनच्या नावामागं ‘निवृत्त’ हा शब्द आता प्रथमच लागणार होता. त्यानंतर काही वेळातच या मालिकेसाठीचा भारतीय संघ जाहीर झाला. अनेकांनी या दोन घटनांची सांगड घातली आणि आपापला अर्थ काढला.
संदीप पाटील त्या वेळी निवड समितीचे अध्यक्ष होते. ‘त्या संघनिवडीअगोदर आपण सचिनशी संवाद साधला होता,’ असं संदीप पाटील यांनी एक-दोन वर्षांनंतर एका दूरचित्रवाणीवाहिनीशी बोलताना सांगितलं आणि त्या वेळी नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज सर्वांनी बांधला होता.
स्वागतार्ह प्रयोग; पण...
दिग्गज आणि प्रथितयश खेळाडूंनी दिलेल्या योगदानाचा आदर करणं हे त्या त्या खेळाच्या संघटनेचं आणि निवड समितीचंही कर्तव्यच असतं. वगळण्याऐवजी त्यांना निवृत्त होण्याची संधी देणं हे स्वागतार्हच. मितालीसाठी हा प्रयोग चांगलाच; पण ही वेळ येऊ न देण्यासाठी आपण कधी थांबायचं हेसुद्धा खेळाडूंना उमगायला हवं. नाहीतर प्रत्यक्ष मैदानावरून खेळून निवृत्त होण्याची संधी मिळत नसते. ‘दोनशेवा कसोटी सामना हा आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल,’ असं सांगितल्यानंतर सचिनला मिळालेली निवृत्तीची मानवंदना अभूतपूर्व आणि सर्वांच्या डोळ्यात आसवं आणणारी होती; पण अशी संधी सचिनएवढाच प्रतिभावंत असलेला राहुल द्रविड याला मिळाली नव्हती.
व्ही. व्ही. एस. लक्ष्मणलाही अशीच मालिका सुरू होण्याअगोदरच निवृत्ती घ्यावी लागली.
मितालीनं संधी सोडली
ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत स्ट्राईक रेट अपेक्षेएवढा नसल्यामुळे अंतिम ११ खेळाडूंत स्थान न दिल्याचा मितालीला राग आला होता. त्या वेळचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी तिचे खटके उडाले होते. त्यानंतर मितालीनं या प्रकाराला बाय बाय केलं; पण ती कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत होती. यंदा न्यूझीलंडमध्ये झालेली एकदिवसीय विश्वकरंडक ही तिची अखेरची स्पर्धा असू शकेल असं अनेकांना वाटत होतं; पण तसं झालं नाही. परिणामी, २३ वर्षे खेळणाऱ्या, अनेक विक्रम करणाऱ्या, अनेकांसाठी आदर्श असणाऱ्या अशा मितालीला प्रत्यक्ष खेळून कारकीर्दीची सांगता करता आली नाही याची खंत सर्वांसह तिच्या मनात कायम राहील.
अशी झाली क्रिकेटपटू
हवाई दलातील अधिकारी दोराई राज आपला मुलगा मिथुन याला क्रिकेटचे धडे देण्यासाठी सिकंदराबाद इथल्या सेंट जॉन्स अकादमीत आणतात...आठ वर्षांची त्यांची मुलगी मिताली हीसुद्धा सोबत असते...केवळ वडिलांनी सोबत आणल्यामुळे ती तिथं आली होती...भाऊ मिथुन नेटमध्ये सराव करत असताना मिताली सीमारेषेबाहेर आपला गृहपाठ करत होती...तो पूर्ण झाल्यावर तिनं हातात बॅट घेतली आणि जवळच पडलेले चेंडू तडकावले...मितालीची नैसर्गिक शेली पाहून प्रशिक्षक ज्योती प्रसाद थक्क झाले आणि तिथून सुरू झालेला मितालीचा आणि क्रिकेटचा हा प्रवास मितालीच्या वयाच्या ३९ व्या वर्षी थांबला.
मितालीनं ही निवृत्ती स्वेच्छेनं स्वीकारलेली असो किंवा तिला ती घ्यायला भाग पाडलं गेलेलं असो, काहीही असलं तरी मितालीचं भारतीय महिला क्रिकेटमधलं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ राहणार यात शंकाच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.