मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-अपेक्षा, त्यानं रंगवलेली स्वप्नं प्रत्यक्षात धुळीस मिळताना पाहायला मिळणं, त्यातून होणारी ससेहोलपट, अशा अवस्थेतही फिनिक्स पक्ष्याप्रमाणं पुन्हा राखेतून उठून भरारी मारण्याचा प्रयत्न करणं, या आयुष्याच्या रिंगणाभोवती ‘रिंगण’ कादंबरी फिरत राहते.
ज्येष्ठ साहित्यिक मधुकर काकडे यांनी अत्यंत प्रभावशाली पद्धतीनं मानवी भावभावनांचा कल्लोळ यात मांडला आहे. प्रत्येकाच्या मनातील नैराश्याचा आणि नकारात्मकतेचा निचरा व्हावा, ही लेखकाची भूमिका असल्याचं यातून दिसून येतं. चिंतनशीलता हा कादंबरीचा गाभा आहे.
ही कादंबरी वाचत असताना वाचक अस्वस्थ होतो, त्याच्या मनात कादंबरीतील पात्रं घर करून राहतात आणि सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतात, असा भास होऊ लागतो. प्रभावी व्यक्तिचित्रण, चिंतनशीलता आणि प्रवाही लेखन ही या कादंबरीची वैशिष्ट्यं आहेत.
ही कादंबरी विक्रमभोवती फिरत राहते. त्याच्या निवेदनामधून ती उलगडत जाते. वयाच्या विविध टप्प्यांवर असताना तो जीवनाविषयीचे चिंतन करत राहतो. त्यातूनच नवीन आयाम शोधण्याचे प्रयत्न करत असतो. आई-वडील, भाऊ-बहीण यांच्याविषयी त्याच्या मनात असणाऱ्या भावनांचं प्रतिबिंब यातून उमटत जातं.
राग, लोभ, मत्सर, हेवा, प्रेम या सगळ्या जाणिवांचा मोठा पट मांडला जातो. वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असताना, सगळं कसं मजेत चाललं असतं. मात्र, त्यांची फसवणूक झाल्यावर सगळं कुटुंब रस्त्यावर येतं आणि तेथून या कुटुंबाची ससेहोलपट कशी झाली, याचं चित्रण विक्रमच्या स्वगतातून पुढं येत राहते. थोरला भाऊ शरदचा कुटुंबासाठीचा त्याग दिसतो. त्याचप्रमाणे अर्चना, मृणाल, मृदुला या बहिणींविषयी विक्रमचं हळवेपण जाणवतं. त्याचबरोबर त्यांच्याविषयी त्याला अधूनमधून रागही येत असतो. अवी हा शरदचा आणि विक्रमचाही मित्र असल्याने त्यांच्यातील फुललेली मैत्रीही दिसते.
वयाच्या साठाव्या वर्षी विक्रमचा पुन्हा गोंधळ उडतो. सगळ्या जगाचं व्यवस्थित चाललं आहे आणि आपल्यालाच धडपणानं जगता येत नाही, ही भावना त्याच्या मनात घर करून राहते आणि त्यातूनच त्याची अस्वस्थता वाढत जाते. त्याचा आत्मविश्वास आणि मनःस्थिती पुन्हा एकदा गटांगळ्या खाऊ लागते. अनेक घटनांमुळे त्याच्या मनाला हादरे बसू लागतात. ज्या झपाट्यानं जग बदलतंय, तो वेग त्याला झेपत नाही.
मात्र, अशा परिस्थितीतही अनेक जण सुखी आणि समाधानानं जगत असल्याचं पाहून तो पुन्हा अस्वस्थ होतो. तो त्यांच्यावर जळू लागतो. त्यांच्याविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण होऊ लागतो. यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी तो मोठ्या भावाचा आधार शोधतो, त्याचं मार्गदर्शन घेतो. सुदैवानं त्याला मार्ग सापडतो. मात्र, आता आपली जगण्याची भूमिका काय असावी, हा नवाच पेचप्रसंग त्याच्यासमोर उभा राहतो.
ही कादंबरी वाचताना व. पु. काळे यांच्या जीवनाचा अर्थ उलगडून दाखवणाऱ्या वाक्यांची अनेकदा आठवण येते. काकडे यांनीही अशा चपखल वाक्यांचा वापर भरपूर केला आहे. ‘जगण्यातील व्यावसायिकता जमायला हवी.’, ‘तुम्हाला हवी असलेली गोष्ट हातात घेऊन, लोक तुमच्यामागे धावतील हा भ्रम आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करायला हवी. स्वतःची शक्ती आणि युक्ती वापरायला हवी.’,
‘भित्र्या लोकांसाठी पाप-पुण्याचा बागुलबुवा उभा करून, प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल लोक छान मस्त जगत असतात.’ ही त्यापैकी काही वाक्य आहेत. कादंबरीचा शेवटही विलक्षण आहे. त्यामुळं बराच काळ ती वाचकांच्या मनात रेंगाळत राहते. हा शेवट काय आहे, हे समजून घेण्यासाठी मूळ पुस्तक वाचणं आवश्यक आहे.
पुस्तकाचं नाव : रिंगण
लेखक : मधुकर काकडे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे
(दूरध्वनी : ०२०- २४४९५३१४)
पृष्ठं : ३७६
मूल्य : ५२० रुपये
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.