- संजय करकरे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील एका शेतात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन वाघांच्या झुंजीमुळे पुन्हा एकदा ‘छोटा मटका’ संपूर्ण देशभरात चर्चेत आला. साधारण १२-१३ वर्षांचा ‘बजरंग’ वाघ सात-आठ वर्षांच्या ‘छोटा मटका’सोबत लढला. या जीवावर उठलेल्या युद्द्धात अनुभवापेक्षा ताकद वरचढ ठरली.
‘बजरंग’ या वाघाच्या गळ्याला मोठी खोल जखम तसेच त्याच्या हातावरही चावल्याच्या अनेक खुणा बघितल्या गेल्या. या लढाईत ‘छोटा मटका’ जखमी झाल्याच्या सुरुवातीच्या काळात बातम्या आल्या. मात्र अवघ्या तिसऱ्या दिवशी अंगावरती किरकोळ जखमा घेत या वाघाने आपले क्षेत्र पुन्हा राखण्यास सुरुवात केली.
मटकासूर’ आणि ‘छोटी तारा’चा शक्तिशाली बच्चा ‘छोटा मटका’ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअरचे क्षेत्र सोडून उत्तर दिशेला चालत जाऊन खडसंगी वनपरिक्षेत्रात स्थिरावला. ‘छोटा मटका’ या नर वाघाला हे क्षेत्र सोडण्यामागे ‘माया’ वाघीण तसेच त्याचे वडील ‘मटकासूर’ही कारणीभूत ठरले असे म्हणावे लागेल.
तारुण्यात पदार्पण करणाऱ्या ‘छोटा मटका’ने ‘माया’शी सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या सुप्रसिद्ध वाघिणीने त्याला दाद दिली नाही. दोन वेळा ‘माया’ वाघिणीने ‘छोटा मटका’ला केवळ झिडकारलेच नाही तर, त्याचा पाठलाग करून त्याला पिटाळून लावले असे काही गाईडने जंगल भ्रमंती वेळी बघितले होते.
यासोबतच बापासोबत त्याचे खटके उडाल्याचेही अनेक पर्यटकांनी त्यावेळी बघितले होते. नव्या सहचरणीच्या म्हणजेच वाघिणीच्या शोधात तसेच नव्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्याच्या इराद्याने या वाघाला मग या क्षेत्राला लागूनच असलेले उत्तरेकडील बफर क्षेत्र आवडले.
या क्षेत्रात त्यावेळेस ‘मोगली’ नावाचा वाघ तसेच अन्य एक नर वाघ वावरत होता. अलीझंजा, निमडेला, नवेगावचे हे क्षेत्र वन्यप्राण्यांनी समृद्ध आहे. बांबूचे दाट जंगल, पाण्याची उत्तम उपलब्धता,
वाहणारे नाले व ओढे आणि गव्यासह सांबर, चितळ असे भरपूर नैसर्गिक खाद्य या क्षेत्रात असल्याने ‘छोटा मटका’ या क्षेत्रात स्थिरावला. या तृणभक्षी प्राण्यांपेक्षा ‘छोटा मटका’ला सर्वाधिक आवडले ते या परिसरात वावरणारे पाळीव गाईगुरे. २०१९च्या सुमारास साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षी हा वाघ या परिसरात आला.
लहानपणापासून पर्यटकांच्या सोबत वावरणारा ‘छोटा मटका’चा बिनधास्तपणा येथेही कायम होता. अलिझंजा येथे २०१४ पासून गाईडचे काम करणारा अरविंद चौखे या वाघाबद्दल माहिती देताना भरभरून बोलतो. तो म्हणतो, ‘२०१९ पासून या परिसरात आलेल्या या वाघाने आमच्या आयुष्यात मोठी भरभराट आणली.
संपूर्ण देशातून पर्यटकांचा ओघ आमच्या या क्षेत्राकडे वळला. ताडोबातील बफर क्षेत्राला प्रसिद्धी मिळवून देण्यात या वाघाचा महत्त्वाचा वाटा आहे. हा वाघ अंगाने चांगलाच बलदंड आणि भारदस्त आहे. आकार जरी मोठा असला तरी तो शांत स्वभावाचा आहे.
पर्यटकांच्या गाड्या असल्या तरीही अतिशय शांतपणे तो आम्हाला बघायला मिळतो. बरेच वेळा बिनधास्तपणे रस्त्यावर चालत जातो. पर्यटकांना त्याचे हे वागणे भावते. छायाचित्रकारांना त्याला खूप चांगल्या पद्धतीने टिपताही येते.’
‘छोटा मटका’चे अनेक फोटो विविध संकेतस्थळे तसेच सोशल मीडियावर बघायला मिळतील. या बफर क्षेत्रात सुप्रसिद्ध रामदेगी हे ठिकाण आहे. ज्यावेळेस बफर क्षेत्र नव्हते त्यावेळेस लोकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असलेल्या मंदिर परिसरात असायची.
मात्र बफर क्षेत्रात हा परिसर आल्यावर लोकांच्या वावरण्यावर मर्यादा आली. येथे साहजिकच निसर्गाने आपले मूळ रूप दाखवायला सुरुवात केली. ‘छोटा मटका’ला हे मंदिर, त्याचा रम्य परिसर, तेथील शांतता, तेथून खळखळाट करत वाहणारा ओढा भावला आहे. या मंदिराच्या पायऱ्यांवरून उतरतानाचे, मंदिर परिसरातील देवाजवळ उभा असलेले असे एक ना अनेक छायाचित्रे पर्यटकांनी येथे टिपली आहेत.
साहजिकच या बफर क्षेत्रातील अलिझंजा, नवेगाव आणि निमडेला या गेटमधून पर्यटक जाणाऱ्यांची संख्या बघता-बघता वाढत गेली. दरम्यानच्या काळात त्याच्या गळ्यातील पट्टा काढण्यात आला.
ऐन तारुण्यात व उमेदीत असलेल्या ‘छोटा मटका’ने या परिसरातील ‘झरनी’, ‘बबली’, ‘भानुसखिंड’ तसेच ‘आंबा’ या वाघिणीसोबत संसार थाटला आहे. हे करत असतानाच त्याने मोगली या वाघाशी दोन हात केले. ‘मोगली’ आणि ‘छोटा मटका’तील या युद्धात छोटा मटकाच्या उजव्या ओठावर मोठी जखम झाली होती.
या जखमेमुळे त्याचे वरचे ओठ फाटले. जखम बरी झाल्यावर अद्यापही त्याचा ओरखडा बघायला मिळतो. तसेच त्या फाटलेल्या ओठांमधून त्याचे वरच्या बाजूला असलेले दणकट सुळेही सहजपणे नजरेस येतात. या लढाईनंतर मोगली या वाघाने या क्षेत्रातून माघार घेतली.
सध्या येथील ‘झरनी’ या वाघिणीला दोन पिल्ले, ‘बबली’ वाघिणीला तीन पिल्ले तर ‘भानुसखिंड’ वाघिणीची तीन पिल्ले या परिसरातच ‘छोटा मटका’च्या छत्रछायेत मोठी झाली. या सर्व कुटुंबकबिल्यात आणि आपल्या पिल्लांमध्येही ‘छोटा मटका’ आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे.
केवळ आपल्या वाघिणींमध्येच तो रमत नाही तर आपल्या पिल्लांसोबतही त्याचे ममत्व आणि प्रेम अनेक वेळा पर्यटकांनीही अनुभवले आहे.
‘छोटा मटका’चा आकार कमालीचा मोठा आहे. हा वाघ जर जवळून बघितला तर काहीसा थुलथुलीतही दिसतो. शरीरावरील चरबी अधिक झाल्याचे त्याला व्यवस्थित बघितल्यावर लक्षात येते. या सर्व भरभक्कमपणाला कारणीभूत आहे ‘छोटा मटका’ आणि त्याचे पाळीव जनावरांवरील ‘प्रेम’.
हा बलवान वाघ मुख्यतः या परिसरातील पाळीव जनावरांना मारून त्यांना खात असतो. या वनपरिक्षेत्रातील निमढेला, बोथली, वाहनगाव, अलिझंजा, किटाळी, बामनगाव, झरी तसेच पांढरपौनी परिसरातील अनेक पाळीव जनावरांना त्याने आपले लक्ष केले आहे. गाई, बैल तसेच म्हशी मारल्याचे उदाहरणे या परिसरात आहे. यासंदर्भात या बफर वनपरिक्षेत्राचे अधिकारी
धानकुटे सांगतात, साधारणपणे पावसाळ्यात व हिवाळ्यात या सर्व परिसरात कॅटलकिलच्या घटना होतात. उन्हाळ्यात या घटनांचे प्रमाण कमी असते. हा भाग बफर क्षेत्र तसेच त्याच्या काठावरील जंगलात असल्याने साहजिकच त्याला येथे पाळीव जनावरे सहजपणे उपलब्ध होतात.
उमरीखोरापासून ते तळोधीपर्यंतचे बफरचे क्षेत्र तसेच नवेगाव या कोअर क्षेत्रातही हा वाघ फिरत असतो. साधारणपणे सत्तरहून अधिक चौ. किमी क्षेत्रात त्याचा वावर असतो. माझ्या क्षेत्रामध्ये कॅटलकिलच्या घटना जरी होत असल्या तरी आम्ही संबंधित शेतमालकाला नुकसान भरपाई देत असतो.
परंतु कधी-कधी शेतमालकाचे जनावरांचे नुकसान अधिक झाल्याने या वाघाबद्दल रोषही निर्माण होतो. कॅटलकिलच्या घटना जरी होत असल्या तरी हा वाघ कमालीचा शांत स्वभावाचा आहे. अनेक वेळा ‘छोटा मटका’ने मारलेल्या पाळीव जनावरांवर त्याचे संपूर्ण कुटुंब खात असल्याचे बघायला मिळते. कधी-कधी याने मारलेल्या जनावरांवर त्याची पिल्लेही एकत्रितपणे खात असताना बघितली असल्याचे धनकुटे पुढे सांगतात.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील एका शेतात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन वाघांच्या झुंजीमुळे पुन्हा एकदा ‘छोटा मटका’ संपूर्ण देशभरात चर्चेत आला. या वाघाने त्याच्याहून वयाने तसेच अनुभवाने मोठा असलेल्या ‘बजरंग’ या वाघाला ठार मारले.
बफर क्षेत्राला लागून असलेल्या प्रादेशिक क्षेत्रातील वाहनगाव येथील एका शेतात ‘छोटा मटका’ आणि ‘बजरंग’ या वाघात हा संघर्ष झाला. साधारण १२-१३ वर्षांचा ‘बजरंग’ वाघ सात-आठ वर्षांच्या ‘छोटा मटका’सोबत लढला.
या जीवावर उठलेल्या युद्धात अनुभवापेक्षा ताकद वरचढ ठरली. ‘बजरंग’ या वाघाच्या गळ्याला मोठी खोल जखम तसेच त्याच्या हातावरही चावल्याच्या अनेक खुणा बघितल्या गेल्या. या लढाईत ‘छोटा मटका’ जखमी झाल्याच्या सुरुवातीच्या काळात बातम्या आल्या.
मात्र अवघ्या तिसऱ्या दिवशी अंगावरती किरकोळ जखमा घेत या वाघाने आपले क्षेत्र पुन्हा राखण्यास सुरुवात केली. ‘छोटा मटका’चा हा मोठा विजय होता. आपले क्षेत्र, आपल्या माद्या आणि संपूर्ण कुटुंबावरील त्याचा हक्क त्याने प्राणपणाने लढून राखला आहे. या क्षेत्रावरील आपला दबदबा आणि वर्चस्व त्याने कायम राखले आहे. तो पराक्रमी ठरला आहे. (उत्तरार्थ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.