- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com
उपनिषदामध्ये ‘सद्’ या धातूचे तीन अर्थ म्हणजेच विनाश, गती अर्थात् ज्ञान-प्राप्ती, आणि शिथिल करणं. अशा प्रकारे जे ‘ज्ञान’ पापाचा नाश करतं, ‘खरं ज्ञान’ मिळवून देतं, ‘आत्म्याचं रहस्य’ समजावून सांगतं तसंच अज्ञान शिथिल करतं त्याला ‘उपनिषद’ म्हणतात. उपनिषदांमध्ये ऋषी आणि शिष्य यांच्यामधले सुंदर आणि गूढ असे संवाद आहेत. ते वाचकांना वेदांच्या मर्मापर्यंत घेऊन जातात.
‘अष्टाध्यायी’मध्ये उपनिषद हा शब्द ‘परोक्ष किंवा रहस्य’ या अर्थानं वापरलेला आहे. ‘कौटिल्य अर्थशास्त्रा’मध्ये युद्धातील गुप्त संकेतांच्या चर्चेला ‘औपनिषद’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. यातून असा भाव प्रकट होतो की, उपनिषदांचं तात्पर्य म्हणजे ‘रहस्यमय ज्ञान’.‘अमरकोशा’मध्येदेखील काहीसा असाच अर्थ आला आहे. ‘उपनिषद’ हा शब्द धर्माची गूढ रहस्ये जाणण्यासाठी आहे, असं त्यात नमूद आहे.
विद्वानांनी ‘उपनिषद’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘उप’ + ‘नि’ + ‘सद्’ याच स्वरूपात मानलेली आहे. याचा अर्थ असा आहे की, जे ज्ञान व्यवधानरहित होऊन (भगवंताच्या) समीप, जवळ आणतं, जे ज्ञान विशिष्ट आणि संपूर्ण आहे व खरं आहे, ते निश्चित रूपानं ‘उपनिषदज्ञान’ संबोधिलं जातं. मूळ भाव असा आहे की, ज्या ज्ञानाद्वारे ‘ब्रह्म’-साक्षात्कार होतो तेच ‘उपनिषद’. यालाच ‘अध्यात्मविद्या’ असंदेखील म्हणतात.
मुक्तोपनिषदामध्ये, श्लोकसंख्या ३० पासून ३९ पर्यंत, १०८ उपनिषदांची सूची दिली आहे. या १०८ उपनिषदांमध्ये,
ऋग्वेदातील १० उपनिषदं आहेत.
शुक्ल यजुर्वेदातील १९ उपनिषदं आहेत,
कृष्ण यजुर्वेदातील ३२ उपनिषदं आहेत,
सामवेदातील १६ उपनिषदं आहेत,
अथर्ववेदातील ३१ उपनिषदं आहेत.
मुक्तोपनिषदामध्ये चारी वेदांच्या शाखांची संख्यादेखील दिली आहे आणि प्रत्येक शाखेचं एक उपनिषद आहे असं सांगितलं आहे. अशा प्रकारे चारी वेदांच्या अनेक शाखा आहेत आणि त्या शाखांची उपनिषदंदेखील अनेक आहेत. विद्वानांनी ऋग्वेदाच्या २१ शाखा, यजुर्वेदाच्या १०९ शाखा, सामवेदाच्या १००० शाखा, तसंच अथर्ववेदाच्या ५०,००० शाखा सांगितल्या आहेत.
यादृष्टीनं ५११३० उपनिषदं होतात; परंतु १०८ उपनिषदांचा उल्लेख प्राप्त होतो, त्यातील काही तर अत्यंत छोटी आहेत. हाच उल्लेख आपल्याला गुरुचरित्रामधील सत्ताविसाव्या अध्यायातदेखील मिळेल. विप्रांना वेदार्थ सांगताना अतिशय खोलात जाऊन नृसिंह सरस्वती यांनी वेदांवर भाष्य केलं आहे.
या १०८ अतिरिक्त नारायण, नृसिंह, रामतापनी, आणि गोपाल ही अजून चार उपनिषदं आहेत .या १०८ मधील -
- पहिल्या १० उपनिषदांना मुख्य उपनिषद म्हटले जातं = दशोपनिषद.
- २१ उपनिषदांना सामान्य वेदान्त म्हटले जातं = सामान्य वेदांमध्ये
- २३ उपनिषदांना संन्यास म्हटले जातं = संन्यास
- ९ ला = शाक्त
- १३ ला = वैष्णव
- १४ ला = शैव, तसंच
- १७ ला = योग उपनिषद असं संबोधिलं जातं.
विषयाच्या गंभीरतेनं आणि विवेचनाच्या विशदतेच्या कारणानं १३ उपनिषदं विशेष मान्य आणि प्राचीन मानली जातात. जगदगुरू आद्य आचार्यांनी पुढील १० उपनिषदांवर भाष्य केलं आहे -
१) ईशावास्योपनिषद - शुक्ल यजुर्वेद,
२) ऐतरेयोपनिषद - ऋग्वेद,
३) कठोपनिषद - कृष्ण यजुर्वेद,
४) केनोपनिषद - सामवेद,
५) छांदोग्य उपनिषद - सामवेद,
६) प्रश्नोपनिषद - अथर्ववेद,
७) तैत्तिरीय उपनिषद - कृष्ण यजुर्वेद,
८) बृहदारण्यक उपनिषद - शुक्ल यजुर्वेद,
९) मांडुक्य उपनिषद - अथर्ववेद, आणि
१०) मंडूक उपनिषद - अथर्ववेद
आद्य आचार्यांनी निम्न तीन उपनिषदांना प्रमाणकोटी ठेवलं आहे:
१) श्वेताश्वेतर उपनिषद
२) कौषीतकि उपनिषद
३) मैत्रायणी
अशी १३ उपनिषदं मुख्य समजली जातात. अन्य उपनिषदं देवताविषयक असल्यानं ‘तांत्रिक’ मानली जातात. अशा उपनिषदांमध्ये शैव, शाक्त, वैष्णव तथा योगविषयक उपनिषदांची मुख्य गणना आहे.
भाषा तसचं उपनिषदांच्या विकासक्रमानुसार उपनिषदांचं चार स्तरावर विभाजन करण्यात आलेल आहे :
१) गद्यात्मक उपनिषद: ऐतरेय, केन, छांदोग्य, तैत्तिरीय, बृहदारण्यक आणि कौषीतकि
२) पद्यात्मक उपनिषद: यश, कठ, श्वेताश्वेतर आणि नारायण
३) अवांतर गद्योपनिषद: प्रश्न, मैत्रायणी, मांडुक्य
४) आथर्वण अर्थात कर्मकांडी उपनिषद: अन्य अवांतरकालीन उपनिषदांची गणना या श्रेणीत येते.
मनुष्यमात्राच्या अनंत विषयाची मांडणी जर आपण विभक्त करू म्हटलं तर ती अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष चार भागात करता येईल. या चारपैकी तीन अर्थ, धर्म, काम हे अनित्य आहेत, तर चौथा मोक्ष किंवा मुक्ती ही नित्य मानता येईल; कारण, मुक्तीनंतर पुन:र्जन्म नाही, जन्म नाही म्हणजे मृत्यू नाही व संसारही नाही.
‘न स पुंरावर्तते’ असा मोक्ष प्राप्त कसा करून घ्यायचा हा तुमचा-माझा प्रश्न आहे. त्यासाठी उपनिषदांचा अभ्यास व त्यातील ब्रह्मात्मैक्य ज्ञान आपल्याला आत्मसात करण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रारब्धात असेल तर मोक्ष लाभेल. उपनिषद म्हणजे ब्रह्मज्ञान. त्यालाच वेदान्तही म्हणतात.
(लेखक हे अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.