Bihar Nitish Kumar Sakal
सप्तरंग

बिहारी सत्ताधर्म

‘मरण पत्करेन; पण पुन्हा तिकडं - म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर - जाणार नाही’ असं छातीठोकपणे सांगणारे नितीशकुमार यांनी आणखी एकदा पलटी मारली.

श्रीराम पवार, shriram1.pawar@gmail.com

‘मरण पत्करेन; पण पुन्हा तिकडं - म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर - जाणार नाही’ असं छातीठोकपणे सांगणारे नितीशकुमार यांनी आणखी एकदा पलटी मारली. ज्या ‘इंडिया आघाडी’च्या उभारणीसाठी आणि भाजपच्या विभाजनवादी राजकारणाला शह देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असं तेच सांगत होते, त्या आघाडीला सोडचिठ्ठी देत नव्यानं त्याच भाजपशी त्यांनी घरोबा केला. नितीशकुमार पलटले यात तसं नवं काही नाही.

‘पलटूराम’, ‘पलटूबाबू’, ‘पलटेशकुमार’ अशी रंग बदलण्यासाठी ठेवता येतील तितकी नावं त्यांना बिहारमधला भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांनी ठेवली आहेत. नितीशकुमार प्रत्येक पलटी मारताना काहीही सांगत असले तरी त्यामागं स्वच्छ राजकारण असतं ते स्वतःचं महत्त्व टिकवण्याचं आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची न सोडण्याचं.

सुमारे १९ वर्षं सत्तेत असलेल्या या नेत्याला एकदाही स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही म्हणून त्यांच्या मुख्यमंत्रिपदात काही फरक पडत नाही. कधी नितीशकुमार हे लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’ला विरोध करणारे ‘सुशासनबाबू’ बनतात, तर कधी भाजपच्या सांप्रदायिक राजकारणाला आणि ध्रुवीकरणवादी मानसिकतेला विरोध करणारे धर्मनिरपेक्षतेचे रखवालदार बनतात.

खरं तर यातल्या कशाचंच ते प्रतिनिधित्व करत नाहीत हे भाजप, राजदलाही समजतं; मात्र, बिहारी जनता मागची दोन दशकं कौलच असा देत आली आहे की, भाजप किंवा राजद यांना सत्ता हाती ठेवायची तर नितीशकुमार सोबत असावे लागतात. त्यांच्याखेरीज बहुमताची बेगमी होत नाही; मग विचारसरणी वगैरे सारं झूठ ठरतं.

कालपर्यंत ‘नितीशकुमारांना दरवाजे बंद’ असं म्हणणारे भिंती पाडून त्यांना आत घ्यायला उतावळे होतात...‘नितीशकुमार हे मानसिक आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवलं पाहिजे,’ असे तारे तोडणाऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नितीशकुमार नवी सोयरीक तितक्‍याच कोडगेपणानं साजरी करतात. हा बिहारी सत्ताधर्म क्रमाक्रमानं नितीशकुमार नावाच्या चुंबकाची शक्ती कमी करत निघाला आहे.

नितीशकुमार यांनी राजद आणि काँग्रेस यांच्यासोबतची महाआघाडी तोडली आणि सहा तासांतच पुन्हा भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा हा मुख्यमंत्रिपदाचा नववा अवतार एका थकलेल्या आणि निस्तेज बनता चाललेल्या नेतृत्वाकडं निर्देश करणारा आहे. त्यांनी २०२० ची विधानसभेची निवडणूक भाजपशी आघाडी करून लढवली, तेव्हा सर्वाधिक जागा राजदनं जिंकल्या होत्या.

दुसऱ्या क्रमांकावर भाजप होता, तर नितीशकुमार तिसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रात जागा कमी म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या, त्यासाठी सर्वात जुनी युती तोडणाऱ्या भाजपला कमी जागा असल्या तरी नितीशकुमार मात्र मुख्यमंत्री म्हणून स्वीकारार्ह होते. त्यानंतरही नितीशकुमार यांनी पलटी मारलीच आणि समाजवादी कळपातले कट्टर प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी करून पद टिकवलं हा ताजा इतिहास आहे.

त्यानंतर ज्या रीतीनं भाजप आणि नितीशकुमार यांचं संयुक्त जनता दल यांच्यात ‘रिश्‍ते में दरार’ तयार झाली, ती पाहता, याचं पुन्हा जुळणं कठीण, असंच सांगितलं जात होतं; मात्र, राजकारण हा शक्‍यतांचा खेळ आहे याचं अत्यंत भ्रष्ट उदाहरण सादर करताना नितीशकुमार पुन्हा रंग बदलू लागले.

नितीशकुमार असं काही करतात तेव्हा त्यांना जाणीव झालेली असते ती त्यांच्या राजकारणाचं अस्तित्व पणाला लागल्याची. अशी शक्‍यताच उखडून टाकण्यासाठी ते काहीही करतात; मग त्यात नैतिकता, जयप्रकाश नारायण, कर्पूरी ठाकूर यांचा वारसा, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांची शागिर्दी असल्या कशालाही अर्थ उरत नाही. मामला व्यक्तिशः नितीशकुमार यांच्या राजकीय भवितव्यापुरता असतो.

त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अशा किती तरी लगतच्या ज्येष्ठांना आणि कनिष्ठांनाही राजकारणातून हद्दपार करायचा पराक्रम केला आहे, म्हणूनच बिहारमध्ये ‘ऐसा कोई सगा नही, जिसे नितीश ने ठगा नही’ असं लालूप्रसाद जाहीरपणे सांगतात. नितीशकुमार हे एका अर्थानं देशातले एकमेव नेते आहेत, ज्यांना नरेंद्र मोदी-अमित शहा हे सर्वशक्तिमान वाटत असतानाही, त्यांना नितीशकुमार यांची मनमानी सहन करावी लागते...

लालूप्रसाद आणि गांधीकुटुंबाला मागचं विसरून त्यांना सहन करावं लागतं. ही खास बिहारी राजकारणाची कोंडी आहे. महाराष्ट्रात शिवसेना किंवा पंजाबात ‘अकालीं’ना सहज सोडून देणारा मोदी-शह यांचा भाजप, लोकसभेची निवडणूक तर जिंकली, असा आत्मविश्वास दाखवत असतानाही नितीशकुमार यांना मात्र, अल्प ताकद असूनही पायघड्या घालतो, हे आक्रित ‘भारतीय राजकारणात अंतिम काहीच नसतं’ याकडं बोट दाखवणारं आहे.

पक्ष फुटण्याच्या भीतीतून...

ही नवी सोयरीक घडवताना नितीशकुमार यांच्याकडं सांगण्यासारखा एकही नवा युक्तिवाद नाही. या वेळी राजदचे नेते आणि महाआघाडीचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यांचा पूर्ण सन्मान ठेवत होते...नितीशकुमार आणि त्यांच्या मूळच्या समाजवादी गोतावळ्याला साजेसं मंडलकेद्री राजकारण करण्यात त्यांना पूर्ण साथ राजद देता होता. यातूनच बिहारमध्ये जातगनणा झाली, जी भाजपला मान्य नव्हती.

मात्र, हाच भाजपच्या धर्माधारित मतांच्या ध्रुवीकरणावरचा उपाय म्हणून सांगितला जात होता. ‘मंडल २.०’ असंही त्याचं वर्णन केलं गेलं. यातून नितीशकुमार हे मोदी यांच्यासमोर आव्हान उभं करतील असं वातावरण तयार होऊ लागलं. ‘देशभर जातगणना झाली पाहिजे,’ असा पवित्रा काँग्रेसनंही घेतला.

भाजपविरोधी राजकारणाचे नितीशकुमार नकळत सूत्रधार बनत होते ते याच नव्या समीकरणांच्या बळावर. ते मुदलातच मान्य नसलेल्या भाजपसोबत जाण्याचं समर्थन कसं करावं ही विवंचना संयुक्त जनता दलात स्पष्ट दिसते. लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप काही नव्यानं झालेले नाहीत, ज्याचं भांडवल करत नितीशकुमार आपल्या पलटी मारण्याला नैतिक तडका देऊ शकतील.

मग उरते काँग्रेसकडून झालेली कथित उपेक्षा. नितीशकुमार यांना ‘इंडिया आघाडी’चे समन्वयक किंवा ‘आघाडीचा चेहरा’ म्हणून पुढं करावं अशी त्यांच्या पक्षाची अपेक्षा असेलही; मात्र, ते नेहमीच अशी इच्छा नसल्याचं सांगत होते. शिवाय, आता ते एनडीएत गेले तर त्यांना त्या आघाडीचा चेहरा बनवलं जाणार आहे की समन्वयक? भाजप हे मान्य करण्याची शक्‍यताच नाही.

‘इंडिया आघाडी’त जागावाटप रखडलं हे एक नितीशकुमार यांच्या नाराजीचं कारण सांगितलं जातं. मग केवळ एवढ्याचसाठी ज्यांची राजवट संपवायची म्हणून नितीशकुमार ‘इंडिया’त पुढाकार घेत होते त्यांचीच राजवट पुन्हा यावी अशा राजकारणाला ते का साथ देतात? शिवाय, एनडीएत तरी जागावाटप झालं आहे काय? बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा ही नितीशकुमार यांची जुनी मागणी.

ती भाजपनं कधीच मान्य केली नाही. अलीकडं जातगणना हा त्यांचा आवडता मुद्दा. त्यावरही भाजपशी त्यांचा काही समझोता झाला असं दिसत नाही. म्हणजेच, चाललेलं सरकार मोडावं आणि भाजपसोबत पुन्हा बनवावं याविषयी काहीही ठोसपणे नितीशकुमार यांना सांगता येत नाही. मग ते भाजपकडं गेले कसे?

याचं एकच कारण दिसतं व ते म्हणजे आपला पक्षच फुटण्याची भीती. भाजपपासून बाजूला होताना, भाजप आपला पक्ष काखोटीला मारेल अशी भीती त्यांना वाटत होती. आता त्यांच्या पक्षातला एक गट लालूप्रसाद यांच्याशी जवळीक साधत होता, तेव्हा पाठीराखे सोडून जाण्याचं भय त्यांना, पलटी मारायला भाग पाडणारं ठरलं असावं.

‘इंडिया’ची वाटचाल खडतर

या घडामोडींमुळे ‘इंडिया आघाडी’ला दणका बसला आहे. नितीशकुमार यांनीच देशभरातल्या विविध पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयोगाची सुरुवात केली होती.

एका अर्थानं, सूत्रधारच सोडून जातो आहे. याचा सर्वाधिक लाभ भाजपला होईल. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं चारशेहून अधिक जागा जिंकायचं कितीही ठरवलं असलं तरी, मागची कामगिरी पुन्हा करण्यासाठीही भाजपला बिहार-महाराष्ट्र-पश्‍चिम बंगाल यांसारख्या राज्यात झगडावं लागणार आहे.

राममंदिराचा गाजावाजा आधीच बहुतांश जागा जिंकलेल्या उत्तर भारतात नवी भर टाकण्याची शक्‍यता कमी, दक्षिणेत त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता कमी. असं नसतं तर राममंदिराच्या मेगाइव्हेंटनंतरही ज्यांच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले त्या नितीशकुमारांना परत साथीला घेण्याचं कारण काय? या राजकारणात केवळ नितीशकुमार पलटले नाहीत; भाजपही पलटला आहे.

अर्थात्, लोकसभा जिंकण्याच्या उद्दिष्टापुढं सध्या भाजपचं नेतृत्व अन्य कशाचाही विचार करत नाही. तेव्हा, बिहारात या राजकारणाचा लाभ भाजपला होईल तसा तो नितीशकुमार यांनाही होईल; मात्र म्हणून, मागच्या लोकसभेला ४० पैकी ३९ जागा एनडीएनं जिंकल्या, त्याची पुनरावृत्ती होईलच याची खात्री नाही. नितीशकुमार यांच्या पलटीचा वापर विरोधी ऐक्‍याच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उभं करण्यासाठी जरूर होऊ शकतो. ‘इंडिया’समोर आता आणखी खडतर वाटचाल वाढून ठेवली आहे.

बिहारपुरता विचार करायचा तर, नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपद राखलं तरी दीर्घकालीन राजकारणात त्यांची विश्‍वासार्हता तळाला गेली आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले तेव्हा चिराग पासवान यांचा वापर करून भाजपनं त्यांच्या यशावर मर्यादा घालायचा प्रयत्न केला होता. हे भाजपच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे.

भाजपला बिहारमध्येही दुरंगी लढतीकडं जायचं आहे. त्यातला एक पक्ष तेजस्वी यादव यांचा राजद हा असेल हे आता स्पष्ट आहे. दुसरा भाजप असेल तर त्यासाठी जदयूचं अस्तित्व आक्रसत जाणं गरजेचं आहे. बिहारी राजकारणाची हीच दिशा स्पष्ट होते आहे. यात नितीशकुमार यांचा प्रभाव आटतो आहे. त्यांच्या पक्षात ‘भवितव्य राजदसोबत की भाजपसोबत’ यावर मतभेदही आहेत. भाजप याचा लाभ उठवत नितीशकुमार यांची राजकीय स्पेसच संपवण्याचा प्रयत्न करेल.

कदाचित हेच अटळ भविष्य असल्याची जाणीव नितीशकुमार यांना झाली असावी. केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत येईल, त्यानंतर अल्प संख्येवरचं मुख्यमंत्रिपद टिकेलच याची खात्री नाही हेही त्यांना समजत असेल; मात्र, केंद्रीय सत्तेशी जुळवून घेत त्यांना निवृत्ती सुखाची करायची असू शकते. नितीशकुमार यांचा बिहारी सत्ताधर्म अनेक वळणं घेत अशा टप्प्यावर त्यांना घेऊन आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT