सप्तरंग

धगधगत्या भांडणातले इंधन

एकेकाळी एकत्र नांदणारा गोसावी परिवार आपापसात भांडत असतो. परिवार मोठा झाला की गरजाही मोठ्या होतात. गरजा आणि उत्पन्न यांची जुळवाजुळव करताना कर्त्या माणसाची तारांबळ उडते.

श्याम पेठकर

एकेकाळी एकत्र नांदणारा गोसावी परिवार आपापसात भांडत असतो. परिवार मोठा झाला की गरजाही मोठ्या होतात. गरजा आणि उत्पन्न यांची जुळवाजुळव करताना कर्त्या माणसाची तारांबळ उडते.

एकेकाळी एकत्र नांदणारा गोसावी परिवार आपापसात भांडत असतो. परिवार मोठा झाला की गरजाही मोठ्या होतात. गरजा आणि उत्पन्न यांची जुळवाजुळव करताना कर्त्या माणसाची तारांबळ उडते. रामेश्‍वरचेही तसेच झाले. कुटुंब एकत्र होते मात्र चुली वेगवेगळ्या झाल्या. एकोपा वर वर दिसत असला तरी आतून दरी निर्माण झाली. छोटी-मोठी भांडणेही उंबरठ्याच्या आत धगधगत राहिली...

रामेश्वर गोसावी तसा शांत स्वभावाचा. ऑफिस असो की घर, तो आपल्याच शांतकोषात राहायचा. घरी तसे एकत्र कुटुंब होते. चुली वेगळ्या होत्या; पण छत एकच होते. चुली वेगळ्या असल्या तरीही एकमेकांची भूक कळायची. आवडीनिवडीही कळायच्या आणि जोपासल्या जायच्या. घर म्हटले की कमी जास्त होणारच; पण आपण मोठे आहोत म्हणून रामेश्वर समजून घ्यायचा. या कुटंबाचा पिता (बाप माणूस) होता तोवर सगळेच ठीक होते. नंतर मात्र एकोपा वर वर दिसत असला तरी आतून दरी निर्माण झाली होती. कारण सगळ्याच भावांची कुटुंबं वाढत गेली. चुलत-चुलत अशी कुटुंबं त्या एकत्र परिवारात नांदायला लागली होती. तरीही कुटुंब पित्यानंतर त्या घराण्याची एक रीत म्हणून सगळ्यात वडीलधारा म्हणून रामेश्वरकडे अधिकार असायचे.

सगळे तिढे रामेश्‍वर सोडवायचा. नंतर मात्र ज्याचे त्याचे सवते सुभे झाले. रामेश्वर आपला आपली जबाबदारी म्हणून हे सगळेच बघायचा. रामेश्वरचे कुटुंब वाढले होते. तीन मुले आणि एक मुलगी होती त्याला. सुरुवातीला सगळीच मुले लहान असल्याने रामेश्वरच्या कमाईत खर्च भागायचा. वाटले तर भावंडांकडे मागावे लागत नव्हते. गरज ओळखून तेच हात पुढे करायचे. ते धृवीकरणही झालेच होते आणि रामेश्वरची मुलेही मोठी होऊ लागली तसतसा त्यांचा खर्चही वाढत चालला होता. शिक्षण आणि इतर गरजाही वाढ होत्या. तसे आता आपल्याला उत्पन्न वाढवायला हवे, याची जाणीव रामेश्वरला झाली. काही प्रमाणात बचत आणि वार्षिक किंवा पुढची गरज ओळखून आपल्या मासिक उत्पन्नातही त्याने वाढ करत आणली होती. अलीकडे त्यात तूट जाणवायला लागली होती. एक तर मुलांचे खर्च वाढले होते. मुलं कमावती व्हायची होती. त्यात रामेश्वरच्या कुटुंबात आणखी काही सदस्यांची भर पडली. त्याच्या बायकोची भाची आणि एक दूरच्या नातेवाईकाचा मुलगा रामेश्वरकडे शिकायला आले होते.

कुटुंबाच्या मागण्या होत्या. मोठा मुलगा चांगल्या गुणांनी बारावी पास झाला आणि मग त्याने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्याचा खर्च वाढला होता. शेतीत काही सुधारणा केल्या तर उत्पादन वाढणार होते. त्यासाठी मग रामेश्वरने आपल्या कामाचे तास वाढवले. काही आर्थिक निर्णय घेतले. कर्ज घेतले. भाडेकरूकडून येणारे भाडे त्याने वाढवले. भाडेकरू काय किंवा भावंडं काय, ते रामेश्वरला द्यायचा पैसा हा रोखीने द्यायचे. त्याला असे वाटले, की यात आपला तोटा आहे. हा पैसा काळ्या वाटेने जातो. बायको किंवा मुलांकडे हा रोखीचा पैसा गेला तर त्यातला काही भाग गायब होतो, म्हणून त्याने देणेकरूंना पैसे थेट बँक खात्यात भरायला सांगितले. गोसावी परिवाराकडे येणारा असा किराया, शेतीची बटई, मालविक्री, छोटे व्यवसाय किंवा इतर मार्गाने येणारा पैसा एकाच ठिकाणी गोळा होईल आणि मग तो ज्याचा त्याचा त्याला वितरित होईल, असाही निर्णय त्याने घेतला; मात्र सुरुवातीला खूपच क्रांतिकारी वाटणारे हे निर्णय फुसके निघाल्याचे त्याच्या लक्षात आले; मात्र

रामेश्वरसमोर बोलणार कोण?

खर्च वाढत होता. नवे निर्णय घेताना रामेश्वरने सगळ्यांना आता आपण संपन्न होणार, असे स्वप्न दाखवले होते. निर्णय फसले होते. रोखीचा पैसा काळ्या मार्गाने जातो, म्हणून बँक खात्यात टाका, पैशांच्या रूपात येणारी आवक वस्तूच्या रूपात करा, असे निर्णय घेतल्याचे दुष्परिणाम जाणवू लागले होते. बँकेत पैसे टाकताना टीडीएस व इतर कर कापून घेतले जाऊ लागले. रामेश्वरच्या अकाऊंटला उत्पन्न जास्त दिसू लागले. आयकर वाढला. वास्तविक ते उत्पन्न नव्हते. सगळी आवक एका ठिकाणी आणि मग त्याचे वाटप हे सूत्रही जमले नाही. एक तर रामेश्वर त्याच्याकडे आलेल्या परिवाराच्या मिळकतीतून आधी आपला खर्च भागवू लागला, मग भावंडांना जो पैसा द्यायचा तो देता येत नव्हता. तंटे सुरू झाले.

उत्पन्न वाढत नव्हते. आर्थिक योजना फसल्या होत्या. सदस्यांच्या मागण्या वाढल्या होत्या. आर्थिक चणचण जाणवू लागल्याने मुलं कधी नव्हे ती रामेश्वरवर आक्रमक झाली होती. लहान भाऊदेखील संतापले होते. एक दिवस रामेश्वरने शेजाऱ्याशी भांडण केले. चूक नेमकी कुणाची ते सांगता येत नव्हते. गाडी लावण्यावरून रामेश्वरनेच वाद उकरून काढला होता. वास्तवात ती गाडी तिथेच वर्षानुवर्षं लागत आली होती; मात्र रामेश्वर एकदम हमरीतुमरीवर आला. भांडण केले. अगदी मारामारीही झाली. रामेश्वर इतका आक्रमक कसा होऊ शकतो हेच कुणाला कळले नाही; मात्र सगळाच गोसावी परिवार त्या शेजाऱ्याविरुद्ध एकत्र आला.

हळूहळू हा भांडणाचा परीघ बाहेर विस्तारत गेला आणि परिवारातही खोलवर पाझरत गेला. त्यांच्या पारिवारिक विहिरीतून कुठल्या रहाटातून कुणी पाणी काढायचं यावर धाकट्याच्या बायकोने भांडण केले. सासऱ्यांच्या काळात त्याबाबत नियम ठरले होते, असे तिचे म्हणणे होते. एरवी रामेश्वर अशा तंट्यात सामंजस्याची भूमिका घ्यायचा अन् समजावूनही सांगायचा. दोन्ही बाजूंचा तोल सांभाळायचा; मात्र या वेळी त्याने लहान्याच्या बायकोला बळ दिले. ते तसे वरवर दिसू दिले नाही; मात्र तिला कळले की रामेश्वर भावजी आपल्या बाजूने आहेत. नव्हे; खरे तर हा तिढीचा मुद्दाच रामेश्वरने तिच्याही नकळत तिच्या मनात भरवला होता. रामेश्वरने हे भांडण मिटवले नाही, नेहमीप्रमाणे ते पेटत राहील यासाठी कुणालाही कळणार नाही अशा रीतीने इंधनच पुरवले.

मधला भाऊ धार्मिक होता. सकाळी पूजा, मंत्र असायचे. संध्याकाळीही भजन असायचेच. त्याच्या घंटा-टाळांचा आवाज येतो यावर रामेश्वरनेच नापसंती व्यक्त केली. मोठा मुलगा अभ्यास करत असतो अन् हा आवाज... बोलताही येत नाही... अशी तणाव वाढवणारी अगतिक भूमिका घेतली. दोन-चार दिवस चालले हे. मोठ्या मुलालाही पटले. तो उठला अन् मधल्या काकाच्या घरात जाऊन कल्ला करून आला. पूजा करायची तर आपल्या घरात करा, आम्हाला त्याचा त्रास नको म्हणाला. मधल्याला आश्चर्य वाटले. रामेश्वरने मात्र तो म्हणतो तेही खरेच आहे अन् पिताजी असताना काही नियम ठरले होते, यावर बोट ठेवले. मग मधलाही म्हणाला, ठीक आहे, मी माझी पूजा माझ्याच पद्धतीने करणार...

आता गोसाव्यांच्या वाड्यात भांडणे सुरू असतात. एकत्र नांदणारा गोसावी परिवार एकमेकांशी आणि मग एकत्र येऊन शेजाऱ्यांशी भांडत असतो. आता त्याचा मोठा मुलगा मोटरसायकलचे विसरला आहे. मधला काका मोठ्याने पूजा करतो. त्यामुळे माझे शैक्षणिक नुकसान झाले आहे, म्हणून तो रोज त्याच्याशी तंटत असतो. लहाना लॅपटॉप विसरला आहे. तो शेजारच्या घरावर दगड फेकून मारतो...

pethkar.shyamrao@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT