Soviet Union One of Switzerland of Central Asia Kyrgyzstan bike-ride or off roading travel  sakal
सप्तरंग

मध्य आशियाचं ‘स्वित्झर्लंड’!

एक देश म्हणजे ‘मध्य आशियाचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखला जाणारा किर्गीजस्तान. बाईक-राईड किंवा ऑफ रोडिंगसाठी तुम्ही एखादा देश शोधत असाल तर किर्गिझस्तान ही एकदम योग्य निवड ठरेल.

सकाळ वृत्तसेवा

‘मध्य आशियाचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखला जाणारा किर्गीजस्तान. बाईक-राईड किंवा ऑफ रोडिंगसाठी तुम्ही एखादा देश शोधत असाल तर किर्गिझस्तान ही एकदम योग्य निवड ठरेल.

- मालोजीराव जगदाळे

सोव्हिएत महासंघापासून विभक्त झालेले देश नंतर स्वतंत्र झाले. त्यांतील बरेच देश आता मध्य आशियात मोडतात. त्यातीलच एक देश म्हणजे ‘मध्य आशियाचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखला जाणारा किर्गीजस्तान. बाईक-राईड किंवा ऑफ रोडिंगसाठी तुम्ही एखादा देश शोधत असाल तर किर्गिझस्तान ही एकदम योग्य निवड ठरेल.

डोंगर-दऱ्या, बर्फाच्छादित शिखरं, छोटी छोटी टुमदार गावं, अजूनही जुन्या रीती-परंपरा जपत असलेले लोक...या सगळ्याची अनुभूती घेण्यासाठी बहुतेक पर्यटक किर्गिझस्तानला भेट देतात.

किर्गिझस्तानची नाळ रशियाशी घट्ट जोडलेली असल्यानं या देशावर रशियाचा साहजिकच मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे स्थानिक बोलीभाषेतसुद्धा किरगिझनंतर रशियन भाषेचा वरचष्मा आहे. स्थानिक लोकांना इंग्लिश अगदी यथातथाच समजत असल्यानं भारतीय पर्यटकांना मात्र दुभाषा किंवा गुगल ट्रान्स्लेटशिवाय पर्याय नाही.

भारतातून थेट विमान नसल्यानं कझाकिस्तानमार्गे इथं पोहोचणं सोईस्कर आहे. ई-व्हिसाची सोय जरी उपलब्ध असली तरी त्यासोबत स्थानिक टूर कंपनीचं ‘इन्व्हिटेशन लेटर’ असणं गरजेचं आहे, तरच तीस दिवसांचा टूरिस्ट व्हिसा मिळू शकेल.

अजून एक पर्याय म्हणजे, कझाकिस्तानमध्ये फिरून नंतर पाच दिवस किर्गिझस्तानमध्ये फिरणार असाल तर मात्र फक्त ट्रान्झिट व्हिसा पुरेसा आहे. यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची गरज नाही. इतकं ‘व्हिसा-पुराण’ सांगायचं कारण असं की, किर्गिझस्तान पर्यटकांसाठी खुला नव्हता.

एकेकाळी सोव्हिएत संघराज्यात असणारे शजारच्या देशांमधील नागरिक आणि रशियन नागरिक यांनाच इथं मुक्त प्रवेश मिळत असे. किर्गिझस्तानमध्ये हवाई मार्गापेक्षा जास्तकरून ‘लँड बॉर्डर’ मार्गानंच पर्यटक प्रवेश करतात. कझाकिस्तानमधील सर्वात मोठं शहर असलेल्या अलमाटीमधून किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकला पोहोचता येतं. समुद्रापासून सर्वात लांब असणारा देश म्हणूनसुद्धा या देशाची ओळख आहे.

देशाचा ८० टक्के भाग तियान शान आणि पामीरच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे, त्यामुळे समुद्रसपाटीपासून असणारी सरासरी उंची ही आठ हजार फूट आहे.

हिवाळ्यात बहुतांश भाग हा बर्फानं व्याप्त असतो. शेजारच्या उझ्बेकिस्तान किंवा कझाकिस्तान यांसारख्या आधुनिक मेट्रो अथवा रेल्वेसेवा इथं नाहीत. बहुतांश दळणवळण हे मारशुत्का आणि घोड्यांवर अवलंबून आहे.

मारशुत्का म्हणजे खासगी मिनी व्हॅन. इथल्या सरकारी बसस्थानकांवरसुद्धा मोठ्या प्रमाणावर या मारशुत्का असतात. बहुतांश डोंगराळ भागात कच्चे रस्ते असल्यानं इथं पर्यटक दिवसाला साधारणतः हजार रुपये याप्रमाणे घोडेसुद्धा भाड्यानं घेऊ शकतात.

इसे कुल अथवा यीसे कोल या नावानं ओळखला जाणारा खाऱ्या पाण्याचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव या देशात आहे. तब्बल पंधरा हजार पाचशे चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळात हा पसरलेला आहे.

हा तलाव, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पर्वतरांगा आणि या तलावाच्या किनाऱ्यावर बसलेली छोटी छोटी गावं, तसंच अतिशय सुंदर शहरं हेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

बिश्केक ही देशाची राजधानी तर आहेच; पण सर्वात मोठं शहर आणि आर्थिक केंद्रही आहे. प्राचीन सिल्क रूटशी थेट संबंध आल्यानं इथं व्यापारी-भरभराट झाली. संपूर्ण शहर हे सोव्हिएत रशियानं उभं केलेलं आहे, त्यामुळे प्रचंड मोठे चौक, सुटसुटीत रस्ते, भव्य सरकारी इमारती इथं दिसतात. दोर्दोय बाजार आणि ओश बाजार ही ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी आहेत.

दोर्दोय बाजार हा मध्य आशियातील सर्वात मोठा बाजार असून इथं सहा हजारहून अधिक दुकानं आहेत. याव्यतिरिक्त इथलं विद्यापीठ आणि काही संग्रहालयंही बघता येतील. किर्गिझस्तानमधून फिरताना दर शंभर किलोमीटरनंतर इथली भौगोलिक रचना आणि लँडस्केप बदलत जातात.

बिश्केक, कारकोल, कोचकोर, सोंगकोल, ओश अशी भटकंती करून पर्यटक पुन्हा बिश्केकला येऊन समारोप करतात किंवा शेजारील देशांमध्ये प्रवेश करतात. कारकोल हे लहान शहर असून सर्वात जास्त पर्यटक या भागाला भेट देतात. समुद्रसपाटीपासून पाच हजार ५०० फुटांवर असल्यानं तिथलं वातावरण नेहमीच आल्हाददायक असतं.

अमेरिकेच्या ‘ग्रँड कॅनियन’सारखा भासणारा इथला ‘स्कास्का कॅनियन’ हा प्रदेश आहे. इथल्या डोंगरांवर दिवसभरात रंगांच्या अनेक छटा बघायला मिळतात. त्यामुळे इथले लँडस्केप अजूनच विलोभनीय वाटतात.

इथं पूर्वेला चीनच्या सीमेजवळ ‘इंगिलचेक ग्लेशिअर’ला ट्रेकिंगसाठी जगभरातून लोक येत असतात. कारकोलपासून कोचकोर या पश्चिमेकडील शहराकडे होणारा प्रवास ईसे कुल तलावाच्या काठाकाठानं होतो, त्यामुळे एका बाजूला अथांग पाणी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ मैदानाचं लँडस्केप असा अफलातून देखावा दिसत राहतो.

सिल्क रोडवर नित्यनेमानं दिसणाऱ्या ‘कारवाँसराई’ - म्हणजे व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या धर्मशाळा - इथंही असून काही ठिकाणी त्या अजूनही सुस्थितीत आहेत. चिनी प्रवासी युआन त्स्वांग यानं आपल्या प्रवासवर्णनात याचे उल्लेख केले आहेत.

भटके व्यापारी लोक किर्गिझस्तानमध्ये सिल्क रोडमुळेच मोठ्या प्रमाणावर आले आणि नंतर इथंच स्थायिक झाले. मंगोल टोळ्यांचे अनेक वंश अजूनही इथं आहेत, त्यामुळेच इथल्या जीवनपद्धतीवर त्याचाही मोठा प्रभाव दिसतो. घोड्याला इथं अनन्यसाधारण महत्त्व आहे. दळणवळणासह खाण्यासाठी आणि दुधासाठीसुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. घोडीचं दूध आणि त्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ यांचा रोजच्या आहारात समावेश असतो.

कीमिस हे घोडीच्या दुधापासून तयार केलेलं पेय घरी आलेल्या पाहुण्यांना दिलं जातं. इथली स्थानिक जीवनपद्धती नेमकी कशी आहे याचा अनुभव घेण्यासाठी दक्षिणेकडे असलेल्या साँग कुल या दहा हजार फूट उंचीवरील तलावाला आवर्जून भेट द्यावी. या तलावाच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी गावं असून पारंपरिक यर्टमध्ये इथले लोक राहतात.

यर्ट म्हणजे गोलाकार कापडी तंबू. अतिशय थंड प्रदेशात राहण्यासाठी हे तंबू तयार करण्यात आलेले असून आतल्या बाजूनं अत्यंत ऊबदार असतात. पर्यटकांना या यर्टमध्ये राहण्याची सोय उपलब्ध असून त्या माध्यमातून स्थानिक लोकांचं रोजचं जीवन अनुभवता येतं. ऑक्टोबर ते मार्च या काळात अनेक पारंपरिक खेळांचं इथं आयोजन केलं जातं.

त्यांत सहभागी व्हायला देशाच्या इतर भागांतून टोळ्यांचे लोक जमतात. कोक बोरू आणि ईगल हंटिंग हे सर्वाधिक प्रसिद्ध खेळ आहेत. ईगल हंटिंग म्हणजे, गरुडाला शिकारीसाठी प्रशिक्षण देऊन, त्याच्या मदतीनं शिकार केली जाते. याच्या स्पर्धा भरवल्या जातात. या ईगल हंटर्सना बुरकुशू असं म्हटलं जातं, तर कोक बोरू म्हणजे एक प्रकारचा पोलो असून ज्यात बॉलऐवजी जिवंत अथवा मृत शिकार खेळात वापरली जाते.

किर्गिझस्तानचं दुसऱ्या क्रमांकाचं शहर ओश हे उझ्बेकिस्तानच्या सीमेला लागून आहे. ऐतिहासिक फरगाणा खोऱ्याचा हा भाग असून एकेकाळी हा भाग बाबराच्या आधिपत्याखाली होता.

उझ्बेक-किरगिझ सीमाभागातील ही सर्वात मोठी बाजारपेठ असून हेराईनच्या व्यापारासाठीही हा भाग कुख्यात आहे. रशियाच्या सुवर्णकाळातील स्मारकं आणि लेनिनचा पुतळा अशी सोव्हिएत मानचिन्हं अजूनही या शहरात बघायला मिळतात. ओशमध्ये एखादा मुक्काम करून पुन्हा राजधानी बिश्केककडे प्रयाण करता येतं.

नवीन भाषा आणि जवळपास सगळेच पदार्थ नवीन असल्यानं शाकाहारी लोकांसाठी थोडीशी अडचणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. मोमोजसारखा दिसणारा मंटी हा पदार्थ, बिर्याणीसारखा प्लोव, समोसासदृश सम्सा हे मध्य आशियात साधारणतः सगळीकडेच मिळणारे पदार्थ इथंसुद्धा मिळतात. याबरोबरच किरगिझ पदार्थांमध्ये खुर्दाक, ओरोमो हे प्रसिद्ध आहेत. स्थानिक बाजारात मोठमोठ्या आकाराचे तंदूर नान विकायला असतात, ते आवर्जून खाऊन पाहायला हरकत नाही.

किर्गिझस्तानमध्ये फिरण्यासाठी कदाचित एक महिनासुद्धा कमी पडेल इतक्या जागा इथं भेट देण्याजोग्या आहेत. हा देश निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकर्ससाठी पर्वणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT