Eye Sakal
सप्तरंग

डोळ्यातले आभाळ

आभाळाला जमिनीची ओढ असली, तरीही ते खाली येत नाही. क्षितिजाच्या टोकावर मातीला आलिंगन देण्याचा देखावा ते निर्माण करतं; पण हळव्या आभाळाच्या अशा भुलाव्यांना भुलून जाऊ नये.

श्याम पेठकर

आभाळाला जमिनीची ओढ असली, तरीही ते खाली येत नाही. क्षितिजाच्या टोकावर मातीला आलिंगन देण्याचा देखावा ते निर्माण करतं; पण हळव्या आभाळाच्या अशा भुलाव्यांना भुलून जाऊ नये.

अश्रूंचे संदर्भ कळायला नुसते डोळे असून चालत नाही, नजरही असावी लागते. पाहणे आणि दर्शन घेणे, दिसणे आणि जाणवणे यात बरेच अंतर असते. हे अंतर पार करून नजर कमावलेल्या डोळ्यांनाच अश्रूंचे संदर्भ चटकन लागतात. अश्रूंचे संदर्भ कळले नाही, तर आयुष्याचं हसं होतं. काळजात असलेल्या अश्रूंच्या डोहात आषाढाची सावली पडली की, डोळ्यांतून श्रावणसरी बरसतात.

आभाळाला जमिनीची ओढ असली, तरीही ते खाली येत नाही. क्षितिजाच्या टोकावर मातीला आलिंगन देण्याचा देखावा ते निर्माण करतं; पण हळव्या आभाळाच्या अशा भुलाव्यांना भुलून जाऊ नये. हळवं झालेलं आभाळ मग जमिनीकडे झेपावताना कुणाच्या तरी डोळ्यांत साकारतं. पापण्यांवर आभाळ तोलून धरायला डोळे आरस्पानीच असले पाहिजे, असे नाही. पण डोळ्यांना अश्रूंचे सगळेच संदर्भ ठावूक असावेत. डोळ्यांत आभाळ साठवलं की, डोळे निळे होतात की, डोळ्यांच्या कक्षेत सामावणारं आभाळ निळं असतं, या संभ्रमात मात्र नजरवंतांनी राहू नये. पंखांवर भूक तोलून गाव बदलणारे काही पक्षी आभाळ साठलेल्या अशा डोळ्यांच्या शोधात असतात. असे पक्षी कितीही देखणे आणि गोजिरवाणे असले तरीही स्वप्नपिपासू पाखरं आकाशी डोळ्यातलं आभाळ खुडून नेतात. गहिवरल्या मेघांची चिंब स्वप्नं बंदिस्त करणारी बुबुळंदेखील ते पायांच्या तीक्ष्ण नखांनी उचलून नेतात. मग डोळ्यांचं स्मशान होतं. ज्या डोळ्यांत स्वप्न नाहीत, त्या डोळ्यांचं आणखी काय होणार?

लाल डोळ्यांच्या त्या पक्ष्यांच्या चोचीतलं आभाळ मग गावशिवेवरच्या जुनाट पिंपळावर सांडतं. पिंपळपानांचे मग हिरवे डोळे होतात. त्या डोळ्यांमधून आभाळ जमिनीवर टपटपत राहतं. गावमारुतीच्या मंदिरात रात्री भजन करून परतणाऱ्या भजनकऱ्यांच्या पावलांशी लगट करून आभाळ गावात शिरतं. गावावर लख्ख चांदणं धरतं. उंच पहाडावर राहणाऱ्या धिप्पाड लोकांचे काफिले मग अशा गावांकडे वळतात. रंगणारी मेंदी आणि सप्तरंगी बांगड्यांची स्वप्नं गुलनार तळ्याकाठी वसलेल्या गावात गुलजार गावकऱ्यांना विकतात. अशा बांगड्यांच्या रंगसुरात बांधलेले असे मेंदीभरले हात मग ओंजळीत आभाळ झेलू शकतात. मेंदीच्या आरक्त झालेल्या अशा नितळ मुलायम गोऱ्या हातांच्या स्पर्शानं रक्तवर्णी अशोकालाही फुलं येतात. मिठीत चांदणं फुलतं आणि हातांचा झुला होतो. अशा वेळी अनावर सख्याच्या बावऱ्या स्पर्शानं आरक्त चेहरा झाकला जातो आणि मग आभाळ मेंदीभरल्या हातांच्या मालकिणीच्या डोळ्यांत साठवलं जातं. या आभाळाचे रंग मात्र मत्त केशरी असतात. अनाम पक्ष्यांचे थवे तोपर्यंत गावावरून उडून गेलेले असतात. संध्याकाळच्या गडद सावल्या ओढून पिंपळ समाधिस्त झालेला असतो. मारुतीच्या पारावर विसावलेला बैरागी आत्मधून जागविण्याचा प्रयत्न करतो. मग गावातल्या म्हाताऱ्या वाड्याच्या खिडकीत आभाळ दाटून येतं. संकोच पदरात लपेटून ती उभी असते. तिच्या डोळ्यांतल्या आभाळाला मात्र विविधरंगी छटा असतात.

गहिऱ्या डोळ्यांतले असे मोकळे आभाळ सांभाळण्याचा तिचा प्रयत्न कुलवंतिणीचा असतो. डोळ्यांच्या कडांवर पापण्यांच्या आत असलेल्या क्षितिजावर सख्याची पावलं वाजत नाहीत. तिच्या डोळ्यांतलं आभाळ मग केविलवाणं होतं. डोळ्यांत असं आभाळ दाटलेलं असताना, कुणीच कुणाला वाट बघायला लावू नये. डोळे थिजतात. नीज विसरतात. हा छळ न संपणारा असतो. त्याची खंत कुणीच केली नाही, तर मग जोडीदाराची पाखरं अशा डोळ्यांत रडून जातात. आकाश केविलवाणं झालं की, मग पक्षी उडून जातात. आभाळाने असे केविलवाणे होऊ नये, यासाठी मग आषाढाने मौन सोडले पाहिजे. हळूवार भेटीसाठी टळटळीत दुपार तशी बरी नसते. दुपार एकटी असली अन् तिला निळ्या आभाळाचे रेशमी संदर्भ नसले, तरीही एखादी दुपार जास्वंदाच्या लवलवत्या फांदीसारखी कोवळी असते. अशी दुपार टाळता येत नाही. डोळ्यांत गच्च आभाळ साठवून ती नेमकी अशाच वेळी येते. रानतळ्याकाठच्या एकट समाधीपाशी तो तिची वाट बघत असतो. पावलांनी कमालीचा सावधपणा बाळगण्याची हीच वेळ असते. वाळलेल्या पाचोळ्यालाही अशा वेळी डोळे फुटतात. अशा असंख्य रोखलेल्या नजरांमधून वाट काढायची असते. भर दुपारी चाहूल लागल्याने पानांआड विसावलेलं इवलंसं पाखरू टिवटिवत उडून जातं.

दुपारची उन्हं मग उगाच चाळवतात. शांत दुपार उचकटू नये, याची काळजी घेत सख्याची भेट घ्यायची असते. संध्याकाळच्या देवडीत दिवा लावून दुपार अलगद निघून जाताना भेट संपलेली असते. आता त्याच्याही डोळ्यांत आभाळ दाटलेलं अन् तिच्या हातावरच्या मेंदीला फुलं आलेली. फुलांच्या चांदण्या होण्याआधी तिला परतायचं असतं. ती निघते तेव्हा त्याच्या काळजाचा तुकडा पदरात बांधून घेते. मग दुरावा येण्याचे काही कारण उरत नाही. अशा जिवांना समजून घेतलं, तर नभ कुणाच्याही डोळ्यांत उतरू शकतात. ऐन वैशाखातही पावसाच्या सरी कोसळतात. पदरात बांधलेल्या काळजाला पालवी फुटते. टुमदार घरांच्या, डौलदार गावाच्या नदीकाठच्या आमराईत सांजेला ढग मुक्कामाला असतात, असे म्हणतात. डोळ्यांनी ते दिसत नाहीत. त्यासाठी दृष्टी हवी. रानात गुरं राखायला जाणाऱ्या गुराख्यांच्या पोरांकडे ती दृष्टी असते. ती पोरं आमराईतल्या ढगांमधून गाईच्या हंबरण्यासाठी ओलावा शोषून घेतात.

अडीअडचणीसाठी थोडं जादा आभाळ गाईच्या डोळ्यांत दडवून ठेवतात. त्यांचं अस्तित्वच मातीचं असल्यानं त्यांना माहिती असतं की, गाईच्या मोठ्या डोळ्यांत स्वप्न पेरली की त्याचं आभाळ होतं. ते आभाळ मग धुकं होऊन गावशिवेवर दाटून येतं. गुराख्यांच्या जाणत्या पोरांचे पाय मात्र पायघोळ धुक्यात अडकत नाहीत. धुक्याआडून भल्यापहाटे तिचं उजागर सौभाग्य बघणेही बरे नसते. हे माहीत नसलेली काही पावलं मात्र धुकेजल्या पहाटे चिरेबंदी वाड्याजवळ जाऊन उभी राहतात. गाव अशा वेड्या पावलांना रोखत नाही. ढगांच्या धुक्यात ठेचकाळली की, डाव्या पायाच्या करंगळीतून एक एक थेंब रक्त सांडवत अशी पावलं निमूटपणे माघारी वळतात, तेव्हा धुक्याचं निरभ्र आभाळ झालेलं असतं. गावातल्या साऱ्यांनाच जमिनीवर पाय रोवून आभाळ बघण्याची नजर आलेली असते. कुरुक्षेत्रावर अडखळलेल्या पार्थाला पूर्णरूपाने घडविलेलं विराट दर्शन म्हणजे काय, ते गावाला कळतं. पण अशा गावानं गावशिवेवर मेंदीची पुरचुंडी गाडून ठेवावी. हे आपलंच गाव आहे, हे ओळखणं मग आभाळाला कठीण जात नाही आणि गाव ओळखण्यासाठी आभाळालाही डोळे फुटलेले असतात.

pethkar.shyamrao@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT