Rain Sakal
सप्तरंग

गावातून परागंदा झालेली पाखरे

पाऊस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो. असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जिवंत असावे लागते.

श्याम पेठकर

पाऊस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो. असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जिवंत असावे लागते.

पाऊस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो. असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जिवंत असावे लागते. गावाच्या जमिनीप्रमाणे गावाचे आभाळही केवळ जिवंतच असते असे नाही, तर ते जातिवंतही असते. म्हणूनच ऋतूंची वस्ती गावात येण्याआधी आभाळ गाईंच्या डोळ्यांत उतरून जाते. पाखरे मग चोचींवर ढग तोलण्याचा सराव करतात. क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू येण्याआधी गाव स्वत:त ऋतूंना हवे तसे बदल करून घेते.

ज्या शहरांना ऋतू नसतात, त्या शहरांना आभाळाकडे मोकळेपणाने बघता येत नाही. गर्दीतल्या कोपऱ्याकोपऱ्यात आभाळाचे तुकडे अस्तित्वाचा शोध घेत विसावलेले असतात. वेल फर्निश्ड फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा, गावातून शहरात आलेल्या एखाद्या हळव्या जीवाला गावातल्या स्वच्छंद ऋतूंची आठवण करून देतो. उत्तुंग इमारतींच्या टेरेसवरून दिलेले निरोप गावाकडे पोहोचवणे आताच्या ढगांनी केव्हाच बंद केले आहे. शहरांवरून फरपटत वाहताना ढगांमध्येही शहरी मोजकेपणा आलेला आहे. त्यामुळे ऋतूही शहरांना टाळून निघून जाणे पसंत करतात. आभाळाकडे बघण्यासाठी हिरव्या झाडांच्या पानांचे डोळे लागतात. फुलांच्या पापण्याआड हे डोळे दडलेले असतात. मुख्य म्हणजे जमिनीचा जामीन नाकारून आभाळाकडे बघता येत नाही. शहराचे तसेही जमिनीशी नाते तुटलेले असते. शहर सतत भूक शांत करण्यासाठी धडपडत असते आणि अशा अवस्थेत कुणाशी नाते जोडता येत नाही. नाते जोडण्यासाठी गरज संपवावी लागते आणि भूक तर सतत स्वत:शी बांधून ठेवते. म्हणून आजकाल ‘भूक भागवण्याचा कलेशी संबंध जोडणारे’ बंजाऱ्यांचे काफिले शहर टाळून गावाकडे वळतात. कलावंतिणीच्या पायातील चाळांच्या नादी लागून ऋतूही शहरांशी उभा दावा मांडतात.

खरे तर जमीन आणि आकाश जिथे एकत्र येतात, त्या क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू गावात येतात. ऋतूंच्या स्वागतासाठी गाव सज्ज असते. कधी गावाच्या वाटेवर गुलमोहर आपली फुले पसरवून ठेवतो, तर अमलताशचे सोनेरी झुपके ऋतूंची वाट बघतात. ऋतू येणार म्हटले की गावाकडच्या आभाळाला डोळे फुटतात. आभाळाला अशी ऋतुदेखणी नजर येण्यासाठी गावाची जेवढी जमीन असते, तितकेच गावाचे आभाळ असावे.

पाऊस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो. असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जिवंत असावे लागते. गावाच्या जमिनीप्रमाणे गावाचे आभाळही केवळ जिवंतच असते असे नाही, तर ते जातिवंतही असते. म्हणूनच ऋतूंची वस्ती गावात येण्याआधी आभाळ गाईंच्या डोळ्यांत उतरून जाते. पाखरे मग चोचींवर ढग तोलण्याचा सराव करतात. क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू येण्याआधी गाव स्वत:त ऋतूंना हवे तसे बदल करून घेते. पावसाळा येण्याआधी नाही का गाईंचे हंबरणेही ओलसर होते! झाडेही वाऱ्याला कवटाळण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी झाडे मात्र एक काळजी घेतात की पक्ष्यांच्या घरट्यांमधील अंडी पडून फुटणार नाहीत. अशा झाडांच्या सावलीत वाढणारी माणसंही मग तितकीच हळवी होतात. पक्ष्यांची घरटी असलेले झाड ते सहसा तोडत नाहीत. म्हणूनच ऋतू कुठलाही असो, गावाचा झरा मात्र आटत नाही.

शहरांचे मात्र वेगळे असते. शहरात जेवढी जमीन असेल तेवढे आभाळ नसते. सिमेंटच्या जंगलाने आभाळ गिळून टाकलेले असते. खरे तर ऋतूंचे येणे हे माणसाच्या जगण्याच्या शैलीवर अवलंबून असते. शहरांतील माणसांची जगण्याची शैली साहसी असू शकते; पण संयमी आणि शालीन असणे शक्य नसते. शहरात येताना गावाच्या शिवेवर घोड्याची नाल उलटी ठोकून येण्याची पद्धत आहे. पूर्वीचे योद्धे युद्धावर जाताना तसे करायचे. कारण युद्धावरून परत येणे शक्य होईलच हे त्यांना माहीत नसायचे.

एकदा गावात ऋतू आले, की उंबरा ओलांडून जाणे तसे कठीण होते. म्हणून भुकेचे संदर्भ डोक्यात घेऊन गाव सोडायचेच असेल, तर ते ऋतूंच्या संधीकाळात सोडावे, कारण शहरात येताना गावातील आपले अन्नपाणी तुटलेले नसते; पण ज्यांनी जन्माच्या वेळी आपली नाळ माजघरामागील न्हाणीत गाडलेली असते, त्यांनीच आपली रसद तोडलेली असते. अशी रसद तुटली, की पोटाच्या कातडी तंबूची शिवण शाबूत ठेवण्यासाठी शहरात यायचे असते. आपापल्या अस्तित्वाचे अस्वल घेऊन प्रत्येक माणूस शहरात येतो.

एकदा असे झाले की थकून कुठे तरी विसाव्यासाठी जायचे असते. शहरात भूक भागतेच असे नाही; पण प्रत्येक शहर कुठल्याही भुकेल्या आत्मारामाला आश्वासनाच्या आरशात भाकरीचा चंद्र दाखवण्यात वाकबगार असते. विशेष म्हणजे मानवी पाखरांसाठी शहरात सिमेंटची उंचच उंच खुराडी बांधलेली असतात. गावाच्या वेशीवर घोड्याची नाल उलटी टांगून आलेले हे पाखरांचे थवे डोळ्यांवर थकव्याची नीज आणून रात्रभर खुराड्यात मरून जातात आणि पहाटे जिवंत होतात.

पहाट म्हणजे यांत्रिक घड्याळाचा गजर. जागही येते ती त्याच आवाजाचीच. इथे अस्तावर सूर्य उगवत नाही. कारण या शहरात ऋतू नसतात. पानांचे डोळे आणि फुलांच्या पापण्या नसतात आणि क्षितिजही नसते. शहरी खुराड्यांच्या खिडकीतून जेवढे आकाश दिसते, त्याला आभाळाचे कुठलेच संदर्भ नसतात. बुढीचे खाटले, शुक्राची चांदणी, पावसापूर्वी गारवा आलेला ढग, अस्ताच्या सूर्याच्या डोळ्यांमधील मस्तीची नशा, संध्याकाळच्या सावल्या, अंगावरील शेवंतीचा सुगंध असे काहीच नसते. खुराड्यातल्या या आभाळाला उगवती आणि मावळतीचे रंगही नसतात. शहराच्या या आभाळात मानवी पाखरांच्या भुकेचे ढग दाटलेले असतात. शहरात आलेली ही पाखरे, मग काही दिवसांनी आभाळाकडे बघू शकणारे ऋतुपूर्ण डोळेही गमावून बसतात. या पाखरांना ऋतुवेगळे शहर जे दाखवील तेच दिसते, खुराड्यातून दिसणाऱ्या आभाळात एखादवेळेस दुरून जाणारे विमान, एखाद्या इंडस्ट्रीचा शेवाळलेला धूर आणि आपल्या डोळ्यांतून बाहेर पडलेल्या स्वप्नांचा पूर याशिवाय काहीच दिसत नाही.

या शहराला त्याचे पाळण्यातले नाव नसते आणि ज्या शहराला पाळण्यातले नाव नसते, तिथे ऋतू येत नाहीत. ऋतूंना तिथे जाताच येत नाही. मग हे विनाऋतूंचे शहर ऋतूवेगळे होते. या ऋतूवेगळ्या शहरात उन्हाळा येत नाही, पण ऊन येते. हिवाळा येत नाही, पण थंडी येते. पावसाळा येत नाही, पाऊस मात्र येतो. हा पाऊस आभाळातून आला, की कुणाच्या डोळ्यांतून कोसळला हे कळत नाही. ते माहीत करून घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. कुणाकडे तेवढा वेळही नसतो. आषाढाने मोडलेल्या मौनाचीही त्याला जाणीव नसते आणि सगळ्यात भीषण म्हणजे या पावसाला हिरवेपणाची ओढ नसते. थंडी गुलाबी मस्तीची साय पांघरून येत नाही. असे विनाजाणिवांचे मोसम शहरात येऊन जातात. ऋतू येत नाहीत; तरीही गावातून परागंदा झालेली पाखरे मात्र शहरातल्या या बेभरवशाच्या, निस्तेज मोसमांनाच ऋतू समजतात. गावाने रसद तोडली असल्याने शहरातल्या फसव्या मोसमांना आपलेसे करणे, असे अनिवार्य होऊन जाते. ऋतूवेगळे शहर मग पाखरांचे प्राक्तन होते.

pethkar.shyamrao@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT