siachen vast glaciers sakal
सप्तरंग

सियाचीनचं गारुड

भारतीय नकाशामध्ये उत्तर टोकाला एक अशी जागा आहे, ज्याचं भौगोलिक व सामरिक महत्त्व खूप मोठं आहे.

उमेश झिरपे

भारतीय नकाशामध्ये उत्तर टोकाला एक अशी जागा आहे, ज्याचं भौगोलिक व सामरिक महत्त्व खूप मोठं आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, त्यात अतिउंचीचा प्रदेश. नेहमीचं हवामान उणे अंश सेल्सिअसमध्येच. जोराचा वाहणारा वारा, त्यात सतत होणारी हिमवृष्टी हे सगळं नित्याचंच.

हे सर्व काही घडतंय अठरा हजार फुटांहून अधिक उंचीवर ! म्हणजेच किमान साडेपाच ते सहा हजार मीटर उंची. म्हणजे हिमालयातील कित्येक गिरिशिखरांपेक्षाही उंच ठिकाणी, काही हजारांमध्ये भारतीय सैनिक तिथं निर्भयपणे उभे आहेत, देशाच्या रक्षणाकरिता. सियाचीन हे काही एखादं हिमशिखर नाही, ही आहे एक विस्तीर्ण हिमनदी.

पण इथं असणारी भौगोलिक आव्हानं ही हिमशिखरांपेक्षाही मोठी आहेत. त्यामुळे हिमालयातील पर्वत जाणून घेताना सियाचीनदेखील समजून घ्यायलाच हवा.

सियाचीनविषयी सर्वच भारतीयांच्या मनात कुतूहल व अभिमान असं दोन्ही आहे. आम्ही गिर्यारोहण करताना सहा हजार मीटर उंचीवर अनेकदा गेलो आहोत, त्यामुळं इथला ‘बॉलगेम’ काय असतो, याचा पुरता अंदाज आहे. जसजसं आपण हाय अल्टिट्युडला जातो, तसतसं हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण विरळ होतं. म्हणजेच एखाद्या धडधाकट माणसाला देखील सहा हजार मीटर उंचीवर गेल्यावर धाप लागणं अत्यंत साहजिक आहे.

एवढ्या उंचीवर सहज वावरायचं असेल, तर शारीरिक तयारी कसूनच करावी लागते. त्यात सर्वदूर पसरलेला पांढरा हिम, सूर्यप्रकाशाचा अभाव यांमुळं मानसिकतेचा कस लागतो. हे आम्ही जर वर्षातील काही दिवस अनुभवत असतो. यांसाठी तयारी मात्र वर्षभर चालू असते. इथं सियाचीनमध्ये भारतीय सैनिक सहा-सहा महिने अशा वातावरणामध्ये काढतात, तेही डोळ्यात तेल घालून, त्यामुळे या सैनिकांविषयी असलेलं कौतुक व अभिमान हा शब्दातीत आहे.

सियाचीन ग्लेशियर अर्थात हिमनदी ही हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेचा भाग आहे. या पर्वत शृंखलेच्या पूर्वेकडील भागांमध्ये सियाचीन वसलेलं आहे. इथली सरासरी उंची ही वीस हजार फूट इतकी भव्य आहे. तब्बल ७६ किलोमीटर लांब असलेली ही हिमनदी अध्रुवीय प्रदेशातील सर्वांत लांब हिमनदी म्हणून ओळखली जाते. या हिमनदीचं नाव सियाचीन किंवा सियाचेन पडण्यामागं स्थानिक जैवसृष्टीचा संबंध आहे. सियाचीन हिमनदी ज्या ठिकाणी नुब्रा नदीचं रूप धारण करते, त्या उगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रानटी गुलाब आढळून येतात. या रानटी गुलाबांना स्थानिक बाल्टी भाषेत सिया असं म्हणतात आणि सियांचा प्रदेश (प्रदेश अर्थात चेन किंवा चीन) म्हणून याचं नाव होतं सियाचीन.

सियाचीन हिमनदीचा थेट संबंध हा जगातील सर्वांत मोठी सिंचन व्यवस्था ज्या नदीवर उभी आहे त्या सिंधू नदीशी आहे. सियाचीन ग्लेशियरचं वितळलेलं पाणी जातं ते थेट नुब्रा नदीमध्ये. लडाखमधून वाहणारी ही नदी पुढं श्योक नदीला मिळते जी पुढं जाऊन सिंधू नदीत विलीन होते.

थोडक्यात सियाचीन हिमनदीवर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली सिंधू नदी अवलंबून आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सियाचीनचा मूळ रहिवासी आहे, येथील स्नो लेपर्ड अर्थात हिमचित्ता. बर्फाळ भागात, कड्याकपारींतून वावरणारा हा लेपर्ड हजारो वर्षांपासून सियाचीन प्रदेशात असावा, असा तज्ज्ञांचा कयास आहे.

या चित्त्याच्या अधिवास, आणि ज्यानं हळूहळू आपला जम बसवला ते करड्या रंगाचं अस्वल अन् तुरळक प्रमाणात दिसणारे ऍबेक्स किंवा जंगली शेळी/ मेंढी. हिमालय अन् बर्फाळ प्रदेश यांचा अधिवास. मात्र, मानवी अतिक्रमणामुळं या सर्वांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. ही परिस्थिती संपूर्ण हिमालयात आहे, त्याला अर्थातच सियाचीन अपवाद नाही. भारतीय सैन्य दलाकडून मात्र निसर्गाला हानी न पोहोचता, या मूळ अधिवास असणाऱ्यांना त्रास न देता अतिशय शाश्वत पद्धतीनं वावर करण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे.

सियाचीन ग्लेशियरचे कुतूहल १९ व्या शतकापासून आहे. १८२१ मधल्या नुब्रा प्रदेशातील डब्लू मूरक्रॉफ्ट यांच्या पहिल्या मोहिमेपासून ते १८४८ मध्ये हेनरी स्टार्ची प्रत्यक्ष शोध मोहिमेपर्यंत या प्रदेशाचं अनेकांना आकर्षण राहिलं आहे. हेनरी यांनी पहिल्यांदा १८४८ मध्ये सियाचीन हिमनदीच्या दिशेनं तीन किलोमीटर चढाई करत सियाचर घईंरी (घईंरी म्हणजे स्थानिक बाल्टीभाषेत हिमनदी) बद्दल विविध माहिती जगासमोर आणली.

वीस हजार फुटांवर वसलेल्या हिमनदीवर पहिली यशस्वी चढाई झाली ती १९११-१२ मध्ये, जेव्हा अमेरिकी गिर्यारोहक जोडी फॅनी बुलॉक वर्कमन व विलियम हंटर वर्कमन यांनी हिमनदीच्या पश्चिम दिशेनं चढाई केली. आज सियाचीन गिर्यारोहकांसाठी खुलं नाही. इथं अथवा याच्या आसपास असणाऱ्या कोणत्याही शिखरावर चढाई करायची असेल, तर सैन्यदलाची परवानगी लागते. अशी परवानगी सगळ्यांनाच मिळेल असे नाही.

बरं मिळाली तर त्यात कधीही बदल होऊ शकतो. ऐनवेळी तुमचा परवाना रद्द होऊ शकतो. ऐकताना थोडं त्रासिक वाटत असलं, तरी सियाचीनचे सामरिक महत्त्व, बदलणारी राजकीय परिस्थिती आणि इतर अनेक कारणांमुळं सैन्य दलाला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं एक गिर्यारोहक म्हणून माझी या बद्दल काहीएक तक्रार नाही. सियाचीन व गिर्यारोहकांचं एक वेगळ्या प्रकारे घनिष्ठ नाते आहे.

१९८० च्या दशकामध्ये जेव्हा पाकिस्ताननं सियाचीनवर आपला कायमचा ताबा मिळविण्यासाठी हालचाल सुरू केली, तेव्हा भारतानं मोठी पावलं उचलली. यात कर्नल नरेंद्र कुमारांची कामगिरी फार महत्त्वाची आहे. त्यांनी १९७८ व १९८१ मध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीला घेऊन सियाचीन ग्लेशियरवर दोन मोहिमा केल्या. त्यांच्या तुकडीतील सैनिकांनी २५ हजार ४०० फुट व २४ हजार ३०० फुट इतक्या उंचीवर चढाई करून महत्त्वाच्या नोंदी घेतल्या.

या माहितीच्या आधारावरच पुढं जाऊन भारतीय सैन्य दलाला सियाचीन ग्लेशियरवर तळ उभारता आला. या तळाला नाव देखील नरेंद्र कुमार यांचंच दिलं गेलं आहे. हा तळ ‘कुमार बेस’ म्हणून ओळखला जातो. सियाचीन ग्लेशियरचं भौगोलिक स्थान, तिथं असलेली हाडं गोठवणारी थंडी, उणे ३० अंश पेक्षाही कमी तापमान अशा वातावरणात अत्यंत कठीण अशी चढाई करून सैनिकी मोहीम आखणं म्हणजे अशक्यप्राय कामगिरीच.

कर्नल कुमारांनी व त्यांच्या संघानं सगळी आव्हानं पेलली कारण त्यांना सैन्यदलाच्या कठोर प्रशिक्षणासोबत अनुभव होता तो गिर्यारोहण मोहिमांचा. कर्नल नरेंद्र कुमार हे भारतातील अग्रणीचे गिर्यारोहक. जगातील तिसरं उंच शिखर असलेल्या माउंट कांचनजुंगावर ज्या भारतीय संघानं पहिल्यांदा यशस्वी चढाई केली त्या संघाचे प्रमुख म्हणजे नरेंद्र कुमार. या कुमारांचं व सियाचीनचे घनिष्ठ नातं आहे, हे नातं त्यांच्या एकट्याचं नसून आम्हा सर्व गिर्यारोहण कम्युनिटीचं आहे, असंच आम्ही समजतो.

सियाचीनच्या शौर्य गाथा, तेथील खडतर जीवनमान आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, पाहतो. मात्र, सियाचीन नैसर्गिकदृष्ट्या देखील खूप सुंदर व मनमोहक आहे. कमी प्रमाणात का होईना, हळूहळू गिर्यारोहकांना, थोड्या प्रमाणात ट्रेकर्स व पर्यटकांना सियाचीनचं गारुड नक्कीच अनुभवायला मिळेल, असा मला विश्वास आहे.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक’ महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT