Education. 
सप्तरंग

शिक्षणावर बोलू काही : शिक्षणाचा चष्मा

ललितकुमार बारसागडे

आपल्या मुलाच्या शाळेत शिक्षकांच्या भेटीला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा काय विचारता?
आठवा आणि तुमची उत्तरं तपासा,
तुम्ही मुलाच्या रिपोटकार्डविषयी बोलता...
त्याला पडलेल्या कमी-अधिक गुणांविषयी बोलता, कमी मार्क मिळालेल्या विषयाबद्दल चर्चा करता, मुलाचे तपासलेले पेपर्स पाहून चुकीचे गुणदान झाले असेल, तर वेळप्रसंगी शिक्षकांशी हुज्जत घालता.
मुलांविषयी जास्त महत्त्वाकांक्षी असाल, तर शंभरपैकी अठ्यान्नऊ गुण मिळाल्यानंतर दोन मार्क का आणि कसे कमी झाले याविषयी चर्चा करता. खंत बाळगता...
मित्रहो, जर आपली उत्तरे वरीलपैकी असतील, तर शिक्षणाकडे पाहण्याचा तुमचा चष्मा बदलवण्याची वेळ आली आहे. कारण साधं आणि सोपं आहे. येणाऱ्या काळात या गुणांच्या आधारावर तुमच्या पाल्याला काही मिळणार नाहीये. त्याचे भवितव्य त्याच्यात असलेल्या कौशल्यावर ठरणार आहे. गळेकापू स्पर्धेत येणाऱ्या काळात नव्वद-पंच्चान्नव टक्के मार्क्‌स मिळवणारी अगणित मुले त्याच्या स्पर्धेत उभी असणार आहेत. मग हे गुणांचे बांडगूळ काय कामाचे ठरेल?
आजच आपण पाहतोय की, कितीतरी इंजिनिअरिंगची पदवी घेणारे तरुण बॅंकेत क्‍लर्क ते मॅनेजर म्हणून काम करताहेत. तात्पर्य त्यांनी घेतलेली पदवी, मिळालेले गुण त्यांच्या कामी आलेले नाही, तर त्यांचे कौशल्य त्यांच्या कामी आलंय.
शिक्षणाविषयी कधी नव्हे, ती जागरुकता आज लोकांमध्ये आलेली आहे. पण, गंमत अशी की, ही जागरुकता केवळ नामांकित आणि सो कॉल्ड कॉन्व्हेंट पॅटर्नच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याच्या प्रवेशापुरती आहे. त्याउपर जाऊन आपला मुलगा नेमका काय शिकतो? त्याला काय येते काय नाही? तो कशात उत्तम आहे. त्याची गुणवत्ता कशी आहे, अशा विविध बाबींचा आपण विचारच करत नाही.
शिक्षण म्हणजे आम्हाला शासन शाळा किंवा शिक्षक यांचीच जबाबदारी आहे, असे वाटते. आश्‍चर्य असे की, लोक राजकारणावर बोलतात. समाजकारणावर बोलतात. कळत असेल नसेल, तरी अर्थकारणावरही बोलतात; मात्र शिक्षणावर बोलत नाही. चष्मा बदला. शिक्षण ही आपलीही जबाबदारी आहे. यादृष्टीने पाहायला शिका.
कुटुंब, शाळा आणि समाज हे तीनही घटक एक सुजाण नागरिक घडवतात. जर कुटुंबातील आणि समाजातील एक घटक म्हणून अनौपचारिकरीत्या बालकाच्या जडणघडणीमध्ये आपण जबाबदार असतो, तर शिक्षण या बाबीत आपली जबाबदारी आम्ही का झटकतो?
आपल्या मुलाचं मूल्यांकन करण्यासाठी आपण शिक्षक असणे आवश्‍यक नाही. शिक्षणशास्त्रातील पदविका किंवा पदवी असणेही आवश्‍यक नाही आणि आपण शिक्षणतज्ज्ञ असण्याचीही गरज नाही.
गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलण्याची. शिक्षणाकडे पाहण्याचा आपला चष्मा बदलण्याची. शिक्षणाविषयी थोडीफार आवड निर्माण करून घेण्याची बरेच पालक मुलांसाठी चांगल्या शाळा निवडतात. सोबतीला अगदी पहिल्या वर्गापासून ट्यूशनही निवडतात. वरचे वर्ग असतील, तर आज घडीला मार्केटमध्ये उपलब्ध असलेले विविध लर्निंग ऍप्स आणि ऑनलाइन लर्निंग सिस्टमही निवडतात. मात्र, स्वत:ची जबाबदारी निवडत नाही.
मुलांची पुस्तके आपण उघडून बघता का? पुस्तकांच्या सुरुवातीला त्या विषयातून आपला पाल्य काय शिकणार किंवा काय शिकावं, याची उद्दिष्टे दिलेली असतात. केवळ इतकेच नव्हे, तर पाठाच्या शेवटी आपला पाल्य त्यातून काय शिकला, याचाही उल्लेख असतो. आपल्या मुलाला ते अवगत झाले का? त्यानुसार अपेक्षित बदल झाला का? हे तपासण्यासाठी तुम्ही शिक्षणतज्ज्ञ असणे गरजेचे नाही किंवा मुलाची गुणपत्रिका हातात येण्याची वाट पाहण्याचीही गरज नाही.
भारत सरकारने जून 2019 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 हे प्रारूप सार्वजनिक केले. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या धोरणावर जनतेच्या प्रतिक्रिया मागविल्या. सामान्य जनता तर सोडाच परंतु, शिक्षक किंवा शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या किती लोकांनी हे प्रारूप वाचून प्रतिक्रिया नोंदविल्या असतील, हा शोधाचा विषय आहे. इतकी प्रचंड अनास्था शिक्षण या विषयाबद्दल आहे. आम्ही शासनाचे अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर कामापुरतं का होईना ते वाचतो. काही अंशी समजून घेतो. मात्र, ज्यावर येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य निर्भर आहे, असे राष्ट्रीय शिक्षण धोरण मात्र टाळतो. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांबद्दल आमची अनास्था या क्षेत्रामध्ये प्रचंड लूट आणि पिळवणूक याला जबाबदार ठरत आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांवर हिरिरीने भांडणाऱ्या शिक्षकांच्या संघटना त्यांच्या विविध प्रश्‍न आणि समस्यांबाबत निवेदने देऊन चर्चेची आणि सभांची मागणी करतात. मात्र, विद्यार्थी गुणवत्ता दर्जेदार शिक्षण याबाबत चर्चा करण्यासाठी आजपर्यंत तरी निवेदने आल्याचे एक अधिकारी म्हणून मला आठवत नाही. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पालक शिक्षणाबाबत आपली प्रभावी भूमिका बजावू शकत नाही त्या ठिकाणी शिक्षकांची जबाबदारी वाढलेली आणि फार मोलाची आहे. शिक्षकांच्या शिक्षणाप्रति दृष्टिकोनावर विद्यार्थ्यांचे भविष्य आकार घेते.
शिक्षित होत असतानाच आपला मुलगा संस्कारी व्हावा, असे आपणास वाटते ना, मग त्याच्या मूल्यशिक्षणाकडेही लक्ष द्या. शाळेत भेटीला गेल्यावर चर्चा केवळ त्याने मिळवलेल्या गुणांवरच करू नका. आपला पाल्य इतरांशी कसा वागतो, किती मिसळतो, एक नागरिक म्हणून त्याच्या अंगी येणाऱ्या वृत्ती यावरही चर्चा करा. त्याची आवड त्याच्या अंगी असलेले कसब, कौशल्य यावरही बोला. शिक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारा. शिक्षणाकडे पाहण्याचा चष्मा बदला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT