डाऊन टू अर्थ sakal media
सप्तरंग

गोष्ट पैशापाण्याची : डाऊन टू अर्थ

माझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करियरमधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रथितयश, संपूर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती

प्रफुल्ल वानखेडे

मी एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये मॅनेजर होतो. कंपनीच्या एका महत्त्वाच्या डीलसाठी मला अर्जंट दिल्लीला जायचे होते; पण विमानाचं इकॉनॉमी क्लासचं तिकीट मिळत नसल्याने मला बिझनेस क्लासने जाण्यास सांगण्यात आले. विमानात स्थानापन्न झाल्यावर कंपनीच्या चेअरपर्सन आल्या आणि मागे इकॉनॉमी क्लासच्या सिटवर गेल्या. माझ्या जीवाची घालमेल सुरू होती. मी त्यांच्याकडे जाऊन माझी ओळख दिली. त्यांना माझ्या सीटवर बिझनेस क्लासमध्ये शिफ्ट होण्याची विनंती केली. त्यांनी ती विनंती नम्रपणे नाकारली. या प्रसंगाने जगातल्या सर्वोतम विद्यापीठातही जे साधेपणाचे ज्ञान मिळाले नसते, ते शिकविले...

माझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करियरमधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रथितयश, संपूर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत काम, नवीन शिकण्याची आस, त्यामुळे सतत दौरे आणि मिटींग्ज चालू असायच्या.त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरिंग आणि डिझाईन सर्विसेस देतात) ते डिपार्टमेंट पाहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय. त्यात वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक मोठी केस माझ्या नजरेखालून जायचीच.एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलिकडून उद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटिंगसाठी हजर व्हा, असा निरोप मिळाला. ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटिंग होती आणि जर आमची टेक्निकल चर्चा चांगली झाली तर काही कोटींची ॲार्डर नक्की कंपनीला मिळणार होती.

मी लगेच आमच्या ट्रॅव्हल डेस्कशी संपर्क करून दुसऱ्या दिवशीचे सकाळच्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी फोन केला. पाच मिनिटांत त्यांचे उत्तर आले. सर्व विमाने फुल आहेत आणि कोणतेही तिकीट अगदी आज रात्री ते उद्या दुपारपर्यंत शिल्लक नाही. मी पुन्हा दिल्लीला फोन लावून मिटिंग पुढे जाऊ शकते का, म्हणून विचारले; पण त्यांनी त्यास नकार दिला. काय करावे काही कळेना, मग आमच्या जनरल मॅनेजर साहेबांना हा प्रॅाब्लेम सांगितला. त्यांनाही माहिती होते की, हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रोजेक्ट आहे आणि मला वैयक्तिकरीत्या तिकडे हजर असणे फार गरजेचे होते. त्यांनी मात्र चुटकीसरशी ‘‘तू ताबडतोब बिझनेस क्लासचे तिकीट पाहा आणि असेल तर लगेच बुक करून जा,’’ असे सांगून प्रश्न निकाली काढला. अनुभवी लोकं आजूबाजूस असली की निर्णय घेणं कसं सोप्पं होऊन जातं, हे कळण्यासाठी खरं तर असे प्रसंगही फार उपयोगी पडतात.

मी लगेच आमच्या लोकांना बिझनेस क्लासबद्दल तशा सूचना दिल्या. पुढे लगेच अप्रुव्हल्स मिळाली आणि ताबडतोब बुकिंगही झाले. मी पहाटेच वेळेआधीच विमानतळावर पोहचलो. बिझनेस क्लास तिकीट असल्याने सर्वात प्रथम आदरपूर्वक आम्हाला विमानात प्रवेश मिळाला. मी स्थानापन्न झालो आणि नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला लागणार एवढ्यात माझ्या समोर थरमॅक्सच्या चेअरपर्सन अनु आगा आल्या. क्षणभर बावरलोच. बरं मला वाटले, त्या इथेच बसतील; पण त्या सरळ चालत मागे इकॉनॉमी क्लासच्या सिटवर गेल्या आणि शांतपणे बसल्या.

माझ्या जीवाची घालमेल सुरू होती. बरं त्या इतक्या मोठ्या कंपनीच्या मालक, त्या इकॉनॉमीने आणि मी बिझनेस क्लासने, हे माझ्या मनाला खूप बोचत होते, पण लोकांची विमानात बसण्यासाठी रिघ लागलेली होती आणि त्यामुळे मला त्यांच्यापर्यंत पोहचतायेत नव्हते. थोड्याच वेळात विमानाने टेकॲाफ घेतला. सिटबेल्ट काढण्याचा संकेत मिळाला तसा मी ताबडतोब जागेवरून उठलो आणि अनु मॅडम जिथे बसल्या होत्या तिकडे गेलो. त्या शांतपणे पुस्तक वाचत होत्या, मला मात्र अत्यंत अपराधीपणाची भावना होतीच. मी नम्रपणे माझी ओळख सांगितली (तेव्हा कंपनीचे आय कार्ड गळ्यात सतत असायचे, त्यामुळे त्यांनाही हा आपलाच एम्लॅाई आहे, हे लगेच कळाले.) आणि मी काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट मिटिंगसाठी दिल्लीला चाललोय आणि इकॉनॉमीचे तिकीट नसल्याने बिझनेस क्लासने चाललोय, हे सांगितले. पुढे काय, कसे असे पाच-दहा मिनिटे बोलल्यावर मी मुद्द्याचे बोललो, ‘‘मॅडम, माझी तुम्हाला विनंती आहे, कृपया तुम्ही बिझनेस क्लासच्या जागेवर बसा. मी तुमच्या जागेवर इथे इकॉनॉमीमध्ये शिफ्ट होतो.’’

माझे बोलणे ऐकून त्यांनी स्मितहास्य केले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाल्या, ‘‘अरे, मी माझ्या खाजगी कामासाठी दिल्लीला चाललीये आणि मला याची चांगली सवय आहे. तू कंपनीच्या कामासाठी आणि तेही अत्यंत गरजेचे आहे म्हणून चाललायेस. उलट तू तिथेच बसून शांतपणे मिटिंगची तयारी कर आणि Win the Game.’’ मी वारंवार आग्रह करूनही शेवटी त्यांनी त्याला प्रेमाने नकारच दिला आणि मला ‘‘Win the Game” आशीर्वाद देत माझ्या जागेवर परत पाठवले.उतरताना मी मुद्दाम त्या येईपर्यंत थांबलो. त्यांनीही अतिशय आदबीने चौकशी केली आणि हसतमुखाने मला निरोप दिला. पुढे दिल्लीत मिटिंग अत्यंत चांगली पार पडली. थरमॅक्सला भली मोठी ॲार्डरही मिळाली. मी मुद्दाम न विसरता त्याचा ई-मेल आमच्या जनरल मॅनेजर साहेबांतर्फे त्यांना पोहचविला आणि त्यांनीही मनापासून माझे अभिनंदन केले. मला मात्र त्या अभिनंदनाशिवायही त्या मिटिंगने न विसरता येणारी आठवण आणि जगातल्या सर्वोतम विद्यापीठातही जे मूल्य आणि साधेपणाचे ज्ञान मिळाले नसते, ते शिकविले. नोकरी असो की व्यवसाय, पैसे आहेत, संपत्ती आहे म्हणून थाट करणे, फक्त सवलती लाटणे किंवा वारेमाप खर्च करत राहणे यापेक्षा खरी गरज काय आहे, हे ओळखून आयुष्यात मार्गक्रमण करत राहणे, हा महत्त्वाचा मंत्र मला मिळाला. जवळपास चार हजार कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या महाकाय आंतरराष्ट्रीय कंपनीची मालकीन इतकी डाऊन टू अर्थ!

खाजगी आणि ॲाफीशियल काम यातील मूल्य जपत इतक्या साधेपणानं जगणं आणि मी वारंवार विनंती करूनही त्याला आदरपूर्वक नकार देणं, हे अत्यंत उच्चकोटीचे संस्कार होते. आजही हा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आला की, आपोआप त्यांच्यात मला माझा गुरू दिसतो आणि मी त्यांना अंतःकरणातून प्रणाम करतो. हे शिकायला मिळालं, यासारखं दुसरं भाग्य नाही. सुप्रसिद्ध लिओ नार्दो दा विंची यांचे एक खूप चांगले वाक्य प्रसिद्ध आहे - “Simplicity is the ultimate sophistication.” आणि या प्रसंगातून ते मनोमन पटतेही. आज आमच्या उद्योगात जे काही यश आहे, त्यात या अशा संस्कारांचा, शिक्षणाचा आणि मूल्यांचा खूप मोठा वाटा आहे, हे मात्र नक्की!

आयुष्यात ही निरीक्षणं, अनुभव आणि त्यानंतरची अनुभूती आपल्या एकंदर आयुष्याला दिशा देतात. प्रत्येकाकडून जे जे चांगलं ते ते शिकत जायचं, ते ताबडतोब अमलात आणायचं आणि पुढे जायचे. हेच बदल शेवटी आपले आयुष्य बदलतात, सुखकर करतात. अब्राहम लिंकन म्हणतात - “If you want to Test a man’s character, give him power.” हल्ली अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या काळात ही मूल्ये आपल्या जगण्याला खरा आकार, शांतता अन्‌ हमखास समाधान देतील. पैसे कमवायला लागल्यावर किंवा गरजेपेक्षा जास्त पैसे आल्यावर आपल्याला नक्की कसे वागायचे आहे, हे कळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा आपण ते नक्की वापरतो कसे, यावरच आपण श्रीमंत होणार की गरीब हे ठरते.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT