struggle to realize picture in imagination enriches human life and always marks the taste of imperfection sakal
सप्तरंग

थोडा हैं, थोडे की जरुरत हैं।

आमच्या यादव अंकलला म्हणजे वाचमन अंकलला सकाळी सहज विचारलं, दिवाळीनिमित्त काय विशेष म्हणून? आमचा संवाद हिंदीतून झाला.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

‘थोडा हैं, थोडे की जरुरत हैं’मधलं अपूर्णत्व प्रत्येकाला खुणावत राहो, कारण कल्पनेतलं चित्र सत्यात उतरवण्याची धडपड माणसाचं जगणं अधिक समृद्ध करत असते आणि माणसांना अपूर्णत्वाची गोडी नेहमीच खुणावत राहते.

म्हणूनच रोजच्या जगण्याचा उत्सव करताना, जीवनशैली उंचावताना सणाचं महत्त्व आणि अप्रूप टिकून राहावं, असं वाटत असेल तर अवाजवी जाहिरातबाजी आणि दैनंदिन आयुष्यातली अतिरिक्त खरेदी दोहोंपासून स्वतःला जाणीवपूर्वक लांब ठेवलं पाहिजे.

आमच्या यादव अंकलला म्हणजे वाचमन अंकलला सकाळी सहज विचारलं, दिवाळीनिमित्त काय विशेष म्हणून? आमचा संवाद हिंदीतून झाला. आवाजात बेस, थोडंसं उपहासाचं हसू आणि मग लागलेला धीरगंभीर स्वर, ‘‘कुछ नहीं बेटा, हर साल जैसे फोडते आया वैसेही यहा पे सुतली बॉम्ब फोडूंगा.’’

मूळ उत्तर प्रदेशातलं गाव, पोरंबाळं तिथेच, कल्याणला इथे एकट्याने रहाणं आणि वर्षा-दोन वर्षांतून एकदा घरी जाणं. दिवसा सायकलवरून गुलाबजाम विकणं आणि रात्री वाचमन म्हणून ड्युटी करणं, हा गेली कित्येक वर्षे त्यांचा ठरलेला दिनक्रम.

असं असलं तरीसुद्धा त्यांना ट्रेंड फॉलो करायला आवडतं. नवं काहीतरी ट्राय करणं, घेणं, पहाणं हे सगळं ते एकट्यासाठीही आनंदाने करतात. तरीही दिवाळीबाबत फार उदास स्वर ऐकून मलाच चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. गेल्या काही दिवसांत ही उदासीनता अनेकांमध्ये पाहिली, हेही जाणवलं.

ऑनलाईन शॉपिंगचे बहुसंख्य पर्याय पाहून झाले, मोठमोठ्या शॉपिंग मॉल्स आणि स्टोअर्समध्ये जाऊन झालं तरीसुद्धा दिवाळीत घ्यायला, मिरवायला म्हणून काही काही आवडलं नाही. सगळंच घरात आहे, असं वाटलं किंवा हे आता घेण्याची खरंच गरज आहे का, असं वाटून मनाला पटलं नाही.

कपडेच काय, पण कंदील, शोभेचे दिवे, रंगवलेल्या पणत्या, लायटिंग किंवा मग पाकपुक करणाऱ्या माळा यातलंसुद्धा काहीच नवं नकोसं झालं. हातातलं, गळ्यातलं, कानातलं अगदी हे तरी कशाला घ्यायचं नवीन, असं म्हणून ‘काहीतरी नवीन घेऊ’ या इच्छेला सहज माघारी पाठवता आलं. ही अवस्था आपल्यातल्या कित्येकांची आहे.

फराळातही नको किती ते तेलकट, तुपकट, मैद्याचं असं सगळं म्हणत फराळाला या वर्षी सुट्टीच देऊ असं कितीतरी जणांचं ठरवून झालं असेल. नैवेद्यापुरतं काही केलं पाहिजे म्हणून काहींनी फराळ बनवला असेल किंवा ऑर्डरने बनवून घेतला असेल. फटाके वाजवून जमाना झाला असेल, त्यामुळे त्या विषयीची तटस्थता याही वर्षी कॅरी फॉरवर्डच करण्यात येणार असेल.

दिवाळ सणातला हा समंजस स्वर आपल्यातल्या कित्येकांनी हात आखडता घेऊन लावलेला नसून; गरज, हौस, आवश्यकता याचं गणित आखून वा सातत्याने सगळ्यात तोच तो पणा जाणवून घेतलेला आहे.

हे सगळं आलं कुठून, याचा मागोवा घेताना एक धागा हाताशी आला. प्रत्येकाला त्याचा आपला स्वतंत्र धागा गवसू शकतो. माझ्या हाती जे आलं ते होतं खरेदीचे उपलब्ध बहुसंख्य पर्याय. वाढलेल्या म्हणण्यापेक्षा बोकाळलेल्या मार्केटिंगच्या माध्यमातून, जमेल त्या प्रत्येक माध्यमांवर केलेली जाहिरातबाजी.

त्यातून दिवस-रात्र समोर येणारे असंख्य कपडे, साड्या, दिवे, त्यातही हवं ते कापड, रंग, हवी तशी आणि हवी तेवढीच किंमत ठरवून घेता येणारा शोध, यामुळे सगळंच एकदम हाताशी आलं. मार्केटमध्ये खरेदीसाठी जाण्याची निकड तशी उरलीच नाही.

एखाद्यात तसं करण्याची उर्मी शिल्लक असली तरी सगळं आधीच पाहिलेलं असल्याने त्यात नावीन्य जाणवत नाही. ज्यांच्या हाताशी पैसे आहेत, त्यांच्याकडे हवं ते, हवं तेव्हा निवडण्याची सोय आहे. बाजारपेठा सततच फुललेल्या असतात.

सोबतच दैनंदिन आयुष्यातही सणावाराव्यतिरिक्त नोकरीच्या ठिकाणी वा सार्वजनिक आयुष्यात माणसं अधिकाधिक टापटीप राहू लागली आहेत. अनुकरणप्रिय असणारे आपण सगळेच टीव्ही मालिका, चित्रपट या सगळ्यातल्या लाईफस्टाईलचं हुबेहूब अनुकरण करू लागलोय. रोजच्या जगण्याच्या उत्सवात प्रत्येक जण सेलिब्रेशन मोडमध्ये स्वतःला सतत गुंतवून ठेवू पाहतोय. या सगळ्यामुळे सणाचं अप्रूप तितकंसं राहिलेलं नाही.

अर्थात ही समाजातल्या एका ठराविक आर्थिक वा सामाजिक स्तरातल्या माणसांची गोष्ट. म्हणूनच ज्यांच्यासाठी सणाचं अप्रूप सरलेलं नाही, त्यांचा थोडाबहुत हेवा वाटून जातोय. सगळं काही असूनही जे असोशीने सण साजरे करू पाहतायत त्यांच्याविषयी अप्रूप आहे.

ज्या हातांना सणामुळे काम मिळतंय, रोजगार मिळतोय त्यांच्याविषयी मनात आदर आहे. सतत उत्सवी राहणाऱ्या माणसांविषयी कुतूहलही आहेच. कारण त्यांना अजूनही काहीतरी खुणावतंय, ते खुणावणारं त्यांच्याजवळ येतंय या आशेवर ते चालू शकतात, हसू शकतात, त्यांना अपूर्णत्व खुणावतंय, पण ज्यांच्या मनाने संपृक्तावस्था गाठलेली आहे, त्यांना असं करणं फार अवघड जातं.

नावीन्य त्यांना खुणावत नसतं असं नव्हे, त्या नव्याच्या आगमनाच्या हलत्या सावल्या जाहिरातीतून इतक्यांदा पाहून होतात की, सगळं नकोसं होतं. म्हणूनच ज्यांच्या हाताला अजून स्मार्टफोन लागलेला नाही वा लागूनही ज्याच्या स्क्रीन टाईमवर मक्तेदारी सांगितली नाही त्या गृहिणी मला या क्षणी आनंदी वाटतायत.

आई- बापाकडे अजूनही नव्या कपड्यांसाठी हट्ट करणारी, खेळण्यातल्या बंदुका, फटाके, आपटी बॉम्बसाठी हातपाय आदळणारे जीव कधीच मोठे होऊ नयेत, असं वाटतंय. ज्यांना चांगल्या अर्थाने काहीतर हवंय, म्हणजेच ज्या हवं असण्यात हपापलेपण नाही, पैशांमागे धावणं नाही, कुणाशी बरोबरी करणं नाही हे आहे, आपल्या मागच्या दिवाळीपेक्षा ही दिवाळी अधिक संपन्न, साजरी असावी, अशी ज्यांची मनीषा आहे ती सगळीच माणसं सुखी वाटतायत. कारण त्यांच्याकडे थोडं आहे आणि त्यांना आता थोडसंच हवं आहे.

हे ‘थोडा हैं, थोडे की जरुरत हैं’मधलं अपूर्णत्व प्रत्येकाला खुणावत राहो, कारण कल्पनेतलं चित्र सत्यात उतरवण्याची धडपड माणसाचं जगणं अधिक समृद्ध करत असते आणि माणसांना अपूर्णत्वाची गोडी नेहमीच खुणावत राहते. म्हणूनच रोजच्या जगण्याचा उत्सव करताना, जीवनशैली उंचावताना सणाचं महत्त्व आणि अप्रूप टिकून रहावं, असं वाटत असेल तर अवाजवी जाहिरातबाजी आणि दैनंदिन आयुष्यातली अतिरिक्त खरेदी दोहोंपासून स्वतःला जाणीवपूर्वक लांब ठेवलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT