- सरोजिनी देवरे
‘निःशब्द’मधील कथा सभोवताली घडणाऱ्या बारीक-सारीक प्रश्नांची उकल करून उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत.
निमित्त, फिंद्री या गाजलेल्या कथासंग्रहानंतर कथाकार सप्तर्षी माळी यांचा नव्याने आलेला ‘नि:शब्द’ कथासंग्रह अक्षरबंध प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या संग्रहातील सर्वच कथा सभोवतालच्या घटनांचा वेध घेताना दिसून येतात.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये हरवत चाललेली जीवनमूल्ये, माणुसकी याकडे कथेच्या माध्यमातून वाचकांचे लक्ष वेधते. सभोवताली घडणाऱ्या बारीक-सारीक प्रश्नांची उकल करणाऱ्या या कथा वाचकांची उत्सुकता, उत्कंठा वाढविते. प्रत्येक कथेतील पात्रे एका विशिष्ट घटनेनंतर नि:शब्द होतात, तशाच त्या कथा वाचकांनाही क्षणभर नि:शब्द करतात.
संसाराची गुलाबी स्वप्ने काळी किनार घेऊन कशी उद्ध्वस्त होतात, याचे जिवंत चित्रण सप्तर्षी माळी यांनी केले आहे. या कथासंग्रहातील ‘प्रारब्ध’ ही पहिली कथा आहे. सैनिक पत्नी असणाऱ्या संगीताच्या नवीन संसारात अचानक आलेले दु:ख.
सैनिक असलेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी, तरुण विधवा सुनेचा पुनर्विवाह, काही दिवसांतच सैनिक मुलगा जिवंत असल्याची खबर. या कथेत लेखकाने समाजातील आदर्श सासरा दाखवला आहे. अतिशय वेगळा विषय व हृदयस्पर्शी कथानक या कथेत लेखकाने गुंफले आहे. कथा संपल्यानंतर वाचकाला हुरहुर लागून जाते.
स्त्री जन्मात येणाऱ्या निरनिराळ्या समस्या आपल्या कथेतून मांडल्या आहेत. अशीच एक कथा आहे ‘जखम’. रंग सावळा असलेल्या रागिणीचे लग्न ऐनवेळी मोडते. त्यावेळी कुठलीही प्रतिक्रिया न देता व विचलित न होता स्वतः निर्धाराने उभी राहून रागिणी शिक्षणाधिकारी बनते.
काही वर्षांनंतर मुख्याध्यापक असलेल्या, लग्न मोडून गेलेल्या त्या मुलाची लाच घेतल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी तिची नियुक्ती होते. त्या वेळी त्या घटनेची त्या व्यक्तीला आठवण करून, परखड शब्दांत कानउघाडणी करणारी रागिणी भ्रष्टाचारी माणसाशी लग्न झाले नाही, याचे समाधान मानते. स्त्रीला कमी लेखू नये, असा संदेश ही कथा देऊन जाते.
‘प्रारब्ध’ या कथेत शासकीय रुग्णालयातील गलथानपणामुळे कैलास आणि रेणुका यांना सात वर्षांनंतर झालेल्या बाळाचा आगीत होरपळून मृत्यू होतो. समाजातील विदारकता कथेतून पुढे आणण्याचे काम लेखकाने आपल्या कथेतून केले आहे.
स्त्री कुठेही असली तरी तिच्या वाट्याला दुःख हमखास असतात. अनेक वेळा ही दुःखे दुसऱ्यापेक्षा आपल्याच जवळच्या व्यक्तीकडून होत असतात आणि ही दुःख इतर दुःखांपेक्षा मोठी वाटतात. ‘नरक यातना’ या कथेतून स्त्रीच्या आयुष्यातील दुःख लेखकाने दाखविले असले तरी त्याला तेवढ्याच ताकदीने सामोरी जाणारी खंबीर स्त्रीही दाखविली आहे.
‘फेसबुक फ्रेंडस्’ ही कथा समाजातील अनेक लोकांना आरसा दाखणारी आहे. आपल्या फेसबुक पोष्टला लाईक- कमेंट्स करणारे आपले आभासी मित्र हे खरे नसतात. संकटाच्या वेळी मदत करणाराच खरा मित्र असतो.
मात्र आपण सोशल मीडियाच्या आभासी मित्रांच्या वाढत्या संख्या यादीवर मिरवत असतो. सोशल मीडियाच्या आहारी जाताना आपण आपल्याच लोकांना महत्त्व देत नाही आणि येथेच आपली चूक होते.
सप्तर्षी माळी यांनी समाजातील वास्तव आपल्या कथेतून मांडताना मुलांचे अतिलाड, वाईट संगतीत मुले कशी बिघडतात यावरही भाष्य केले आहे. ही कथा प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते. आयुष्य कितीही पुढे गेले तरी पहिले प्रेम विसरले जात नाही.
जीवनात कधी ना कधी, कुठल्या तरी वळणावर ते पुन्हा भेटते. असा आशय असलेली ‘डियर’ कथा वाचनीय आहे. हास्यांचे फवारे उडवणारी कथा लिहिताना सप्तर्षी माळी यांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून ग्रामीण भागातील एका घटनेवर आधारित ‘गोंधळ’ ही मजेशीर प्रसंगांनी रंगली आहे.
‘नशीब’ या कथेत मुंबईतील झगमगाटाचे आकर्षणामुळे प्रमिला नावाच्या मुलीचे हाल व दुर्दशा कशी झाली, याची गोष्ट सांगणारी आहे. जोपर्यंत माणसाकडे स्वतःचं काही असतं. तेव्हाच त्याला किंमत असते. ज्या व्यक्तीपासून काहीच फायदा नाही तिला अडगळीत टाकले जाते.
परावलंबी व्यक्तीला कुठलीही किंमत नसते, याची आठवण ‘परावलंबी’ कथेतून करून दिली आहे. सर्वच नात्यांना वेळ देता देता स्वतःकडे दुर्लक्ष करणारी आई ‘निःशब्द’ कथेत येते. ‘निःशब्द’ ही संग्रहातील शीर्षक कथा आहे. आईला व पत्नीला गृहीत धरणारी पात्रे घरोघरी असतातच. घरातील स्त्री सगळ्याच गोष्टी बोलत नाही. तिला समजून घेणे गरजेचे असते. याची जाणीव या कथेद्वारे लेखक करून देतो.
आजच्या घाणेरड्या राजकारणाचा वेध घेणारी ‘गद्दार’ ही कथा नेमकेपणाने मुद्देसूद कथानकातून पुढे नेण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. कथेत परिवारात सर्वांच्या सुखासाठी स्वत:च्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवणाऱ्या स्त्रीकडे कोणाचेही लक्ष नसते. ‘निःशब्द’ या शीर्षक कथेत स्त्री मनाचे भावविश्व उलगडताना वाचक नक्कीच नि:शब्द झाल्याशिवाय राहत नाही.
या संग्रहातील कथांमध्ये समाजातील विविध घटनांचे प्रतिबिंब जाणवते. लेखकाने घटनांच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवून समाजाला विचार करायलाच जणू आपल्या कथांतून भाग पाडले आहे. सरस कथांनी या कथासंग्रहाचे अंतरंग फुलून आले आहे.
या संग्रहातील अनेक कथा राज्यस्तरीय कथा स्पर्धेत विजेत्या ठरल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार विष्णू थोरे यांनी या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ रेखाटले आहे. नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका विजया मारोतकर यांची प्रस्तावना, तर युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांची पाठराखण या संग्रहाला कौतुकाची थाप आहे.
कथासंग्रह : नि:शब्द
कथाकार : सप्तर्षी माळी
प्रकाशक : अक्षरबंध प्रकाशन
पृष्ठसंख्या : ८८
मूल्य : २०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.