अन्योक्ती (२) sakal
सप्तरंग

अन्योक्ती (२)

सकाळ वृत्तसेवा

सुभाषितरत्नानि

मंजिरी धामणकर,manjiridhamankar@gmail.com

कमळ

अ) रे पद्मिनिपत्र, भवच्चरित्रं चित्रं प्रतीमो वयमत्र किञ्चित्।

त्वं पङ्कजन्मापि यदृच्छभावादपि स्पृश्यस्यम्बु न पङ्कसङ्गि।।

अनुवाद : तुझे वागणे जगावेगळे भासे मज कमळाच्या पाना

जन्म घेसि चिखलात जरी तू, स्पर्शसि त्या चिखलास कधी ना

शब्दार्थ : हे कमलपत्रा, तुझं वागणं मला जगावेगळं वाटतं. दैवयोगानं

तुझा जन्म जरी चिखलात झाला असला तरी तू त्या चिखलमिश्रित पाण्याला स्पर्शही करत नाहीस.

सूचितार्थ : वाईट संगतीत वाढलेल्या; पण तरीही आपलं चरित्र, वागणूक विशुद्ध, स्वच्छ ठेवणाऱ्यांना उद्देशून ही अन्योक्ती आहे.

ब) रुचिरतिरुचिरा शुचित्त्वमुच्चैः शिरसि धृतः स्वयमेव शङ्करेण।

कमलिनि! मलिनीकरोषि कस्मान्मुखमिदमिन्दुमुदीक्ष्य

लोककान्तम्?

अनुवाद : अतिसुंदर, पावन, सुखकारक, शंभु शिरी धारित ज्याला

म्लान तुझे मुख का गे कमलिनी, पाहुनिया त्या चंद्राला?

शब्दार्थ : जो अतिसुंदर आहे, पवित्र आहे, ज्याला शंकरानं आपल्या

शिरावर धारण केलं आहे अशा, सर्व जगाला सुखदायक असलेल्या चंद्राला पाहून हे कमलिनी, तुझ्या मुखाला अशी मलीनता का बरं?

सूचितार्थ : चंद्रोदय झाला की सूर्यविकासी कमळं मिटतात. कितीही

सौंदर्य, गुण दिसले तरी सतत नाक मुरडणाऱ्या टीकाकारांना उद्देशून ही अन्योक्ती आहे.

क) एकस्मिञ्जनिरावयोः समजनि स्वच्छे सरोवारिणी।

भ्रातः सङ्गसुखेन कानिचिदहान्यत्र व्यतीतानि नौ

लब्धं तामरस! त्वया मृगदृशां लीलावतंसास्पदम्

शैवालं विलुठामि पामरवधूपादाहते पाथसि।।

अनुवाद : एका स्थानी जन्म आपुला, सुखे वाढलो इथेच आपण

परस्परांच्या साथीने अन् इथेच केले व्यतीत जीवन

परंतु तुजला हरिणाक्षीच्या प्रसाधनांत मिळाले स्थान

अन् ललनांच्या लाथा मज शेवाळाचा करती अपमान

शब्दार्थ : शेवाळ कमळाला म्हणत आहे : एकाच स्वच्छ सरोवरात

आपल्या दोघांचाही जन्म झाला. इथंच आपले कितीतरी दिवस मधुर मैत्रीसुखात गेले; पण हे कमला, तुला हरिणाक्षीच्या सौंदर्यवर्धक साधनांत स्थान मिळालं आणि मी शेवाळ मात्र स्त्रियांच्या पायांनी ढवळलेल्या पाण्यात इकडून तिकडं लाथा खातो.

सूचितार्थ : दोन सख्ख्या भावंडांपैकी एकाला उच्च पद, संपत्ती,

मानमरातब प्राप्त होतो; पण दुसरा मात्र उपेक्षित; दरिद्री राहतो,

समाजाकडून लाथाडला जातो.

कलश

अ) देवळाचा कळस

भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिस्ताम्राकृतिः सर्वतो।

मा भैषीः कलश! स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि।।

ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेऽधुना।

नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनो लोका बहिर्बुद्धयः।।

अनुवाद : मंदिरकळसा, ताम्रतनू तव आच्छादिलि सोन्याने रे

नको भय तुला, रहा सदोदित मंदिर शिखरी आता रे

ताम्रपणा तव गेला निघुनी, सोनेपण प्रस्थापित रे

भुलती जन हे वरल्या रंगा, अंतरंग ना पाहति रे

शब्दार्थ : हे देवळावरच्या कळसा, तुझा मूळ तांब्याचा देह पूर्णपणे सोन्यानं आच्छादून टाकण्यात आला आहे. म्हणजेच तुझ्यावर सोन्याचा मुलामा चढवला गेला आहे. त्यामुळं तुला आता भिण्याचं काहीच कारण नाही. तू खुशाल मंदिराच्या शिखरावर चिरकाल राहा. तुझं ताम्रत्व आता गेलेलं आहे आणि ‘तू सोन्याचा आहेस’ ही तुझी कीर्ती आता प्रस्थापित झाली आहे. सर्व लोक नेहमी बाह्य देखाव्यालाच भुलणारे असतात. अंतरंगात डोकावून कुणीच पाहत नाही.

सूचितार्थ : स्वतःची पात्रता नसताना वशिल्यानं उच्च पदी चढणाऱ्यांना उद्देशून ही अन्योक्ती आहे.

ब) कळशी, घडा

दृढतरगलकनिबन्धः कूपनिपातोऽपि कलश! ते धन्यः।

यज्जीवनदानैस्त्वं तर्षामर्षं नृणां हरसि।।

अनुवाद : हे कलशा, गळफास घेउनी विहिरीमध्ये जाशि खोल तू

धन्य तुझे ते पतन, तृषा त्यायोगे लोकांची हरसी तू

शब्दार्थ : हे कलशा, स्वतःच्या गळ्याला घट्ट फास लावून घेऊन

विहिरीत खोल जाणं तू पत्करतोस. ते पतनसुद्धा किती धन्य;

कारण ‘जीवन’दानानं, म्हणजे ‘पाणी’ देऊन तू तहानेलेल्या लोकांची तहान भागवतोस.

सूचितार्थ : लोककल्याणासाठी कष्टणारे, देशासाठी फाशी जाणारे

यांना उद्देशून ही अन्योक्ती आहे.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT