story of seven friends those want to celebrate birthday one of its their struggle Sakal
सप्तरंग

वेगळ्या रस्त्यावरचे सात जण...

संदीप काळे saptrang@esakal.com

नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर मी सकाळी सकाळी उतरलो. दोन्ही हातात दोन बॅगा घेऊन स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी चालायला लागलो. थोडं पुढं गेल्यावर एक तरुण माझ्या समोर येऊन म्हणाला, साहेब, हॉटेल पाहिजे का ? एसी, नॉन एसी, टॅक्सी पाहिजे का ? नास्ता करायचा आहे का ? सांगा साहेब, काय हवे आपल्याला ? मी व्यवस्था करतो. मी नाही म्हणत होतो आणि तो माझ्या मागं मागं येत होता.

साहेब, गाडी आहे, हॉटेल आहे... आपल्याला नास्ता तरी हवा असेल ना... मी सगळ्या विषयाला ना ना म्हणून मान हलवत होतो. तो मात्र त्याची चिकाटी सोडत नव्हता.

मी म्हणालो, चला, नास्ता करू !

तो म्हणाला, सर, तुम्ही कुठले... मुंबईचे का ?

मी म्हणालो, हो.

तो म्हणाला, काय खाणार सर ? नागपूरचे तर्री पोहे फार प्रसिद्ध आहेत...

मी म्हणालो, तर्री पोह्याचा तुमचा व्यवसाय आहे का?

तो म्हणाला, नाही. माझ्या मित्राचा आहे...

मी म्हणालो, हॉटेल, लॉज, टॅक्सी यापैकी तुमचे काय आहे. तो म्हणाला काहीही नाही. सर्व ठिकाणी आम्ही मित्र मिळून काम करतो. आम्ही बोलत बोलत तर्री पोह्याच्या हातगाड्यावर गेलो.

माझ्यासाठी नागपूरच्या त्या रेल्वे स्टेशनसमोरील तर्री पोहे नवीन नव्हते. नवीन होती ती त्या युवकाची नजर जी सतत इकडून तिकडे भिरभिरत होती. त्याला रेल्वे स्टेशनमधून येणारी गरजू माणसे शोधायची होती. मी त्याला चांगले हॉटेल कोणते आहे ? आणि वर्धा किती दूर आहे, असं म्हणून अडकून ठेवलं होतं.

मला जो पोहे देत होता, त्याचा टोन आणि माझ्याशी जो बोलत होता त्याचा टोन मला पूर्णपणे वेगळा होता. ते दोघे लोकांना पोहे देत देत बोलत होते. गाडीची चावी टाकून अजून एक जण आला. त्यानेही चार लोकांना पोहे देऊन स्वतः पोहे खायला सुरुवात केली.

त्याच्या बोलण्यावरून तोही मला वेगळ्या जिल्ह्याचा वाटत होता. मी त्या तिघांनाही म्हणालो, तुम्ही मित्र आहात काय ? ते म्हणाले, हो, आमची चांगली मैत्री झाली. त्यातून एकमेकांना मदत करतो आम्ही. ते त्यांच्या बोलण्यात आणि कामात, खाण्यात व्यग्र होते;

पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. हे कॉलेजचे मित्र, सारे वेगवेगळ्या भागाचे, उच्च शिक्षित... हे इथे काय करतात. आमच्या गप्पा सुरू होत्या. आमची चांगली ओळख झाली. या तरुणांना भेटलं पाहिजे, हा विचार माझ्या मनात चालला होता.

ते आता थोड्या वेळात जिकडे तिकडं जाणार होते. तितक्यात मी त्या तरुणाच्या टॅक्सीमध्ये बसलो. आता तो टॅक्सी सुरू करणार तितक्यात मला स्टेशनमधून बाहेर घेऊन आलेला मुलगा त्या टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्तीला म्हणाला, अरे आज शिवाचा वाढदिवस आहे ना..! रूमवर लवकर ये. तो तरुण माझ्याकडे बघत म्हणाला, दादा तुम्हीपण या.

आपण गप्पा मारू. मी हो म्हणालो. सायंकाळी किती वाजता आणि कुठे भेटायचं हे ठरलं. दिवसभर ऑफिसमधली कामे, भेटीगाठी करत दिवस कसा गेला कळले नाही. सायंकाळी ठरलेल्या जागी आम्ही भेटलो. एक प्रशस्त अशी रूम होती.

जिथे सात जण एकत्रित राहत होते. गणेश पुरोहित- जालना, सतीश पवार- सातारा, मधुकर रोकडे- लातूर, शिवा कांबळे- रत्नागिरी, विजय जाधव- सोलापूर, विशाल रोकडे- नागपूर असे हे सात मित्र होते.

हे सातही जण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले. सर्वांनी उच्च शिक्षण घेतलं. तीन इंजिनिअर, दोन एम.कॉम, दोन एम.एड. असे उच्चशिक्षित. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं खरं; पण पुढे नोकरीचं काही खरं दिसत नव्हतं. अनेक ठिकाणी धक्के खाल्यावर या सगळ्यांना एकत्रित करणाऱ्या गणेशनं त्या वेळी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

मात्र एका भिकाऱ्याच्या शब्दांनी तो भानावर आला. गणेश आणि त्या भिकाऱ्याची दोस्ती झाली. त्या भिकाऱ्याने आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये असणाऱ्या अनेक युवकांची गणेशची ओळख करून दिली. सात तरुणांची टीम झाल्यावर यांनी नागपूरचा रस्ता धरला. पुढे यांच्या टीममध्ये येणारे अनेक युवक चांगल्या मार्गाने जावेत, यासाठी चांगले प्रयत्न झाले.

अतिशय श्रीमंत माणसं केवळ पैसा कमावतात, आनंदी राहत नाहीत. आपण आनंदी राहू आणि चार माणसांना आनंदी राहण्यासाठी आयुष्य खूप सुंदर आहे, असा विचार देत जगण्यासाठी पुढं आणू या. हा विचार या युवकांनी उराशी बाळगला. हे सातही जण एका प्राध्यापकाच्या मदतीनं नागपूरला आले. त्यांनी छोटी छोटी कामं करायला सुरुवात केली. आता त्या छोट्या कामांमधून ही मंडळी अनेकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

हॉटेलचा व्यवसाय, टॅक्सीचा व्यवसाय, लॉजचा व्यवसाय, माहिती देण्याचा व्यवसाय, असे अनेक छोटे-छोटे व्यवसाय या सर्वांनी सुरू केले. गरज असणारी माणसं त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवायची आणि त्यातून मिळणाऱ्या कमिशनवर छानपैकी चार पैसे कमवायचे.

भांडवल नाही, ना कर्ज ना त्याचं व्याज. याच पैशावर त्यांचं खूप छान पद्धतीनं भागतं, असं ते सांगत होते. सकाळी चार तास स्टेशन परिसरात काम करायचे. सायंकाळी वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे जॉब करायचे, असे यांचे काम सुरू आहे.

मिळणाऱ्या पैशातून लागतो तेवढा पैसा जवळ ठेवायचा. बाकी पैसा गरजू असणाऱ्या युवकांना मदत म्हणून द्यायचा. कधी कोणाच्या बहिणीचं लग्न, तर कधी कोणाच्या आई-वडिलांचं आजारपण, कधी कुणाच्या घराचं बांधकाम; तर कधी कुणाच्या भावाचं शिक्षण या सगळ्यांचं एकत्रितपणे राहणं आणि एकमेकांना मदत करून त्याला उभं करणं कमालीचं वाटत होतं. हे सारं मला शिवा समजावून सांगत होते.

दरम्यान त्या रूमवर एक छोटासा केक आणून तो कापला गेला. मेसवरचे डबे आलेच होते. मी त्या सर्वांसोबत जेवण केलं. ते जेवण छान रुचकर होतं. या सातही जणांच्या बोलण्यामध्ये एक जाणवत होतं, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर शिक्षणाचा जो पर्याय लादला म्हणून त्यांनी ते केलं. चांगले मार्क मिळवले.

ज्या क्षेत्रात त्यांना काम करण्यासाठी रुची नाही, ते काम ते करत होते; पण त्यांना अपयश यायला लागलं. पुढं तर करणे शक्य नव्हते. नागपूरमध्ये त्यांनी छोटे छोटे काम सुरू करून चार पैसे कमावत त्यांनी आपली मानसिकता बनवली. त्यांना ज्या कामात रुची आहे, त्या त्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं.

ते सातही जण घरदार, पाहुणे, गाव या मोहमायातून कधीच बाहेर पडले होते. त्यांना आता करिअर करायचं होतं. त्यांना पुढे जायचं होतं. आयुष्यामध्ये कोणीतरी सांगितलं, त्यामुळे त्यांनी करिअर करायचं स्वप्न उराशी बाळगलं; पण ते पुढे जमणार नाही, लादलेलं निभावणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले.

त्यातून त्यांनी आत्महत्येसारखा मार्ग निवडला होता; पण त्यातूनही एकाला दोन आणि दोनाला तीन असे हे सात जण मिळाले. केवळ हे सात जण त्यांच्यापुरतेच थांबलेले नाहीत, तर त्यांना जे कोणी अपयशाचे धनी झालेले दिसले, त्यांनी त्यांना मदत केली.

कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं. तुमच्या कामांतून तुम्हाला समाधान किती आहे, तुम्हाला आवड किती आहे आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे, इमानदारीसह किती करताय, हे फार महत्त्वाचे आहे, असे ते सारे जण मला सांगत होते. त्याचे वय जास्त नव्हतं; पण अनुभव खूप मोठा होता.

त्या सर्वांचा निरोप घेऊन मी रस्त्याने निघालो. मी विचार करत होतो, ज्या मुलांवर आई-बाबा मार्कांसाठी वाट्टेल ते लादतात, या लादण्यामुळे त्यांचे हाल होतील का, त्यांना ते आवडेल का, याचा विचार कधी कोणी करतच नाही.

ही कहाणी त्या सात जणांचीच नाही, तर ही कहाणी लालसेपोटी आपल्या मुलाला पाहिजे तिथे ढकलणाऱ्या त्या हजारो मुलांच्या आई-वडिलाची आहे. आपण केवळ थ्री एडियट चित्रपट पाहतो; पण अमलात काही आणत नाही.

मुलांच्या लहानपणी आई-वडील मुलांचा विचार करत नाहीत. मुलांच्या मोठेपणी मुले आई-वडिलांचे ऐकत नाहीत. त्यातून एका वेगळ्या कहाणीचा सिलसिला सुरू होतो. काय माहीत, हा सिलसिला कधी थांबणार ते!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT