१९७३ साली हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्पाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या भागातील समस्या कुठल्या कुठल्या असू शकतात या बाबत फारशी कल्पना नव्हती. आरोग्य सुविधा या भागात उपलब्ध नव्हती म्हणून प्रकल्पाची सुरवात रुग्णालय सुरु करण्यापासून झाली. डॉक्टर झालेले एक दाम्पत्य प्रकाश व मंदाकिनी आमटे या भागात स्वेच्छेने काम करण्यास आले होते म्हणून प्रकल्पाची सुरुवात ही मोफत आरोग्य सेवा पुरविण्यापासून झाली. काम सुरु झाल्यानंतर येथील विविध समस्या समोर दिसू लागल्या. या भागात महिलांची प्रसूती पूर्वी घरीच होत असे. त्यावेळी या भागात बाल कुपोषण मोठ्या प्रमाणात होते. माता कुपोषण पण होते. अनेक वेळा गावातच प्रसूती होत असतांना अति रक्तस्त्राव झाल्याने मातेचा मृत्यू ओढवत असे. ते बाळ पोरके होत असे. आई विना पोरके झालेले नवजात बाळ सांभाळणे सतत कामात आणि हातावरचे पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी खूप कठीण काम होते.
नवजात बाळांना दुधाची आवश्यकता असते. आदिवासी बांधव गाई म्हशींचे दूध काढत नाहीत. नवजात बाळांना निर्जंतुक केलेल्या बाटलीने दूध देऊन त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. त्या काळी गावागावात संवाद साधताना कार्यकर्त्यांच्या हे लक्षात येत होते की अनेक गावात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्यावर बरीच बालके सुद्धा दगावली होती. लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांना हे ऐकताना फारच दुःख होत होते. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ठरवले की आपण प्रकल्पात अशा आई विना पोरक्या झालेल्या बालकांचा ते बालक नीट अन्न ग्रहण करू लागेपर्यंत सांभाळ करायचा आणि नंतर ते बाळ वडिलांच्या स्वाधीन करायचे.
लोक बिरादरी प्रकल्पामार्फत सुरु असलेल्या आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा, अनाथ वन्यप्राण्यांची सेवा, शेती विकास प्रशिक्षण, विविध प्रकारचे बियाणे वाटप प्रकल्प, गावातील तंटा मुक्ती साठी लोक अदालत, हातपंप दुरुस्ती, मीठ वाटप कार्यक्रम अशा प्रकारच्या विविध कार्याबरोबरच नवजात बालकांचे गोकुळ हे नवीन काम प्रकल्पात सुरू करण्यात आले. आईविना पोरकी झालेली बरीच बालके प्रकल्पात एक-एक वर्ष राहिली आणि सशक्त झाल्यानंतर त्यांचे वडील त्यांना परत घरी घेऊन गेलेत. त्यातील काही बाळांना वडिलांनी नेले नाही. त्यांनी दुसरे लग्न करून नवीन संसार थाटला. प्रकल्पातील काही कार्यकर्त्यांनी अशा बालकांना दत्तक घेतले. दत्तक घेतलेल्या सर्व बालकांची कार्यकर्त्यांनी पोटच्या मुलापेक्षा जास्त काळजी घेतली. प्रकल्पाचे काम जसजसे वाढत गेले तसतसे आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाबद्दल जागरूकता यायला सुरवात झाली. प्रकल्पातील दवाखान्याचे काम जसे वाढत गेले तसे पुढे अनेक गावातील गर्भवती महिला तपासणी साठी दवाखान्यात नियमित येऊ लागल्या. माता मृत्यू कमी झालेत. म्हणून कालांतराने १९८० च्या दशकाच्या शेवटी गोकुळ प्रकल्प बंद करण्यात आला.
विजय शरद लेकामी हा या भागातील माडिया समाजातील पहिला व्हेटर्नरी डॉक्टर (पशूंचा डॉक्टर BvSC आणि MvSC). विजयचा जन्म कोठी गावात ४ ऑक्टोबर १९८३ ला झाला. विजयची आई दुर्दैवाने त्याला जन्म देताच देवाघरी गेली. त्याच्या वडिलांनी त्याला प्रकल्पातील गोकुळात आणून कार्यकर्त्यांकडे सोपवले. पुढे त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांनी परत विजयला नेले नाही. लोक बिरादरी प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या शरदभाऊ आणि सिंधूबाई दास या दांपत्याने त्याला दत्तक घेतले.
१९७० च्या दशकात शरदभाऊ आणि त्यांची पत्नी सिंधूबाई हे दोघे कुष्ठरोग झाला म्हणून आनंदवनमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यावर आनंदवन मध्ये सफल उपचार झालेत. त्यानंतर लोक बिरादरी प्रकल्पाच्या सुरवाती पासून बाबा आमटे यांनी त्यांना हेमलकसा येथे काम करण्यास पाठविले होते. शरदभाऊ यांना लोक बिरादरी दवाखान्यात नर्सिंग चे प्रशिक्षण दिले गेले. नंतर त्यांना लोक बिरादरी प्रकल्पापासून ३० किलोमीटर लांब असलेल्या कोठी गावात छोटे आरोग्य केंद्र उभारून दिले. जवळपास २५ वर्ष शरदभाऊने त्या भागात हजारो आदिवासी बांधवांवर उपचार केलेत. सर्दी-खोकला -मलेरिया -जखमा अशा विविध रोगांवर तिथे औषधोपचार केले जायचे. कालांतराने त्या भागात शासनाचे आरोग्य केंद्र सुरू झाल्याने आणि शरदभाऊ व सिंधूबाई यांचे वय वाढत असल्याने ते सेंटर बंद केले. पुढील आयुष्य ते लोक बिरादरी प्रकल्पात राहिले.
कोठी येथील आश्रम शाळेत विजयने पहिली पास केली. नीट शैक्षणिक सुविधा नसल्याने शरदभाऊने त्याला लोक बिरादरी आश्रमशाळेत आणून टाकले. लोक बिरादरी प्रकल्प येथे कार्यरत असणारे जेष्ठ कार्यकर्ते रेणुका (आत्या) आणि विलास (आतोबा) मनोहर यांच्या घरी विजय वास्तव्यास होता. शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करणाऱ्या रेणुका आत्याच्या सहवासात त्याला शिक्षणाची गोडी लागली आणि त्याचा शैक्षणिक पाया पक्का झाल्याचे विजय नेहमी सांगतो. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक असलेले गोपाळ (नाना) फडणीस आणि इतर सर्व शिक्षकांचा त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे. विजय ने १० वी पर्यंतचे शिक्षण लोक बिरादरी आश्रमशाळेत पूर्ण केले. १९९९ ला दहावीमध्ये तो शाळेत पहिला आला होता.
पुढे आनंदवन मध्ये ११ वी आणि १२ वी आनंद निकेतन महाविद्यालयमध्ये केले. पण काही कारणास्तव १२ वी मध्ये त्याने ड्रॉप घेतला. मग त्याने १२ वी अहेरी तालुक्यातील पेरिमीली येथील कॉलेज मधून पास केली. २०१३ साली १२ वी मध्ये तो अहेरी तालुक्यात पहिला आला. लोक बिरादरी प्रकल्पातील वन्यप्राणी अनाथालयात होणारे कार्य बघून त्याला पशूंचा डॉक्टर होण्याची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे प्रयत्न केले आणि त्याला नागपूरच्या शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. २००९ मध्ये तो व्हेटर्नरी डॉक्टर झाला. त्याने तिथेच २०१२ साली पोस्ट ग्रॅज्युएशन पण पूर्ण केले. कालांतराने त्याला लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून बल्लारपूर येथे शासकीय नोकरी मिळाली. दरम्यान व्हेटर्नरी कॉलेज मध्येच ओळख झालेल्या गडचिरोली येथील डॉ. शीतल तराम या व्हेटर्नरी डॉक्टरशी त्याचे लग्न झाले. आज तो व त्याची पत्नी दोघेही गडचिरोली येथे शासकीय नोकरीत आहेत. त्यांचा संसार सुखाचा सुरु आहे. त्यांना प्रत्युष नावाचा एक ६ वर्षांचा मुलगा आहे.
ज्या आई बाबांनी पोटतिडकीने त्याला सांभाळले, पाठबळ दिले, मोठे केले आणि शिकवले त्यांना आता तो या उतार वयात सुखी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. दुर्दैवाने शरदभाऊ यांचे दोन वर्षांपूर्वी तंबाखू सेवनामुळे झालेल्या तोंडाच्या कॅन्सरने निधन झाले. त्यांच्या वर ३-४ वेळा मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. विजयने सर्वात चांगली ट्रीटमेंट त्यांना मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. विविध मोठ्या दवाखान्यात औषधोपचार केलेत. पण नशिबाने जास्त साथ दिली नाही.
सामाजिक बांधिलकी म्हणून कोठी गावातील आणि शिक्षणासाठी गडचिरोली येथे असणाऱ्या एका पितृछत्र हरविलेल्या मुलाचा शैक्षणिक खर्च तो करतोय. पुढे जाऊन तो अनेकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करेल आणि सहकार्य करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.