Rajrajeshwari Temple Sakal
सप्तरंग

त्रिपुरसुंदरी राजराजेश्वरी

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोळली या छोट्या गावात असलेलं हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे.

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते जरी पूर्णपणे केरळी मंदिर स्थापत्यशैलीत बांधलेलं असलं तरी ते आहे मात्र आजच्या दक्षिण कर्नाटकात. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोळली या छोट्या गावात असलेलं हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे. या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराची मुख्य देवता श्रीराजराजेश्वरीसहित मंदिराच्या गर्भगृहातल्या सर्व मूर्ती एका विशिष्ट प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या मातीपासून तयार केलेल्या आहेत आणि त्यांना रंग दिलेला आहे. सामान्यतः मंदिरांच्या गर्भगृहातील मूर्ती काष्ठ, पाषाण किंवा पंचधातूपासून बनवलेल्या असतात; पण हे मंदिर त्याला अपवाद आहे.

इथला इतिहास असं सांगतो की, देवी राजराजेश्वरीचं हे मंदिर सर्वप्रथम इसवीसनाच्या आठव्या शतकात या भागातला राजा सुरथ यानं बांधलं होतं. पुढं दक्षिण कन्नड प्रदेशावर राज्य करणाऱ्या अनेक राजवंशांनी त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार आणि विस्तार केला. काळाच्या ओघात या परिसरावर कदंब, चालुक्य, अलुपा, राष्ट्रकूट, होयसळ, विजयनगर, इक्केरी, म्हैसूर इत्यादी अनेक राजवंशांनी राज्य केलं आणि या सर्व राजवंशांनी या मंदिराला वेळोवेळी दानं दिली.

साधारणतः आठव्या शतकात या प्रदेशावर राज्य करणाऱ्या अलुपा राजघराण्यातील राजांची या मंदिरावर विशेष श्रद्धा होती. केळदीची शूर राणी चेन्नम्मा यांनीही या मंदिराला भेट दिली होती आणि मंदिराला भव्य रथ भेट दिला होता असे उल्लेख प्राचीन ताम्रपत्रात आहेत. इथली आराध्यदेवता श्रीराजराजेश्वरीची मूर्ती म्हणजे देवी श्रीललिता त्रिपुरसुंदरीचं दुसरं स्वरूप. मंदिरातली राजराजेश्वरीची मृण्मय मूर्ती जवळजवळ दहा फूट उंचीची असून तिच्या चेहऱ्यावरचे भाव अत्यंत आश्वासक आणि प्रसन्न करणारे आहेत. बाजूच्या गाभाऱ्यात श्रीभद्रकाली, श्रीसुब्रमण्यम आणि श्रीगणेश यांच्या तितक्याच भव्य मृण्मय मूर्ती आहेत. दर बारा वर्षांनी ‘लेपाष्ट गंध’ नावाच्या धार्मिक उत्सवात या सर्व मूर्तींचं आठ औषधी गुणधर्म असलेल्या विशेष मातीच्या मिश्रणानं पुनर्लेपन केलं जातं व परत रंग दिला जातो.

दक्षिण कर्नाटकामधील सर्व मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराच्या परिसरात राखण्यात येणारी कमालीची स्वच्छता आणि शांतता! एक कागदाचा कपटादेखील इथं तिथं टाकलेला दिसणार नाही. इतके भाविक रोज दर्शनाला येतात; पण कसलाही गलिच्छपणा नाही की गोंगाट नाही. मंदिरात आल्यावर जी प्रसन्नता आणि शांतता आपल्याला अपेक्षित असते ती इथं भरभरून लाभते. पोळलीचं हे राजराजेश्वरी मंदिरही तसंच आहे.

दक्षिण कर्नाटकाच्या सर्व मंदिरांत असतं तसं इथंही अखंड अन्नछत्र सुरू असतं. दुपारच्या वेळी मंदिराच्या परिसरात आलेली कुणीही व्यक्ती उपाशी राहत नाही. इथला वार्षिक रथोत्सवही फार प्रसिद्ध आहे. रथ अतिशय देखणा आणि नाजूक लाकडी कोरीव कामानं नटलेला आहे.

सध्या आपल्याला मंदिराची जी वास्तू दिसते ती जेमतेम सात वर्षं जुनी आहे; पण मंदिराचा जीर्णोद्धार करताना कुठंही पारंपरिक मंदिरस्थापत्याशी तडजोड केलेली नाही. मंदिराच्या श्रीकोविल, म्हणजे आतल्या गाभाऱ्याबाहेर, अत्यंत सुरेख लाकडी नक्षीकाम आहे आणि ते सर्व जवळच्याच कारकळानामक गावच्या कसबी स्थपतींनी पारंपरिक साधनं वापरून घडवलेलं आहे. मंदिराचं छत उंच आणि उतरतं असून अत्यंत सुरेख लाकडी कोरीव कामानं सजवलेलं आहे. छत तोलून धरणारे स्तंभ ग्रॅनाईटचे आहेत आणि त्यांच्यावरही अप्रतिम कोरीव काम आहे. भारतातल्या कुठल्याही प्राचीन मंदिराच्या तोडीस तोड असणारं हे कोरीव काम आहे. भारतात इतर ठिकाणी जीर्णोद्धाराच्या नावाखाली जुनी सुंदर दगडी मंदिरं पाडून तिथं काँक्रिटच्या कुरूप वास्तू उभारल्या जातात, त्या पार्श्वभूमीवर या मंदिराचा जीर्णोद्धार खरोखरच सुखावणारा आहे.

या मंदिराचं अजून एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे, इथं साजरा होणारा वार्षिक ‘पोळली चेंडू उत्सव’, जो ‘फुटबॉल उत्सव’ म्हणूनही ओळखला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात वापरला जाणारा चामड्याच्या चेंडू तयार करण्याचा मान जवळच्याच एका गावातल्या चर्मकार कुटुंबाकडे वंशपरंपरेनं दिला गेलेला आहे. पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी हा चेंडू आणि एक ताडपत्रीची छत्री मंदिराच्या गोपुरावर ठेवली जाते. श्रीराजराजेश्वरीची पूजा केल्यानंतर हा चेंडू वाजतगाजत जवळच्या मैदानात नेला जातो आणि खेळ सुरू होतो.

या खेळात गोल नसतो; पण चेंडू पायानं प्रतिस्पर्धी टीमच्या क्षेत्रात लोटायचा असतो. प्रतिवर्षी जवळजवळ पाचशे लोक या खेळात भाग घेतात! अशी अनोखी प्रथा दुसऱ्या कुठल्याही मंदिरात असल्याचं मला तरी माहीत नाही.

फाल्गुनी नदीच्या काठावर, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाळ तालुक्यात असलेलं हे अतिशय देखणं आणि भव्य मंदिर मंगळूर शहरापासून फक्त २० किलोमीटरवर आहे. माडांच्या रायांनी आणि हिरव्यागार भातशेतीनं वेढलेलं हे मंदिर एक वेगळीच मनःशांती देऊन जातं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT