ghulam nabi azad sakal
सप्तरंग

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल

जुने-जाणते काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यातून पक्षांतर्गत पेचप्रसंग निर्माण झाला आहे असं अनेकांना वाटतं.

सकाळ वृत्तसेवा

जुने-जाणते काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यातून पक्षांतर्गत पेचप्रसंग निर्माण झाला आहे असं अनेकांना वाटतं.

- शशी थरूर editorinchief@esakal.com

जुने-जाणते काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यातून पक्षांतर्गत पेचप्रसंग निर्माण झाला आहे असं अनेकांना वाटतं. एकामागून एक नेता पक्षातून बाहेर पडत असण्याच्या मालिकेतील ही सर्वात ताजी घटना. माध्यमांमधून अव्याहतपणे सुरू असलेल्या तर्क-कुतर्कांना या घटनेनं अधिकच चालना मिळाली आहे. काँग्रेस पक्षावर रोजच्या रोज लिहिल्या जात असलेल्या ‘मृत्युलेखां’ना भलतंच स्फुरण चढलं आहे. ताज्या निवडणूकनिकालांमुळे मुळातच काँग्रेसकार्यकर्त्याला नैराश्याशी सामना करावा लागत असताना या साऱ्या घटनांमुळे त्याचं नीतिधैर्य अधिकच खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशातील जवळपास २० टक्के मतदार आपल्या राजकीय धारणांच्या आणि आकांक्षांच्या पूर्तीसाठी काँग्रेस पक्षाकडेच आशेनं पाहत असतात. आपला अपेक्षाभंग केला गेल्याचा विषाद या सर्वसामान्य नागरिकाच्या आणि मतदाराच्या मनात आज दाटलेला दिसत आहे.

असे बहुमोल सहकारी पक्षातून निघून जाणं मुळीच हितावह नसतं. व्यक्तिशः मला याचं दुःखच वाटतं. या माझ्या मित्रांनी पक्षातच राहून संघटनेत सुधारणा घडवून आणण्यासाठी संघर्ष करत राहायला हवा होता असं मला वाटतं. त्या तथाकथित ‘जी २३’ च्या पत्रावर सही करणाऱ्यांपैकी एक म्हणून मला हे सांगायला हवं की, काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सामर्थ्यशाली व्हावा अशी इच्छा असणाऱ्या पक्षसदस्यांना आणि हितचिंतकांना गेले कित्येक महिने वाटत असलेल्या चिंतेचंच प्रतिबिंब त्या पत्रात पडलेलं होतं. ही चिंता केवळ पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी होती. पक्षाची विचारसरणी किंवा मूल्ये याबद्दल ती मुळीच नव्हती. पक्ष अधिक बळकट आणि ‘तेजतर्रार’ करणं हाच त्या पत्रामागचा आमचा एकमेव हेतू होता. आम्ही पक्ष फोडू इच्छित नव्हतो किंवा तो दुबळाही करू पाहत नव्हतो.

भारतीय जनता पक्ष आज देशात जे काही घडवत आहे, त्याला आव्हान देऊ शकेल असा समर्थ काँग्रेस पक्ष आम्हाला हवा होता. आम्ही कुणाही व्यक्तीविरुद्ध नव्हतो, तर प्रश्न हाताळण्याच्या पक्षाच्या पद्धतीत आम्हाला सुधारणा हवी होती. आज काँग्रेसचा गुंता असा झालाय की, दिवसेंदिवस अनेक टीकाकारांना, पक्षाची अवस्था वर पत्ताच न टाकलेल्या एखाद्या लिफाफ्यासारखी वाटू लागलीय.

हे सारं कितीही खरं असलं तरी काँग्रेस पक्षाला मोडीत मुळीच काढता येणार नाही. पहिली गोष्ट अशी की, देशभर तुल्यबळ अस्तित्व असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड वर्चस्वाला थोपवू शकेल असा दुसरा कोणताच राष्ट्रव्यापी पर्याय आज देशभरात मुळी अस्तित्वातच नाही. देशातील अन्य सगळ्याच राजकीय शक्ती एकेका किंवा फार तर दोन राज्यांपुरत्याच मर्यादित आहेत. सर्वसमावेशक दृष्टिकोन हा काँग्रेस पक्षाचा प्राण असलेल्या मूलभूत विचारसरणीचा अंगभूत घटक आहे. भारतीय लोकशाहीला या समावेशक दृष्टीचीच आज नितांत आवश्यकता आहे; परंतु भाजपला पर्याय म्हणून आपण राष्ट्राला नेमकं काय काय देऊ इच्छितो याबद्दलची भूमिका पक्षानं जनतेसमोर निःसंदिग्धपणे स्पष्ट करायला हवी. आणि, स्वतःचं भविष्य सुरक्षित राखण्यासाठी आता अधिक उशीर न लावता काहीएक मार्ग त्यानं शोधायला हवा.

सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वाच्या पोकळीमुळे पक्षांतर्गत हानी तर बरीच झालेली आहे. तथापि, भूतकाळातील अनेक कठीण प्रसंगी बदलत्या वातावरणाला नीट तोंड देण्याची आणि येणाऱ्या राजकीय परिस्थितीवर स्वार होत पुनःश्च यश प्राप्त करण्याची विलक्षण क्षमता या महान, पुरातन संघटनेनं यापूर्वी वेळोवेळी दाखवून दिलेलीच आहे. मग सांप्रतच्या संकटकाळी या घोंघावणाऱ्या वादळावर मात करण्यासाठी पक्षानं नेमकं काय करायला हवं?

काँग्रेस वर्किंग कमिटी ही पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. तिनं पक्षाध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार, ता. १९ ऑक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे. खरं तर, या समितीनं निवडून येणं आवश्यक असलेल्या आपल्या स्वतःच्या बारा सदस्यांची निवडणूकही याबरोबरच घोषित करणं उचित ठरलं असतं. या महत्त्वाच्या स्थानी पक्षाचं सुकाणू कुणाकुणाच्या हाती असावं याची निवड करण्याची संधी अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि प्रदेश काँग्रेस समिती यांमधील पक्षसदस्यांना द्यायला हवी होती. त्याद्वारे निवडून येणाऱ्या नेतेमंडळींना विधिवैधता प्राप्त झाली असती आणि पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना विश्वसनीय जनादेश लाभला असता. तथापि, केवळ नव्या पक्षाध्यक्षांची निवडणूक होणं हासुद्धा काँग्रेसमध्ये नवचेतना आणण्याचा शुभारंभ ठरेल. आज काँग्रेसला अशा चेतनेची नितांत आवश्यकता आहे.

अशा निवडणुकीमुळे होऊ शकणारे अन्य संभाव्य फायदेही काही कमी नाहीत. उदाहरणच द्यायचं तर, सन २०१९ ला ब्रिटनमध्ये तेरेसा मे यांची जागा घेण्यासाठी त्यांच्या पक्षातील डझनभर नेत्यांमध्ये चुरस लागली होती आणि बोरिस जॉन्सन यांनी त्यात बाजी मारली होती. या साऱ्या घडामोडीदरम्यान ब्रिटिश काँझर्व्हेटिव्ह पक्षातील नेतृत्वाच्या या शर्यतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिल्याचं आपण पाहिलं आहे. काँग्रेसच्या बाबतीत असंच चित्र समोर आलं तर भारतीय जनतेत पक्षाबद्दलची उत्सुकता आणि आकर्षण वाढीस लागेल; आणि म्हणून, पक्षाध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील अनेक नेते पुढं यावेत असं मला वाटतं. त्यांच्यातील प्रत्येकजण पक्ष आणि राष्ट्र यांबद्दलचं आपापलं कल्पनाचित्र जनतेसमोर ठेवू लागेल. या मंथनामुळे जनतेच्या मनात पक्षाबद्दलच्या कुतूहलाची लाट उसळेल.

खरं तर संपूर्ण पक्षाच्याच पुनर्बांधणीची आज आवश्यकता आहे. तथापि, तत्काळ भरलं जाण्याची निकड असलेलं एकच एक पद कोणतं असेल तर ते अर्थात् अध्यक्षपदच. पक्षाची सद्यस्थिती, समोरचा पेचप्रसंग आणि देशाचं आजचं स्वरूप पाहता, जो कुणी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा वाहील त्याला आपल्या पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं आणि देशभरातील मतदारांना प्रेरित करणं अशा दोन्ही गोष्टी साध्य कराव्या लागतील. यासाठी पक्षाच्या नेमक्या दुखण्यावर इलाज करण्यासाठी निश्चित अशी योजना आणि संपूर्ण भारताच्या भावी वाटचालीचं सुस्पष्ट कल्पनाचित्र त्याच्या डोळ्यासमोर असावं लागेल. शेवटी, राजकीय पक्ष हा देशाची सेवा करण्याचं फक्त एक साधन असतो. पक्ष हेच काही आपलं अंतिम साध्य असू शकत नाही. तर, अधिक चांगल्या समाजासंबंधीची काँग्रेस पक्षाची कल्पना काय आहे...आणि, राष्ट्राला त्या कल्पनेपर्यंत पक्ष कसा घेऊन जाऊ इच्छितो...पक्षाध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुखातून आम्हाला हे सारं ऐकायचंय.

राहुल गांधींनी ही निवडणूक लढवायला नकार दिलाय. ‘आपल्या जागी गांधीघराण्यातील कुणीही येऊ नये,’ असंही ते म्हणालेत. काँग्रेसचे अनेक पाठिराखे यामुळे खिन्न झालेले आहेत. या मुद्द्यावर गांधीकुटुंबाचा सामूहिक निर्णय काय आहे हे ठरवण्याचा अधिकार निःसंशयपणे त्या कुटुंबाचाच आहे; परंतु, लोकशाहीव्यवस्थेत कोणत्याही पक्षानं, केवळ एकच एक कुटुंब आपलं नेतृत्व करू शकतं, अशा भूमिकेत शिरणं योग्य नव्हे. ते काहीही असो.

मुक्त आणि न्याय्य पद्धतीनं घेतली जाणारी निवडणूक हाच हा प्रश्न सोडवण्याचा सर्वात हितकर मार्ग ठरेल. त्यामुळे पदभार स्वीकारणाऱ्या अध्यक्षांना मिळालेल्या जनादेशाला खरीखुरी वैधता प्राप्त होईल.

हा पेचप्रसंग उद्भवल्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सर्वदूर पसरलेली भावना त्यांच्या तोंडून माझ्या कानी पडत गेली. मी केलेल्या वरील मांडणीत त्या भावनेचंच प्रतिबिंब पडलेलं आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण करणारी आणि राष्ट्रापुढं नावीन्यपूर्ण कार्यक्रम ठेवणारी एक व्यापक आणि जोमदार रणनीती आखून तिची नीट अंमलबजावणी करू शकणारं उत्साही आणि समर्थ नेतृत्व आपल्याला लाभावं हीच या सर्वांची इच्छा आहे. आज तयार झालेली नेतृत्वाची पोकळी मुक्त आणि न्याय्य निवडणुकीमुळे भरून काढली जाईल. पक्षाच्या उच्च स्तरावर आपलं प्रतिनिधित्व कुणी करावं हे ठरवण्याचा ठोस अधिकार काँग्रेसकार्यकर्त्याला देण्याच्या प्रक्रियेला अशा निवडणुकीमुळे संस्थात्मक स्वरूप प्राप्त होईल. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या हृदयात आणि सर्वसामान्य जनतेतही पक्षाचा पाया भक्कम करील.

काँग्रेसच्या आणि देशाच्याही इतिहासानं असंख्य काळरात्री सोसलेल्या आहेत; परंतु एके काळी याच काँग्रेस पक्षानं मुक्ती आणि स्वातंत्र्य यासाठीच्या लढ्यात आख्खं राष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली एकवटलेलंही आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आलेल्या भावविरेचकपर्वातही राष्ट्रातील स्त्री-पुरुषांना नेतृत्व देत याच पक्षानं योग्य ती दिशा दाखवली आहे. या देशाचा आत्मा हा समता, समावेशकता आणि सामाजिक न्याय अशा तत्त्वांमध्ये या पक्षानंच घट्ट रुजवला आहे. असा हा काँग्रेस नावाचा पक्ष पुन्हा एकदा या अंधाऱ्या रात्रीचा नायनाट करेल आणि एका नव्या उष:कालापर्यंत या देशाला घेऊन जाईल असा ठाम विश्वास मी बाळगतो. काँग्रेस पक्षाला आणि ज्या देशाचं सुकाणू आपण पुन्हा हाती घेऊ इच्छित आहोत त्या आपल्या देशालाही अशा एका नव्या पहाटेची तीव्र गरज आहे.

(सदराचे लेखक हे खासदार आणि माजी रानैतिक अधिकारी असून, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT