हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला.
याआधीही निर्भया सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अशा अनेक केस वर्तमानपत्रांत आपण वारंवार वाचतो. अशा वाढत्या घटनांच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण, कॅंडल मोर्चा, मॉब लिंचिंगची मागणी, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकर निकालाची मागणी, अशा मार्गाने समाज आपल्या भावना व्यक्त करतो. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे, कायदेशीर यंत्रणा जलदगतीने कार्यान्वित करण्यात यावी, याबाबत आवाज उठवला जातो; परंतु या सर्व घटना घडल्यानंतर करण्याच्या उपाययोजना आहेत. तत्पूर्वी, बलात्कारासारख्या घटना घडतातच का, याचा अभ्यास करून या प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. कायद्याच्या व्यवस्थेपलीकडे जाऊन सामाजिक संस्कारात काही बदल करता येतात का, हा विचार करणेही गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या काही नैसर्गिक गरजा असतात; परंतु यम-नियम झुगारून त्या गरजा पूर्ण करण्याचा अट्टाहास आणि हव्यास धरला तर अशा विकृत घटना घडतात. सेक्सबद्दल उघड बोलणे ज्या संस्कृतीमध्ये पाप समजले जायचे, त्याच आधुनिक जगामध्ये उघडपणे पॉर्न फिल्ममधून खुलेआम प्रदर्शन केले जाते. वयात येणाऱ्या कोवळ्या मुलामुलींची नैसर्गिक उत्सुकता, त्यांना शारीरिक जबाबदाऱ्यांची जाणीव करून न देता संवेदनक्षम माध्यमातून लैंगिक सुख कसे ओरबडून घ्यायचे एवढेच दाखवले जाते. या असल्या गोष्टी वाचून, बघून, ऐकून असले एक्सपिरिमेन्ट करण्याची खुमखुमी त्यांच्यात येते. या गोष्टी सहज साध्य झाल्या नाहीत तर मग जबरदस्ती करून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
आजकाल केवळ तरुणवर्ग नाही तर कोणत्याही वयातील व्यक्ती अश्लील फोटो, व्हिडीओ एकमेकांना पाठवून क्षणिक सुखाचा आनंद घेताना दिसतात. ‘अरे, मित्रांमध्ये हे चालायचचं’, असे म्हणून मजा घेणारे असे अनेक व्हॉट्सॲप ग्रुप मोबाईलमध्ये असतात. त्यात काहीच गैर नाही असे प्रौढ व्यक्तींना वाटते. परंतु, कधीतरी मुलांच्या हातात हे मोबाईल येतात आणि नको ती दृश्यं, अश्लील फोटो मुलांच्याही दृष्टीस पडतात. पुनःपुन्हा त्या फोटोज, व्हिडीओचा आस्वाद घेण्याची सवय लागल्यामुळे काहीजण मित्रांकडून फॉरवर्ड झालेल्या या गोष्टी डिलिट करीत नाहीत. खरेतर हीसुद्धा एक विकृतीच आहे. या गोष्टीमुळे मानसिक दुर्बलता येते आणि आपल्या भावनांचे समायोजन योग्य पद्धतीने काही व्यक्तींना करता येत नाही. महिला कमजोर असतात, त्यांना स्वतःचे संरक्षण करणे अवघड असते, अशी एक मानसिकता स्त्रियांच्या मनामध्ये असते. तसेच आपल्या शक्तीचा प्रयोग पुरुषांनी स्त्रियांवर करायचा असतो, ती एक उपभोग्य वस्तू आहे, अशी मानसिकता अजूनही काही पुरुषांची आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे अनैतिक वर्तन पुरुषांकडून घडते. या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे.
शारीरिक आणि मानसिक बलात्कार रोखण्यासाठी स्त्रियांनी स्वतः सक्षम होणे, सर्वात महत्त्वाचे आहे. पूर्वीच्याकाळी असे अत्याचार सहन करूनही त्याबाबत बोलण्याची स्त्रीची मानसिक क्षमता नव्हती; परंतु स्त्री ही अबला नाही ती सबला आहे हे तिनेच दाखवून देणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेली स्त्री स्वतःच्या आयुष्यात काहीच अर्थ राहिला नाही, असे म्हणून आत्महत्येकडे वळते
किंवा अपराधी आयुष्य जगत राहते. न केलेल्या अपराधात ती जगते. समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाचे टोमणे, टोचून बोललेले शब्द खात ती आयुष्य नव्हे तर मरण जगत राहते. समाजासाठी जणू तिच्या कपाळावर ‘अव्हेलेबल’ हा शिक्काच मारला जातो. अत्याचार करणारा आपला पुरुषार्थ गाजवून मोकळा फिरतो. याबाबतच समाजाने आणि स्वतः त्या स्त्रीने आपली मानसिकता बदलणे गरजेचे असते. बलात्कारासारखे, विनयभंगासारखे कृत्य का घडते, यामागची मानसिकता काय असेल याबाबत विचार केला तर लक्षात येईल, की जी गोष्ट मला हवी आहे, जी गोष्ट माझ्याकडे नाही ती मला मिळालीच पाहिजे, या हव्यासापोटी केलेले नियमबाह्य/अनैतिक वर्तन. हे वर्तन करून मला हवे असलेले सुख, समाधान मला मिळणार आहे का? त्यातून मिळणारे सुख किती काळ टिकणार? त्याचे काय परिणाम होणार? इत्यादी तार्किक बाबींचा कोणताही विचार न करता स्वकेंद्रित होऊन मला ही गोष्ट आज, आत्ता ताबडतोब हवी हा विचार अधिक प्रभावी पाडतो आणि ते कृत्य घडते. यासाठीच आपल्याला सर्व गोष्टी मिळणार नाहीत, जे कमी आहे ते स्वीकारण्याची आणि ती कमतरता पचवण्याची क्षमता वाढीस लावणे आणि परिणामांचा विचार करून वर्तन करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीने वाढवणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या मानसिक विकृती कमी करण्यासाठी समुपदेशनातून मानसोपचार हे अत्यंत प्रभावी साधन आहे. फ्लर्टिंग, विनयभंग, फसवणूक, बलात्कार इत्यादीसारखी कृत्ये घडूच नयेत म्हणून पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलांना वेळ देऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. आपल्या घरातील नियम मुलगा आणि मुलगी यांना सारखेच असावेत. अंगातले कपडे बदलावेत त्याप्रमाणे आजची तरुण पिढी जोडीदार बदलताना दिसते. आज याच्या सोबत पॅचअप झाले आणि उद्या तिच्यासोबत ब्रेकअप झाले हे खेळ सतत चालूच राहतात. आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळाली नाही, की मग अनैतिक कृत्येही घडतात. एकाच व्यक्तीबरोबरच्या नात्यात जन्मभराचे सुख गवसू शकते याबाबतची जाणीव आणि विश्वास त्यांना देणे गरजेचे आहे. चांगल्या संस्काराची रुजवात घालणे आणि आपल्याकडील कमतरतांकडे लक्ष न देता आपणाकडे असणाऱ्या गोष्टींबाबत स्वाभिमान बाळगणे हे महत्त्वाचे आहे. यालाच ‘मिसिंग टाइल्स’ फिलॉसॉफी असेही मानसशास्त्रात म्हटले जाते. थोडक्यात, विकृत मनोवृत्ती बदलण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. केवळ कायद्यामध्ये बदल करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. सामाजिक बदल हा आपोआप घडून येत नाही, त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून करायला हवी. आज ही घटना हैदराबादमध्ये एका स्त्रीच्या आयुष्यात घडली. उद्या आपल्या कुटुंबातीलही कोणी व्यक्ती असू शकेल. म्हणूनच हे सामाजिक भान ठेवून आपल्या मुलामुलींना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी आपण घेऊ या.
स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.