Ved Sakal
सप्तरंग

अज्ञाताच्या शोधाचा प्रयास...

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद हे चार वेद अपौरुषेय आहेत; म्हणजे वेदांचा कुणीएक लेखक नाही.

सकाळ वृत्तसेवा

- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद हे चार वेद अपौरुषेय आहेत; म्हणजे वेदांचा कुणीएक लेखक नाही. कारण, ते मुळी लिहिलेच गेले नाहीत; कारण, लिहिण्याची कलाच तेव्हा अस्तित्वात नव्हती. वेदकर्ता जसा एक नाही तसा त्यांचा काळही एक नाही. अनेकांनी ते निर्माण केले म्हणून अपौरुषेय. त्यातही अनेक शाखा सांगितलेल्या आहेत.

फलप्राप्तीसाठी शेवटी अनुष्ठान महत्त्वाचं मानलं गेलं हे सत्य आहे. कुठल्याही क्षेत्रात प्रथम ज्ञान हे अभ्यासातून महत्प्रयासानं प्राप्त करावंच लागेल; पण ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून उतरवलं गेलं तरच त्या कार्यातून फलप्राप्ती होत असते हा तुमचा-माझा अनुभव आहे.

अनुष्ठानाशिवाय कर्मापासून फलप्राप्ती होत नाही हे एकदा पटलं की पुढील प्रश्न सोडवायला सोपे जातात. हा सिद्धान्त सर्व क्षेत्राला लागू असेल तर मग ब्रह्मज्ञानातून फलप्राप्ती होण्यासाठीसुद्धा अनुष्ठान लागतंच हे आता कुणालाही मान्य व्हायला हरकत नसावी. अज्ञानमयी अंधकार नष्ट करण्यासाठी सामर्थ्यशाली होण्याचा मार्ग जो अवलंबतो त्याला ते शक्य होतं.

त्यासाठी ब्रह्माकार वृत्तीरूपी ज्ञान प्राप्त व्हावं लागेल. हे ज्ञान पूर्वकर्मानुष्ठान उपासनेद्वारा अंत:करणाची असलेली चंचलता पूर्ण शून्यवत् करून, रागादीमलरहित शुद्ध अंत:करणानं श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आचार्यांच्या सन्निध जाऊन, त्यांची कृपा झाली तर आणि त्यांच्या मुखातून वेदान्त महावाक्यश्रवणाचा लाभ झाला तर ब्रह्माकार वृत्तीतूनच प्राप्त होऊ शकतं आणि मग हे चैतन्य अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ ठरू शकतं.

नित्यसिद्ध ब्रह्माला आत्मरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आला की मग तो साधक कृतकृत्य होतो आणि त्याला मग बाकी काही कर्तव्य करण्यास शिल्लक राहत नाही. अशा ब्रह्मविद्येला मुख्यत: ‘उपनिषद’ किंवा ‘वेदान्त’ या नावानं संबोधलं जातं. या उपनिषदांचा समन्वय ब्रह्मसूत्रात आला असून, तेच तत्त्वज्ञान श्रीमद्भगवतगीतेतून प्राप्त होतं. म्हणूनच गीतेला वेदान्ताचा गौरव प्राप्त झाला आहे.

आचार्य शंकर भगवत्पाद यांनी उपनिषदं, ब्रह्मसूत्रं, तसंच गीतेवर भाष्य लिहिल्यानंतरच कैवल्याद्वैत सिद्धान्त मांडला. उपनिषदांत जे सांगितलं गेलं ते वेदाच्या शिरोभागातील असल्यानं उपनिषदांना ‘वेदान्त’ किंवा ‘उत्तरमीमांसा’ असंही म्हणतात. प्रस्थानत्रयी = १. उपनिषद, २. श्रीमद्भगवद्गीता, ३.ब्रह्मसूत्र.

उपनिषदं ही भारतीय आध्यात्मिक चिंतनाची मूलाधार आहेत. उपनिषदं हे भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे स्रोत आहेत, ब्रह्मविद्या आहेत. उपनिषदं म्हणजे आध्यात्मिक अभ्यासातून उत्पन्न झालेल्या जिज्ञासेचं ऋषी-मुनींना सापडलेलं उत्तर आहे.

उपनिषदं हे चिंतनशील ऋषी-मुनींची आपापसात जी ज्ञानचर्चा झाली तिचं सार आहे. उपनिषदं ही कविहृदय असलेल्या ऋषींची काव्यमय आध्यात्मिक रचना आहे. उपनिषदं हा अज्ञाताच्या शोधाचा प्रयास आहे. उपनिषदं हा वर्णनातीत अशा ईश्वरीय परमशक्तीला शब्दांत बांधण्याचा प्रयत्न आहे.

उपनिषदं हे त्या निराकार, निर्विकार, असीम, अपार भगवंताला आंतर्दृष्टीनं समजण्याच्या आणि परिभाषित करण्याच्या अदम्य आकांक्षेचं लेखबद्ध विवरण आहे. उपनिषदांमध्ये अनेकानेक ऋषी-मुनींनी आपले आयुष्यभरातील अनुभव रसज्ञ केले आहेत. याच कारणामुळे उपनिषदं ही सर्वतोपरी असल्याचं स्वीकारलं गेलं आहे.

जीवनातले सारे विचार आणि चिंतन क्षुल्लक असू शकतं; पण जीव आणि शीव यांच्या मीलनासाठी केलेलं आध्यात्मिक चिंतन हे शाश्वत आणि सनातन आहे. मानवाला जीवनातल्या परमोच्च उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचं काम उपनिषदं करतात. सर्व जीवांसाठी उपनिषदं ही भगवंतासमान आहेत. ‘अज्ञान तिमिरांधस्य’ अशी ती आहेत.

उपनिषदांची भाषा गूढ आहे. जीवाची बुद्धी आणि मन बाह्य वस्तूंनाच ओळखतं. संवेदनशील अंगांद्वारे ग्रहण केले जाणारे अनुभवच बुद्धीमध्ये नोंदवले जातात आणि तेच जीव समजू शकतो. यामुळेच उपनिषदं समजणं अवघड जातं. उपनिषदांमध्ये ईश्वराच्या बाबतीत किंवा सैतानाच्या बाबतीत अथवा स्वर्ग-नरक यांच्याबाबतीत काहीच सांगितलेलं नाही. उपनिषद सांगतात स्वयंचेतनेबाबत - यालाच आपण आत्मा असं देखील म्हणतो - म्हणून उपनिषदं समजणं खूप कठीण जातं. पुढच्या काही भागांमध्ये आपण काही मुख्य उपनिषदांविषयी जाणून घेऊ या.

(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT