जेव्हा संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील धर्मविचारांचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रासह पंजाबमधील त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे. संत नामदेवांनी गुजरातमध्ये केलेल्या आध्यात्मिक आणि वैचारिक पेरणीचा सारा वेध संत वाङ्मयाच्या अभ्यासक मनीषा बाठे यांनी ‘विठ्ठल नामाचा भारतसंचार...गुजरात’ या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवला आहे.
संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या उत्तर-भारतातील प्रभावाचा उल्लेख मराठी संतांच्या अभंगांतून आला आहेच, परंतु या ग्रंथाच्या निमित्ताने तीर्थावळ-विषयावरील गुजराती आख्यानांचा मराठी साहित्यास परिचय होत आहे. ज्ञानदेवांच्या समाधिपश्चात संत नामेदवरायांनी उत्तर-भारतात संचार केला. त्यामध्ये त्यांनी भागवत धर्माच्या विचारांची बीजे पेरली.
शीख परंपरेतील गुरुग्रंथसाहिब या ग्रंथामध्ये नामदेवरायांचे अभंग आहेत. मात्र, पंजाबला जाताना त्यांनी गुजरात, राजस्थान या प्रांतांमध्येही आपल्या वैचारिक पाऊलखुणा ठेवल्या होत्या. बाठे यांनी आपल्या संशोधनातून या पाऊलखुणा शोधून काढल्याचे या ग्रंथातून दिसून येते. ग्रंथाचा गर्भितार्थ पाहिल्यास बाठे यांनी कष्टपूर्वक केलेल्या संशोधन-लेखनातून ‘महाराष्ट्र-गुजरात संत परंपरांची एकरूपता’ अधोरेखित होते.
पंधराव्या शतकात गुजराती वैष्णव वाङ्मयपरंपरेमध्ये संत नरसी महेतांनी आख्याने, गरबा, भागवत दशमस्कंधावर आधारित राससहस्रपदे इत्यादींद्वारे एक ‘भक्तियुगच’ निर्माण केले होते. या संताच्या वाङ्मयावर विस्मयकारकरित्या संत नामदेवांच्या भक्तिपरंपरेचा आढळलेला प्रभाव हा जागोजागी त्यांच्या रचनांमधून दिसतो, तो ग्रंथात मांडलेला आहे.
विस्मयकारक म्हणण्याचे कारण संत नामदेवांपश्र्चात शंभर वर्षांनी सौराष्ट्रात असलेला त्यांचा प्रभाव संत नरसी महेता व तत्कालीन समाजावर दिसतो. तसेच केवळ नरसींच्याच साहित्यात नव्हे तर त्यांच्या पाचशे वर्षे चाललेल्या प्रभावळींच्या (वैचारिक अनुयायी) अभंग रचनांमध्ये ‘विठ्ठल’, पंढरपूर आणि ‘नामदेवराय’ यांचा उल्लेख वेळोवेळी येतो.
हे समर्थ संप्रदायाच्या अनुग्रहित असलेल्या बाठे यांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. त्यासाठी त्यांनी गुजरात पिंजून काढून विठ्ठल, पंढरपूर आणि नामदेवराय यांच्याबाबतच्या केलेल्या पदरचना हस्तलिखित दफ्तरांतून शोधल्या आहेत. त्यातील सुमारे दीडशे गुजराती रचनांचा मराठी भावार्थ या ग्रंथात दिलेला आहे.
गुजराती संतकवी नरसी महेता यांचे समग्र जीवनचरित्र बाठे यांनी या ग्रंथातून विस्ताराने मांडले आहेच. मुख्यत्वे गुजरातमधील स्पृश्य-अस्पृश्यतेला छेदत सर्वांना ‘हरिजन’ म्हणत, जोडणाऱ्या नरसींच्या विचारसरणीतील भागवतधर्माची शिकवण ही त्यांच्या समकालीन पंथ, संप्रदाय यांच्याशी झालेल्या मंथनाचे पुरावे मांडलेले आहेत.
याशिवाय संत नरसींनंतरच्या सुमारे पाचशे वर्षांच्या कालखंडातील गुजराती संतांच्या प्रभावळीतील विचारांचा मागोवाही अभ्यासपूर्वक घेतला आहे. तसेच महेता यांच्याबाबत संत तुकाराम महाराज, संत निळोबाराय, संत बहिणाबाई यांच्या मराठी अभंगांमध्ये नरसी महेता यांचा उल्लेख आलेला आहे.
या ग्रंथात वारकरी सांप्रदायिक आणि संत साहित्यातील अभ्यासकांनाही संत नरसी महेतांचे समग्र चरित्र आणि त्यांची वैचारिक प्रगल्भता यांची एकत्रित मांडणी वाचायला मिळते. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत निळोबाराय, संत दासगणू, संत महिपती, संत बहिणाबाई यांच्या रचनांतील महेता यांच्याबाबतचा अनुबंधही यात आहेत.
महेता यांच्या रचनांमधून त्यांचा ‘विठ्ठलाप्रती असलेला जिव्हाळा’, त्यांची ‘भक्तीचे अमूल्य धागे’ संशोधनातून समाजासमोर बाठे यांनी आणले आहेत. अनेक शतकांपासून विठ्ठलभक्तीची मोहिनी अन्य प्रांतांतील संत प्रभावळीतही असल्याचे या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
वारकरी सांप्रदायिक संत श्रीविठ्ठलाला कृष्ण रूप काल्याच्या अभंगातून आळवतात, हा भाग महेता यांनी गुजरातीमध्ये मांडला, असे वाटते. त्यामुळेच द्वारकास्थित श्रीकृष्णभक्ती करताना महेता विठ्ठलालाही आपल्या पदरचनांतून आळवतात. त्यातील निवडक पदरचना बाठे यांनी ग्रंथात दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील संत ज्ञानदेव-संत नामदेव द्वयीचा प्रभाव गुजरात प्रांतात आजही दिसून येतो. त्यांच्या विठ्ठलभक्तीचा दरवळ पाचशे वर्षांपासून गुजरात प्रांतांत टिकून आहे, हे महेता यांच्या रचनांमधून स्पष्ट होते. कृष्ण-विठ्ठल भक्तीचा हा अनोखा संगम या ग्रंथात दिसून येते.
महेता यांचे समग्र जीवन आणि त्यांची संत साहित्यावरील प्रगल्भ पकड त्यांच्या रचनांमध्ये आहे. त्यांच्या रचनांचा मराठी भावार्थ देऊन बाठे यांनी ते साहित्य मराठीजनांना खऱ्या अर्थाने खुले करून दिले आहे. ते महाराष्ट्रातील भाविकांना तसेच अभ्यासकांना निश्चित उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. ग्रंथाला संत साहित्याचे ज्येष्ठ संशोधक-अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना असून, गुजराती दफ्तराचे हस्तलिखित तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ वाकणकर यांचे अनुमोदन लाभले आहे.
पुस्तकाचं नाव : ‘विठ्ठल नामाचा भारतसंचार...गुजरात’
संशोधन : लेखक : मनीषा बाठे
प्रकाशक : समर्थ मीडिया सेंटर, पुणे
(संपर्क : ८८०५९६०९३३)
पृष्ठं : ४५६, मूल्य : ६०० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.